कचेरीचे गाव सावरगाव

carasole

येवला शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर, अहमदनगर-मनमाड महामार्गाला लागून असलेले पवारांचे गाव म्हणजे सावरगाव. इंग्रजांच्या काळात ते तालुक्याचे गाव होते व तेथे कचेरी (तहसील कार्यालय), कोर्ट इत्यादी महत्त्वाची शासकीय कार्यालये होती. इंग्रजी काळात त्यास ‘कचेरीचे सावरगाव’ असे म्हणत असत.

राजे रघुजीबाबा यांनी सतराव्या शतकात येवला गाव वसवले. तत्पूर्वी तेथे घनदाट जंगल होते व आसपास थोडीफार शेती होती. त्या भागास येवलवाडी असे म्हणत. ‘पाटोदा’ हे सतरा-अठराव्या शतकात परगण्याचे गाव होते. अनेक खेड्यांचा मिळून परगणा होत असे. परगण्यातील सर्व गावांतील पाटील व कुलकर्णी यांचे नायक अनुक्रमे देशमुख व देशपांडे असत. हे देशमुख व देशपांडे परगण्याच्या गावी गढ्या बांधून राहत. पाटोदा हे परगण्याचे गाव असल्याचा उल्लेख १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचे सेनापती, येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांच्या जबानीत आलेला आहे.

पाटोदा हे परगण्याचे गाव १८५९ पर्यंत होते, सावरगाव तालुक्याचा समावेश अहमदनगर जिल्ह्यात होता. नाशिक जिल्ह्याची निर्मिती १८६९ मध्ये झाली तेव्हा पाटोदा परगण्याचा, सावरगाव तालुक्याचा समावेश नाशिक जिल्ह्यात केला गेला.

रघुजीबाबांनी येवला वसवल्यानंतर खडकी (औरंगाबाद), पैठण, बागानगरी (हैदराबाद), अहमदाबाद इत्यादी ठिकाणांहून विणकर-कारागीर येवला येथे आले. त्यामुळे येवला येथे मोठ्या प्रमाणावर वस्त्रनिर्मिती उद्योग सुरू झाले. येवला येथे नगरपालिकेची स्थापना १८५८ साली झाली. येवल्यात रेल्वेचे आगमन १९६९ मध्ये झाले.

सावरगाव येथील तहसील कचेरी येवले येथे कधी स्थलांतरित झाली याबद्दल काही संदर्भ ‘बॉम्बे गॅझेटीअर १८८३’ मध्ये आढळतात. येवले येथील मामलेदाराने पैठण येथून १८३६ मध्ये आलेल्या काही सोने, चांदी दराचे काम करणाऱ्या कारागिरांना व्यवसाय करात सूट दिल्याचा उल्लेख आढळतो. येवले येथे १८६० साली कोर्ट सुरू झाल्याचा उल्लेख आहे. त्यावरून असा निष्कर्ष निघतो, की सावरगाव येथील तहसील कार्यालय येवले येथे स्थलांतरित होऊन येवले गावास एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला तालुक्याचा दर्जा मिळाला.

साबरवाडी रस्त्याला लागून असलेल्या पुरातन कचेरीच्या इमारतीच्या पायाचे अवशेष व गावाच्या पूर्वेला ब्रिटिश अधिकाऱ्यांचे थडगे आहे.

सावरगाव येथे स्थायिक झालेली मराठा समाजाची प्रमुख घराणी म्हणजे पवार, काटे, काकड व ब्राह्मण समाजातील कुलकर्णी, जोशी, देशपांडे इत्यादी. सावरगाव येथील कचेरी व प्रशासकीय कार्यालये येवला येथे स्थलांतरित झाल्यानंतर सावरगाव येथील ब्राह्मण समाज तेथून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला. तथापी, अन्य मराठा व बहुजन समाज यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे तो समाज सावरगावमध्ये स्थायिक आहे.

