ऐनापूर शिलालेखातील भाषाविशेष

3
41
_EnapurShilalekhatil_Bhashavishesh_1.JPG

कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर या गावी यादवकालीन शिलालेख आहे. तेथे शेतात काम सुरू असताना काही दगड, सतीची शिल्पे, गजलक्ष्मी शिल्प, गणेशमूर्ती आणि हा शिलालेख अशा गोष्टी मातीत गाडलेल्या अवस्थेत सापडल्या. शिलालेखावरील बरीच अक्षरे झिजलेली आहेत. शिलालेखाचे प्रथम वाचन डॉ. हरिहर ठोसर आणि अ.ब. करवीरकर यांनी केले. ते राजवाडे संशोधन मंडळ, धुळे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘संशोधक’ या त्रैमासिकाच्या सप्टेंबर 1990 च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. शिलालेखाच्या सतराव्या ओळीत काळाचा उल्लेख आलेला आहे, तर आठव्या ओळीत यादवराजा महादेवराय याचे नाव आलेले आहे. लेखात शके 1992 शुक्ल संवत्सर वैशाख अमावास्या असा काळाचा निर्देश आलेला आहे. ‘तथापी गत पंचांगानुसार काल आणि संवत्सर नामानुसार शिलालेखाचा काळ शके 1991 असा धरावा लागेल. तो इसवी सन 1269 असा येईल.’ (ठोसर, करवीरकर, 1990 : ३४) म्हणजे शिलालेख ज्ञानेश्वरीच्या अगोदर बारा वर्षांपूर्वी कोरला गेलेला आहे.

गडहिंग्लज तालुका हा कर्नाटकालगत असल्याने काही कन्नड भाषाविशेषही त्या लेखात सापडतात. मी या लेखात शिलालेखाच्या भाषिक वैशिष्ट्यांचा विचार करत आहे. शिलालेख संमिश्र स्वरूपाचा आहे. लेखातील प्रास्ताविक, कालनिर्देश, सत्ताधीश, नृपतीची बिरुदावली व लेखाचा शेवटचा भाग हा संस्कृत भाषेमध्ये आहे. लेखाची लिपी तेराव्या शतकातील देवनागरी आहे. लेख यादवकाळातील असल्यामुळे तो ऐतिहासिक दृष्ट्या जसा महत्त्वाचा आहे, तसा भाषिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. मराठी भाषेचा अभ्यास करण्याचा असेल तर तिचा सुरुवातीचा काळ म्हणजे यादवकाळ हा महत्त्वाचा म्हणून विचारात घ्यावाच लागतो.

शिलालेखाची उंची पंच्याण्णव सेंटिमीटर आणि रुंदी पंचावन्न सेंटिमीटर आहे. वरील त्रिकोणी भागात सूर्य, चंद्र, गाय, वासरू, तलवार आणि विळा या आकृती कोरलेल्या आहेत. लेखात पंचवीस ओळी असून सुरुवातीच्या एकोणीस ओळी मोठ्या अक्षरांमध्ये आणि जागा अपुरी पडते असे लक्षात आल्यावर उर्वरित सहा ओळी लहान आकारामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. शिलालेख पुढीलप्रमाणे आहे –

शिलालेख वाचण्यासाठी सूचना –

 • {} च्या ऐवजी हा शब्द असायला हवा
 • () राहून गेलेले अक्षर,
 • + वाचता न आलेली अक्षरे

