कराडचा विज्ञानवेडा ‘पुजारी’

2
72
_vidnyanveda_pujari

यशवंतराव चव्हाण यांचा कराडमधील ‘विरंगुळा’ बंगला हे तीर्थस्थान बनून गेले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना व त्याचा विकास यांसाठी केलेले कार्य स्मरून लोक ‘विरंगुळा’ दर्शनास येतात. ‘विरंगुळा’ला भेट देण्यासाठी येणाऱ्यांची पावले आपसूकच ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’कडे वळतात. चव्हाण यांची ‘दृष्टी’च जणू त्या केंद्रातून सद्यकाळात व्यक्त होत आहे!

आता, प्रवास उलट सुरू झाला आहे! केवळ महाराष्ट्रातून नव्हे, तर देशभरातून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विज्ञानवेडे संशोधक केंद्रात येऊ लागले आहेत आणि मग त्यांची पावले चव्हाण यांच्या ‘विरंगुळा’ बंगल्याकडे वळतात. 

संजय पुजारी यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी केवळ विज्ञान आणि विज्ञानच दिसते! संजय यांना लहानपणी विज्ञानाचे वेड लागले आणि ते वाढतच गेले आहे.

मी आणि अच्युत गोडबोले, आम्ही त्यांच्या ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’ला भेट दिली. आम्हाला आत पाऊल टाकताच एखाद्या टुमदार प्रयोगशाळेत असल्याचा भास झाला. संपूर्ण प्रयोगशाळा वैविध्यपूर्ण साधनांनी, पुस्तकांनी आणि मुला-मुलींनी गजबजून गेली होती. आम्ही जाण्यापूर्वी संजय यांनी आम्ही लिहिलेल्या ‘जीनियस’ या सिरिज पुस्तकांचे मुलांना ‘वाचन करून येण्यास सांगितले होते. संजय यांनी ‘जीनियस’चे शंभराहून अधिक संच मुलांना मोफत वाटले आहेत! आम्ही ‘जीनियस’वर बोलू लागलो – गॅलिलिओपासून ते स्टीफन हॉकिंगपर्यंतच्या वैज्ञानिकांचे आयुष्य आणि काम मुलांसमोर उलगडत होतो. मुलांनीही त्यात सहभाग घेतला. एका मुलाने तर सांगितले, की त्याला रिचर्ड फाइनमन आवडला आहे. तो ‘जीनियस’चे हे पुस्तक त्याच्या आई-वडिलांना भेट देणार आहे. त्याचे कारण रिचर्ड फाइनमनचे आई-वडील त्याच्याशी जसे वागले, त्यांनी त्याला जसे घडवले आणि त्याला जसे समजून घेतले, तशीच त्या मुलाची त्याच्या आई-वडिलांकडून अपेक्षा आहे. 

आम्ही मुलांबरोबर आणि संजय पुजारी यांच्याबरोबर झालेल्या संवादाने समाधान पावून पुण्यात परतलो; मात्र संजय यांचा चेहरा आणि ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’ची वास्तू मनात दीर्घकाळ रेंगाळत राहिली. ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’च्या भिंतीवर दिमाखात लटकणारे आइन्स्टाइन, जेन्नर, फ्लेमिंग, भाभा, एडिसन, हॉकिंग, न्यूटन, राइट बंधू या सगळ्यांचे भव्य, बोलके फोटो विसरताच आले नाहीत. पुजारी यांचे खूप कौतुक वाटले. त्यांनी त्यांच्या जगण्यात, बोलण्यात, वागण्यात विज्ञान भरले आहे.

