कचारगडची प्रागैतिहासिक गुहा

0
59

गोंदिया जिल्ह्यातील कचारगडच्‍या गुहेत प्रागैतिहासिक मानवाच्‍या अस्तित्‍वाचे पुरावे मिळाले आहेत. ती गुहा गोंड समाजाच्‍या आराध्‍य दैवताचे स्‍थान समजली जाते. महाराष्ट्रातील ज्ञात अशा सर्व नैसर्गिक गुहांमध्ये आकाराने सर्वात मोठी गुहा येथेच असून तिची निर्मिती एकाच दगडात झाली आहे.

मानव निसर्गात जन्मला, वाढला, उत्क्रांत झाला. त्याने निसर्गावर मातही केली! मानवी संस्कृतीची पहाट झाली ती निसर्गाच्या साक्षीने, सरितांच्या कुशीत; परंतु या सुसंस्कृत मानवापूर्वीही मानवी अस्तित्व हे होतेच. सर्वसामान्य जन त्यास आदिमानव म्हणून ओळखतात. आदिमानव ख-या अर्थाने निसर्गपुत्र होते. त्यांचे जीवन निसर्गावर आधारित होते. भूक लागल्यास कंदमुळे-फळे खावी, शिकारीत मारलेल्या पशूंचे मांस खावे, अंगावर वृक्षाच्या साली, पाने अगर जनावरांची कातडी पांघरावी आणि निवारा म्हणून निसर्गातीलच झाडे, कडेकपारी अगर गुहा-गव्हरांचा आश्रय घ्यावा असा त्यांचा नित्यक्रम होता.

 

