ऊस शेती – किमया तीन ‘एफ’ची

भविष्यकाळात देशाच्या प्रगतीसाठी ऊसशेती हा एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ऊसशेती करण्याचे फायदे शेतकऱ्यांनी जाणून घ्यायला हवेत …

अन्न (फूड Food), इंधन (फ्युएल Fuel) आणि खते (फर्टिलायझर्स Fertilisers) या तीन F(‘एफ’)बद्दल जगभर चर्चा सुरू आहे. सगळे जण या तीन गोष्टींच्या कमतरतेमुळे चिंतेत आहेत. त्यांतील पहिला ‘एफ’ हा शेतीशी (Farming) निगडित असून फ्युएल आणि फर्टिलायझर्स यांचे उत्तर या ‘फूड’मध्ये म्हणजे साखर उद्योगामध्ये दडलेले आहे. साखर उद्योग हा प्रामुख्याने ऊसशेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्याने ऊस पिकवला तर पुढील सगळ्या वस्तू म्हणजे साखर, मळीपासून इथेनॉल, रेक्टिफाइड स्पिरिट, एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल, अॅसिड्स, चिपाडापासून (सह)वीज निर्मिती आणि अन्य अनेक गोष्टी बनतात. इंधन म्हणून इथेनॉलचा वापर सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये होणार आहे. तो काही ठिकाणी सुरूही झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचे इथेनॉलचे पंप यापुढील काळात गावोगावी उभे राहिले तर नवल वाटण्यास नको ! कोट्यवधी रुपयांच्या पेट्रोल-डिझेल व इंधन आयातीला समर्थ पर्याय आपोआप तयार होईल.

शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग इथेनॉल निर्मितीमधून जात आहे. इतरही अनेक पर्याय पुढे येऊ लागले आहेत. त्यांमध्ये साखर कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वेस्ट वॉटरवर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करता येतो हा पर्यायही आहे. बायो-सीएनजी आणि बायो-एलएनजी यांमध्ये त्याचा व्यापारी कारणासाठी वापर करता येऊ लागला आहे. यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांना ऊस शेतीतून जादाचे पैसे मिळू शकतात. ऊस शेती ही शेतकऱ्यांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरणार आहे. मात्र, त्यासाठी एकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे फार महत्त्वाचे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे.

(‘शेतीप्रगती’ मासिकाच्या (ऑगस्ट 2022) संपादकीयवरून उद्धृत)

रावसाहेब पुजारी 9322939040 sheti.pragati@gmail.com

———————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here