कराडच्या (साताऱ्याच्या) ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’त जाणे म्हणजे धमाल सहलीचा अनुभव घेणे! पहिलीपासून बारावीपर्यंत, पालकांपासून शिक्षकांपर्यंत अगदी कोणीही तेथे जाऊ शकते. शाळेत न शिकवले जाणारे, पाठ्यपुस्तकात नसलेले विज्ञानाचे मूलभूत प्रयोग तेथे करून बघता येतात. तारांगणाचा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी घेता येतो. इतकेच नाही, तर जादूचे प्रयोग पाहता येतात. बोलका बाहुला मुलांशी गोड आवाजात संवाद _prayogshalaसाधतो. मुलांना तेथे गाता येते, नाचता येते आणि गिटार-बोंगोसारखी वाद्येही वाजवता येतात. तेथे तिसरीच्या मुलांना पट्ट्या दिल्या जातात. त्यांच्या हाताला आणि मेंदूला काम मिळते. मुलांच्या मेंदूची वाढ होण्याचा तो काळ असतो. अशा कृतीमुळे मेंदूतील मज्जापेशींची जुळणी होते, मेंदू शिकतो. त्याची वाढ होऊ शकते. ती मुले कागदापासून पेंग्विन, विमाने तयार करतात. मुलांना विमानांचे आकर्षण असते. ते कृती करत असताना त्यांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशीलतेला संधी मिळते. हाताला, बोटांना वळण लागते. ते करत असताना विमानाचा शोध कसा लागला त्याचा इतिहास समजतो. माणसाने पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडण्यासाठी केलेले प्रयत्न, धडपड, चिकाटी दाखवणाऱ्या व्हिडिओ फिल्म्स मुलांना दाखवल्या जातात. मुलांचे मनोरंजन होऊन त्यांना स्वतः काहीतरी करावे अशी ऊर्जा मिळते. प्रयोग, ज्ञान, मनोरंजन, जादूमागचे विज्ञान, माहिती, बालनाट्य, व्हिडिओ फिल्म, कृती करत शिकणे आणि त्यासाठी तेथे भरणारी रविवारची विज्ञानशाळा… स्वाभाविक आहे, की तेथे मुले वेळेचे भान हरपतात. 

गॅलिलिओ तेथील भिंतीवरून सांगत असतो, की ‘प्रयोग केवळ बघायचे नसतात, तर करायचे असतात!’ आणि तेथील साहित्य मुलांना तसे खुणावत असते. मुलाने कधी रॉकेट बनवले, विमान बनवले हे त्याचे त्यालाही कळत नाही. त्याने बनवलेले ते रॉकेट, विमान, पूल असे सगळे काही घरी घेऊन जाता येते! चंद्रावर वस्ती झाली तर ती कशी असेल, थ्री डायमेन्शन्स म्हणजे काय, फोर्थ डायमेन्शन कोणते, सापेक्षतावाद म्हणजे काय, गतीचे नियम कसे सिद्ध केले गेले असतील, उपग्रह म्हणजे काय, अंतराळवीर कसे काम करतात, आकाशातील ग्रह-तारे कसे दिसतात अशा अनेक गोष्टींबाबतचे मुलांचे कुतूहल तेथेच शमवले जाते. 

संजय यांचे लहानपण कोल्हापूरजवळच्या गडहिंग्लज येथे गेले. त्यांचे वडील मुख्याध्यापक होते, तर आई शाळेत शिक्षक होत्या. त्यामुळे घरातील वातावरण शिक्षणाला अनुकूल होते. संजय यांना वाचनाची गोडी लहानपणीच लागली. ती इतकी, की त्यांनी त्या बालवयात त्यांचे वैयक्तिक वाचनालय असावे असा ध्यास घेतला आणि प्रत्यक्षात आकाराला आणला. त्यांच्याकडे पाच हजार पुस्तकांचा संग्रह आहे. गावात सानेगुरुजी संस्कार शिबिरे होत. शिबिरांसाठी ग.प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते यांच्यासारखी मंडळी येत. यदुनाथ थत्ते मुलांशी कसे बोलतात, कशा गप्पा मारतात हे संजय यांनी जवळून पाहिले आहे.

