एकसरचे वीरगळ (Hero Stones of Eksar)

5
973

दहिसर बोरिवलीच्या दरम्यान एकसर नावाचे खेडे होते. आजही त्याला एकसर व्हिलेज अशे म्हणतातपण त्यात खेडे असण्याच्या  कुठल्याही खूणा दिसत नाहीत. अशा या ठिकाणी सहा वीरगळ, म्हणजे स्मृतीशिळा होत्या. आठशे वर्षांपूर्वीच्या एका सागरी युद्धाच्या सक्षीदार असलेल्या या शिळा, आता त्यापैकी चार शिल्लक आहेत. त्या झिजल्या तर आहेतच पण सिमेंट काँक्रिटमध्ये गाडल्यामुळे त्यांचे तळाचे भाग नीट दिसत नाहीत.

कोकणपट्टीतल्या राजांच्या नौदल सज्जतेचा पुरावा असलेल्या या शिळांची माहिती देत आहेत सुनंदा भोसेकर.

मोगरा फुलला या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथै क्लिक करा.

-राणी दुर्वे

बोरिवली जवळ एकसर नावाचे एक खेडे आहे. खेडे म्हणायचे कारण म्हणजे त्याचे नाव एकसर व्हिलेज असे आहे. आता ते दहिसर-बोरिवलीचाच एक भाग झाले आहे. त्याला काही वेगळे व्यक्तिमत्त्व उरलेले नाही. तर अशा या गर्दी, गडबडीने भरलेल्या गावात किंवा भागात सहा वीरगळ होते. वीरगळ म्हणजे युद्धात कामी आलेल्या वीरांच्या  स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या शिळा. ज्याअर्थी हे वीरगळ एकसरमध्ये उभारलेले आहेत त्याअर्थी हे युद्ध तिथेच कुठेतरी आसपास झालेले असणार.

स्मारक शिळांमधून लोकसमूह धारातिर्थी पडलेल्या वीराविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतात. वीरगळ हा साधारणत: एक स्तंभ असतो आणि त्याच्यावर एकाखाली एक तीन, चार किंवा पाच चौकटी कोरलेल्या असतात. एका चौकटीत वीराच्या आत्म्याला अप्सरा कैलासावर घेऊन जात आहेत असे दृश्य असते. वरच्या चौकटीत कैलासावर किंवा स्वर्गात  पोहोचलेला वीर, शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे असे दृश्य असते. काही ठिकाणी इतर दैवतेही असतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गायींचे रक्षण करताना बळी पडलेल्या वीरांचेही वीरगळ असतात. तिथे गायींचेही चित्रण असते. महाराष्ट्राचे परमदैवत, पंढरपूरच्या विठोबाचे मूळही गाईंचे रक्षण करताना बळी पडलेल्या वीराच्या स्मरणाप्रित्यर्थ उभारलेल्या वीरगळात आहे असा एक मतप्रवाह आहे.

वीरगळावरच्या शिल्पांच्या द्वारे कथा सांगितलेली असते. वीरगळांचे मूळ हे मृतांना पुरल्यानंतर त्याजागी एक खुणेचा दगड लावत असत त्या प्रथेत आहे. अनेक आदिम जमातींमध्ये दफनाच्या जागेवर अशा शिळा उभ्या करण्याची किंवा गोलाकारात दगड लावण्याची पद्धत होती. महाराष्ट्रभर अशी शिळावर्तुळे आणि वीरगळ अनेक ठिकाणी आढळतात. मग एकसरच्या वीरगळांचे वेगळेपण काय? तर त्यावर जहाजांची चित्रे आहेत. सागरी युद्धात बळी पडलेल्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या या शिळा आहेत. ताम्रपट, शिलालेख यांच्याप्रमाणेच वीरगळ हे इतिहासाची संगती लावण्याचे साधन आहे.

गॅझेटियरमधल्या वर्णनानुसार एकसरच्या या शिळा एका आमराईत, तळ्याकाठी आहेत. मूळ वर्णनानुसार यातल्या चार शिळा दहा फूट उंच आणि तीन फूट रूंद आहेत चौथी शिळा उंचीला सहा फूट आहे आणि रूंदीला तीन फूट आहे. सहावी त्यामानाने लहान आहे. उंचीला चार फूट आणि रूंदीला एक फूट आहे. यातल्या पाच वीरगळांच्या वरच्या भागात मोठे कान असलेले अमृतकलश कोरलेले आहेत.

