उषा बाळ यांची सोबती समवेत आव्हानांवर मात

0
329

मानसशास्त्रज्ञ डॉ.अल्बर्ट एलिस म्हणतात, ‘जेव्हा तुम्ही निर्णय घेता की मी माझ्या समस्यांची जबाबदारी स्वतः घेणार आहे. त्याबद्दल इतर माणसे किंवा परिस्थिती यांना दोष देणार नाही, तो क्षण साक्षात्काराचा असतो. तेथून तुमची प्रगती वेग घेते.’ अंध व बहुविकलांग मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘सोबती पालक संघटने’च्या संस्थापक उषा बाळ यांच्या जीवनाकडे बघताना या वचनाची प्रचिती येते. असंख्य आव्हानांना पुरून उरलेल्या या दुर्गेची ही प्रेरक कहाणी.

जन्माला आलेले पहिले बाळ लहानशा आजाराने पंधरा-वीस दिवसांतच 1979 साली गेले. त्याच घटनेची पुनरावृत्ती 1983 मध्ये झाली. त्यानंतर दोन वर्षांनी तिसऱ्या प्रयत्नात मुलगा (आदित्य) झाला. तो अंध व ऑटिस्टिक. सर्व उपचार निष्फळ ठरल्यावर उषाताईंमधील आईने, प्रथम मन खंबीर करून मुलाचे अपंगत्व स्वीकारले आणि पतीबरोबर विचारविनिमय करून निर्णय घेतला, की यापुढे मुलासाठी प्रयत्न करायचा नाही. त्याचवेळी, ‘आपले पुढील जीवन अंध आणि बहुविकलांग मुलांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी कारणी लावायचे हा विचारही मनात अंकुरला. पण त्यासाठी काय करावे ते कळत नव्हते.

उषा बाळ ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजमध्ये प्राध्यापक तर त्यांचे पती प्रकाश बाळ हे पत्रकार. त्यांना आदित्यला नोकरी करून सांभाळताना माहेरची भक्कम साथ मिळाली. पण दिसत नाही, एकग्रता कमी, अस्थिर स्वभाव अशा मुलाला रमवणार तरी कसे ? म्हणून स्वस्थ बसून चालणार नव्हते. अंधत्वाच्या जोडीला बौध्दिक क्षमतांची कमी असलेल्या आदित्यसारख्या मुलांना सामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेणे शक्य नव्हते. अशा मुलांसाठी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) ही संस्था कार्यरत होती. तिच्या माध्यमातून समदुःखी पालक एकत्र आले आणि उषाताईंच्या पुढाकाराने ‘सोबती पालक संघटने’ची स्थापना 2004 साली झाली. त्या पालकांच्या मदतीने ठाण्यात ‘डे केअर सेंटर’ 2007 मध्ये सुरू झाले. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या त्या केंद्राचा लाभ दहा-बारा मुले घेऊ लागली. पश्चिम उपनगरातील मुलांसाठी अंधेरी येथे दुसरे केंद्र 2009 मध्ये सुरू झाले. तेथेही पाच मुले नियमित येऊ लागली.

त्या केंद्रांत दात घासणे, टॉयलेट ट्रेनिंग येथपासून मोत्यांचे दागिने बनवणे, पणत्या रंगवणे, तोरणे बनवणे, कुटून मसाले – चटण्या बनवणे अशा कामांचे प्रशिक्षण देताना लक्षात आले की मुलांना ते जमत आहे आणि ती त्यात रमत आहेत. त्या निमित्ताने मुलांना तर मित्र मिळालेच, त्याबरोबर पालकांचाही ग्रूप तयार झाला. सुखदुःखाच्या गप्पा रंगू लागल्या. तेव्हा सर्वांच्या मनातील प्रश्नाला – ‘आमच्या पश्चात मुलांचे काय’… वाचा फुटली. मुलांना त्यांच्या  अपंगत्वासह सुखी जीवन जगता यावे यासाठी ‘निवासी केंद्र’ हाच एकमेव उपाय होता.