०१. श्रीगणाधिपतएनम: || नमस्तुंगशिरश्चुंवि चंद्र चामर चारवे त्रैलोक्य न
०२. गरारंभा मूलस्तंभाय संभवे || स्वस्ति श्रीमआ {हा} स्ता {स्था} न समावासित श्री
०३. मद्विजयकटके समधिगत पंचमहाशब्द महाराजाधिराज परमेश्वर द्वारावती
०४. पुरवराधीश्वर विष्णुवंशोद्भव यादव कुलज कलिका विकासभास्कर अरिराय
०५. जगझंप मालवियमल्ल अहितराय विरसेल्ल विभ्रांड बधिरक ++++ उत्पाटनकर
०६. गुर्जरवारुणांकुश श्रीमत्पौढप्रतापचक्रवर्ती श्रीप्रभुदेव राजविजय ++++
०७. स्वस्तिश्री सकु ११९२ शुक्ल संवछरे वैशाखवद्य अमावास्याम् ++ अधेय श्री
०८. मत्पौढप्रतापचक्रवर्ती श्रीमहादेवराज तत्पादपद्मोपजीवि श्री हस्तिसा
०९. धनीक श्रीराजगुरू जीवनारायण विषालदेव ++++ रंवलदेवना
१०. यके क्रिंत आंघ्रारे {अग्रहारे} कविलगे ++++++++ सीवेती नैव्रित्ये {नैऋत्ये} कोनि
११. चाविरा वायाव्य (वायव्य) कोनी इंडीविगुतु +++++++++ ईशान्य कोनी ते
१२. य अमदी शीवंती असे ते शीवंती ++++++++++ ची पाणंदिरेखा
१३. वरिआली वेटे घाघरूनु आग्निय {अग्नेय} कोनि सिंदवाघरी अमदी सीवंती असे
१४. देववु सीवंत्येमाझारि निधिनिक्षेपदंडु दोषु आकंठक समस्ततेजसा
१५. ध्य वंकक {वंकट} सुनु रवलदेवनायके महाजनादिद्विज ++++ सवितादाय
१६. ++ ग ५० अंकोपितोपि गद्याण पंनास मंगलशहा श्रीश्रीश्री ००० रायराज
१७. गुरू जोयनारायण विषालदेव त नम रवलदेवनायक सुक्षेम
१८. स्वविज साम्यमुरम्यवागि सरवलिगेयनु पाणिपुर्वकं वागि
१९. कविलगेय महाज (न) मंगलिगेकोटनु मंगलमहा श्रीश्रीश्री ०
२०. बहुभिर्वसुधाभुक्ता राजभि: सगरादिभिर्यस्ययस्य यदा भूमि तस्य तस्य तदा फलं || गाण्यंते पांसवोभूमी गान्यंते व्रिष्टिबिंदव: न गन्यंते वि
२१. धात्रापि धर्मरक्षणे फलं || अपहरत ममर्यस्यास्य जीवस्य स्वदतां परदत्तां वा यो हरेती वसुंधरा सष्टिवर्श
२२. सहस्रणी विष्टायां जायते क्रिमिं || परदत्तातुयो भूमी मुपहिंसेत कदाचन | सबद्ध वारूणै पाशै: क्षिपयते पूयशोणिते कर्मणामन
 २३. सावाचा य समर्थो ऽ प्युपेक्षते | सभ्यस्तथैव सस्यात्तदै चांडाला सर्वधर्म बहिष्कृत: || सामैन्योयं धर्मसेतु नृपाणां काले काले पालनीयो भ
२४. विद्भ : सर्वानेतान्माविन: पार्थिवेंद्रान् भूयो भूयो याचते रामचंद्र: मद्वंशजा परमहीपतिवंशजावा पापादपेत मनसो भुविभावि
२५. भूपा: || ये पालयन्ति ममधर्ममिमंसमस्तं तेभ्यो मया विरचितोजलिरेष मूर्घ्नि ||
 

