‘ओपिनीयन’ला निरोप देताना…

अजून ज्याला तारुण्य लाभायचे आहे अशा होतकरू किशोराचे अचानक निधन झाले हे ऐकून मनात जसे सुन्न वाटते; तसेच, 'ओपिनीयन' हे गुजराथी मासिक बंद पडणार ही वार्ता ऐकून वाटले. त्याचे 'एकला चलो रे' असे व्रत घेतलेले संपादक श्री. विपुलभाई कल्याणी यांच्याबद्दल खूप खंत वाटली. त्यांनी अतिशय आटापिटा करून पंधरा वर्षे 'ओपिनीयन'ला जोपासले, पण अखेर छपाई, टपालव्यवस्थेतील अंदाधुंदी व अपुरी ग्राहकसंख्या ह्या कारणांस्तव त्यांना आपला नाद सोडून देणे अपरिहार्य ठरले.

वेम्बली(इंग्लंड)हून प्रसिध्द होणारे, सर्वसामान्य स्वरूप असलेले एक असामान्य मासिक मार्च 2010 पासून कागदोपत्री प्रकाशित होणे बंद झाले. एप्रिल 2010 पासून त्याची केवळ 'इलेक्ट्रॉनिक' आवृत्ती प्रसिध्द होऊ लागली! विपुलभाईंशी बोलताना, त्यांनी 'ओपिनीयन' बंद करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण सांगितले. ते म्हणजे सर्वसामान्य गुजराती माणसाची भाषा व साहित्य यांबद्दलची तोकडी आसक्ती! ते म्हणाले, की शिक्षित, मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरी गेल्यास हॉलमधील कॉफीटेबलवर निदान दोन-तीन मासिके व शेल्फवर दोन-चार कादंब-या अवश्य दिसतात. सर्वसामान्य गुजराती घरांतून ह्या गोष्टी खूप कमी दिसतात. सांगायचे तात्पर्य असे अजिबात नाही, की गुजराती माणसाला वाड्ःमयाची आवड किंवा भाषेबद्दल आपुलकी नाही. परंतु अशी आवड व आपुलकी असलेली माणसे एकंदर (शिक्षित) लोकसंख्येच्या खूप अल्पांश आहेत.
 

विपुलभाई ऋजू स्वभावाचे व शांत प्रकृतीचे सदगृहस्थ आहेत. त्यांनी 'ओपिनीयन' बंद करण्याचा निर्णय घेतला (किंवा त्यांना घ्यावा लागला) ह्याबद्दल त्यांच्या मनात उद्वेग किंवा राग नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे, त्यांनी हा प्रकल्प 'स्वांत सुखाय' केला. स्वत:च्या मनाचा आनंद, गुजराती भाषेवर असलेले अतोनात प्रेम व गुजरातबाहेर राहणार्‍या गुजराती लेखक, कवी, रसिक समुदायाला अभिव्यक्तीची सोय; अशा त्रिविध हेतूंसाठी त्यांनी हे 'विचारपत्र' स्वरूपाचे मासिक नि:स्वार्थ भावाने, चिकाटीने चालवले.
 

तसेच, त्याच्या प्रकाशनाचे स्वरूप बदलावे लागत आहे, ह्या वस्तुस्थितीचा सुध्दा त्यांनी निर्विकारपणे स्वीकार केला आहे, त्यांची दुधाची तहान 'ओपिनीयन'ची इलेक्ट्रॉनिक प्रसिध्दी चालू राहणार एवढया ताकाच्या घोटाने भागणार होती, पण त्यांना आणखी एक आश्वासन लाभले आहे. श्री. प्रकाश शाह नावाचे विपुलभाईंचे मित्र अमदाबादहून 'निरीक्षक' नावाचे समविचारी मासिक प्रसिध्द करतात. प्राय: मित्रप्रेमाने, तसेच 'ओपिनीयन'बद्दलच्या जिव्हाळयामुळे, प्रकाशभाईंनी 'निरीक्षक'मधील काही जागा विपुलभाईंच्या 'ओपिनीयन'साठी काढून दिली व त्या जागेचा योग्य विनिमय करण्याचा सर्व अधिकारही विपुलभाईंना बहाल केला! पत्रकारितेत असे सहकार्य व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक व व्यावहारिक दृष्ट्या  इष्ट आहे. परिणामी, आता 'ओपिनीयन'मधील काही लिखाण 'निरीक्षक'मध्ये, तर त्यातील सर्व लिखाण त्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध राहील. नवीन स्वरूपातील 'ओपिनीयन'मध्ये सुध्दा ‘एतान श्री’ (वाचकांच्या प्रतिक्रिया) व ‘गुफ्तगू’ (छोटेखानी परंतु विचारात्मक लेख) ही नेहमीची व लोकप्रिय सदरे कायम राहतील अशी आशा आहे. विपुलभाईंचे संपादकीय अग्रलेख असतीलच, हे वेगळे सांगायला नको.
 