त्यासाठी जागेचा शोध सुरू झाला. जमीन घेणे, त्यावर वास्तू उभारणे, मुलांबरोबर राहणारे प्रशिक्षित शिक्षक तयार करणे या सगळ्यासाठी लागणारा पैसा देणग्यांतून मिळवणे अशी आव्हाने पेलताना अनंत अडचणी आल्या. सगळे हातातून निसटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ‘हेतू शुद्ध असला की मार्ग सापडतो’ या वचनाचा प्रत्यय आला, मदतीचे हात मिळत गेले. एका दानशूराने वाडा तालुक्यातील ‘तिळसा’ गावातील त्यांची ‘पाऊण एकर जमीन’ संस्थेला दान दिली. अखेर पन्नास मुले राहू शकतील अशा सोयींसह, ‘तेरा हजार स्क्वेअर फुटां’च्या टुमदार इमारतीत निवासी केंद्र 9 एप्रिल 2017 रोजी सुरू झाले. तो प्रवास क्षणोक्षणी परीक्षा पाहणारा होता.

सध्या तेथे सतरा मुले (पंधरा मुलगे आणि दोन मुली) रहात आहेत. त्यांच्यासाठी मुलांबरोबर वास्तव्य करणारे तीन पुरुष शिक्षक व आलटून पालटून राहणाऱ्या तीन शिक्षिका आहेत. ती मुले सहसा कोणात चटकन मिसळत नाहीत. पण जीव लावणारे शिक्षक आणि मोकळे वातावरण यामुळे मुले पटकन रुळली. खेळ, व्यायाम, व्यावसायिक प्रशिक्षण, बागकाम यात सतत गुंतवून ठेवल्याने तरतरीत झाली. मुलांचे कुटुंबाशी असलेले भावनिक नाते तुटू नये म्हणून त्यांना महिन्यातून चार दिवस घरी पाठवले जाते. सुट्टी संपली की मुले उत्साहाने केंद्रात परततात.

त्या निवासी केंद्रात दर महिन्याची ठरलेली आठ हजार रुपये फी काही ठराविक पालकच देऊ शकतात. बाकीचे त्यांच्या क्षमतेनुसार भरणा करतात. मात्र वागणुकीत कोणताही भेदभाव नाही.

पालक, शिक्षक, स्वयंसेवक, हितचिंतक आणि देणगीदार आणि अर्थातच जीवनसाथी प्रकाश बाळ या सर्वांच्या साथीने उषाताईंचे काम अनेक अंगाने सुरू आहे. त्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबर, पालकांचे मनोधैर्य वाढवण्याचा, त्यांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. उषाताईंनी निवृत्त झाल्यानंतर 2011 मध्ये वहिनी स्वाती गोखले यांच्यासह सोबतीच्या कामात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले.

त्या सत्तराव्या वर्षीही नव्या नव्या संकल्पनांना आकार देण्यात मग्न आहेत. त्या केंद्राच्या पंचक्रोशीतील दिव्यांग मुलांना विविध प्रकारचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी जवळच थोडी जमीनही घेतली आहे. तेथे कार्यशाळा उभारायचा प्रकल्प विचाराधीन आहे. मुलांचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी आर्थिक घडी बसवणे व मनुष्यबळ वाढवणे हे आता त्यांचे प्रमुख ध्येय आहे. या सर्व योजना साकार करण्यासाठी त्यांना अनेक हातांची साथ मिळावी यासाठी शुभेच्छा.

उषा बाळ – 9869122357 Ubal77.ub@gmail.com
सोबती पेरेंट्स असोसिएशनचे निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, विठ्ठल मंदिराजवळ, मु.पो.तिळसा, तालुका:  वाडा, जिल्हा: पालघर.

संपदा वागळे 9930687512 waglesampada@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here