ई-लर्निंगला मिळाला मराठी साज

0
24

एखाद्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर आपला निवृत्तीचा काळ विश्रांती किंवा इतर कारणांसाठी द्यावा, अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र आपण घेतलेले शिक्षण आणि केलेले कार्य याचा उपयोग इतरांना आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत व्हावा यासाठी निवृत्तीनंतरही कार्य करत राहण्याचा विचार करणा-या व्यक्ती विरळा.

पुण्यातील USS च्या संचालिका उषा देव यांनी संगणक क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी निवृत्तीनंतर सुरू केलेले कार्य प्रेरणादायी आहे. उषा, साहिल आणि सलील (साहिल आणि सलील ही उषाताईंच्या दोन मुलांची नावे) या तीन नावांच्या आद्याक्षरांवरून उषाताईंनी आपल्या कंपनीचे नामकरण USS असे केले आहे. USS च्या माध्यमातून ‘मूडल’ या ई-लर्निंगच्या सॉफ्टवेअरचा मराठीत अनुवाद करून उषाताईंनी मराठी विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळवून दिला आहे.

कुटुंबातल्या एखाद्या मुलीने इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड टेलिकम्युनिकेशन सारखा विषय घेऊन अभियंता व्हावे, ही बाब ऐंशीच्या दशकातल्या सुशिक्षित कुटुंबासाठीही अप्रुपाची होती. शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असल्या तरी समाजाचा दृष्टिकोन विकसित झालेला नव्हता. पण शिक्षणाला पूरक असे घरातील वातावरण, इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या वडिलांचा व्यापक दृष्टिकोन आणि शिक्षणाविषयीची आत्मीयता यांतून उषा देव (म्हणजे लग्नापूर्वीच्या उषा पुरुषोत्तम विद्वांस) यांनी आपलं अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शालेय शिक्षण मुंबईत तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून घेऊन उषाताईंनी 1975 साली शिष्यवृत्ती मिळवून अभियांत्रिकीची पदवी घेतली. पुढे, लग्नानंतर पती वासुदेव (राजा) अनंत देव  यांच्याबरोबर कॅनडाला जाण्याचा योग आला आणि   कॅनडातल्या ओटावा विद्यापीठातून 1978 साली उषाताईंनी अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.  ओटावा विद्यापीठात  त्यांनी कॉम्प्युटर ऍनालिस्ट म्हणून काम केले. याच विद्यापीठात सुमारे आठ  वर्षे त्यांनी कॉम्प्युटर सायन्स हा विषय शिकवलासुध्दा.

पुढे, पुण्यात आल्यानंतर काही काळ एमआयटी संस्थेत अध्यापनाचे काम त्यांनी केले. 1988 ते 2009 या काळात पुण्यातील नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरमध्ये त्यांनी विविध विभागांची जबाबदारी सांभाळली. या ठिकाणी सिनिअर टेक्निकल डायरेक्टर या उच्च पदापर्यंत त्यांनी मजल मारली. या काळात विविध विभाग त्यांनी सांभाळलेच; पण कामाच्या निमित्ताने, देशभरात भ्रमंतीही केली. 2009 साली स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी USS च्या माध्यमातून स्वत:चे काम करायला सुरूवात केली.

इंटरनेटवर आधारित प्रशिक्षण कोर्सेस चालविण्यासाठी ‘मूडल’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. हा जागतिक पातळीवरील प्रकल्प असून शिक्षणाच्या सामाजिक चौकटीला पाठबळ देणे हा या सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश आहे.जीएनयूच्या चोकटीनुसार ‘मूडल’ हे सॉफ्टवेअर ओपन सोर्स वर्गवारीत मोडते, त्यामुळे हे इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे.  मुख्यत्त्वेकरून  ‘मूडल’ सॉफ्टवेअरचे स्वामित्त्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत परंतू तरीदेखील ‘मूडल’ हे सॉफ्टवेअर वापरण्यात एक वेगळया प्रकारची स्वातंत्र्य चौकट आणि लवचीकता अतिरिक्त ठेवण्यात आली आहे.

