इतिहासजमा इमारती
प्रकाश पेठे हे बडोद्याचे आर्किटेक्ट बडे उपक्रमशील आणि हौशी आहेत. ते सतत कशाच्या तरी शोधात असतात. त्यांनी मुख्यतः आर्किटेक्चर या विषयासंदर्भात, त्याचे वेगवेगळे पैलू पकडून सहा पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे लेखन खूप हिंडूनफिरून होते व ते तसेच कागदावर उतरते. ते तितकेच फोटो काढतात. त्यांनी काढलेले जगभरचे उत्तम दोन-अडीच हजार फोटो त्यांच्या संगणकीय संग्रहात आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे झाली तेव्हा एक खूळ डोक्यात घेतले, की त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी इंग्रजीतून फेसबुकवर लिहायच्या. आठवड्यातून दोनदा. प्रत्येक आठवण तीनशे शब्दांत. तशा शंभर आठवणी पाडव्याला पूर्ण झाल्या आणि त्याबरोबर त्यांना तत्काळ दाद देणाऱ्या, त्यांच्या लेखनावर बरे-वाईट म्हणणाऱ्या व ‘लाईक्स’ नोंदवणाऱ्या मंडळींचा समुदाय तयार झाला. सहा पुस्तके लिहून जे घडले नव्हते ते ‘फेसबुक‘मुळे घडले!
याचा अर्थ त्यांना पूर्वी प्रतिसाद नव्हता असे नाही, पण मराठी पुस्तकांचा वाचक जुन्या संचिताच्या पुढे येऊ पाहत नाही. आर्किटेक्चर म्हटले, की त्याच्या लेखी माधव आचवल यांची ‘किमया’. ते 1962 सालचे पुस्तक संदर्भांनी कालबाह्य झाले आहे. त्यातील सौंदर्यतत्त्वे पुढील पिढ्यांनी अंगीकारली व क्वचित नवी मांडणी नव्या धाटणीने केली आहे. पेठे हे त्यातील एक आहेत. त्यांच्या लेखनातील लालित्य अधिक भावनाभारलेले असते.
पेठे निवृत्तीनंतर बडोद्याच्या दोन-तीन कॉलेजांत ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ म्हणून शिकवत असतात. त्या ओघात त्यांनी बडोद्याच्या सर्व उत्तमोत्तम वास्तूंचा सचित्र इतिहास नोंदणे चालवले आहे. ते त्याचे सादरीकरणही करत असतात. बडोद्याच्या बऱ्याच वास्तू तेथील मूळशंकर दवे नावाच्या आर्किटेक्चर शिकलेल्या आद्य पुरुषाने बांधल्या आहेत. त्यांचा जन्म 1902 चा आणि ते वारले 1962 साली. बडोद्याच्या सयाजीराजे विद्यापीठाच्या उपकुलगुरू हंसा मेहता यांनी दवे यांना बडोद्यात वास्तुकला पदवी कोर्स सुरु करण्यास सांगितले. तो त्यांनी 1954 साली सुरु केला. तसेच, दवे यांनी स्वतःचे ऑफिस काढून बडोद्यात अनेक सुंदर इमारती बनवल्या.
मूळशंकर दवे |
पेठे बडोद्याला नोकरीनिमित्त 1966 साली गेले. ते म्हणाले, की दवे ही रंगतदार व्यक्ती असणार. ते निझामाच्या विश्वासातील होते आणि निझामाने त्याच्या चार-चार बायकांना, दोन गट करून युरोप पाहण्यासाठी पाठवले, तेव्हा त्या दोन्ही वेळेस त्यांच्याबरोबर ‘एस्कॉर्ट’ म्हणून दवे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती! त्यांनी 1949 साली बांधलेल्या सरदार भवनाचे उद्घाटन विनोबा भावे यांच्या हस्ते झाले.
(दिनकर गांगलहे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
————————————————————————————————
गांधी नगर गृह |
युनिव्हर्सिटी पॅव्हेलियन |
छान लेख आहे.