उखाणे

_Ukhane_1.jpg

स्त्रिया त्यांच्या पतीचे नाव लग्नकार्य, मुंज, डोहाळेजेवण, बारसे अशा आनंदाच्या प्रसंगी लहान लहान, मात्र यमकबद्ध शब्दांची नेटकी मांडणी केलेल्या वाक्यरचनेमध्ये, कुशलतेने गुंफून थोड्या लाडिक स्वरात सर्वांसमक्ष घेतात; त्या प्रकाराला ‘उखाणा’ घेणे म्हणतात. स्त्रीने तिच्या पतीचे नाव घेऊ नये, त्याचा उल्लेख ‘हे’, ‘अहो’, ‘इकडून’, ‘स्वारी’ अशा संबोधनांनी वा सर्वनामांनी करावा अशी पद्धत, विशेषत: महाराष्ट्रात चालत आलेली आहे. ती कोणत्या काळापासून पडली असावी याचा अंदाज नाही.

उखाण्यांना ‘झी’ मराठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने वेगळीच लज्जत प्राप्त झाली आहे. ‘भावोजी’ आदेश बांदेकर रोज नव्या घरात जातो तेव्हा तेथील गृहिणी पतीचे नाव कशा प्रकारच्या उखाण्यात घेते यावरून तिचे व्यक्तिमत्त्व कळून येते. आदेशदेखील त्याप्रमाणे त्यावर मिस्किलपणे टिप्पणी करतो. ते त्या कार्यक्रमाचे मोठे आकर्षण असते. करुणा ढापरे यांनी सांगितले, की ‘होम मिनिस्टर’चे ते प्रक्षेपण लोक मोठ्या प्रमाणावर बघतात. म्हणून उखाणे त्यांना तयार करून दिले जातात. रामायण-महाभारतापासून उखाणे घालण्याच्या चालीरीतींचे धागेदोरे गवसतात, म्हणून परंपरेने अनेक वर्षें चालत आलेली ही पद्धत; भारतीय संस्कृतीचे ते मौल्यवान लेणे आहे.

‘उखाणा’ कधी भव्यदिव्य विचार सांगून जातो तर कधी थट्टामस्करी अगर विनोदसुद्धा निर्माण करून वातावरण आनंदमय करतो. त्यामुळे स्त्रिया एक प्रकारच्या उर्मीनेच पतीचे नाव घेण्यासाठी उखाण्यांचा वापर करताना दिसून येतात. स्त्रीने पतीचे नुसते नाव घेतले तर त्याचे आयुष्य कमी होते या भीतीने व खुळचट समजुतीने उखाण्यांचा जन्म झाला असावा असेही सांगितले जाते. उखाण्यांचे अंतःकरण मोकळे असते, त्यामधील विचार खेळकर असतात आणि त्यांच्यासाठी वापरली जाणारी भाषा ही चटकदार असते. त्यामुळे त्याला खुमारी असते.

जुन्या बायका उखाणा घेताना म्हणींचा वापर सहजगत्या करत; शिवाय, त्या गोष्ट बोलण्यास साधी, सरळ अशी असतानादेखील, ती काव्यमय रीतीने सादर करत; ते सारे खूप सुरेख असायचे. उखाण्याची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीच्या कल्पकतेचे कौतुक वाटते. स्त्रियांच्या प्रमाणे पुरुष मंडळीसुद्धा त्यांच्या त्यांच्या पत्नीचे नाव घेताना, क्वचित प्रसंगी उखाण्यांचा वापर करताना आढळून येतात. उखाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भाषेवरून व कल्पनेवरून नव्या नवरीच्या माहेरच्या घराण्याचे मोजमाप केले जाते. त्यांची रसिकताही कळून येते. त्यातही एक गोष्ट सासरच्यांकडून प्रामुख्याने लक्षात घेतली जाते, ती म्हणजे मुलीने आईकडून काय धडे घेतले आणि ते धडे ती पुढे सासरी कसे गिरवणार आहे? म्हणून उखाण्यांची परंपरा ही मोलाची मानली जाते. असेच काही खास उखाणे –