पहिल्या शिळेवर चार भाग कोरलेले आहेत. सर्वात खालच्या भागात डाव्या बाजूला दोन घोडेस्वारांनी एका योध्याला खाली पाडून मारले आहे. उजव्या बाजूला त्याचा आत्मा इतर आत्म्यांबरोबर स्वर्गात जात आहे. दुस-या कप्प्यात दोन घोडेस्वार सहा सैनिकांशी सामना करत पळ काढत आहेत. एक धनुर्धारी लढतो आहे. तिस-या कप्प्यात एक सैनिक धनुर्धारी सैनिकाला भाला मारतो आहे. त्या सैनिकाच्या मागे धनुष्यबाण घेऊन हत्तीवर बसलेला एक सैनिक आहे आणि हत्तीच्या पायाशी तीन सैनिक आहेत. उजव्या बाजूला आत्मे विमानात बसून स्वर्गात जात आहेत. आणि त्याच्यावरच्या चौकटीत अप्सरा मृतात्म्याला कैलासावर नेत आहेत. चौथ्या कप्प्यात डाव्या बाजूला एक जोडपे शिवलिंगाची पूजा करत आहे. उजव्या बाजूला नृत्य-गायन चालू आहे. वर अमृतकलश आहे आणि अप्सरा माळा हातात घेऊन उभ्या आहेत. हे जमिनीवरच्या युद्धात कामी आलेल्या धनुर्धारी योध्याचे स्मारक आहे.

दुस-या समृतीशिळेतही चार कप्पे आहेत. सगळ्यात खालच्या कप्प्यात तीन मृतदेह आहेत आणि अप्सरा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत. उजव्या बाजूला हत्तीवर बसलेला राजा आणि त्याचा एक मंत्री आहे. राजाच्या डोक्यावर छत्र धरलेले आहे आणि हत्ती एका माणसाला सोंडेत गंडाळून आपटत आहे. दुस-या कप्प्यात राजा मध्यभागी आहे. त्याच्या डोक्यावर छत्र आहे. उजव्या बाजूला एक घोडेस्वार राजावर हल्ला करतो आहे.  त्यांच्या आजूबाजूला बरेच सैनिक एकमेकांशी लढत आहेत. तिस-या कप्प्यात तीन हत्ती एकापाठोपाठ एक उभे आहेत. त्यांच्यावर माहूत आहेत. समोर दोन सैनिक लढत आहेत. सैनिक दाढीधारी आहेत आणि त्यांच्या कानात भिकबाळ्या आहेत. चौथ्या कप्प्यात कैलासावर मृतात्मा पोहोचला आहे. त्याच्या डोक्यावर अप्सरा पुष्पवृष्टी करत आहेत. वरच्या भागात अमृतकलश आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंना फुलांचे हार घेतलेल्या अप्सरा उडत आहेत.

तिसरा वीरगळही पहिल्या दोन वीरगळांच्या आकाराचा आहे. त्यालाही चार कप्पे आहेत सर्वात खालच्या कप्प्यात डोलकाठ्या असलेली पाच जहाजे आहेत. त्यांच्या एका बाजूला वल्ही आहेत. जहाजांवर धनुर्धारी योद्धे युद्धासाठी सज्ज उभे आहेत. दुस-या कप्प्यात चार जहाजे एका मोठ्या जहाजावर हल्ला करत आहेत. मोठ्या जहाजातली माणसे समुद्रात पडत आहेत. तिस-या कप्प्यात डाव्या बाजूला तीन माणसे शिवलिंगाची पूजा करत आहेत. उजव्या बाजूला गंधर्व आहेत. चौथ्या कप्प्यात शंकर-पार्वती बसले आहेत आणि वरच्या टोकाला अमृतकलश आहे.

