उपवासाला विचारांचे अधिष्ठान!

0
50

–  अविनाश सावजी

   अमरावतीचे अविनाश सावजी यांनी अण्‍णा हजारे यांच्‍या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्‍याच्‍या विचारातून सात दिवसांचा ‘उपवास’ धरला होता. सावजी यांच्‍या उपवास धरण्‍याच्‍या कृतीमागे केवळ भावनाच नाही, तर त्‍याला विचारांचे अधिष्‍ठानही आहे. ही बाब त्‍यांचे विचार जाणून घेतल्‍यावर समजते. उपवास आणि उपोषण यातील फरक स्‍पष्‍ट करून त्‍यांनी उपवासाचे अनेक फायदे सांगितले आहेत. यामध्‍ये स्‍वतःच्‍या क्षमता जाणून घेणे आणि आत्‍मबळाची वृद्धी होणे या दोन महत्‍त्‍वाच्‍या गोष्‍टी ते अधोरेखित करतात.


–  अविनाश सावजी

     अण्‍णा हजारे यांनी सुरू केलेल्या लोकपाल विधेयकाच्‍या आंदोलनाला पाठिंबा म्‍हणून मी 22 ऑगस्‍ट ते   28 ऑगस्‍ट 2011 या कालावधीत अमरावतीतील अंबादेवी रोड, ओसवाल भवन येथे उपवास धरला होता. हा उपवास होता, उपोषण नव्‍हे. उपोषण म्‍हटले की त्‍यात मागणी आली. मी केवळ पाठिंबा दर्शवण्‍यासाठी उपवास केला होता. उपवास हा स्‍वतःसाठी असतो आणि स्‍वतःसाठी केलेल्‍या गोष्‍टींचेही वैश्विक परिणाम होत असतात. एका जागी उभे राहून केलेल्‍या प्रार्थनेचेही परिणाम होतात, असे मी मानतो.

     आधी, मी सायलेण्ट ऑब्‍जर्व्‍हर म्‍हणून या आंदोलनाकडे पाहिले. त्‍यानंतर म्‍हटले की आपणंही यासाठी काही केले पाहिजे! माझा पिंड रस्‍त्‍यावर उतरण्‍याचा नाही, पण मी उपवास नक्‍कीच करू शकतो. त्‍यासाठी मी उपवासाला सुरूवात करून, इतरांनीही आपापल्‍या ठिकाणी उपवास करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. सामुहिक प्रार्थनेचा परिणाम म्‍हणून आंदोलनास बळ आणि नैतिक पाठिंबा मिळावा हा यामागे उद्देश होता.

     माझा हा तिसरा उपवास आहे. मी 1980 साली, होस्‍टेलला असताना सहा तासांहून अधिक काळ उपाशी राहू शकत नसे. त्‍यावेळी उपवासाची जी माहिती वाचनात आली त्‍यावरून आपण हे करू शकू का? असा विचार मनात आला. त्‍यानंतर मी रात्रीचे जेवण न घेण्‍याचा प्रयोग सुरू केला. विज्ञानात वेगवेगळे प्रयोग करतात, त्‍या प्रकारे मी वेळेच्‍या मर्यादेत प्रयोग करत सहा तासांचा कालावधी बाहत्तर तासांपर्यंत वाढवला. या संकल्‍पशक्‍तीचा चांगला अनुभव मला जीवनाच्‍या इतर बाबींतही आला.

     मी गणतंत्रदिनाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्‍याच्‍या निमित्‍ताने एक दिवसाचा उपवास करून, देशातील घडामोडींवर चिंतन केले. त्‍यावेळी मी हा उपवास आणखी पाच दिवस वाढवला. दीडएकशे मुलामुलींनी बारा तास, चोवीस तास, छत्तीस तास, असे आपापल्‍या परीने उपवास करून त्यावेळी मला साथ दिली. दोन वर्षांपूर्वी, ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ नावाचा सप्‍ताह देशभर साजरा करण्‍यात आला. भारतीयांमधील दानवृत्‍ती वाढावी हा त्यामागचा हेतू होता. त्यामध्‍ये आपण काय द्यावे हे स्‍वतःहून ठरवायचे होते. आपण इतरांना दान करताना आपणास नको असलेल्‍या गोष्‍टी देतो. आपणाकडून मुदलातून काहीच दिले जात नाही. आपल्‍यालाला हव्‍या असलेल्‍या गोष्‍टींमधून इतरांना देण्‍याचा आनंद वेगळा असतो. त्‍यामुळे मी उपवास करून त्‍यातून जे अन्‍न वाचेल, त्‍याची किंमत इतरांना देण्‍याचा संकल्‍प केला. त्‍यानुसार मी सहा दिवसांचा उपवास केला आणि लोकांनाही तसा प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले. आमचे ‘सेवांकूर’ नावाचे तरुणांचे नेटवर्क आहे. त्‍यातील अनेक मुलांनी आपापल्‍या ठिकाणी उपवास केले.

