पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेली अजस्त्र डोंगररांग! कराल… पातळस्पर्शी… बुलंद वगैरे अलंकारांनाही सहज पुरून उरणारी! दिसते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त अभेद्य असलेली आणि खालून माथ्याकडे नुसती नजर टाकली तरी डोळे दिपवणारी! पावसाळ्यात तिच्या माथ्यावरून खोल कोसळणारे धबधबे नुसत्या दर्शनाने मनुष्याला मंत्रमुग्ध करतात. घाटमाथ्यावरून कोकणात दृष्टी फिरवली, की सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळे झालेले आणि आभाळात बाणासारखे घुसू पाहणारे दोन बेलाग सुळके दिसतात! त्यातील एकाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात तर माथ्यावर एक छोटे मंदिर. दुसरा सुळका मात्र सह्याद्रीचे खरेखुरे अस्तित्व दाखवून देतो. गिर्यारोहकांच्या ‘फेव्हरेट लिस्ट’मध्ये असलेला तो अप्रतिम आणि आडवाटेचा घाट म्हणजे आहुपे घाट आणि त्याच्या माथ्यावरून सच्च्या सह्यप्रेमीला मनापासून साद घालणारे ते दोन सुळके म्हणजे गोरक्षगड आणि मच्छिंद्रगड.
देहरीतून गोरक्ष-मच्छिंद्रचे आभाळस्पर्शी सुळके ध्यानस्थ ऋषिमुनींसारखे भासतात. त्यातील उजवीकडील गोरक्षगड आणि डावीकडील मच्छिंद्रगड. खरे तर, त्याला मच्छिंद्र सुळका म्हणणे जास्त योग्य, कारण येथे किल्ल्याचे कुठलेही बांधकाम नाही. गोरक्षगडाला मच्छिंद्रगडाच्या उजवीकडून पूर्ण वळसा घालून जावे लागते.
देहरीतून निघून गोरक्षगडावर पोचेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर गडाचा आकार बदलत असल्यायचा भास होतो. गोरक्षनाथांच्या साधनेचे ठिकाण म्हणजे हा गोरक्षगड ऊर्फ गोरखगड. गोरक्षनाथांचे मंदिर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर बांधलेले आहे. गड चढू लागले, की चढण खडी होत जाते. गोरक्षगडाची मुख्य चढण संपली की एक पठार लागते. तेथून गोरक्षगडचा तोपर्यंत सुळकेवजा दिसणारा आकार कातळभिंतीत रूपांतरीत झालेला दिसतो. उजवीकडील सिद्धगडही दृष्टिपथात येतो.
गडावरील पश्चिमनाथ मंदिरापासून थोडे पुढे गेले, की गोरक्षगडाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेची अंतिम चढाई सुरू होते. त्या मार्गावर खड्या चढाईच्या पायऱ्या खोदलेल्या असून त्या पायऱ्यांना आवश्यक तेथे पकड घेण्यासाठी खोबणीही केलेल्या आहेत. काही ठिकाणी मात्र पूर्ण पायरी नसून केवळ अरुंद अशा खोदीव पावट्या आहेत. गोरक्षगडाच्या लोकप्रियतेचे गमक म्हणजे त्याची मुख्य दरवाज्यापर्यंतची आणि शेवटची सर्वोच्च माथ्यासाठीची थरारक चढाई. गोरक्षगडाच्या प्रवेशद्वाराच्या टप्प्यात पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंला खोल दरी असून तिकडे नुसती नजर गेली तरी डोळे फिरतात. तेथील एका पायरीवर देवनागरीतील शिलालेख कोरलेला आहे. त्याची अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. गोरक्षगडाच्या दरवाज्याची रचना वैशिष्ट्यडपूर्ण आहे. दरवाज्याच्या मुख्य चौकटीतून आत गेले, की नाशिक जिल्ह्यातील हरिहर उर्फ हर्षगडासारखा भुयारी मार्ग तेथे कोरण्यात आलेला दिसतो. त्या भुयारी मार्गात पायऱ्या आहेत. तो मार्ग पार करून पुढे गेले, की समोर उभी राहते एक उंच कातळभिंत! सुमारे दीडेकशे फुटांच्या त्या कातळभिंतीवरून रॅपलिंगचा थरार जगावेगळा असेल एवढे मात्र नक्की! दरवाज्यातून शेवटच्या काही पायऱ्या चढून पुढे गेले, की गोरक्षगडाच्या कातळात खोदलेली भव्य गुहा समोर येते. ती शंभरेक लोकांच्या मुक्कामाची सोय करू शकेल. त्याक गुहेला स्थानिक भाषेत ‘मंडप’ म्हणतात.
