आल्फ्रेड गॅडने आणि त्यांचे दापोलीतील एकशेसदतीस वर्षांचे ए.जी. हायस्कूल

आल्फ्रेड गॅडने हे दापोलीला मिशनरी म्हणून 1875-76 साली आलेली स्कॉटिश व्यक्ती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. त्यांनी कोकणातील पहिल्या हायस्कूलची स्थापना दापोली येथे ए.जी. हायस्कूलच्या रूपात 1880 मध्ये केली. गॅडने यांनी प्राचार्य म्हणून अठ्ठेचाळीस वर्षे ए.जी. हायस्कूलचे प्राचार्यपद सांभाळले. गॅडने अनाथ मुलांचेही वाली झाले…

कोकणातील 1875-76चा काळ. एका सायंकाळी एक उंच, भारदस्त व्यक्ती बोटीतून दाभोळ बंदरात उतरली. सगळीकडे किर्रर्र रान… धो धो कोसळणारा पाऊस… आसपास विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणारे स्त्री-पुरुष. त्या अनोळखी व्यक्तीबरोबर त्याचा एक भारतीय सेवक होता. त्याच्या हातात कंदील. त्याने एक काठी मोडून ती त्याच्या साहेबाच्या हातात दिली – जंगली श्वापदांपासून आणि सर्पांपासून रक्षणासाठी ! साहेबाला सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. ती व्यक्ती होती स्कॉटिश मिशनरी आल्फ्रेड गॅडने ! तो तरुण मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर भारताच्या एका टोकाच्या भागात शिक्षणप्रसाराचे काम करण्यासाठी आलेला होता. त्याच्या खिशात कलेक्टरचे मान्यतापत्र होते. ते त्याने दापोलीतील सैन्यतळाच्या कमांडर-इन-चीफला दिले. दापोली हे थंड हवेचे ठिकाण होते; तसेच, सागरी हालचालींसाठी मोक्याचे ठिकाण होते. त्यामुळे तेथे ब्रिटिशांचा कॅम्प असे. तेथे कमांडर-इन-चीफने गॅडनेंच्या राहण्या-जेवण्याची सोय केली.

ते दापोलीत येण्याआधी मुंबईमध्ये एस.पी.जी. (Society for Propagation of Gospel) या मिशनरी संस्थेचे काम करत होते. गॉस्पेल म्हणजे ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान. तेथे त्यांची पत्नी ‘एलिना’ ही देखील महिला मिशनरी म्हणून काम करत होती. एलिनाने मुंबईत मुलींसाठी नॉर्मल स्कूल ही शाळा स्थापन केली होती. नॉर्मल स्कूल ही शिक्षकांना अध्यापनाविषयी प्रशिक्षण देणारी संस्था होती. तर गॅडने यांनी मुंबईत अनाथ मुले सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्याकडे तेरा मुले 1876 साली होती तर 1877 मध्ये ती संख्या वाढून पंचवीसपर्यंत गेली होती. गॅडने दापोलीत आले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि तीस अनाथ मुले होती.

गॅडने यांनी हायस्कूल उभारण्यासाठी दापोलीतील एका उंच टेकडीची निवड केली आणि भराभर हायस्कूलच्या उभारणीस सुरुवात केली. गॅडने यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सुतारकामाचा होता. त्यांनी स्थानिक संसाधने म्हणजे जांभा दगड, माती व उत्तम सागवानी लाकूड वापरून इमारत साकारली. ती सव्वाशे वर्षांनंतरही टिकून आहे आणि वापरात आहे. तिचे बांधकाम गॉथिक शैलीचे आहे. कमानी मोठ्या आहेत. दोन बाजूला प्रशस्त व उंच वर्गखोल्या आणि मध्ये रुंद मार्गिका असे बांधकामाचे स्वरूप आहे.