संजय यांना तंगडे या शिक्षकांमुळे विज्ञान व गणित या विषयांची गोडी लागली. ते स्वतः शाळेमध्ये वेगवेगळे प्रकल्प हातात घेऊन मिळतील त्या वस्तूंच्या साह्याने पूर्ण करू लागले. संजय यांचे रॉकेट बनवणे, पृथ्वी कशी फिरते ते दाखवणे, गणपतींचे देखावे असे नानाविध उद्योग चालायचे. संजय यांनी टीव्हीचे मॉडेलही तयार केले होते आणि त्या मॉडेलमधून राम, सीता, रावण दिसतील अशी व्यवस्था केली होती. लोकही येऊन त्यांचे प्रकल्प पाहून कौतुक करत असत. जी.जे.पाटील या शिक्षकांमुळे संजय यांना नाटक, गाणी, कथाकथन, वक्तृत्व अशा गोष्टींची आवड लागली. संजय राज्य नाट्यस्पर्धेत सहभाग, ‘नटसम्राट’सारखी नाटके-एकपात्री प्रयोग कर, गाणी गा अशा अनेक उपक्रमांत सहभागी होत आणि त्यात यशही मिळवत. 

संजय यांनी शिक्षक होऊन विज्ञानावर काम करण्याचे तरुणपणीच ठामपणे ठरवले होते. त्यांनी मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी’चा कोर्स पूर्ण केला. संजय यांनी फिजिक्स विषयात एम एस्सी पूर्ण केले आहे. त्यांनी ए_prayogshala_pujariम एडदेखील केले आहे. संजय यांनी कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास 1999 साली सुरुवात केली. संजय यांच्या शाळेत मुलांसाठी पक्षिनिरीक्षण, निसर्गसहली, भ्रमंती, छोटे-छोटे प्रयोग करून घेणे अशा धडपडी सुरू असायच्या. त्यातूनच त्यांनी एक प्रकल्प पूर्ण केला. त्यांनी 2001 मध्ये झालेल्या राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये दिल्ली येथे प्रसाद आणि तेजस या विद्यार्थ्यांना घेऊन, शाळेच्या वतीने प्रकल्प सादर केला होता. ते दोघे आता शास्त्रज्ञ म्हणून अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांनी नारळाच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठीचे एक यंत्र तयार केले होते. त्यांना त्या प्रकल्पासह दिल्लीस जाता आले. त्यांना त्या प्रकल्पासाठी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला.

अब्दुल कलाम समोर आले, तेव्हा संजय नकळत त्यांच्यासमोर झुकले. त्यांनी संजय यांना जवळ घेतले आणि त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्यांनी ‘तू कोठून आलास, काय करतोस’ असे प्रश्न विचारले. संजय यांनी ते यशवंतराव चव्हाण यांच्या गावाहून आले आहेत, तेथे शिक्षक म्हणून काम करत असल्याचे कलाम यांना सांगितले. अब्दुल कलाम यांनी संजय यांना त्यांच्या डायरीत ती गोष्ट लिहून द्यायला सांगितली. संजय यांनी लिहिले, ‘मी शिक्षक म्हणून देशासाठी मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान यात काम करणार आहे. कलाम यांनी मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये जे काम केले आहे. त्याचा देशासाठी काय उपयोग हे मी माझ्या गावकडील भागात मराठीमध्ये सांगण्याचे काम करेन’.

संजय सांगतात, “मी गावी आल्यावर अब्दुल कलाम यांना भेटल्याचे ज्याला त्याला सांगत सुटलो. कल्पना चावला यांच्या मृत्यूची बातमी 11 फेब्रुवारी 2003 रोजी आली. संजय यांना तोपर्यंत चावला यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांचे अंतराळ संशोधनातील काम त्यांना नीटसे ठाऊक नव्हते. संजय यांनी कल्पना चावलाविषयी जाणून घेण्यास सुरुवात केली. भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर डॉ.कल्पना चावला कोलंबिया यानातून पृथ्वीवर परत येत असताना, अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. कल्पना यांचा जन्म हरियाणा राज्यातील कर्नालचा. त्यांनी अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स’ ही पदवी 1984 साली मिळवली. त्यांना अंतराळवीर होण्याच्या स्वप्नाने पछाडले होते. त्यांनी पहिल्या अंतराळ प्रवासात 1996 साली 10.67 दशलक्ष किलोमीटर प्रवास केला. ते अंतर दोनशेबावन्न वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याइतके आहे. त्यांची निवड दुसऱ्या उड्डाणासाठीही 2000 साली झाली. ‘नासा’सह अनेक मान्यवर संस्थांनी कल्पना यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. संजय कल्पना चावला यांच्या वडिलांना भेटण्यास कर्नाल येथे गेले होते.

