उपवासाचे राजकारण

– डॉ.अनिलकुमार भाटे 

     उपवास ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा आणि विशेषत: अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून अलिकडच्या सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत उपवास ही व्यक्तिगत बाब होती, पण सध्या उपवासाचे राजकारण मांडले जात आहे. त्याबरोबर उपवासाचे मूळ असलेल्‍या अध्यात्म या गोष्टीचाही अतिरेक होऊ लागला आहे. सत्याग्रह, उपोषण, अहिंसा या संकल्पनांचा पुन्हा नव्याने विचार करण्याची आणि त्यांची पुनर्मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

डॉ.अनिलकुमार भाटे

 

     उपवास ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा आणि विशेषत: अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून अलिकडच्या सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत उपवास ही निव्वळ व्यक्तिगत बाब होती. उपवास केव्हा करावा, कसा करावा, कुणी करावा, कुणी करू नये (उदाहरणार्थ गर्भवती स्त्रिया वगैरे) याबद्दलचे नियम धर्मशास्त्रामधे दिलेले आहेत, पण सध्या वेगळेच घडत आहे. उपवासाचे मूळ जे अध्यात्म त्या गोष्टीलाही भारतीय संस्कृतीमधे फार महत्त्व आहे आणि त्याचाही अतिरेक अलिकडे होऊ लागला आहे.

 

     उपवास या गोष्टीला उपोषण म्हणायला कधीपासून सुरुवात झाली ते ठाऊक नाही. पण हिंदू धर्मग्रंथांमधे उपोषण हा शब्द उपवास करण्याची कार्यपद्धत ऊर्फ ‘प्रोसेस’ या अर्थाने वापरला गेला आहे. त्यातही उप अधिक वास या शब्दांचा अर्थ देवाच्या निकट जाणे, देवापाशी वसती (वास) करणे असा सांगितला गेला आहे. त्याबरोबर, माणसाने मनामधे वसती करून राहिलेल्या वासनांना (मने, चित्ते वसति इति वासना!) दूर ठेवणे असाही अर्थ आहे. त्याउलट, उपोषण ही शरीराचे पोषण थांबवण्याची क्रिया आहे. पण अलिकडच्या काळात उपोषण ही बाब इतरांना किंवा दुसर्‍या कुणाला तरी अद्दल घडवण्याची युक्ती या अर्थाने आणि एक नवी सामाजिक प्रथा म्हणून वापरली जाऊ लागली आहे. त्याचे हत्यार बनले आहे. इतकेच नव्हे तर उपोषण राजकारणाचा अविभाज्य भाग बनून गेले आहे. मला त्यात सूडबुद्धीचादेखील वास येतो.

 

     लोकमान्य टिळक हे भारतातल्या राजकारणामधे हे मोठे अजोड नाव आहे. टिळक 1920 साली वारले, पण त्यांच्या काळापर्यंत राजकारणांमध्ये हा प्रकार नव्हता. अध्यात्मातल्या उपवास धरून सर्व गोष्टी पूर्णपणे व्यक्तिगत स्वरूपाच्या मानल्या गेल्या आहेत. टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे म्हटले, पण त्या जन्मसिद्ध हक्काचा संदर्भ जन्माशी आणि आयुष्याशी होता; अध्यात्माशी नव्हे!

 

     अध्यात्माला राजकारणामधे स्थान मिळवून देण्याचे श्रेय गांधीजींच्याकडे जाते. त्यांनी आयुष्यभर सतत ‘सत्य, सत्य’ असा घोष केला. सत्य या शब्दाचे 1.व्यावहारिक सत्य आणि 2.आध्यात्मिक सत्य असे दोन अर्थ आहेत. गांधीजींनी या दोन अर्थांची सरमिसळ केली. त्यातून सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान जन्माला आले आणि त्या संदर्भात उपोषण या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.

 

     अण्णा हजारे यांनी उपोषण केले, कारण ते गांधीवादी आहेत. पण रामदेवबाबा गांधीवादी नव्हेत. तरीही ते उपोषण करू पाहतात याचे मला आश्चर्य वाटते आणि त्यानंतर पोलिसांना चुकवण्याकरता स्त्रीवेश घालून पळ काढणे हा तर भलताच प्रकार झाला!

     वेदांमधे सत्य या शब्दाचा अर्थ व्यावहारिक सत्य किंवा फारतर लोजिकल सत्य एवढाच आहे आणि तो सत्यवचन ऊर्फ प्रॉमिस या एकमेव अर्थाने वापरला गेला आहे. आध्यात्मिक सत्याकरता वेदांमधे सत्य या शब्दाऐवजी ‘ऋत’ असा वेगळा शब्द वापरला गेला आहे.

