ऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव

गोदावरी नदीकाठी गोदा संस्कृतीचा उदय झाला व तेथे अनेक गावे वसली. त्या गावांना धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे. मुंगी गाव त्यापैकी एक. त्याच्या एका बाजूला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे पैठण, तर दुसऱ्या बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आपेगाव आहे. मुंगी गावाला पूर्वीच्या काळी पैठण शहरासारखे महत्त्व होते…

महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीकाठी गोदा संस्कृतीचा उदय झाला. त्या नदीकाठी अनेक गावे वसली. त्या गावांना प्राचीन काळापासून धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिकराजकीयआर्थिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील बहुतेक गावांचा इतिहास हा वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. मुंगी गाव त्यापैकीच एक. ते पैठण या ऐतिहासिक शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या एका बाजूला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे पैठण, तर दुसऱ्या बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आपेगाव पाच किलोमीटर अंतरावर आहे. मुंगी हे गाव अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात येते. त्या गावाला पूर्वीच्या काळी पैठण शहरासारखे महत्त्व होते. ते शेवगावपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे.

मुंगी या गावाचे प्राचीन काळी पिपीलिका असे नाव होते. त्या मागील आख्यायिका अशी सांगितली जाते, की त्या ठिकाणी इसवी सनपूर्व 5018 मध्ये दधीचि ऋषि यांचा मुलगा पिप्यलाद याने पिपीलिकेश्वरमहादेवाची स्थापना केली. त्यानंतर त्या परिसराला पिपीलिकेश्वर असे म्हटले जाऊ लागले. त्यासंबंधीचा उल्लेख काशीखंड कथासार या ग्रंथामध्ये करण्यात आला आहे. तसेच, अनेक ठिकाणी मुंगी आणि पैठण या परिसरांचा एकत्रित असा उल्लेख आढळतो. बहुतेक ग्रंथांमध्ये त्या परिसराला प्राचीन काळी वैदूर्य पतन म्हटले जाई. मुंगी गावाचे नाव मुंगी-पैठण, मुंगी-शेवगाव या नगरांशी पूर्वीपासून जोडलेले आहे. वैदिक ऋषी पिपलाद हे पुरातन काळातील विद्वान तत्त्ववेत्ता होते. त्यांनी दहा मुख्य उपनिषदांपैकी प्रश्नोपनिषद लिहिले आहे.

अश्मयुगातील मानवाने बनवलेली दगडी हत्यारे संशोधकांना 1863 साली मुंगी येथे सापडली होती. त्याच बरोबर गोदावरी नदीपात्रात मुघलकालीन नाणी, तसेच गौतम बुद्धांच्या काळातील भगवान विष्णू व लक्ष्मी यांची ध्यानस्थ मूर्ती सापडल्याचे गावकरी सांगतात. त्या परिसरात सांप्रतकाळीही प्राचीन मंदिरांचे अवशेष आढळतात. नाशिकच्या पंचवटी येथे ज्या प्रकारचे धातू अवशेष सापडतात त्याच प्रकारचे अवशेष मुंगी येथेही आढळून आलेले आहेत.

श्री भगवान निम्बार्काचार्य यांचा जन्म बुधवार कार्तिक कृष्ण पौर्णिमेला मुंगी येथे झाल्याचे मानले जाते. ते ऋषी अरुणी व जयंतीमाता यांचे पुत्र होत. निम्बार्क महाराज यांना निंबादित्य किंवा नियमानंददेखील म्हणतात. ते योगी व तत्त्वज्ञ होते. त्यांनी निंबार्कस नावाच्या भक्ती पंथाची स्थापना केली. त्यांनी द्वैतवादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. राधाकृष्ण हे त्यांचे आराध्य दैवत होते. मुंगी गावात निम्बार्काचार्य यांच्या नावाशी संलग्न असे कडुनिंबाचे झाड पवित्र मानले जाते. त्यामुळेच त्या गावी आजही निंबाचे झाड तोडले जात नाही. तसेच, संत नामदेव यांचे गुरू विसोबा खेचर यांचे प्रकटस्थानही मुंगी हे गाव आहे.

