‘इप्रसारण’

0
22

आपले स्वप्न प्रत्यक्ष साकार होताना जो मनस्वी आनंद होतो तो मी वैद्य दांपत्याच्या चेहर्‍यावर अनुभवला. Eprasaran.com बद्दल बोलत असताना, वैद्य पती-पत्‍नी आपल्या अपत्याबद्दल बोलावे तसे ममतेने बोलत होते.

अतुल वैद्य हे मुळचे मुंबईचे, छबिलदास शाळेचे विद्यार्थी. त्यांच्या घरी बिनाका गीतमाला ऐकायला लोक जमत. ते बघून रेडिओ ही अत्यंत महत्त्वाची चीज आहे ही कल्पना लहानपणीच त्यांच्या मनात घर करून बसली. आपले स्वत:चे रेडिओ स्टेशन असावे असे स्वप्न त्याच कल्पनेतून वैद्यांच्या मनात निर्माण झाले. टी.व्ही.-ब्रॉडकास्टिंगचे शिक्षण व त्यातील आपला अनुभव गाठीशी बांधून अतुल १९९७ साली अमेरिकेत पोचले. स्वप्नतर मनात दडी करून बसले होते, पण त्याला आकार देण्यास कोणाची तरी साथ हवी होती. मिलिंद गोखले यांनी एप्रिल २००६ मध्ये ही साथ वैद्यांना दिली आणि मनातील त्या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार होण्यास चालना मिळाली.

वैद्द दांपत्याचा स्वप्नानंद

— दिपाली पटवर्धन

     आपले स्वप्न प्रत्यक्ष साकार होताना जो मनस्वी आनंद होतो तो मी वैद्य दांपत्याच्या चेहर्‍यावर अनुभवला. Eprasaran.com बद्दल बोलत असताना, वैद्य पती-पत्‍नी आपल्या अपत्याबद्दल बोलावे तसे ममतेने बोलत होते.

     अतुल वैद्य हे मुळचे मुंबईचे, छबिलदास शाळेचे विद्यार्थी. त्यांच्या घरी बिनाका गीतमाला ऐकायला लोक जमत. ते बघून रेडिओ ही अत्यंत महत्त्वाची चीज आहे ही कल्पना लहानपणीच त्यांच्या मनात घर करून बसली. आपले स्वत:चे रेडिओ स्टेशन असावे असे स्वप्न त्याच कल्पनेतून वैद्यांच्या मनात निर्माण झाले. टी.व्ही.-ब्रॉडकास्टिंगचे शिक्षण व त्यातील आपला अनुभव गाठीशी बांधून अतुल १९९७ साली अमेरिकेत पोचले. स्वप्नतर मनात दडी करून बसले होते, पण त्याला आकार देण्यास कोणाची तरी साथ हवी होती. मिलिंद गोखले यांनी एप्रिल २००६ मध्ये ही साथ वैद्यांना दिली आणि मनातील त्या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार होण्यास चालना मिळाली.

     अतुल वैद्य यांचा टी.व्ही. प्रसारण माध्यमातील अनुभव व गोखल्यांचा सॉफ्टवेअरमधील अनुभव यांचा असा काही समन्वय जुळला, की १ मे २००६ रोजी ईप्रसारण डॉट काम या इंटरनेट रेडिओची सुरुवात झाली. ह्यात अतुल व मिलिंद यांच्या पत्‍नी विद्या वैद्य व मधुरा गोखले यांचाही हातभार लागला. प्रथम, थोड्या दिवसांसाठी करून बघू असे ठरवून सुरू झालेला हा internet radio नंतर कुठच्याही कारणास्तव खंडित वा स्थगित झालेला नाही. Eprasaran सुरू झाले तेव्हा फक्त शुक्रवारी ठरावीक वेळेला ठरावीक वेळेसाठी प्रसारण केले जायचे, पण त्याची लोकप्रियता एवढी वाढली, की बे एरिया, कॅलिफोर्नियाच्या बाहेर राहणार्‍या श्रोत्यांच्या आग्रहाखातर व सोयीखातर वर्षभरात Eprasaran वर सातही दिवस चोवीस तास कार्यक्रम उपलब्ध होऊ लागले. मराठी भाषेला इथे प्राधान्य असले तरी लोकाग्रहास्तव हिंदीमध्येही कार्यक्रम सादर केले जातात.

     ईप्रसारणाची इतक्या थोड्या काळात झालेली ही लोकप्रियता जाहिरातींमुळे नव्हे, तर फक्त ‘वर्ड ऑफ माऊथ’मुळे घडून आली. त्यांचे श्रोते अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात ठिकठिकाणी व भारतातही पसरले आहेत असे वैद्य अभिमानाने सांगतात. भारतातही इंटरनेट रेडियो प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे कार्यक्रमांचा दर्जा, जाहिरातींचा व्यत्यय नाही व जॉकीची बडबड नाही असे वैद्य नमुद करतात.

     ईप्रसारण सुरू झाले तेव्हा सर्व्हर वैद्यांच्या घरातून वापरला जाई, पण आता ऐकणार्‍यांची संख्या एवढी वाढली आहे, की त्यांना मोठ्या क्षमतेचा रेंटल सर्व्हर घेणे भाग पडले. इंटरनेट रेडिओचे सर्व सॉफ्टवेअर मिलिंद गोखले यांनी स्वत: निर्माण केले आहे. वैद्य पती-पत्‍नी गोखल्याबद्दल अगदी भारावून बोलत होती. वैद्य म्हणाले, की “गोखले दांपत्य भेटलं आणि त्या चौघांचं मेतकूट जमलं” “आमचा जराही कशाच्या बाबतीत कॉन्फ्लिक्ट होत नाही. आमचं “जस्ट click झालं व सर्व जुळून आलं.”