     वेदवाड.मयामधे ‘सत्यम वदिष्यामि, ऋतम वदिष्यामि’ असे जोडवाक्य ठिकठिकाणी येते. त्यामधे अधिक-उणे असे काही करता येत नाही. त्यातला एखादा शब्द काढून टाकता येत नाही किंवा एखादा शब्द बाहेरून आत घालता येत नाही. शिवाय, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचा भोंगळपणा वेदांमधे नाही. फारच महत्त्वाची एखादी गोष्ट सांगायची असेल, तर वेदांमधे पुनरुक्ती येते, तीसुद्धा अपवादाने. तेव्हा एकदा ‘सत्यम वदिष्यामि’ (म्हणजे मी खरे सांगतो) असे म्हटल्यावर पुन्हा ‘ऋतम वदिष्यामि’ असे म्हणायची गरज काय? त्यावरून सत्य आणि ऋत या दोन शब्दांचे मथितार्थ एक नसून वेगवेगळे आहेत हे उघड होते.

 

     जो सत्य जाणू शकतो आणि ते सत्य स्पष्टपणे सांगतो त्याला वैदिक परिभाषेत सत्यवादी किंवा सत्यवचनी म्हणतात. पण जो ऋत जाणतो आणि सांगूही शकतो, त्याला वैदिक परिभाषेमधे ऋषी असे म्हणतात. मराठीमधे आपण जरी ऋषीमधला षी दीर्घ लिहित असलो, तरी वैदिक संस्कृतात तो –हस्व आहे आणि त्याच्यापुढे विसर्ग आहे(ऋषि:). सत्य जाणणे हे बौद्धिक (इण्टलेक्चुअल) स्वरूपाचे असते पण ऋत जाणणे बौद्धिक असत नाही, कारण ऋत बुद्धीच्या कक्षे- पलीकडे असते. ऋत हा ऋषीने त्याच्या समाधी अवस्थेमधे, पंचेद्रिंयांच्या पलीकडे जाऊन घेतलेला आणि त्याबरोबरच मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे जाऊन घेतलेला, अतींद्रिय स्वरूपाचा निर्विचारी (थॉटलेस) अनुभव असतो. अशा अनुभवाची वर्णने वेदांमधल्या आरण्यकांमधे व उपनिषदांमधे आहेत.

     अरण्यक-उपनिषदांमधली ऋताची वर्णने ही मानवी इंद्रिये, मन, बुद्धी यांचा परिपाक (प्रॉडक्ट) नाहीत. ती अमानवी आहेत, म्हणून अपौरूषेय; असा ‘अपौरुषेय’चा एक अर्थ आहे. दुसरा रूढ अर्थ म्हणजे वेदांना कोणी एक कर्ता नाही. ऋषिसमुदायाला निसर्गसान्निध्यात झालेले स्फुरण व त्यातून निर्माण झालेले ज्ञान असा आहे. पहिला अर्थ फक्त अरण्यक-उपनिषदांना आणि काही खास वेदमंत्रांना लागू पडतो, सर्व वेदवाड.मयाला नव्हे. तरीदेखील सर्व वेदवाड.मय हे दुसर्‍या अर्थाने अपौरुषेय आहे.

      ऋत हे मन, बुद्धी, चित्त यांच्या पलीकडल्या अवस्थेमधे जाऊन घेतलेल्या अनुभवावर आधारलेले असल्याने त्याचे विवरण भाषेच्या माध्यमातून करता येत नाही. किंबहुना ऋताचा अनुभव पंचेद्रियांच्याही पलीकडे जाऊन घेतलेला असल्याने तो ‘एक्स्ट्रा-सेन्सरी परसेप्शन’ (ई-एस-पी) प्रकारचा असतो. म्हणूनच ऋताचा अनुभव पूर्णपणे व्यक्तिगत (सबजेक्टिव्ह) असतो. त्याचे सार्वत्रिकीकरण (ऑब्जेक्टिफिकेशन) करता येत नाही. मात्र तो व्यक्तिगत असला तरी चुकीचा किंवा खोटा असतो असे नव्हे. तो प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या त्याच्या पुरता खरा असला तरी ज्याला जे जे बरोबर वाटेल त्याने ते ते, ‘माझा अनुभव असा आहे बुवा’ असे म्हणावे, अशा प्रकारचा नाही. उदाहरणार्थ, वेदांमधली वेगवेगळी सूक्ते रचणारे ऋषी वेगवेगळे अनेक आहेत. पण ऋत या अनुभवाच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत आहे. वेदवाड.मयामधे कुठेही वैचारिक मतभिन्नता (कॉन्फ्लिक्ट) नाही; एका वाक्याविरुद्ध दुसरे वाक्य असा अंतर्गत परस्परविरोधही नाही.