     अण्‍णांच्‍या आंदोलनाच्‍या निमित्‍ताने, मी माझी क्षमता वाढवत नेत सात दिवसांचा उपवास करण्‍याचा प्रयत्‍न केला. अण्‍णांनी रविवार, 28 ऑगस्‍ट 2011 रोजी उपोषण सोडले आणि माझा उपवास त्‍यापुढे लांबवण्‍यास काही अर्थ उरला नाही. तेव्हा मीदेखील माझ्या उपवासाची समाप्‍ती केली.

     आपल्‍या शरीराच्‍या क्षमता अफाट आहेत, त्‍यांचा आवाका आपल्‍याला ठाऊक नसतो. दैनंदिन जीवनात आपण शरीराच्‍या केवळ दहा ते वीस टक्के क्षमतांचा वापर करत असतो. या क्षमता अधिक प्रमाणात वापरता आल्‍या तर आयुष्‍य अधिक समृद्ध होऊ शकते. उपवास करण्‍याने आपल्‍याला ही क्षमता जाणून घेता येते. निसर्गोपचारात तसेच आयुर्वेदात थेरेपी म्‍हणून उपवासाला महत्‍त्‍व आहे. आरोग्याच्‍या आणि क्षमताविकासाच्‍या दृष्‍टीने ही उपयुक्‍त पद्धत आहे. जैन समाजाच्‍या व्‍यक्‍ती वगळता हिंदू आणि मुस्लिम धर्मीय व्‍यक्‍ती ‘फराळी उपवास’ करतात.

     गांधींनी वापरलेल्‍या उपवास आणि मौन या दोन्‍ही गोष्‍टींचा अण्‍णांकडूनही परिणामकारक वापर करण्‍यात आला. अण्णांच्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण शक्‍ती उभी राहिली. या आंदोलनात तरुण गांधींच्‍या विचारांपर्यंत पोचला. ही युवाशक्‍ती दूरगामी टिकवण्‍यासाठी शांतता आणि अहिंसक पद्धतींचा वापर करता आला पाहिजे. तरुणांनी ही साधने वापरण्‍यास शिकावे आणि त्‍यासाठी त्‍यांना प्रेरणा मिळावी, याकरता मी उपवास केला. आणखी एक गोष्‍ट अशी, की तरुण वर्गाला साहस आवडते. साहस केवळ मैदानात अथवा पर्वतांवर नाही, तर एका जागेवर बसण्‍यातही आहे. ही गोष्‍ट तरूणांना आव्‍हानाप्रमाणे वाटली असावी. मी उपवास आणि मौन या दोन्‍ही गोष्‍टी तरूणांसमोर अॅडव्‍हेंचर म्‍हणून मांडण्‍याचा प्रयत्‍न करतो.

     भारतात वीस कोटी जनता दररोज एकवेळ उपाशी राहते. ‘हंगर’ हा शब्‍द आपण शिकतो, मात्र भूक म्‍हणजे काय, त्‍याचा अर्थ आणि अनुभव आपल्‍याला समजत नाही. यामुळे भूक लागली की कसे वाटते हे कळावे,  हंगर या शब्‍दाचा अर्थ जाणता यावा, ही देखील माझी उपवास करण्‍याची कारणे आहेत. अमरावतीच्‍या पानेरी पाचड नावाच्‍या सोळा वर्षीय मुलीच्‍या हस्‍ते मी उपवास सोडला. या मुलीला असलेल्‍या एका गंभीर आजारामुळे तिला उभे राहणे किंवा चार पावले चालणे, अशा साध्‍या क्रियाही शक्‍य नाहीत. मात्र तरीही तिने जिद्दीने राष्‍ट्रीय पातळीवरील जलतरण स्‍पर्धांमध्‍ये पंचवीस पदके मिळवली आहेत. मला वाटते की बाबा आमटे आणि अभय बंग यांच्‍याप्रमाणे पानेरीसारखी सर्वसामान्‍य माणसेही आपले आदर्श असतात. मी पानेरीला आदर्श मानतो.

अविनाश सावजी, भ्रमणध्वनी – ९४२०७२२१०७, ईमेल – aksaoji@gmail.com

दिनांक – 23-08-2011

संबंधित लेख –

उपवासाचे राजकारण
{jcomments on}

About Post Author

Previous articleमुदतपूर्व निवडणुका?
Next articleलोकसभेचा दुप्पट आकार !
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.