संजय पुजारी कल्पना चावला यांच्या असामान्य कार्याने प्रभावित झाले. संजय यांनी ‘वेध अवकाशाचा’ या शीर्षकाखाली एक व्याख्यान तयार केले. त्यांनी त्यात रंजकतेने काही गोष्टींची गुंफण केली. त्यांनी राइट _achyut_godbole_dipa_Deshmukhबंधूंच्या विमानापासून ते रॉकेट संशोधनातील प्रगतीपर्यंतची हकिगत स्लाइड शो आणि निवेदन अशी मांडली. त्या व्याख्यानातून लोकांसमोर अग्निबाणातील भारताची प्रगती, स्पेस शटल अशा अनेक गोष्टी उलगडल्या जाऊ लागल्या. संजय यांनी विमानांची मॉडेल तयार केली, काही विकत मागवली. संजय यांनी डॉ.अब्दुल कलाम यांना त्यांच्या कामाविषयी खूप पत्रे लिहिली. त्यांनीही पुजारी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसंबंधातील काही पोस्टर्स पाठवली. डॉ.अब्दुल कलाम यांनी पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही रॉकेटची मॉडेलेदेखील त्यांना पाठवून दिली. संजय यांचा हुरूप अब्दुल कलाम यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे वाढला. ते स्वतःची साधनसामग्री घेऊन शाळा-कॉलेजांमध्ये मॉडेलांच्या साह्याने व्याख्याने देत फिरू लागले.

त्यांनी स्वतःच्याच लहानशा घरात समोरची खोली ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’साठी उपयोगात आणली; त्या केंद्रात ‘लर्निंग बाय डूइंग’ या तत्त्वाखाली काम सुरू झाले. विज्ञान केंद्र गर्दीने फुलून जाऊ लागले. घरातील जागा अपुरी पडू लागल्यावर कधी बागेतील झाडाखाली, तर कधी मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये कार्यक्रम, कार्यशाळा, व्याख्याने होऊ लागली. संजय पुजारी विमानचालक होण्याची, कल्पना चावलाप्रमाणे अवकाशात जाण्याची स्वप्ने पेरत आहेत. ते मुलांना फिल्म दाखवतात, लढाऊ विमाने बघण्यासाठी पुण्याच्या ‘नॅशनल डिफेन्स अकादमी’मध्ये घेऊन जातात. त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या केंद्रातील मुले ‘एनडीए’मध्ये गेली आहेत. अवतारसिंग आणि अमोल ही त्याची उदाहरणे. संजय यांच्या मदतीला अनेक तज्ज्ञ मंडळीही विज्ञान उलगडण्यासाठी येऊ लागली. 

कराडजवळील आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी हायस्कूलमध्ये शिक्षक असणारे संजय पुजारी विज्ञानप्रसाराच्या वेडापायी फकीर झाले आहेत. त्यांना त्यांची पत्नी नेहा आणि सासरे यांनी खंबीरपणे साथ दिली आहे. त्यांनी विज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी डोक्यावर पस्तीस लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे घेतले आहे. ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’ची स्वतंत्र वास्तू तयार झाली आहे. कराड अर्बन बँकेनेही संजय यांना मदत केली. कल्पना चावला यांचे वडील बनारसीलाल चावला मुलीच्या नावाने उभारलेले विज्ञान केंद्र पाहण्यासाठी कराडला दोनदा येऊन गेले. त्यांनी कल्पना चावलाचे आठवीत मैत्रीणीला लिहिलेले पत्र, कल्पनाचे नासातील जॅकेट, बॅच असे _pujariसाहित्य केंद्राला भेट दिले आहे. 

