एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास

0
28

 रेणू गावसकर‘UNTO THE LAST’ हा विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आयुष्याची पंचवीस-तीस वर्षे झटणारी, अतिशय संवेदनाशील, प्रेमळ, मुलांवर माया पाखरणारी आणि त्याचबरोबर नम्र आणि साधी स्त्री म्हणजे रेणू गावसकर .

वेश्यांची, व्यसनाधीनांची व रस्त्यावरची मुले – त्यांच्यावर आईचे संस्कार करणारी, आरोग्याची देखभाल करणारी रेणुताईंनी उभी केलेली संस्था म्हणजे ‘एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास’. पुण्याच्या भाजी मंडईमागे ही संस्था 2003 पासून कार्यरत आहे.

समाजातील वंचितांकरता काम करणार्‍या किंवा समाजातील अन्यायाविरुध्द झगडायला प्रवृत्त होणा-या बहुतेक व्यक्ती स्वत:च्या वैयक्तिक दु:खातून संवेदनशील होतात आणि मग स्वत:ला समाजाच्या प्रश्नांमध्ये झोकून देतात.

रेणुताईंच्या मनात अनुकंपा निर्माण झाली ती त्या पंचवीस वर्षांच्या असताना. त्यांचे आई-वडिलांचे छ्त्र एकाएकी हरपले, त्यानंतर! तेव्हापर्यंत त्यांचा विवाह झालेला होता, त्यांना एक मुलगापण होता. असे असूनसुद्धा पोरके झाल्याची पोकळी इतकी गहिरी होती, की त्या काही काळ सैरभैर झाल्या. अशा दु:खी आणि विमनस्क अवस्थेत त्या मुंबई येथील माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकासमोरच्या रस्त्याने जात असताना त्यांचे लक्ष डेव्हिड ससून रिमांड होमच्या खिडक्यांकडे गेले. त्या खिडक्यांत त्यांना अनेक केविलवाणे, हताश, कोवळे चेहेरे दिसले. क़ुणी एक बाई आपल्याकडे आर्द्र नजरेने पाहत आहे, असे त्या मुलांना जाणवले आणि त्यांतल्या काही चिल्ल्यापिल्यांनी रेणुताईंना साद घातली, ‘हमारे पास कोई नहीं आता’. आधीच हळुवार झालेले रेणुताईंचे मन गलबलले. मी विवाहित, माता असूनही जर मला आई-वडिलांच्या निधनाने एकाकी वाटते, तर मग गजाआडच्या ह्या मुलांच्या कोवळ्या मनाचे काय काय़ होत असेल? विचारांनी त्यांचे अंग शहारले आणि त्यांनी रिमांड होमचे दार ठोठावले. त्या दिवसापासून रिमांड होम हे रेणुताईंचे दुसरे घर झाले.

त्यांनी तिथल्या अनुभवावर लिहिलेला कथासंग्रह 'आमचा काय गुन्हा?' हा एक हृदयस्पर्षी दस्तावेज आहे.एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास

कालांतरानं, 2000 सालच्या सुमारास त्या पुण्याला येऊन स्थायिक झाल्या. एका मैत्रिणीला सोबत म्हणून त्या बुधवार पेठेत वेश्यावस्तीत कामाला जाऊ लागल्या. त्यांनी तिथल्या अगतिक स्त्रिया, लोभी दलाल, अमानुष गिर्‍हाईकं आणि या स्त्रियांची मुलं, ह्यांच्या जीवनातलं भयानक आणि विदारक सत्य अनुभवलं. रेणुताईंनी त्या मुलांना त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पदर खोचला व त्या कामाला लागल्या.

वेश्याव्यवसायातील स्त्रियांची अगतिकता, विकलता जाणून घेऊन त्यांनी एकेक करत तिथल्या मुलांना संस्कारित करायला सुरुवात केली. ज्या समाजाची शेवटची पायरी सुखी, समाधानी तो समाज सुखी, समाधानी आणि सुरक्षित, हा विचार रेणुताईंचा प्रेरणास्रोत बनला.

या कामातूनच त्यांची भेट घडली ती व्यसनाधीन लोकांशी. मुळातच आईची माया आणि आपुलकी अंगात असलेल्या रेणुताई व्यसनमुक्ती केंद्रामार्फत समुपदेशन करू लागल्या. तिथं त्यांच्या जवळ आली ती व्यसनाधीन लोकांची कुटुंबं, स्त्रिया आणि मुलं. ही मुलं पण त्यांनी आपल्या पंखाखाली घेतली. मग आली ती घरांतून पळून आलेली रस्त्यावर अथवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारी मुलं.