शिलालेखातील भाषाविशेष

०१. अपभ्रंश भाषांमध्ये अंत्य स्वरांचे ऱ्हस्वीकरण झालेले आहे. शिलालेख यादवकालीन असल्यामुळे येथेही अंत्य स्वरांचे ऱ्हस्वीकरण झालेले आहे. कोनिं, अंकपितोपि, घाघरुनु, देववु, माझारी, वागि, सवरलिगेयनु, निधीनिक्षेपदंडू, दोषु, मंगलिगेकोटनु.
 ०२. संस्कृतमध्ये व्यंजने तालव्य आहेत; पण मराठीत व्यंजने दंततालव्य आहेत. ती यादवकाळातही रूढ होती.
०३. प्राकृत-अपभ्रंश भाषांमध्ये लोप पावलेले किंवा ‘स’ रूप झालेले ‘श, ष’ हे उष्मे मराठीत पुन्हा रूढ झालेले दिसतात.
०४. ‘ऋ’ हा ध्वनी तत्सम शब्दात राहिलेला दिसतो. तद्भव शब्दात त्यांची ‘अ-इ-उ’ याप्रमाणे निरनिराळी रूपे झालेली दिसतात.
विषालदेव, ऊशान्य (तत्सम), शीवंती, दोषु
०५. ‘य’ युक्त संयोग – ‘य’ चा संयोग होत असताना बऱ्याचदा स्पर्श व्यंजने प्रभावी ठरलेली आहेत आणि ‘य’ त्यांच्याशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे ‘य’चा वेगळा संयोग या शिलालेखातही सापडतो. योगनारायण या शब्दाचे अपभ्रंश रूप ‘जोयनारायण’ असे झाले आहे. (शिलालेखांव्यतिरिक्तची उदाहरणे आणखी काही देता येतील ; योग्य – जोगे, शक्य – सकणे, रौप्य – रूपे, ज्योतिषी – जोईसि, व्याघ्र – वाघ)
०६. ‘व’ हा अर्धस्वर यादवकालीन मराठीत आद्यस्थानी संस्कृत ‘व’ पासून किंवा प्राकृत ‘व’पासून आला आहे. वक्र (संस्कृत) त्यापासून वंकट.
०७. शब्दयोगी – साधित विभक्तिरूप.
नामांना शब्दयोगी अव्ययाची जोड होऊन सर्व विभक्तींची रूपे तयार होताना दिसतात. (षष्ठी सोडून) ती होताना मूळ प्रातिपदकाचे सामान्यरूप तयार होते व त्या सामान्यरूपाला शब्दयोगी अव्यये लागतात.
माझारि – सीवंत्ये माझारि
हे शब्दयोगी अव्यय कोरीव लेखात जसे आढळते तसे ते पुढे ग्रंथांमध्येही आढळते. पारंबियामाझारि (ज्ञानेश्वरी १५ अध्याय ओवी क्रम. ५८), पोळीमाझारिं (रुक्मणीस्वयंवर ८७४), ब्राह्मणामाझारि (उद्धवगीता ७१८), तिहीलोकांमाझारि (धवळे पूर्वार्ध ४२)
०८. ग्रामनामाची विशिष्ट पद्धत : कविलगे, सरवलिगे मंगलिगेकोटनु.
०९. कन्नड भाषेचा परिणाम
गडहिंगल्ज तालुका हा कर्नाटकाशी लगतचा असल्याने आणि तालुक्यातील अनेक लोकांची बोली कन्नड असल्याने काही कानडी विशेष या शिलालेखातही दिसतात. यादवकाळातील मराठीत ‘उ’काराचे प्राबल्य द्रविडीच्या संपर्कामुळे आले आहे. (Caldwell R., 1875 : 17-18) घाघरुनु, देववु, निधिनिक्षेपदंड, दोषु, सुनु, सरवलिगेयनु, मंगलिगेकोटनु.
१०. संख्यालेखन – संख्यालेखन अंक व अक्षरी अशा दोन्ही पद्धतींनी केलेले दिसते. ५० – पंनास.
११. अयोग्य शब्दतोड : रंवलदेवना- यके, ते-य, समस्ततेजसा-ध्य, रायराज –गिरू, न –गरारंभा, श्रीहस्तसा-धनीक, वि-धात्रापि असे काही शब्द.
१२. लेखनदोष – शिलालेख कोरणारे लोक अशिक्षित असल्यामुळे काही लेखनदोषही आढळतात.
अ. ऱ्हस्व-दीर्घातील अनियमितता : कोनि-कोनी-कोनि (ओळ १०-११-१३)
आ. स्वरांचे अनिश्चित लेखन : आघ्रारे-अग्रहारे, आग्निय-अग्नेय.
इ. अनुस्वार योजनेतील अनियमितता : रंवलदेवनायचे-रवलदेवनायके (ओळ ९-१७)
ई. लेखनातील अपभ्रष्ट रूप : संवत्सरे-संवछरे
उ. लेखनातील हस्तदोष : वायाव्य-वायव्य, महाज-महाजन, वंकक-वंकट, शीवंती-सीवंती.

भाषाभ्यासाच्या दृष्टीने हा शिलालेख महत्त्वाचा असला तरी तो ज्या अवस्थेत आहे ती पाहून मन उद्विग्न होते. शिलालेख खूप वर्षें मातीत गाडला गेलेला असल्यामुळे त्यावरील अनेक अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. तो गावाबाहेरच्या गणेशमंदिराच्या बाह्यमंडपात आहे; पण केवळ ठेवायचा म्हणून ठेवला गेला आहे. स्त्रिया त्यावर तेल वाहताहेत! अक्षरे जेवढी दिसतात तेवढीही हळदकुंकू यांचा मारा सुरू राहिला तर काही काळानंतर दिसणार नाहीत!

(भाषा आणि जीवन – पावसाळा 2013 वरून उद्धृत)

– निलेश शेळके

About Post Author

3 COMMENTS

 1. रा. शेळके सर,
  आपण करत असलेले…

  रा. शेळके सर,
  आपण करत असलेले संशोधन खूपच मूलभूत स्वरूपाचे व महत्त्वाचे आहे. मराठीची पुर्वपिठीका उलघडत असताना मराठी व कानडीचा अनुबंध तपासता येणार आहे.

 2. शेळके सर,
  आपण करत असलेले…

  शेळके सर,

  आपण करत असलेले संशोधन खुपचं मुलभूत स्वरूपाचे महत्त्वाचे आहे.

 3. आतिशय दुर्मिळ आहे
  हा विषय

  आतिशय दुर्मिळ आहे
  हा विषय

Comments are closed.