  • नवरी मुलीने घेण्याचे उखाणे –

०१. एक होती चिऊ एक होती काऊ, ……रावांचं नाव घेते, डोकं नका खाऊ.
०२. आई-बाबांनी केलं कन्यादान, पुण्य बांधलं गाठी, ……रावांचं नाव घेते सर्वांच्या आग्रहासाठी.
०३. चंदनाच्या खोडाला निरंतर येतो सुवास, ……रावांचं नाव घेताना, देते मी त्यांना जिलबिचा घास.
०४. बाण जिथे लागतो, तिथे राहते खूण, ……रावांचं नाव घेते ……यांची सून.
०५. सप्तपदीच्या सातपावलांनी केली संसाराची नांदी, ……रावांच्या संसारात राहीन मी खूप आनंदी.
०६. चांदण्यांना खेळायला आकाशाचं अंगण, …….रावांचं नाव घेऊन सोडते मी हस्तांचे कंकण.
०७. संसाराच्या ऊन-पावसात मोठ्यांचं असावं छत्र, ……रावांच्या नावाने मी गळ्यात घातलं मंगळसूत्र.
०८. प्रेम सहवासानं जडतं, विरहानं वाढतं, ……रावांसारखे पती मिळायला चांगलं नशीब लागत.
०९. उंबरठ्यावरचं माप ओलांडून केला सासरी प्रवेश, ……रावांचं नाव घेते, आज मी झाले ह्या घरची विशेष.
१०. सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैंजण, ……रावांचं नाव घेते ऐका सारे जण.
११. प्रेमरूपी कादंबरी मी प्रेमाने वाचते, ……रावांच्या जीवनातील फुले आनंदाने मी वेचते.
१२. पैठणची पैठणी, त्यावर जरतारी मोर, ……चं सासर मिळालं, भाग्य माझं थोर.
१३. राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, ……रावांचं नाव घेताना, आनंद होतो माझ्या मनाला.
१४. गुलाबाचे फुल दिसायला ताजे, ……रावांचं नाव घेते सौभाग्य माझे.
१५. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …….रावांची आजपासून मी झाले गृहमंत्री.
१६. आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू महेश, ……रावांचं नाव घेऊन, मी करते गृहप्रवेश.
१७. हिवाळ्यात वाजते थंडी, उन्हाळ्यात लागते ऊन, ……रावांचं नाव घेते …..यांची मी सून.
१८. भवसागरात तरंगते संसाररुपी होडी, देवाच्या कृपेने सुखी राहो ……ची आणि माझीजोडी.
१९. मंगळसूत्राचे दोन डोरले, एक सासर अन दुसरे माहेर, ……रावांनी दिला मला हा सौभाग्याचा अनमोल आहेर.
२०. वड्यात वडा बटाटावडा, ……रावांनी मारला खडा म्हणून, जमला आमचा जोडा.
२१. काचेच्या बशीत बदामाचा हलवा, ……चे नाव घेते सासूला बोलवा.
२२. मान राखून तुमचा, मैत्रिणींनो मी घेते उखाणा, …….रावांचं नाव घ्यायला लागतो मला बाई बहाणा.
२३. सत्यनारायणाच्या पुढे उदबत्तीचा पुडा, …… रावांच्या नावाचा भरलाय मी हिरवाचुडा.
२४. चांदीचं निरांजन, कापसाची फुलवात, …….च्या नावाची केली मी आजपासून सुरवात.
२५. शुभ कार्याला गणेश पूजनाने करतात आरंभ ………..नाव घ्यायला आजपासून करते प्रारंभ.
२६. आई-बाबांनी शोधला लेकीच्या तोडीचा जावई …………ना घास देते, चमच्यात आहे रसमलाई.
२७. श्रावण महिन्यात कोसळतात पर्जन्याच्या धारा, धनलक्ष्मी सह विद्यालक्ष्मी येवो ………..च्या घरा.
२८. सॉफ्टवेअर हार्डवेअर शिवाय कॉम्प्युटर होत नाही ………. शिवाय कशात इंटरेस्ट वाटत नाही.
२८. पहाटेच्या दवबिंदूत रात्र जाते विरून ……….. चे नाव घेते कुलदेवतेला स्मरून.
२९. आकाशात चंद्र उगवला, की कमळे फुलतात तळ्यात ……….. नावाचे मंगळसूत्र घातले गळ्यात.
३०. जीवननौका पार करण्यासाठी पाहिजे भक्कम आधार याच विश्वासाने ………….. निवडला जन्माचा जोडीदार.
३१. वर्षाऋतूच्या आगमनाने धरती होते हसरी ……..चे नाव घेते मी नवपरिणिता लाजरी.
३२. मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार ……….. च्या रूपाने लाभला मनीचा जोडीदार.
३३. निसर्गरम्य पर्वतावर घनदाट वृक्षांच्या रांगा ………चे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा.
३४. दारी होती तुळस तिला घालत होते पळी पळी पाणी आधी होते आई-बाबांची तान्ही मग झाले …………. ची राणी
३५. एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजवली …………ची माणसे मी आपली मानली.
३६. नीलवर्ण आकाशात, चंद्राची लागली चाहूल ………च्या जीवनात ठेवले पहिले पाऊल.
३७. कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन ………….. च्या बरोबर मी आदर्श संसार करीन.
३८. थोर कुळी जन्मले, उच्च कुळी आले ………… च्यामुळे मी भाग्यशाली झाले.
३९. संस्कृतमध्ये नदीला म्हणतात सरिता ……. चे नाव घेते आपणाकरिता
४०. रंगीबेरंगी फुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले …………..ची छाया होऊन सप्तपदी चालले.
४१. अभिमान नाही परिस्थितीचा, गर्व नाही रूपाचा ……….. च्या सोबतीने संसार करीन सुखाचा.
४२. मानस सरोवरात विहार करते राजहंसाची जोडी …….च्या प्रेमात आहे साखरेपेक्षा गोडी.
४३. हिरव्यागार कुरणात चरते गोजिरवाणी हरिणी आणि आजपासून झाले ………ची सहचारिणी.