चौथ्या वीरगळाला आठ कप्पे आहेत. सर्वात खालच्या कप्प्यात अकरा जहाजे आहेत आणि ती एका जहाजावर हल्ला करत आहेत. दुस-या कप्प्यात पाच जहाजे एका जहाजावर हल्ला करत आहेत. तिस-या कप्प्यात नऊ जहाजे विजयी होऊन जात आहेत. चौथ्या व पाचव्या कप्प्यात सैनिक चालत आहेत. सहाव्या कप्प्यात आठ माणसे शिवलिंगाची पूजा करत आहेत. सातव्या कप्प्यात मृतात्मा अप्सरांसह गमन करत आहे. त्याच्या भोवती वाद्ये वाजवणारे आहेत. आठव्या कप्प्यात महादेवाचे मंदिर आहे.

पाचवी शिळा उंचीला कमी आहे. तिला चार कप्पे आहेत. सर्वात खालच्या कप्प्यात डोलकाठी आणि वल्ही असलेली सहा जहाजे आहेत. एका जहाजात राजाच्या डोक्यावर छत्र आहे. दुस-या कप्प्यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सहा जहाजे येऊन एकमेकांना भिडली आहेत. जखमी सैनिक पाण्यात पडत आहेत. मधल्या कप्प्यात मृत योध्यांवर पुष्पवृष्टी करत आहेत. तिस-या कप्प्यात मध्यभागी शिवलिंग आहे. आसनावर बसलेला एक माणूस त्याची पूजा करत आहे. गंधर्व आणि अप्सरा नृत्य गायन करत आहेत. सगळ्यात वरच्या भागात एका राजाचा दरबार भरलेला आहे  आणि अप्सरा त्याला नमस्कार करत आहेत.

सहाव्या स्मृतीशिळेला दोन कप्पे आहेत. ही चार फूट उंचीची आहे. खालच्या कप्प्यात सागरी युद्ध चालले आहे आणि वरच्या कप्प्यात एक वीर स्वर्गात पोहोचला आहे.

हे  गॅझेटियरमध्ये दिलेले वर्णन आहे. तिथे सहा शिळा असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात आता तिथे चार शिळा आहेत.  बाकी काही तुकडे आहेत त्यापैकी दोन शिळांवर नौकायुद्धाचे चित्रण दिसते. सध्या हे वीरगळ तलावाच्या काठी नसून  एका गगनचुंबी इमारतीच्या परिसरात उभे आहेत. सिमेंट कॉन्क्रिटमध्ये रोवल्यामुळे शिळांचा खालचा भाग स्पष्ट दिसत नाही. अठराव्या शतकात हे वीरगळ अभ्यासकांच्या दृष्टीस पडले तेव्हाच झिजल्यामुळे त्यांच्यावरचे लेख वाचता येत नव्हते. स्थानिक लोक त्यांची पूजा करत होते पण ते नेमकी कशाची आणि कोणाची स्मारके आहेत याविषयीची स्मृती नष्ट झाली होती. आजही त्यातल्या काही चौकटींवर शेंदूर दिसून येतो आणि फुलं वाहून पूजा केलेली असते.

पुरातत्त्वज्ञ हेन्री कझेन्स  (Henrey Cousens) याच्या मते शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यामध्ये तेराव्या शतकात झालेल्या युद्धाचे या वीरगळांमध्ये चित्रण आहे. या युद्धात शिलाहार राजा सोमेश्वर कामी आला आणि शिलाहारांचे राज्य नष्ट झाले. वा.वि मिराशी यांनी आपल्या ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख’ या पुस्तकातही एकसरचे वीरगळ हे सोमेश्वराच्या वीरमरणाचे चित्रण करतात असे म्हटले आहे. देवगिरीच्या महादेव यादवाने प्रचंड सैन्य आणि हत्तीदळ घेऊन इ.स. 1265च्या सुमारास उत्तर कोकणच्या शिलाहारांवर स्वारी केली. जमिनीवरच्या युद्धात सोमेश्वराचा पराजय झाला. त्यानंतर त्याने घारापुरी बेटावर आश्रय घेतला. मात्र महादेव यादवाने अरब मांडलिकांची मदत घेऊन आरमारी युद्धात सोमेश्वराचा पराभव केला. हा पराभव सोपारा बंदराच्या आसपास झाला असावा. सोपारा बंदर ताब्यात घेण्यासाठी हा आरपार संघर्ष झाला असावा. सोमेश्वराचा अंत्यसंस्कार समुद्रकिनाऱ्यावर एकसर या ठिकाणी झाला आणि या युद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ वीरगळ उभारले गेले.

इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकात भारतीय राजांची नौदले भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर कार्यरत होती पण काही तामिळ काव्यांमधला उल्लेख वगळला तर या नौकादलांविषयी लिखित पुरावा सापडत नाही. एकसर खेरीज गोव्यात आणि कोकणात अशा काही स्मृतीशिळा आहेत ज्यावर नौदलाचे चित्रण आढळते. एकसरच्या वीरगळांचे वेगळेपण हेच आहे की त्यात अनेक वल्ही आणि शिडे असलेल्या मोठ्या युद्धनौकांचे चित्रण आहे. राजघराण्यातली व्यक्ती, त्याच्या डोक्यावर छत्र धरलेले असल्यामुळे ओळखू येते. एका वीरगळावर चिलखत घातलेल्या हत्तींचेही चित्रण आहे कानात भिकबाळ्या घातलेले लोक कोकणातले असावेत असत तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुमारे आठशे वर्षांपूर्वीची घटना. सतराव्या शतकात कान्होजी आंग्रे यांनी मराठ्यांचे सशक्त आरमार उभे केले, त्याही आधी कोकणपट्टीतल्या राजांची नौदले होती. अरब नाविकांच्या स्पर्धेत ही नौदले समुद्रावर वावरत असतील याचा पुरावा एकसरच्या वीरगळांच्या रूपाने मागे राहिला. आणखी किती काळ शिल्लक राहील  ते सांगता येत नाही.

-सुनंदा भोसेकर

9619246941

sunandabhosekar@gmail.com

फोटो : नारायण इंगोले

संदर्भ: ठाणे गॅझेटियर –खंड 15, पृष्ठ क्र. 57

About Post Author

5 COMMENTS

  1. सर्वप्रथम सुनंदा भोसेकर यांचे अभिनंदन. क्वचितच कोणाला माहीत असेल अशी ऐतिहासिक महत्व असलेली माहिती त्यांनी सर्वां समोर आणली ती देखिल त्यांच्या नेहमीच्या ओघवत्या शैलीत. मुंबईत आणि त्यातही बोरिवली-एकसरमधिल रहिवाश्यासाठी तर हा लेख खूपच उत्सुकता वाढवणारा आहे.

    • आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. मंडपेश्वर, महाकाली लेणी, सोपाऱ्याचा स्तूप आणि मुख्य म्हणजे कान्हेरी अशा या परिसरात इतिहासाच्या बऱ्याच खाणाखुणा पसरल्या आहेत. यथावकाश त्याविषयी बोलूच.

  2. वीरगळ एकसर संबंधी अद्भुत माहितीबद्दल आभार. एकसर परिसर आम्हा बोरिवली आणि दहिसर च्या रहिवाशांना बहुपरिचित, पण या वीरगळ हेरिटेजसंबंधी आम्ही पूर्ण अज्ञानात होतो. ज्यांना ह्यांचे थोडे बहुत ज्ञान असेल ती पिढी कदाचित आता अस्तित्वात नसेल. पण या लेखामुळे आजच्या पिढीला ही माहिती उपलब्ध झाली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही माहिती आता वेबद्वारे उपलब्ध झाल्यामुळे उत्सुक जाणकार आणि अशा विषयांच्या अभ्यासक व्यक्तींना अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि आपला इतिहास अधिक समृद्ध होईल यात शंका नाही आणि पुढील पिढ्याही ही माहिती सहज मिळवू शकतील. पुनःश्च मनःपूर्वक आभार.

  3. ही खूपच दुर्मिळ माहिती मिळाली या लेखातून.कोकण, मुंबई ला सागरी मार्गाने परदेशातून ये जा होत होती हे माहिती होते .पण येथील नौदल आणि युद्धाबद्दल काहीच माहिती नव्हते. इतिहास माझ्या आवडीचा विषय.
    इतिहासाचा अभ्यास करून ही माहिती दिल्याबद्दल सुनंदा तुझे खूपखूप
    आभार.

  4. आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दिलीप रानडे. मंडपेश्वर, महाकाली लेणी, सोपाऱ्याचा स्तूप आणि मुख्य म्हणजे कान्हेरी अशा या परिसरात इतिहासाच्या बऱ्याच खाणाखुणा पसरल्या आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here