गडावर पश्चिम दिशेला छोटी गुहावजा खोली आहे. गोरक्षगडावरून दिसणारा सूर्यास्ताचा अपूर्व सोहळा अनुभवावा तो त्याच ठिकाणाहून! पश्चिम क्षितिजावर होणाऱ्या केशरी रंगाच्याच उधळणीत मनसोक्त न्हाणारा सिद्धगड नयनरम्यू दिसतो.
गोरक्षगडावरील त्या गुहेत मुक्कामाला राहिले तर गोरक्षगडावरील रात्रीचे शांत, निर्मनुष्य, कोणाचाही पायरव नसणारे वातावरण अनुभवता येते. रात्रीचे पिठूर चांदणे आणि वर लुकलुकणारे तारे त्यांच्या शीतल प्रकाशानेच सगळा आसमंत भारून टाकतात. त्या अगणित चांदण्यांच्या, नक्षत्रांच्या आणि ग्रहगोलांच्या प्रकाशात चिंब भिजलेला गोरक्षगडाचा माथा पाहणे म्हणजे अवर्णनीयच! सूर्योदयाचा अभूतपूर्व सोहळा तेवढाच सुंदर! हळुहळू तांबडे फुटायला लागले असताना अंधारात बुडालेल्या अहुप्याच्या रौद्र रांगांमागून विविध रंगांचे धुमारे फुटू लागतात आणि पूर्वक्षितिजावर सप्तरंगांची उधळण सुरू होते.
गोरक्षगडाच्या माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्यांची चढाई थरारक आहे. मागे आ वासून बघणारी खोल दरी आणि त्यातून उगवलेला बेलाग मच्छिंद्रगड! अर्ध्या वाटेवर गुहा खोदलेली आहे. जवळपास सगळ्याच पायऱ्यांवर आरपार खोबणी केलेल्या असून त्या आधारासाठी अगदी योग्य आहेत. वीसेक मिनिटांच्या चढाईनंतर गोरक्षगडाच्या माथ्यावर पोचता येते. देहरी गावातून दुर्लंघ्य वाटणारे गोरक्षगडाचे शिखर कठीण नसले तरी काही ठिकाणी काळजाचा ठोका चुकवणारे आहे. गोरक्षगडाचा माथा निमुळता आहे. वर केशरी रंगाचे गोरक्षनाथांची समाधी असलेले छोटेखानी मंदिर आहे. माथ्यावर इतर अवशेष नाहीत. मात्र तेथून दिसणारा नजारा अप्रतिम आहे. शेजारचा अभेद्य मच्छिंद्रगड, गोरक्षगडाचे पाठीराखे असलेले अहुप्याचे कडे, त्याच्या पूर्वेकडे दिसणारे धाकोबा, दाऱ्या घाट, जीवधन आणि नाणेघाट, पश्चिमेकडील बुलंद आकाराचा सिद्धगड आणि वातावरण स्वछ असल्यास दिसणारे चंदेरी – म्हैसमाळ, मलंग आणि माहुली असा तो अविस्मरणीय देखावा मनात घेऊनच आपण परतीच्या वाटेला लागतो.
– ओंकार ओक