कयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला

3
19
-heading

हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीच्या काठावरील तीनशेसतरा हेक्टर जमीन कुरणक्षेत्र म्हणून संरक्षित केली गेली आहे. ते जवळ जवळ बारा गावे व त्यांतील लोक यांच्या प्रयत्नातून साध्य झाले आहे. त्यापाठीमागे आहे ‘उगम’ संस्था आणि तिचे अध्यक्ष जयाजी पाईकराव. ‘उगम ग्रामीण विकास संस्थे’ने कुरणक्षेत्र संवर्धन कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. समगा, दुर्गधामणी, वसई, टाकळी, खेड, हिंगणी, पूर, कंजारा, नांदापूर, हरवाडी, सोडेगाव, सावंगी, टाकळगव्हाण या गावांमधील लोकांनी मोहिमेत सहभाग घेतला. तेथे चराईबंदी व कुऱ्हाडबंदी आहे आणि ती लोकांच्या पाठिंब्यातून यशस्वी झालेली आहे.

कयाधूकाठी असलेल्या कुरणक्षेत्रात पस्तीस प्रकारचे गवत आहे. त्यामध्ये मारवेल हे उच्च प्रतीचे गवत आहे. ते गवत गुरांना दिल्यास दुधाचे प्रमाण वाढते व दुधातील स्निग्धताही वाढते. त्यामुळे दुधाला भाव जास्त मिळतो, पशूची शरीरयष्टी सुधारते. पशूचे आवडते गवत मारवेल हेच आहे. कयाधूकाठावर पवना नावाचे गवतही आहे. निव्वळ पवना गवत दुभत्या जनावरांना दिले तर त्या दुधापासून उच्च प्रतीचे तूप तयार होते. म्हणून त्या बारा गावांमध्ये ‘पवन्याचे तूप’ ही संज्ञा लोकप्रिय आहे. कुरण विकासाच्या मोहिमेला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग (नवी दिल्ली), भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (पुणे) व पर्यावरण शिक्षण केंद्र (पुणे) यांचे सहकार्य लाभले आहे. ते क्षेत्र आता जैवविविधतेचा खजिनाच ठरत आहे; पर्यावरणप्रेमींसाठी नंदनवन झाले आहे! कुरण संवर्धन मोहिमेचा भाग म्हणून प्रथम लोकांना गवत वाढवण्याची महती सांगण्यात आली. तोपर्यंत शेतकऱ्यांचा अनुभव असा होता, की गवत आपोआप वाढते. गवत संवर्धन  करणे ही जाणीवच ग्रामस्थांना नवी होती. 

कयाधू नदीकाठी कुरणक्षेत्र मोठ्या प्रमाणावर पन्नास वर्षांपूर्वी होते. परंतु कुटुंबांची विभागणी होत गेली तसे जमिनीचे तुकडे झाले; त्याचबरोबर, कुरणक्षेत्राचे तुकडे झाले. शेतकऱ्यांनी तेथील गवत नष्ट करून शेती केली. त्यामुळे पाणी संवर्धन रुकले गेले. तसेच, तेथील माती पावसाबरोबर वाहून गेली. परिणामी, नदीचे पात्र रुंद झाले, तर काही ठिकाणी नदीचा प्रवाह बदलला. स्थानिक गवताचे गुणधर्म पुण्याच्या ‘बायफ’ संस्थेकडून संशोधन केले गेले; तर मारवेल व पवना हे दोन गवतप्रकार उच्च प्रतीचे असल्याचे निष्पन्न झाले. शेतकऱ्यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यातून त्यांना पैसे मिळू लागले. तसेच, काही शेतकरी गवतविक्री करतात. गुरे असल्यामुळे शेण व शेणखत विक्री करतात. कुरणक्षेत्रातून सोयाबीनपेक्षा (सध्याचे मुख्य मागणीचे पीक) जास्त उत्पादन मारवेल गवतातून मिळते!

कयाधू नदीकाठावरील कुरणक्षेत्राला शांती (जर्मनी), फ्युमी (जपान), एस.एन.डी.टी. महाविद्यालय (मुंबई), यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (सातारा), अखिल सर समाजकार्य महाविद्यालय (परभणी) अशा विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत.

कयाधू काठावर जोंधळी गवताचेही अस्तित्व आहे. ते गवत मका, ज्वारी यांच्या पिकासारखे दिसते. ते गवत पंच्याहत्तर दिवसांचे आहे. त्याच्या पानांवर काटे नसतात. ते त्यामध्ये पोषक द्रव्ये जास्त असल्यामुळे जनावरांना आवडते. ते गवत विशिष्ट उंचीवरून कापल्यास कायमस्वरूपी उत्पादन मिळू शकते.

स्टायलो गवत पशूंसाठी पौष्टिक, रुचकर व सकस आहे. तसेच, त्या गवताचा वापर क्रिकेटच्या मैदानासाठी केला जातो. त्याबरोबर त्या कुरणक्षेत्रात चिकटा, गोंडाळी, काळी कुसळी, कोल्हा शेपूट, लाल मारवेल, पसरट मारवेल, लालभरड, रेशमकाटा, खांडसूर्या, कसई, पांढरी कुसळ, डोंगरी, पंधाड, पवना, बोंडी, पाल, बांबू, कुंदा, हराळी, बुरसाळी, दशरथ, लीचडा, केना, बिंडी, फुलराणी (घास आडकी), कांडी गवत, गोंडवेळ, लवंग गवत इत्यादी प्रकारांचे गवत आढळते.

कुरणक्षेत्र निर्माण झाल्याने गावांमधील चाऱ्याचा प्रश्न मिटला. तसेच, दुधउत्पन्नामुळे त्यांना उपजीविका निर्माण झाली आहे. ज्यांच्याकडे जनावरे आहेत ते दुधाचा व्यवसाय करू शकतात. ज्यांच्याकडे पशुधन नाही ते गवताची विक्री करू शकतात. गवतापासून पिकाइतके उत्पादन सहज शेतकऱ्यांना मिळू शकते.

गवताला जोडून फुलपाखरे येतात. तेथे पायरिडी, कॉमन लाईन ब्लू, ग्राम ब्लू, ग्रास ज्युवेल, कॉमन ग्रास येलो स्ट्राईपड टायगर इत्यादी जातींची फुलपाखरे आढळतात. त्याचबरोबर मावा, ढालकिडा, घोडा (हेलिकॉप्टर), थुंकी किडा, सोनकिडा अशा किटकांचेही अस्तित्व आहे. उलटी छत्री, आम्लेट अळंबी यांचेही प्रमाण मोठे आहे. बेडूक, टोड, पाली, सरडे, मधमाशा यांचा वावर तेथे आहे.

कयाधू नदीकाठावरील जैवविविधता संवर्धन करण्यासाठी मुख्य संशोधक जयाजी पाईकराव, प्रकल्प समन्वयक म्हणून मी, तर अॅनिमेटर धनंजय पडघन, मुख्तधीर पठाण व पर्यावरण शिक्षण मित्र सुभाष खंदारे कार्यरत आहेत.

विकास कांबळे 7722048230
kamble358vikas@gmail.com 

About Post Author

3 COMMENTS

  1. The work is so good and…
    The work is so good and helping people to promote sustainable livelihood with conservation of natural resources.

Comments are closed.