‘मूडल’ हा शब्द मॉडयुलर ऑब्जेट या शब्दाच्या अपभ्रंशातून निर्माण झाला आहे. मॉडयुलर ऑब्जेक्ट  म्हणजे ओरिएण्टेड डायनामिक लर्निंग एनव्हायर्मेंट. शैक्षणिक थेओरिस्ट आणि प्रोग्रॅमर्स यांना मुख्यत्त्वेकरून  या सॉफ्टवेअरचा मोठा फायदा होतो. अशा प्रकारे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांना जसे हवे तसे या सॉफ्टवेअरच्या आधारे  शिकता येऊ शकते किंवा शिक्षकांना शिकवता येऊ शकते. उषाताईंनी ‘मूडल’चे मराठी भाषांतर केले. याकामी विशाखा आणि धनश्री या सहका-यांची त्यांना मदत झाली. ‘मुडल’ साईटवर भाषा या सदराखाली हे सर्वांना उपलब्ध आहे.  पंचाऐशी भाषांमध्ये हे सॉफ्टवेअर उपलब्ध असून ‘मूडल’वर आधारित साईटची संख्या 48 हजार 682 इतकी आहे.  जगभरातल्या 211 देशांमधील कोट्यावधी लोक  ‘मूडल’चा वापर करतात. आजमितीला या सॉफ्टवेअरचा वापर करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

‘मेंटल ऍबिलीटी आणि लॉजिकल थिंकिंग’  या विषयात ई-लर्निंगद्वारे उषाताई  प्रश्नावली उपलब्ध करून देत आहेत.  शिक्षण क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने उषाताईंनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणक्षेत्रात करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा त्यांचा प्रयत्न आहे. या सगळ्याचा मराठी मुलांना अधिकाधिक फायदा व्हावा असा उषाताईंचा उद्देश आहे. ‘मूडल’च्या संदर्भातील कोणतीही मदत उषाताई इच्छुकांना करू शकतात.

शिक्षणाबद्दल उषाताईंना असलेली तळमळ त्यांना शांत बसू देत नाही. त्यामुळे एम.सी.ए. किंवा एम.ई. करणा-या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट गाईड म्हणून त्या मार्गदर्शन करत असतात. या विद्यार्थ्यांसाठी भरपूर क्लासेस असतात मात्र तिथे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल याची खात्री उषाताईंना वाटत नाही. त्यामुळेच आपल्या या मार्गदर्शन वर्गाचे स्वरूप कमर्शियल क्लासमध्ये करायचे नाही, हे त्यांनी आधीच ठरवून टाकले आहे.

स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीजसाठी उषाताईंनी  USS तर्फे  विविध संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. त्यामध्ये लॉजिस्टिक्स, कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट (सीआरएम), एण्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी) आणि वेअर हाऊस मॅनेजमेंट यांचा समावेश होतो. USS ही कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि  नॉव्हेल कंपनीची सिल्व्हर पार्टनर आहे. मोनो (Mono) हे नॉव्हेल या कंपनीने विकसित केलेले तंत्रज्ञान आहे. त्यात मु्ख्यत्वेकरून डॉटनेटची संगणक प्रणाली लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वापरता येऊ शकते. USS अशा प्रकारचे कार्य नॉव्हेल आणि त्यांच्या ग्राहकांसाठी प्रामुख्याने करत आहे.

इंग्रजी आणि मराठी वाचनाची आवड असलेल्या उषाताईंना भरतकामामध्ये अधिक रूची आहे. गेल्या वीस वर्षांपासून नियमितपणे योग आणि प्राणायाम केल्यामुळे आपली मन:शक्ती टिकून आहे, यावर त्यांचा खास विश्वास. निसर्गप्रेमी उषाताईंचा भटकंती हा आणखी एक जिव्हाळयाचा विषय. आपले सगळे व्याप सांभाळून त्यांनी ही आवड जपली आहे. सिमन्तिनी कानडे यांच्याबरोबर 1971 पासूनची म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या काळापासून असलेली उषाताईंची मैत्री कायम आहे. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मिळालेली या मैत्रिणीची साथ त्यांना मोलाची वाटते. सहा वर्षांपूर्वी पती वासुदेव यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढणे स्वाभाविकपणे अवघड गेले.  आज आपल्या मुला-नातवंडांबरोबर उषाताई समाधानी जीवन जगत आहेत.

शिक्षणावर विश्वास आणि आपल्या कामावर जीवापाड प्रेम हे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. निवृत्तीनंतरही कामाचा व्याप
सांभाळणा-या उषाताई आज वयाच्या 56 व्या वर्षी चिनी भाषेचे शिक्षण घेत आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात पीएच.डी. करण्याचा त्यांचा मानस पूर्ण होवो!

-ममता क्षेमकल्याणी

vidisha_mn@yahoo.co.in

भ्रमणध्वनी : 9881736078

 

 

About Post Author

Previous articleआदर्श मोठे – विकसनशील छोट्यांसाठी
Next articleकुंभ मेळा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.