पुरातत्त्वज्ञांनी मानवी अस्तित्वाच्या त्या कालखंडास प्रागैतिहासिक काळ असे सार्थ नाव दिलेले आहे. त्या काळाची व्याप्ती व्यापक व प्रदीर्घ आहे. मानवाच्या पृथ्वीवरील जन्मापासून प्राचीन प्रथापरंपरेच्या आरंभकाळातील आणि लिपीच्या प्रचलनापूर्वीच्या पाषाणकाळातील मानवी संस्कृतींना त्या कालखंडामध्ये स्थान दिले जाते.
प्रागैतिहासिक मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे त्याची दगडी हत्यारे व निवासस्थळे यांच्या स्वरूपात प्राप्त झालेले आहेत. विदर्भात वर्धा-वैनगंगा नद्यांच्या खो-यांतूनही तसे ते मिळाले आहेत. चंद्रपूर शहरालगतची ‘पापामियां की टेकडी’ व गोंदिया जिल्ह्यातील कचारगडची प्रागैतिहासिक गुहा ही त्यांपैकी प्रमुख स्थळे होती.
महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर स्थित असलेला गोंदिया हा जिल्हा वनाच्छादित आहे. तेथील नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, इटियाडोह धरण यांसारखी स्थळे पर्यटकांना परिचयाची आहेत. त्या स्थळांच्या जोडीला निधड्या छातीच्या साहसी निसर्गप्रेमी पर्यटकांना आव्हान देईल असे स्थळ म्हणजे दरेकसा गावालगतची कचारगडची प्रागैतिहासिक गुहा होय.
कचारगड हे स्थळ मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गावर दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशनच्या लगत घनदाट अरण्यात आहे. दरेकसा स्थानकावर केवळ पॅसेंजर गाड्या थांबतात. बसमार्गाने गोंदिया सालेकसा या स्थळाहून तेथे पोचता येते. छत्तीसगड राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ डोंगरगड हेसुद्धा तेथून जवळच आहे.
सालेकसा-दरेकसाचा परिसर घनदाट अरण्य व वेळूची वने यांसाठी प्रसिद्ध आहे. त्या प्रदेशातून आगगाडीने जाताना वेगळीच अनुभूती लाभते. दरेकसानजीकच्या हाजरा फॉल या प्रसिद्ध धबधब्याच्या जवळ असलेल्या बोगद्यास पार करून आगगाडी दरेकसा स्टेशनवर थांबते. आगगाडीतून उतरताच प्रथमदर्शनी जाणवणारी गोष्ट म्हणजे सशस्त्र जवानांची व्यापक उपस्थिती. प्रदेश नक्षलग्रस्त असल्यामुळे एस.आर.पी.ची गस्त हा तिथला नित्याचा प्रकार आहे. परंतु बाहेरून येणा-या पर्यटकांस त्यामुळे नक्षलग्रस्त प्रदेशाची प्रकर्षाने जाणीव होते. गाव पार करून कचारगडच्या गुहेकडे जाताना पोलिस ठाण्याच्या संरक्षणार्थ बंदुकीच्या नळ्या ताणून सशस्त्र उभे असलेले जवान पाहून ती भावना आणखी गडद होते.
कचारगडच्या गुहेत जाणे हे सामान्य कुवतीच्या माणसाचे काम नव्हे. दरेकसापासून कचारगड असे मार्गक्रमण करताना त्याचा प्रत्यय वारंवार येतो. दरेकसालगतच्या धनेगाव या वनग्रामापासून कचारगडच्या गुहेकडे मार्ग जातो. नवख्या पर्यटकाने जाणकार वाटाड्या गावातून घेणे उत्तम. धनेगाव गावापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे पहाडीत गुंफा आहे. डोंगर चढत-उतरत, जंगल तुडवत त्या स्थळी जाऊन पोचताच स्वागतासाठी उभी असतात ती मधमाश्यांची घरकुले व त्याभोवती घोंगावणा-या माश्या. गुहेच्या दाराचे व त्यावर लटकणा-या अनेक पोळ्यांचे दुरूनच दर्शन होते.
तो गुहासमूह मैकल पर्वतश्रेणीमध्ये यू आकाराच्या दरीत पश्चिम-दक्षिण असा पसरलेला आहे. समुहात चार नैसर्गिक शैलाश्रये आहेत. ती गुहा पर्वताच्या पायथ्याशी वाहणा-या दोन पावसाळी प्रवाहांपासून पाचशेअठरा मीटर उंचीवर असून गुहांचा पृष्ठभाग राखेच्या अवशेषांनी भरलेला आहे.
गुहासमुहातील सर्वात मोठी गुहा ही उत्तर-दक्षिण अठ्ठावन मीटर लांब व सत्तावन मीटर रुंद आहे. तिचे छत अतिशय उंचावर आहे. ती पर्वताच्या पोटात नैसर्गिक रीत्या एकाच खडकात तयार झालेली आहे. गुहा पश्चिमाभिमुख असून तिचे प्रवेशद्वार पंचवीस मीटर इतके रुंद आहे, तर तिच्या कमानीची (आर्च) सरासरी उंची चौ-याण्णव मीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील ज्ञात अशा सर्व नैसर्गिक गुहांमध्ये आकाराने सर्वात मोठी अशीच ही गुहा आहे.