संजय पुण्याचे अरविंद गुप्ता यांना गुरू मानतात. त्यांनी ‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’चे ग्रंथालय विकसित केले. पुस्तकांबरोबरच सीडी, डीव्हीडी उपलब्ध केल्या. केंद्रातील इंच न् इंच जागा उपयोगात आणली गेली आहे. शिक्षक आणि पालक यांनाही तेथे प्रशिक्षण दिले जाते. संजय यांनी मोबाइल व्हॅन घेतली आहे. त्यांनी जी मुले केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत केंद्राने पोचावे असे ठरवले आहे. व्हॅन विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टींनी भरलेली असून, ‘विज्ञान तुमच्या घरी’ असा संदेश देत ती ठिकठिकाणी पोचते. तुम्ही कागदाचे विमान बनवले, तर मोठे झाल्यावर खरेखुरे विमान बनवाल… हा संदेश मुलांवर बिंबवला जातो. विमाने बनवताना विमानांवर पुस्तके लिहिलेले माधव खरे हे मुलांना मार्गदर्शन करतात. जवळच्याच उंडाळे गावचे तेजस पाटील हे पायलट आहेत, ते मुलांना विमानाची माहिती देतात. त्या सगळ्याचा मुलांवर परिणाम होतो. पुजारी यांच्याकडे कल्पना चावलाची दुर्मीळ अशी एक फिल्म आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अमोलने कल्पना चावला यांची ती फिल्म पाहिली. भारतात रंगीत टीव्ही 1982 मध्ये नुकताच आला होता. लँडलाईन फोनचा प्रसार होऊ लागला होता. त्या काळात कल्पना चावला स्पेसमध्ये जाण्याचा विचार करते आणि ती अमेरिकेला जाते- मग मी का नाही; असा विचार अमोलच्या मनामध्ये आला. तो आठवीला वर्षभर कल्पना चावलाचा अभ्यास करतो. अमोलचे वडील संजय पुजारी यांना घरी बोलावतात आणि अमोलची खोली दाखवतात. सर्व खोलीभर कल्पना चावलांबद्दल आलेले लेख लावलेले असतात. अमोलने विमानबांधणीशास्त्र शिकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठीची परीक्षा अमोलने दिली. पूर्ण राज्यातून फक्त दोघांची निवड त्यासाठी होत असते, तेथे पहिल्या प्रयत्नात अमोलला यश मिळाले आणि कल्पना चावलाच्या प्रदेशात शिकणार, म्हणून चंडीगडला प्रवेश घेतला, त्याने तो अभ्यास पूर्ण केला. आज तो नासामध्ये जाण्याची तयारी करत आहे. अशीच गोष्ट पाचवीपासून त्या केंद्रात येणाऱ्या अभिलाष सरवदे याची. त्याची आयआयटी पवईसाठी आणि इस्रोसाठी निवड झाली. पुजारी यांनी त्याला देशाची सेवा करण्याची संधी म्हणून इस्रोमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आज अभिलाष इस्रोमध्ये सॅटेलाईटसाठी काम करत आहे, त्याला अब्दुल कलाम यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. गीतेश इनामदार याच्या घरी वडिलांचे कपड्याचे दुकान. वडील म्हणाले, बारावीपर्यंत काहीही कर. गीतेश केंद्रातील रविवारच्या शाळेत यायचा, सहलीमध्ये सहभागी व्हायचा. त्याला परीक्षेत चांगले गुण मिळाले. बारावीनंतर प्रत्येक रविवारी वेगळे काहीतरी असते. मुलांसाठी सहली असतात, एखाद्या घाटात जायचे- बरोबर कोणीतरी प्राणीशास्त्र-वनस्पतीशास्त्र प्राध्यापक असतात, तेथे मुलांचे गट केले जातात. त्यांनी तेथील फुलपाखरे, किडे, साप, रंगीत दगड जे दिसेल त्याची माहिती घ्यायची. हे फक्त विज्ञानाच्या दृष्टीने नव्हे कारण पुढे मुलांची आवड कोणत्या क्षेत्रात असेल ते सांगता येत नाही. पालक-शिक्षकांनी त्यांना कशात बांधून घ्यायचे नाही. अनेक मार्ग आहेत. त्यातून त्यांना आवड ओळखता येईल व आवडीप्रमाणे काम मिळवता येईल, समाधान मिळेल म्हणून जे काही नवीन दिसेल त्याची माहिती द्यायची. 
एस.एस.पाटील हे प्राणिशास्त्राचे प्राध्यापक, मुले त्यांच्याबरोबर जंगलात भटकतात. त्यांनी पावसाळ्यात मुलांना चाळीस प्रकारची गांडुळे दाखवली. जळू अंगाला चिकटली, की रक्त शोषते. जळूचे तीन जबडे दाखवले. मोठी फुलपाखरे हा निसर्गातील खजिना पुस्तकातून कसा सापडेल? पाटील पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढतात. सापांच्या माहितीचा स्लाईड शो दाखवतात. समाजातील तज्ज्ञ व्यक्तींची मुलांना माहिती देण्यासाठी, विविध अनुभव देण्यासाठी विज्ञान केंद्रामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. सुधीर कुंभार- पर्यावरण, सी.डी.साळुंखे- वनस्पतीशास्त्र, राजेंद्र कदम- मॉडेल तयार करणे, तर शंतनू कुलकर्णी- आरोग्यशास्त्र अशी उच्चशिक्षित मंडळी त्यांच्या विषयाशी संबंधित कार्यक्रमांत सहभागी होतात. ब्रह्मनाळकर हे इंजिनीयर कोयना धरण बांधताना होते. त्यांनी धरणाची जागा कशी निवडली, तेथपासून ते धरण कसे बांधून पूर्ण केले याची माहिती देत होते. मुलांच्या सहली सायन्स पार्क- पुणे, रेल्वे म्युझियम येथे नेल्या गेल्या आहेत. सहली दांडेली जंगलातही जातात. गीतेश आणि विराज अनगळ दांडेलीच्या जंगलात जायचे, त्यांची जंगले फिरण्याची _pujariआवड वाढत गेली. अस्वलांच्या मोजणीसाठी गीतेशला, तर वाघ मोजण्यासाठी विराजला बोलावले जाते.  

