‘इशान्य वार्ता’

 

 सेव्‍हन सिस्‍टर्स प्रदेशात गेली काही दशके विश्‍व हिंदू परिषदेने नेटाने शिक्षणाचे काम उभे केले आहे. त्याच संस्थांमार्फत विद्यार्थ्यांचे आदानप्रदानदेखील चालू असते. परंतु त्याबाबत डोंबिवली-पुणे येथील काही गट वगळले तर बाकी सारा अज्ञानांधकारच आहे! अशा परिस्थितीत डोंबिवलीचे पुरुषोत्तम रानडे व त्यांचे मित्र अरुणाचलमधील घडामोडींबाबत लोकांना जागे करण्याच्या ध्येयाने प्रेरित झाले व त्यांनी दोन वर्षांपूर्वी, 15 ऑगस्टला ‘ईशान्य वार्ता’ नावाचे मासिक सुरू केले. चीनच्‍या अरूणाचलमधील घुसखोरीच्‍या पार्श्‍वभूमीवर या मासिकाचे विशेष महत्‍त्‍व वाटते.

जागे व्हा – जाणते व्हा!
 

भारताच्या ईशान्येकडील ‘सेवन सिस्टर्स’ हे पर्यटनामधील नवे आकर्षण बनून गेले आहे. या प्रदेशाबद्दल औत्सुक्य वाढले असले तरी त्यातील धोका संवेदनशील व विचारी मनाला सतत छळत असतो. क्वचित अस्थिर राजकारणामुळे एखादी ट्रिप रद्द झाल्याचेदेखील कानावर येते, मग भीतीचे गांभीर्य वाढते. उलट, कर्णोपकर्णी असे पसरलेले असते, की या दौर्‍यात एका ठिकाणी भारताची सीमा ओलांडून काही तासांसाठी मियांमारमध्ये जाऊन येता येते आणि ते खरेच असते. त्यामुळे पर्यटकांचे ‘थ्रिल’ व तिकडे जाण्याची ओढ वाढलेली असते.
 

‘सेवन सिस्टर्स’ म्हणजे आसाम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश ही राज्ये होत. तेथे विश्व हिंदू परिषदेने गेली काही दशके नेटाने, मुख्यत: शिक्षणाचे काम उभे केले आहे. त्याच संस्थांमार्फत विद्यार्थ्यांचे आदानप्रदानदेखील चालू असते. परंतु त्याबाबत डोंबिवली-पुणे येथील काही गट वगळले तर बाकी सारा अज्ञानांधकारच आहे!
 

अशा परिस्थितीत डोंबिवलीचे पुरुषोत्तम रानडे व त्यांचे मित्र अरुणाचलमधील घडामोडींबाबत लोकांना जागे करण्याच्या ध्येयाने प्रेरित झाले व त्यांनी दोन वर्षांपूर्वी, 15 ऑगस्टला ‘ईशान्य वार्ता’ नावाचे मासिक सुरू केले. त्याला विशेष महत्त्व अशासाठी, की चीनने अरुणाचलमध्ये बरीच घुसखोरी केली आहे. तेथे अनेक क्षेत्रांत चिन्यांचे राज्य आहे, तेथील हकिगती कळणे जरुरीचे आहे.
 

मासिक कसे सुरू झाले हे सांगताना, रानडे म्हणाले, की डॉ. तात्याराव लहाने डोबिंवली येथील नागालॅण्ड वसतिगृहाच्या स्नेहसंमेलनास आले असताना त्यांनी अशा प्रकारचे वसतिगृहाचे काम महाराष्ट्रात विविधस्थानी सुरू आहे याबाबत आश्चर्य व कौतुक व्यक्त केले! त्यांनी दरवर्षी या प्रकल्पासाठी देणगी देण्याचेही जाहीर केले. त्याच स्नेहसंमेलनासाठी आलेल्या माझ्या एका तरुण मित्रानेही वसतिगृहाला देणगी दिली व तो म्हणाला, “हे फार मोठे काम आहे. पण आजपर्यंत गेली अनेक वर्षे डोंबिवलीत राहात असूनही मला याबाबत काहीच माहीत नव्हते.”