आल्फ्रेड गॅडने हायस्कूलची सुरुवात 1880 मध्ये झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. तसेच, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापनासुद्धा 1885 मध्ये झाली. म्हणजे त्या दोन्ही घटनांच्या पाच वर्षे आधी रत्नागिरीतीलच नव्हे, तर कोकणातील पहिल्या हायस्कूलची स्थापना दापोली येथे झाली. आल्फ्रेड गॅडने यांनी त्याच वेळी मोठे, हवेशीर वसतिगृहही उभारले आणि त्याच्या भोवती आंबा, पेरू यांची बाग केली. त्या वसतिगृहात सानेगुरुजीही राहात. ‘श्यामची आई’ या त्यांच्या अक्षर साहित्यकृतीत दापोलीचे आणि ए.जी. हायस्कूलचे सुंदर वर्णन आहे. आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटाला भारतातील पहिले सुवर्णमयुर (कमळ) पदक मिळाले. त्यात ए.जी. हायस्कूलचे चित्रिकरण आहे. भारतरत्न पां.वा.काणे, रँग्लर र.पु.परांजपे आणि सानेगुरुजी हे ए.जी. हायस्कूलचे विद्यार्थी होते. डॉ. काणे आणि रँग्लर परांजपे दापोली शिक्षण संस्थेचे अध्यक्षही होते.

गॅडने उंच, धिप्पाड, रुबाबदार होते. ते सूट, बूट, कोट घालत. ते दापोलीत घोड्यावरून किंवा घोडागाडीतून फिरायचे. त्यांची अनेक स्थानिकांशी मैत्री होती. ते उत्तम मराठी आणि संस्कृत बोलायचे अशा त्यांच्या अनेक वर्णन कथा दापोलीत रूढ आहेत. द्वारकानाथ लेले यांनी बाबा फाटक यांच्यावर लिहिलेल्या ‘एकला चलो रे’ या पुस्तकात देखील आल्फ्रेड गॅडने यांचे वर्णन आहे. पण त्यांची ठळक ओळख होईल असा त्यांचा एकही फोटो उपलब्ध नाही. केवळ एक तैलचित्र आहे. पण तेही त्यांच्या वास्तविक रूपाशी तंतोतंत जुळणारे नाही, असे दापोलीकर म्हणतात. आल्फ्रेड गॅडने दापोलीला मिशनरी म्हणून आले होते; पण त्यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. त्यांनी धर्मप्रसाराचे काम केले नाही म्हणून मिशनने ती शाळा दापोली शिक्षण संस्थेला अठरा हजार रुपयांना विकली होती. पण त्यानंतरही, आल्फ्रेड गॅडनेच प्राचार्य म्हणून त्यांच्या निधनापर्यंत कार्यरत होते. त्यांचे निधन 23 डिसेंबर 1928 रोजी दापोली येथेच झाले. त्यांनी अठ्ठेचाळीस वर्षे प्राचार्यपद सांभाळले.

त्यांच्या कार्यामुळे दापोलीलाच नव्हे, तर संपूर्ण भारताला फायदा झाला. आजही गॅडने यांच्या ए.जी. (आल्फ्रेड गॅडने) हायस्कूलमध्ये शिकून मुले नावलौकिक मिळवत आहेत. दापोलीकरांचे आयुष्य घडवण्यात या शाळेचा फार मोठा वाटा आहे. ए.जी. हायस्कूलचा विस्तार के.जी. पासून पीएच डी पर्यंत झाला आहे. ए.जी. हायस्कूलच्या अनेक शाळा, भागशाळा निघाल्या आहेत. अनेक विद्यार्थी सर्वदूर पसरलेले आहेत, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात तळपत आहेत.

दापोलीच्या कोकंबा आळीत गॅडने यांचे दुर्लक्षित थडगे आहे. त्या थडग्यावर संदेश कोरलेला आहे. तो संदेश आहे, “येशू म्हणाला, जो कोणी तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक व्हावे.”

(लेखक ए.जी. हायस्कूलचे निवृत्त प्राध्यापक आहेत)

सतीशचंद्र तोडणकर 8380064640 satishchandra.todankar@gmail.com

——————————————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हद्दपार ‘ कादंबरीमधे दापोलीच्या सफरीच्या वर्णनात गॅडनीसाहेब व चर्चचा उल्लेख आलेला आहे. सदर कादंबरी 1950 साली प्रसिद्ध झालेली आहे.

  2. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हद्दपार ‘ कादंबरीमधे दापोलीच्या सफरीच्या वर्णनात गॅडनीसाहेब व चर्चचा उल्लेख आलेला आहे. सदर कादंबरी 1950 साली प्रसिद्ध झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here