     ईप्रसारणवर मनोरंजनाबरोबरच सामाजिक विचार-विनिमयाचे कार्यक्रम सादर केले जातात. ‘स्वरसंध्या’ हा मराठी गाण्यांचा, ‘गीतांजली’ हा हिंदी गाण्याचा, ‘आमची आवड’ हा भक्तिगीतांचा, योगानुभव, प्रवचने, नाट्य असे विविध कार्यक्रम होतात. ‘आपली आवड’ हा फर्माईशी गाण्यांचा कार्यक्रम तर इतका प्रसिद्ध आहे, की ईप्रसारणकडे सात हजार गाण्यांच्या फर्माईशीची लाईन लागली आहे. सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांच्या ईमेल फीडबॅकचा आढावा घेतला जातो. वैद्य म्हणतात, की “आम्ही दोन्ही प्रकारचे, चांगले-वाईट फीड बॅकस् वापरतो. यामुळे आम्हाला शिकायला मिळते. आमचे कार्यक्रम उत्तम रीत्या सादर करायला ‘फीडबॅकस्’ची आम्हाला मदत होते.

     ईप्रसारणचे कार्यक्रम महिनाभर आधी तयार असतात. गोखले व वैद्य हे चौघेजण आपापले व्यवसाय सांभाळून हा इंटरनेट रेडिओ चालवतात. एका तासाच्या सादरीकरणासाठी सहा-सात तास काम करावे लागते. ‘ईप्रसारण’वर फक्त व्यावसायिक, नामांकित कलाकारांचे कार्यक्रम होत नाहीत तर अनेक हौशी, नवख्या कलाकारांच्या कलेला वाव देणारे, प्रोत्साहन देणारे हे व्यासपीठ बनले आहे.

     ईप्रसारण-इंटरनेट रेडिओवरचे सर्व कार्यक्रम श्रोत्यांना विनामूल्य ऐकू येतात. वैद्य-गोखले विविध कार्यक्रमांचे – बे एरिआतील क्रिकेट मॅच, विवाह सोहळे, यांचे-‘लाईव वेबकास्ट’ करून आणखी मजा आणतात. ‘लोकांची उपक्रमाबद्दलची आस्था त्यामुळे वाढते व मुख्य म्हणजे ह्या फुकटच्या उद्व्यापासाठी पैसा मिळतो’ असा त्यांचा खुलासा असतो! ईप्रसारण वर ‘स्वरांगण’ नावाची ‘सारेगमप’प्रमाणे गाण्याच्या स्पर्धेचा कार्यक्रम सादर केला गेला. त्याच्या finals शिकागोच्या २०११ सालच्या  BMM convention मध्ये होणार आहेत. ईप्रसारणचे श्रोते आपल्या आवडत्या कार्यक्रमांना क्षुल्लक फी भरून डॉऊनलोड करू शकतात व संग्रही ठेवू शकतात. नवीन टेक्नॉलॉजी झपाट्याने प्रगत होत आहे. ईप्रसारण इंटरनेट रेडिओ व मोबाईलवर ऐकता येते. वैद्य गाड्यांमध्ये इंटरनेट सुरू होण्याची वाट बघत आहेत ! त्यामुळे श्रोते कुठेही, केव्हाही ईप्रसारणाचा आस्वाद घेऊ शकतील.

     ईप्रसारणच्या ट्युनचा किस्सा सांगताना तर वैद्य दांपत्य एकदम भूतकाळात रममाण झाले! विश्वास गोडबोले यांनी अर्ध्या दिवसामध्ये हिंदी वर्जन लिहून कंपोजसुद्धा केली आणि वैद्य-गोखल्यांना रेकॉर्डिंगसाठी बोलावले! संध्याकाळी रेकॉर्डिंगसाठी निघाल्यावर, विद्या वैद्यांच्या लक्षात आले की ईप्रसारण हा तर मराठी इंटरनेट रेडिओ आणि त्याची मराठी कविता तयार नाही! त्यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओत पोचेपर्यंत अर्ध्या तासात मराठीत सिग्नेचर ट्युन लिहून काढली व त्यांचे रेकॉर्डिंगही पूर्ण केले!

     वैद्य-गोखले जोडीचे असे हे जुळलेले मेतकूट व त्यातून निर्माण झालेले ‘ईप्रसारण’ बघून ऐकून धन्य वाटले. ही गुणी जोडी उत्साहाने व प्रेमाने ‘ईप्रसारण’चे काम सांभाळते. अमेरिकेत राहून इंटरनेट माध्यमातून मराठी रसिकांसाठी, मराठी कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारा ‘ईप्रसारण’ हा एकमेव इंटरनेट रेडियो त्यांनी सुरू केला व त्याचा दर्जा उत्तम राहवा यासाठी त्यांचे सतत प्रयत्न चालत असतात. ही जोडी, हे मेतकूट असेच कायम राहून ‘ईप्रसारण’ची लोकप्रियता शिखरावर पोचायला फार काळ लागणार नाही अशी माझी खात्री आहे.

दिपाली पटवर्धन

About Post Author

Previous articleबीसीसीआयची बदमाशगिरी
Next articleईप्रसारण
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.