सावरगाव येथे स्थायिक झालेले पवारांचे पूर्वज धार येथून आले. मध्यप्रदेशातील देवास येथील थोरल्या पातीचे तुकोजी पवार (१७८९ ते १८२७) यांच्या घराण्याची जहागिरी लासलगावजवळील कोटमगाव येथे होती. त्या जहागिरीची व्यवस्था धारचे गोविंदराव पवार बघत होते. दोनशे वर्षांपूर्वी सावरगाव येथे मुस्लिम प्रशासक होता. त्याचा सावरगावच्या वेशीजवळ गढीवजा वाडा होता व आसपास दोनशे एकर जमीनजुमला होता. सावरगाव येथील जनता त्याच्या जाचास कंटाळली होती. जनतेने तिची गाऱ्हाणी कोटमगाव येथील गोविंदराव पवारांपुढे मांडली. गोविंदरावांनी सावरगाव येथे येऊन तेथील जुलमी व अन्यायी शासकाची हकालपट्टी केली व कारभार स्वतः हाती घेतला. तेव्हापासून पवार घराणे सावरगाव येथे स्थायिक झाले.

त्याच घराण्यातील श्री. मारोतराव पवार यांनी १९८५ ते १९९५ पर्यंत दहा वर्षे विधानसभेत येवला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.

सावरगावातील (नव्हे तालुक्यातील) सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती म्हणून भाऊराव गोविंदराव पवार यांचे नाव घेतले जाते. त्यांची जन्मतारीख १९ जुलै १९०६ ही आहे. जन्मतारखेचा मूळ दाखला त्यांच्याकडे आहे. येवला गावात त्यांची ओळख दोन काठीचे बाबा म्हणून सांगितली जाई, कारण ते दोन काठ्या हातात घेऊन चालत. त्यांचे वय १०७ वर्षें असूनसुद्धा त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. सावरगावात दीडशे वर्षांपूर्वीचे सतीमंदिर आहे. घराण्यातील एका कर्त्या पुरुषाबरोबर त्याची पत्नी सती गेली. जी स्त्री सती गेली तिच्यावर तिच्या जावेचे अतोनात प्रेम होते. तिला तिच्या जावेचा विरह सहन न झाल्यामुळे तिनेसुद्धा जावेपाठोपाठ चितेवर उडी घेतली. एका स्त्रीसाठी दुसरी स्त्री सती जाणे हे भारतातील एकमेव असे उदाहरण आहे. या सती गेलेल्या दोन जावांची स्मृती म्हणून त्याकाळी सावरगावात बांधलेले ते सती मंदिर.

स्वामी समर्थ सुमारे दीडशे वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यात आले होते. त्यांनी अंकाई येथे अगस्थी महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सहा-सात महिने) सावरगावी मुक्काम केला. त्यानंतर ते शिर्डी, नगर, दौंड मार्गे अक्कलकोट येथे गेले. ज्या ठिकाणी स्वामींनी मुक्काम केला होता तेथे मठ आहे. तो स्वामी समर्थांचा या सर्वांत पुरातन मठ मानला जातो.

सावरगाव येथील प्राथमिक शाळा ही येवला तालुक्यातील सर्वात जुनी शाळा असावी. तेथील जन्मदाखल्याचे पुरातन असे रजिस्टर सुस्थितीत आहे. त्यात १८ ऑक्टोबर १८६८ पासून पुढील सर्व नोंदी आढळतात. आरंभीच्या नोंदी (१९०० पर्यंतच्या) मोडी लिपीत असून त्यानंतरच्या नोंदी मराठी देवनागरीमध्ये आहेत. गावात पवार, देशपांडे, कुलकर्णी या घराण्यांचे पुरातन वाडे आहेत. गावात पुरातन पिराचे एक स्थान आहे. पूर्वी तेथे उरुस भरत असे.

– नारायण क्षीरसागर

Last Updated On – 14th July 2017

About Post Author

4 COMMENTS

  1. मी येवल्याचा असून मला हये
    मी येवल्याचा असून मला हे माहित नव्हते. खूप छान माहिती मिळाली.

Comments are closed.