पुरस्काररेणुताईंच्या कामाचा सपाटा दांडगा, तसाच पसाराही मोठा. अनेकजण न बोलावता सहकार्य करायला पुढे झाले, 'एकलव्य'मध्ये मिसळून गेले. एका बिल्डरने पुण्यात मंडईमागे तीन मजली शाळा दिली. तिथं शंभर मुलं, मुली – वय पाच ते पंधरा- राहतात, शिकतात. काही लोक शिकवायला पुढे झाले, काहींनी धनधान्य देऊ केलं. वंचितांच्या उद्धारासाठी जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे योगदान करू लागला. रेणुताईंचा कटाक्ष आहे, की त्यांना मुलांना सहानुभूती, करुणा दिलेली आवडत नाही. त्या म्हणतात, मुलांना गरज आहे ती सहानुभाव, आत्मीयता, प्रेम यांची. त्यांच्या मते ह्यांतले प्रत्येक मूल म्हणजे समाजाच्या अथांग, अक्राळविक्राळ सागरातले एकाकी बेट आहे.

रेणुताईंनी ह्या मुलांना माणूस म्हणून जगण्यासाठी सक्षम करण्याची धुरा घेतलेली आहे आणि ती त्या सचोटीनं पार पाडताहेत. गतवर्षी ‘एकलव्य’मधली दहा-बारा मुले दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. ती पहिली बॅच. त्यांतील बहुतेक मुलं ‘एकलव्य’मध्येच लहानाची मोठी झालेली आहेत.

ऋजुताची आई धाय मोकलून रडली. तिला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं, की आपल्या- सारख्या शरीरविक्री करणार्‍या स्त्रीची मुलगी दहावी पास होईल कधी म्हणून! ऋजुता एस.एन.डी.टी.मध्ये होम सायन्स करत आहे आणि तिथं शिकलेले वेगवेगळे पदार्थ ‘एकलव्य’च्या मुलांना आवर्जून खायला घालत आहे. सलमा आणि रघू कॉमर्स करताहेत. सवितानं सायन्स घेतलं आहे.

ह्या सर्वच मुलांचं बालपणं हलाखीत, कौटुंबिक छळात गेलेलं आहे. एकेकाच्या कथा रेणुताईंच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा उभा राहतो आणि डोळ्यांत पाणी. रेणुताईंनी आपल्या कथासंग्रहातून ह्या मातांचे आणि मुलांचे हाल मांडले आहेत. त्यांतली भीषणता कुणाचंही काळीज हेलावून सोडेल.

'एकलव्य' हे मात्र आनंदानं बहरलेलं, डवरलेलं गोकुळ आहे. मुलांचा चिवचिवाट सतत चालू असतो. अनेक कंपन्यांनी, विदेशी व्यक्तींनी, विदेशी संस्थांनी मुलांना त-हेत-हेची मदत पुरवलेली आहे. एका कंपनीनं टेम्पो ट्रॅव्हलर दिली आहे. ह्या गाडीतून वेगवेगळ्या वस्त्यांमधून मुलांना वाचन, शिक्षणाची आवड लावण्याचं काम चालू आहे.

एका संस्थेनं आपली इमारत काही वर्षांसाठी म्हणून धायरीमध्ये मुलींचं वसतिगृह चालवायला देऊ केली आहे. एका व्यावसायिकानं वाई येथील जमीन संस्थेला दान केली आहे. नि:स्पृह कार्याची समाजानं केलेली ही फेड आहे. असे असले तरी संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे, कारण जर कार्य आणखी मुलांपर्यंत, स्त्रियांपर्यंत पोचवायचं असेल तर आर्थिक बाजू सक्षम करावीच लागते.

‘एकलव्य’कडे मनुष्‍यबळ कमी पडतं. तसंच या मुलांचा जीवनस्तर उंचावायचा असेल तर शिक्षण, आरोग्य याबरोबर स्वच्छ्ता, शिस्त आणि सर्वसाधारण संस्कारही या मुलांवर व्हायला हवेत अशी आवश्यकता जाणवते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ते आवश्यक आहे. मात्र रेणुताई प्रेम, माया, आपुलकी या भावनांवर पक्क्या उभ्या आहेत.

संपर्क –
एकलव्‍य बालशिक्षण आणि आरोग्‍य न्‍यास,
7, इंदिरा अपार्टमेंट, चिंतामणीनगर, सहकारनगर नं. 2, पुणे – 411009,
020-56215386, 9225543590

ekalavyatrust@yahoo.co.in
http://www.ekalavyapune.org/
रेणू गावसकर – 9850894504 इंद्रायणी – 9850052794

– सतीश राजमाचीकर

Last Updated On – 24th August 2016

About Post Author