  • नवऱ्या मुलाने घेण्याचे उखाणे –

०१. ताऱ्यांचं लुकलुकणं चंद्राला आवडलं, ……ला मी जीवनसाथी म्हणून निवडलं.
०२. निसर्गाला नाही आदी ना अंत, ……आहे माझी मनपसंत.
०३. पुणं तिथं उणं म्हणतात सारी जणं, ……न केलं सार्थ माझं जिणं.
०४. श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी, ……चे नाव घेण्याची ही माझी पहिलीच संधी.
०५. आंब्याच्या वनात कोकिळा गाते गोड, ……आहे माझ्या तळहाताचा फोड.
०६. अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, ……ला घास भरवतो वरण-भात तुपाचा.
०७. श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण, ……ला सुखात ठेवीन हाच माझा पण.
०८. चंद्राचा होताच उदय, समुद्राला येते भरती, ……च्या दर्शनाने माझे सारे श्रम हरती.
०९. चंद्राला पाहून भरती येते सागराला, ……ची जोड मिळाली आज माझ्या जीवनाला.
१०. राधिकेला कृष्ण म्हणे, हास राधे हास, ……ला मी देतो लाडवाचा घास.
११. आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड ……… चे नाव आहे, अमृतापेक्षाही गोड.
१२. खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड ………..च्या रूपात नाही कोठेच खोड.
१३. ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास ………… माझी फर्स्ट क्लास.
१४. वेरूळची शिल्पे आहेत अप्रतिम, सुंदर …………च्या साथीने होईल संसार सुंदर.
१५. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी अशी शपथ घेतली ………….. ही प्रिय पत्नी लाभल्याने धन्यता वाटली.
१६. कळी हसेल, फुल उमलेल, मोहरुन येईल सुगंध ……..च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
१७. नाशिकची द्राक्षे, नागपुरची संत्री …………..आजपासून माझी गृहमंत्री.
१८. फुलात फूल मदनबाण ………. माझा जीव की प्राण.
१९. चित्रकाराने केली फलकावर रंगांची उधळण ………चे नाव भासे जणू माणिक-मोत्यांची उधळण.
२०. जिजाईसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र ……….च्या गळ्यात बांधतो मी मंगळसूत्र.
२१. पाटावर बसून, ताटात तांदूळ पसरले त्यावर सोन्याच्या अंगठीने ……….चे नाव लिहिले.
२२. सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रूप ………मला मिळाली आहे अनुरूप.

(स्वयम् ब्राह्मण सेवा, एप्रिल 2018 वरुण उद्धृत  आणि संपादित)

– धनश्री तुषार कुलकर्णी

About Post Author