गुहेच्या छताच्या आग्नेयेस छताच्या कोप-याशी मोठे छिद्र आरपार गेले आहे. त्यातून आकाशदर्शन होते. त्यामुळे गुहेमध्ये दिवसभर भरपूर प्रकाश खेळत राहतो. पश्चिमेच्या दारातून दुपारनंतर भरपूर सूर्यप्रकाश आत येतो. त्यामुळे गुहेत सुलभतेने वावरता येते. गुहेच्या दक्षिण कोप-यात नैसर्गिक झरा असून त्याचे पाणी पिण्यास योग्य आहे. गुहेमध्ये नैऋत्येस व उत्तर बाजूस कमीत कमी तीन खोल कोनाडे (विवर) आहेत. त्या ठिकाणी यायचे झाल्यास मात्र टॉर्चची गरज भासते. कोनाडे खोल असून आत निमुळते होत गेलेले आहेत.
गुहेमधील पूर्व व उत्तर बाजूंचा बहुतेक पृष्ठभाग हा राखेच्या निक्षेपाने व्याप्त असून पावसाळ्यात छताच्या छिद्रातून पडणा-या पावसाच्या पाण्यामुळे गुहेच्या पृष्ठभागावरील काही राख व अवशेष वाहून गेलेले आहेत. तथापी बरेच क्षेत्र मानवी हस्तक्षेपापासून अबाधित राहिलेले आहे. त्या ठिकाणच्या राखेच्या थरात पूर्वपुरातन काळातील दगडी अवजारे व इतर पुरावशेष आढळतात.
सालेकसा तालुक्यात पुरातत्वाच्या दृष्टीने महत्‍त्‍वाचे अवशेष मिळाल्यामुळे या तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या प्रागैतिहासिक शाखेने (नागपूर कार्यालय) ऑक्टोबर 1982 मध्ये त्या ठिकाणी चाचणी उत्खनन केले होते. कचारगडाच्या उत्खननात चकचकीत कु-हाड, छन्नी, उखळ हे पाषाणशस्त्रे सापडलेली आहेत. यावरून या गुहेत आदिमानवाचे वास्तव्य होते, असा अंदाज बांधता येतो. उत्खननात गुहेच्या मध्यभागी मानवी वसाहतीशी निर्देशक असे सहा पृष्ठभाग प्राप्त झाले. त्यातून मध्यपाषाण काळापासून नवाष्म युगापर्यंतची विविध हत्यारे, नवपाषाण काळाची निदर्शक मृदभांडी, त्याचप्रमाणे महापाषाण संस्कृतीची निदर्शक अशी कृष्णलोहित मृदभांडीसुद्धा प्राप्त झाली. उत्खननकर्त्यांच्या मते, नैसर्गिक गुहेमध्ये प्राप्त मानवी अवशेषातून मध्याश्मयुगातील अवजारे व मृदभांडी गुहेमधून प्राप्त होणे हा पुरावा संपूर्ण भारतात आश्चर्यकारक असा आहे. कारण त्यापूर्वीची नवाश्मयुगाशी संबंधित सर्व वसाहतस्थळे ही मोकळ्या व सपाट जागेत होती. कचारगड येथून प्राप्त पुरावशेष नवाश्मग्युगातही या प्रकारच्या नैसर्गिक गुहांमध्ये मानवी वसाहत होती या बाबीकडे आपले लक्ष वेधतात.
ती गुहा साधारणपणे पाचशे माणसे आरामात उभी राहू शकतील एवढी मोठी, तसेच प्रकाश व पाणी यांनी समृद्ध आहे. त्याशिवाय वारा, पाऊस, ऊन यांपासून नैसर्गिक रीत्या तिथे संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे अश्मयुगीन मानवाने आपल्या निवासासाठी त्या स्थळाचा उपयोग करणे अत्यंत स्वाभाविक होते.
कचारगड येथे इतर तीन गुहा लहान आहेत. तथापी त्यांचा पृष्ठभागसुद्धा राखेच्या निक्षेपांनी युक्त आहे. त्यापैकी मुख्य गुहेच्या वायव्येस दोन व पूर्वेस एक गुहा आहे.
कचारगडच्‍या गुहा या गोंड समाजाचे धार्मिक स्थळ आहे. त्याच्या धारणेनुसार त्‍या गुहा म्हणजे त्यांच्या देवांचे निवासस्थान आहेत. त्यांच्या पूर्वजांची अवजारे त्या गुहेत पुरलेली असल्‍याचा समज गोेंड लोकांमध्‍ये प्रचलित आहे. त्‍या पारंपरिक समजुतीमागे पुरातत्त्वीय वस्तुनिष्ठता दडलेली आहे, हे सत्य नाकारता येत नाही. प्रस्तुत संदर्भात रेव्हरंड हिप्लॉप यांनी एका सुपरिचित गोंडी लोकगीतातून नोंदवलेली स्थानिक आख्यायिका येथे विशद करणे महत्त्वाचे ठरावे.
स्थानिक भाषेत या स्थळास काचगड अथवा कचारगड असे म्हणतात. काचगड या शब्दाचा शब्दश: अर्थ लोहगड असा होतो. काच या गोंडी भाषेतील शब्दाचा अर्थ लोखंड असा होतो. लोकगीतातील उल्लेखानुसार महादेव म्हणतो, की लाल टेकडीच्या गुहेमध्ये (काचीकोपा) गोंड लोक बंदिस्त करून ठेवले व त्यावर विशाल प्रस्तर लावून गुहेचे तोंड बंद केले, तेव्हा आदिवासींचा नायक लिंगो याने तो प्रस्तर बाजूला ढकलून सोळा जमातींच्या आदिवासींना मुक्त केले. ते सर्व आदिवासींचे पूर्वज होते. ही आख्यायिका कचारगड या स्थळाविषयी असणे संभवनीय आहे. स्थानिक आदिवासींच्या मनात स्थळाविषयी अपार श्रद्धा व आदर दिसून येतो. त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात मोठी यात्रासुद्धा भरते.
– मनोहर नरांजे
9767219296

Last Updated On – 19th May 2016

About Post Author