     एवंच, ऋताचा अनुभव जरी व्यक्तिगत असला, तरी वेगवेगळ्या व्यक्तींनी घेतलेला अनुभव एकसारखा असतो, हे स्पष्ट दिसते. याचे आणखी एक कारण असे, की व्यक्तिसापेक्षता म्हणजे व्यक्ती-व्यक्तीमधला फरक हा मुख्यत: प्रत्येक व्यक्तीचे मन, स्वभाव, बुद्धी वगैरे वेगवेगळे असल्याने असतो. पण जो अनुभव मुळातच मन, बुध्दी यांच्या पलीकडचा आहे, त्याच्या बाबतीत व्यक्ती-व्यक्तीमधला फरक येणार कुठून?

     ऋत हा अनुभव भाषेत म्हणजे शाब्दिक स्वरूपात सांगण्याचे प्रयत्न वेदांच्या व्यतिरिक्त इतर ग्रंथांमधे झाले आहेत. वानगीदाखल 1.आद्य शंकराचार्यांचा ‘विवेकचूडामणि’, 2.योगी अरविंद यांचा ‘लाइफ डिव्हाईन’, 3.ज्ञानेश्वरांचा ‘अमृतानुभव’ अशी उदाहरणे देता येतील. या विविध ग्रंथांमधे दिलेल्या तात्त्विक विवरणांमधे कमालीचा सारखेपणा आहे.

     एवंच, गांधीजी सत्यवादी, सत्यवचनी होते यात शंका नाही. पण ते ऋषी नव्हते. म्हणूनच गांधीजींनी सत्य आणि ऋत या दोन शब्दांच्या अर्थांची सरमिसळ करून त्या सगळ्याला सत्य असे म्हटले. अर्थात त्याबद्दल गांधीजींना दोष देता येत नाही.

     अण्णा हजारे गांधीवादी आहेत. तरीसुद्धा, मी अमेरिकेत राहत असल्याने, लांब अंतरामुळे, अण्णा हजारे यांचे उपोषण गांधीवादी होते का? याचे नेमके परीक्षण मी करू शकलो नाही. तसे असेल तर त्यांच्या उपोषणाला अहिंसक म्हणता येईल. पण रामदेवबाबांच्या उपोषणाबाबत मात्र तसे दिसत नाही.

     गांधीजींची उपोषणे अहिंसक होती, कारण त्यांच्यामधे ब्रिटिश सरकारचे मन वळवण्याचा प्रयत्न होता. त्या उपोषणांचे उद्दिष्ट फक्त ‘मतपरिवर्तन’ एवढे असायचे. त्यात हिंसा नव्हती.

   उपवास आणि उपोषण यांच्यामधला फरक ध्यानात घेतला, तर गांधीजींच्या उपोषणांना उपवास म्हणता येते. पण रामदेवबाबांचे उपोषण हा उपवास तर नव्हताच, पण साधे उपोषणदेखील नव्हते. तो चक्क ‘हंगर स्ट्राईक’ होता. ‘स्ट्राईक’ म्हणजे ‘आघात’ आणि कुठलाही आघात अहिंसक असूच शकत नाही!

     शिवाय, रामदेवबाबांनी डेहराडूनच्या विमानतळावर विमानात बसल्यावर पोलिसाचे पेन मागून जी पाच पाने खरडली, त्यावरून तर मला त्यात सूडबुद्धीचा वास येतो. यात अहिंसा कुठे आली?

     रामदेवबाबांना टिव्हीवरून योगाचा प्रचार केल्यामुळे प्रचंड लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. योग म्हटला की त्याला पावित्र्य, मांगल्य, अध्यात्म वगैरे गोष्टी साहजिक चिकटवल्या जात असतात. पण दुर्दैवाची बाब अशी, की रामदेवबाबा या पावित्र्याच्या संकल्पनेचा राजकीय उपयोग करू पाहत आहेत.

     सत्याग्रह, उपोषण, अहिंसा या संकल्पनांचा पुन्हा नव्याने विचार करण्याची आणि पुनर्विचार करून त्यांची पुनर्मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सत्याग्रह काय आणि उपोषण काय, हे दोन्ही प्रकार भारतातले आहेत आणि भारतातल्या समाजजीवनावर या दोहोंचा प्रभाव आहे. या दोन्ही प्रकारांमधे अध्यात्माला राजकीय क्षेत्रात विनाकारण ढकलले जात आहे.

     मी एक अमेरिकन नागरिक आहे. थॉमस जेफर्सन याने अमेरिकेची राज्यघटना लिहिताना म्हटलेले अत्यंत महत्त्वाचे मूलभूत तत्त्व-‘सेपरेशन ऑफ चर्च अॅण्ड स्टेट’ हे मी शिरोधार्ह मानतो. माझे भारतीय बांधव याचा विचार करतील का?

-डॉ.अनिलकुमार भाटे,  anilbhate1@hotmail.com
-निवृत्त प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान व मॅनेजमेण्ट एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका, 

About Post Author