रानडे यांच्या तरुण मित्राचे हे उदगार ‘ईशान्य वार्ता’ सुरू होण्यासाठी प्रेरक ठरले!
 

रानडे म्हणाले, की ‘ईशान्य वार्ता’साठी मदतीचे अनेक हात पुढे झाले. तरुणांनी लिहिते व्हावे असा आग्रह धरला गेला आहे आणि त्यानुसार पंचवीस ते तीस तरुणांनी आणि वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनीही ‘ईशान्य वार्ता’करता लिहिले आहे. तरुणांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचे धोरण ठेवल्यामुळे ‘युवा वार्ता’ या सदरालाही तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
 

जनकल्याण समितीमार्फत ईशान्य भारतातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सुरू असलेल्या वसतिगृहांच्या उपक्रमांची माहिती, ईशान्य भारतातील सांस्कृतिक घडामोडी व सकारात्मक घटना यांना ‘ईशान्य वार्ता’ने प्रसिद्धी दिली आहे. त्याचबरोबर त्या बाबतचा योग्य दृष्टिकोनही परखड शब्दांत मांडला वानगीदाखल काही घटना पुढीलप्रमाणे——-

गर्भवती महिलेचा गोळीबारात मृत्यू झाल्यामुळे मणिपूरमध्ये उदभवलेली भयंकर परिस्थिती (मणिपूरचे महाभारत),

अरूणाचलमधील चीनचा वाढता हस्तक्षेप,

मणिपूरमधील अराजकसदृश स्थिती (मणिपूर अफगाणिस्थानच्या वाटेवर),

विशाल नागालँडचा राजकीय तिढा,

बर्डेकर यांचे अरुणाचलमधून अतिरेक्यांनी केलेले अपहरण व सुटका,

उखूलच ओजा शंकर विद्यालय,

मणिपूरमध्ये शर्मिला चानू यांच्या उपोषणाची दहा वर्षे,

ठाणे शहरातील दोन शाळांमधील स्काऊट /गाईडच्या पथकाची अरुणाचल भेट,

‘कॉमनवेल्थ गेम्स’मधील मणिपुरी खेळाडूंची गौरवास्पद कामगिरी,

अरुणाचल स्काऊट बटालियन,

रियांग निर्वासितांची ससेहोलपट,

फ्रंटीयर ‘नागालँड’ या वेगळ्या राज्याची मागणी (एन.एस.सी.एन-आय, एम),

फुटिरतावादी गटाचे अध्यक्ष मुईवा यांच्या मणिपूर भेटीमुळे उदभवलेली भयंकर परिस्थिती, मणिपूरची आर्थिक कोंडी इत्यादी………..

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे पाठबळ ‘ईशान्य वार्ता’ला लाभत आहे. त्यामुळे ‘ईशान्य वार्ता’ मासिक पत्रिका बर्‍याच जिल्ह्यांत पोचली आहे. आजवरची वाटचाल लक्षात घेता असे लक्षात येते, की ईशान्य भारतविषयक नियतकालिक मराठी भाषेत सुरू होणे ही काळाची गरज होती!

फक्त अडचण अशी आहे, की ‘ईशान्य वार्ता’चे हौशी रूप लपत नाही. ते त्याच्या निर्मितीमधून प्रकट होते व लेखनातूनही. त्या दोन्हीमधून रानडे व मित्रमंडळी यांची मेहनत, तळमळ व निष्ठा जाणवते. परंतु नियतकालिकाचा इष्ट परिणाम- ईशान्य भारताबद्दलची जागृती- साधला जातो का याबद्दल शंका वाटते. ईशान्येकडील प्रश्नांची आमलोकांना जाणीव होण्यासाठी नव्या काळात प्रचारसाधनांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे का? असा प्रश्न मनी उभा राहतो.
 

प्रतिनिधी- इमेल: info@thinkmaharashtra.com

इशान्य वार्ता, पत्ता –पुरुषोत्तम रानडे, 13, कृष्‍णकुटीर, ओम बंगल्‍यासमोर, आयरे रोड, डोंबिवली पूर्व, 421201

पुरुषोत्तम रानडे – 9969038759, friendsofne@gmail.com 

About Post Author