कल्पना चावला यांचे स्मारक म्हणून उभारलेल्या त्या केंद्रात खूप काही आहे. व्याख्याने, चर्चा, प्रश्नमंजूषा, विज्ञानभेटी यांपासून ते अगदी रोबोच्या कार्यशाळेच्या संधी तेथे आहेत. आकाशदर्शन आहे. मुंबईमध्ये पूल पाहिलेले, दुसरीत शिकणारे मूल केंद्रात त्याच्या सवंगड्यांना घेऊन लाकडी पट्ट्यांपासून लांबच्या लांब पूल तयार करते. त्या पुलाखाली दुकानेही उभारते. संजय यांना त्यांच्या कामाला हातभार लावणारे चिन्मय जगधनी, भूषण नानावटी, प्रमोद, कबीर मुजावर, कुमार, तरल यांच्यासारखे बुद्धिमान तरुणही मिळाले आहेत. त्या केंद्राला जयंत नारळीकर, नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर, पर्यावरणतज्ज्ञ अरविंद देशमुख, सुरेश नाईक, मोहन आपटे, रघुवीर साखवळकर, विपुल व अपर्णा राणा या मान्यवरांनी भेटी देऊन मुलांना मार्गदर्शन केले आहे. 
संजय पुजारी यांना केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

‘कल्पना चावला विज्ञान केंद्रा’चे ब्रीदवाक्य ‘स्वप्नाकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग अस्तित्वात आहे. तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य तुमच्यात असले पाहिजे,’ हे आहे.

संजय पुजारी  92261 63260, 92264 68088,  90214 02254.
kcsc.karad@yahoo.com
डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र, ओंकार अपार्टमेंट,
श्री हॉस्पिटलजवळ, रुक्मिणीनगर, कराड – 415110
वेबसाइट : http://www.kcsckarad.com/
(नामदेव माळी यांच्या लेखनातील काही भाग)

– दीपा देशमुख 95455 55540
deepadeshmukh7@gmail.com
(बाईटस् ऑफ इंडियावरुन उद्धृत, संपादित-संस्कारित, विस्तारित)

About Post Author

2 COMMENTS

  1. प्रेरणादायी काम, खूप छान…
    प्रेरणादायी काम, खूप छान वाटले माहिती वाचून.

Comments are closed.