गुजराती प्रजा व्यापारी आहे हे सर्वश्रुत आहे. व्यापारासाठी गुजराती माणूस शेकडो वर्षांपासून जगभर पसरला आहे. एक दंतकथा अशी आहे, की वास्को डी गामा हिंदुस्तानात यायला निघाला व आफ्रिकेच्या दक्षिणेस आलेल्या 'केप ऑफ गूड होप'पर्यंत पोचला; पण तेथून पुढे हिंदुस्थानात कसे जावे या विचाराने गोंधळला. तेथे त्याला सुरतेचा गुजराती व्यापारी भेटला व त्याने अरबी समुद्र ओलांडून हिंदुस्तानचा किनारा कसा गाठायचा हे समजावून सांगितले! तात्पर्य म्हणजे गुजराती लोक जगभर पसरले आहेत. ह्या माणसांनी व्यापारासाठी देश सोडला, पण मातृभाषेला मारलेली घट्ट मिठी जरासुध्दा सैल सोडली नाही. आजदेखील, देशोदेशी, अगदी खेडेगावी राहणार्‍या गुजराती कुटुंबांत शुध्द शाकाहारी जेवण व गुजराती भाषा कायम टिकून आहेत. वाङमयप्रदेशाकडे सर्वसामान्य गुजराती माणसाचा कल तसा बेताचाच, पण असे असूनही गुजरातीत सातत्याने भरपूर लिखाण होत असते.
 

गुजराती भाषा सुमारे एक हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. अनेक ख्यातनाम लेखक, कवी, निबंधकार व समीक्षक गुजराती भाषासमृध्दीत भर घालत आले आहेत व असतात. नरसिंह मेहता, प्रेमानंद, दयाराम, दलपतराव, न.भो.दिवेटीया, महात्मा गांधी, आनंदशंकर ध्रुव, कवी नानालाल, कनैयालाल मुनशी, र.व. देसाई, पन्नालाल पटेल व उमाशंकर जोशी ही त्यांतील काही नामवत मंडळी. काकासाहेब कालेलकर स्वत: मराठी भाषिक असून त्यांनी गुजरातीत भरपूर लिखाण केले, तर गोपाळराव विद्वांस यांनी मराठीतील किमान सत्तर पुस्तकांचा अनुवाद गुजरातीत केला. नगीनदास पारेख ह्यांनी बरेच बंगाली साहित्य गुजरातीत आणले.
 

देश सोडून परदेशी स्थायिक झालेल्या गुजराती लोकांनीदेखील मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करायची संधी उचलून धरली. त्यांनी स्वत:च्या कुवतीनुसार जसे जमेल तसे गुजरातीत लिहायचा प्रयत्न जारी ठेवला. अशा प्रयत्नांतून जन्माला आले 'डायास्पोरा-साहित्य'. 'डायास्पोरा' हा शब्द गुजराती भाषेत अलिकडेच प्रचलित झाला असला तरी परदेशांत राहून मायभाषेत लिहिणे ही घटना अनेक वर्षांपासून चालू आहे. मागील तीस-चाळीस वर्षांच्या अवधीत ह्या प्रकारात नवीन भर पडली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात डॉक्टर, इंजिनीयर व एम.बी.ए. झालेल्या बहुसंख्य मंडळींनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व इतर युरोपीय देशांत वास्तव्य केले. कुशाग्र बुध्दिमत्ता असलेली ही मंडळी, म्हणता म्हणता सधन झाली. त्यांच्या संस्कारजन्य भुकेतून त्यांच्या साहित्यिक कल्पनांना अंकुर फुटू लागले व या पिढीतून नवीन लेखक-कवी जन्माला आले. त्यांच्या निर्मितीला अभिव्यक्तीच्या माध्यमाची आवश्यकता होती.
 

विपुलभाई कल्याणी यांच्यासारख्या सहृदय साहित्यप्रेमीने ही गरज बिनचूक ओळखली व तिला योग्य प्रतिसाद दिला. त्यांनी 'ओपिनीयन'मध्ये गुजराती ‘डायास्पोरा’ निर्मित साहित्याला खास प्राधान्य दिले. भारतातील मातब्बर लेखक मंडळींना ज्याचा सुगावाही नव्हता असे पाश्चिमात्य जग ह्या 'डायास्पोरा' लेखकांनी जवळून पाहिले होते; एवढेच नव्हे तर त्याचा स्वत: अनुभव घेतला होता. त्यांना त्यांच्या गुणदोषांची पक्की माहिती होती. जगभर हिंडल्याने त्यांचे पूर्वग्रह दूर झाले होते. त्यांना जगातील आर्थिक व सामाजिक प्रवाहांना तटस्थपणे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन लाभला होता. त्यांचे गुजराती भाषेवर प्रभुत्व होते. साहजिकच, त्यांच्या साहित्यनिर्मितीवर ह्या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष परिणाम होत होता. 'ओपिनीयन' (व त्यासारख्याच अमेरिकेतून प्रकाशित होणा-या 'गुर्जरी', 'गुजरात दर्पण', 'गुजरात मित्र' इत्यादी प्रकाशनांनी) प्रगल्भ 'डायास्पोरा' साहित्यिक-कलावंत पुरवण्याचे कार्य हाती घेतले होते. गुजराती भाषेची एक छोटीशी पणती गुजरातबाहेर तेवत होती. 'ओपिनीयन 'ची कागदी आवृत्ती बंद झाली, तेव्हा त्या पणतीवर अंधाराचे एक अदृश्य पटल पांघरले जात असल्‍याची धास्ती वाटत होती. मात्र 'ओपिनीयन' इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरू आहे, हा त्यातील आशेचा किरण म्हटला पाहिजे.
 

संपर्क : विपुलभाई कल्याणी- vipoolkalyani.opinion@btinternet.com

ओपिनीयन – http://www.theonlineopinion.com

अशोक विद्वांस.  ashok@vidwans.com

About Post Author