उपक्रमशील भक्तिसंस्था – श्रीक्षेत्र देवगड

0
109
_Shrikshetr_Devgad_1.jpg

अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड हे अलिकडे प्रसिद्ध झालेले महत्त्वाचे भक्तिकेंद्र. ते स्थान मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर नगर-औरंगाबाद महामार्गालगत आहे. तो दळणवळणाचा मार्ग म्हणून प्राचीन काळापासून ओळखला जातो. नेवासा या पुण्यक्षेत्राचे सान्निध्य व ज्ञानदेवांच्या वारकरी पंथाचा अनुषंग लाभल्याने त्या स्थळास आगळे महात्म्य लाभले आहे. शिवाय, क्षेत्र प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीचा अनुबंध पुराणातील अमृतमंथनाच्या घटनेत आहे. नदी प्रवरा देवस्थानाला वळसा घालून पुढे प्रवरासंगम येथे गोदावरीला भेटते. गोदा-प्रवरेचा तो अपूर्व संगम डोळ्यांचे पारणे फेडणारा अद्भुत सोहळाच वाटतो!

त्या दोन नद्यांच्या संगमावर आणि तीरावर महाराष्ट्र संस्कृतीचा पाया रचला गेला. त्याच प्रदेशात श्री गुरुदत्त देवस्थान वसले आहे. भूमी वै. किसनगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे. भास्करगिरी महाराज यांनी ते दत्तपीठ उभारले. देवगड हे क्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, कडकंजी, नरसोबाची वाडी वगैरे प्रमाणे अल्पावधीत नावारूपाला येत आहे. भास्करगिरी महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्या खडकाळ माळरानावर सुंदर असे नंदनवन फुलवले आहे. तेथे भावभक्तीची निसर्गरम्य बाग बहरली आहे.

क्षेत्राची महती वैविध्यपूर्ण आहे. ते भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या त्रिविध अधिष्ठानावर मंडित आहे. तेथे फक्त भक्तीचा मळा फुललेला नाही तर त्या ओसाड माळरानावर मानवतेच्या कल्याणाचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा अखंड नंदादीप तेवत आहे. भक्तीबरोबरच सामाजिक उन्नतीचे स्तोत्र गायले जात आहे. क्षेत्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील शांतता! ‘अशा एखाद्या सुंदर तळ्याकाठी, बसून राहवे मला वाटते, जेथे शांतताच स्वत:च निवारा शोधत आलेली असते’ या काव्यपंक्तीतील अर्थाची प्रत्यक्ष अनुभूती त्या क्षेत्री प्रत्ययास येते. म्हणूनच ध्यानधारणा, पारायण, भक्तिसाहित्याचे मनन- चिंतन- भजन- कीर्तन इत्यादी उपक्रमांसाठी क्षेत्र महत्त्वपूर्ण ठरले आहे आणि महाराजांनी भक्तनिवास व यात्रीनिवास बांधून ती सुविधा तेथे भक्तगणास उपलब्ध करून दिली आहे. एकूणच, भक्तगणांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे हे संस्थान धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असे भक्ती केंद्र बनले आहे. तेथे आज राज्यातून व परराज्यातून अनेक भाविक येत आहेत. तेथे अत्यंत शिस्तबद्ध व निस्पृहतेने सेवा केली जाते. कोणतेही बाह्य अवडंबर न माजवता तेथे केवळ भक्तीला प्राधान्य आहे आणि त्याचा आदर्श आहेत ते भास्करगिरी महाराज! महाराजांची दूरदृष्टी, कल्पकता आणि त्यांचा व्यासंग यांचे भक्कम अधिष्ठान देवस्थानाला लाभले आहे.

_Shrikshetr_Devgad_2.jpgदेवगड देवस्थानने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काही वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तेथे निवासी शाळेची सुविधा निर्माण केली गेली. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामीण परिवारातील मुलांची शिक्षणाची समस्या सुटली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे गुरुपीठ म्हणून त्या संस्थानाने नावलौकिक प्राप्त केला आहे. भास्करगिरी महाराज यांना पंढरपूर येथील शासकीय समितीत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. शिस्तबद्ध पालखी सोहळा, दत्त जन्म सोहळा भक्तिभावाने व शिस्तबद्धपणे पार पडतो.

देवगड देवस्थान येथील भौतिक सुविधा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तेथील संगमरवर दगडातील भव्य इमारती देखण्या आहेत. निसर्गाने नटलेला परिसरही मनाला शांतता प्रदान करतो. दत्त मंदिर, किसनगिरी महाराज यांचे समाधी मंदिर, गोशाळा, पाकशाळा, भक्तनिवास या सर्व वास्तू रमणीय आहेत. वृक्ष लागवड करून तेथे साधलेला पर्यावरणाचा समतोल वाखाणण्याजोगा आहे. ज्ञानसागर या तेथील एका इमारतीच्या नावाने तर मला खूपच भुरळ घातली. त्या इमारतीत ज्ञान व भक्तीविषयक जागर, कीर्तन, प्रवचन, भजन, चिंतन, चर्चा, विचार अविरतपणे चालू असतात. तेथील सांस्कृतिक सभागृहाला ‘ज्ञानसागर’ असे नाव दिले गेले आहे.

– अशोक लिंबेकर, संगमनेर, ashlimbekar99@gmail.com

About Post Author