मुंगी गावात काही सरदार घराणी वंशपरंपरेने राहतात. त्यापैकीच वेरुळचे प्रसिद्ध भोसले घराणे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे बंधू विठोजीराजे यांना मुंगी गावाची जहागिरी मिळाली होती. विठोजी भोसले यांचे पाचवे सुपुत्र नागोजी हे त्या ठिकाणी स्थायिक झाले. पुढे, त्याच भोसले घराण्याने राक्षसभुवनच्या  लढाईत मोलाची कामगिरी बजावली. पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात 10 ऑगस्ट 1763 रोजी राक्षसभुवन येथे लढाई झाली होती. त्या लढाईत पराभूत झालेल्या निजामाने मुंगी गावात तह केला होता. तो तह ‘मुंगी-शेवगावचा तह म्हणून ओळखला जातो.

मुंगी या गावामध्ये विणकर लोकांची मोठी वस्ती होती. ते लोक पैठणी विणण्याचे काम करत. मुंगी गावातूनच पैठणीला लागणारा कच्चा माल पुरवला जाई असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात.

मुंगी गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 1951 साली झाली. मुंगी गावची लोकसंख्या पाच हजार पाचशे आहे. गाव सात हजार एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. गावात हनुमान, महादेव, खंडोबा यांची मंदिरे आहेत. मुंगादेवी ही गावाची ग्रामदेवता आहे. तिची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेनंतर भरते. मुंगादेवीच्या आकर्षक छबिन्याची मिरवणूक गावातून यात्रेच्या रात्री निघते. त्यात ग्रामस्थ नृत्य करत सहभागी होतात. यात्रेला कोकणातूनही भाविक येतात.

मुंगी गावाच्या उत्तरेला असलेल्या दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण या शहरावर मोलांनी पंधराव्या शतकात हल्ला केला होता. त्यावेळेस संत एकनाथ महाराजांची पालखी मुंगी गावाच्या विठ्ठलरुक्मिणी मंदिरात वास्तव्यास होती असे सांगितले जाते. मुंगी गावीच एकनाथ महाराजांचे कट्टर शिष्य कृष्णदयार्णव यांनी श्री हरी वरदाहा ग्रंथ लिहिला.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही गावाचा सहभाग होता. कृष्णाजी महादजी राजेभोसले यांनी आझाद हिंद सेनेत मोठा पराक्रम गाजवला होता.

मुंगी गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मुंगी गावातील शेती सुजलाम-सुफलाम होण्यास आपेगावच्या गोदावरी नदीवरील बंधाऱ्याच्या बॅकवाटरचा फायदा झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी नदीवरून शेतात पाईपलाइन आणली आहे. त्याबरोबरच गावातील शेतकऱ्यांकडील विहिरी, बोअरवेल यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. गावाला जवळपास पाच किलोमीटर लांबीचा नदीकिनारा लाभला आहे. तेथे ऊस, कापूस, ज्वारी, तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. गावातील शेतकऱ्यांच्या चिकू, केळीच्या बागा आहेत. शेतीचे आधुनिकीकरण करून शेतकऱ्यांनी त्यांची आर्थिक उन्नती, तसेच; शैक्षणिक प्रगती साधली आहे.

त्या ठिकाणी रस्ते, पाणीवीज या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. गावात बालवाडी ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटार योजना आहे.

मुंगी गावात महिला सक्षमीकरणासाठी महिला बचतगट आहेत. गावकऱ्यांना मासेमारी, वीटभट्टी व शेती यांत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असली तरी तेथे पर्यटन विकासाच्या दृष्टीने तितक्याशा सोयी उपलब्ध नाहीत. गावात पोचण्यासाठी शेवगाव येथून एस टी, रिक्षा, टेम्पो अशा दळणवळणाच्या सोयी आहेत. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने व मेडिकल दुकाने आहेत. गावात पाच सार्वजनिक मंडळे आहेत.

गावात अठरापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व एकमेकांच्या सण-समारंभात सहभागी होतात. गावात सोमवारी आठवडी बाजार भरतो. मुंगी गावाच्या पंचक्रोशीत खडका, मडका, गदेवाडी, घोटण ही गावे आहेत. गाव बौद्धिक व सांस्कृतिक विद्वत्तेच्या आधारे वाटचाल करत आहे.

(लेखाच्या अधिक माहितीसाठी महेश मगर 9168291957 यांचे सहाय्य लाभले.)

– स्वातीराजे भोसले 9673590272 swatiraje9@gmail.com

 ————————————————————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here