आनंद बनसोडे – सोलापूरचा जिद्दी एव्हरेस्ट वीर

हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याची शिखर सर करण्याची जिद्द आणि त्याने त्यासाठी केलेला संघर्ष जाणून घेताना आनंद बनसोडेबद्दल कौतुकच मनी दाटते.

आनंदने गिर्यारोहण प्रयत्नपूर्वक शिकून घेतले व पाच-सात वर्षांच्या अल्पावधीत जगातील चार उंच शिखरे पादाक्रांत केली; एवढेच नव्हे, तर त्या प्रत्येक मोहिमेला सामाजिक विषयाची डूब दिली व त्यामुळे त्याच्या एकूण मोहिमेला संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळाली. युनायटेड नेशन्स सोबत काम करणारा चित्रपट अभिनेता फरहान खान याने आनंदच्‍या मे 2015 मधील अमेरिका मोहिमेचा फ्लॅगऑफ केला होता. खरे तर, राष्ट्रसंघाच्या संबंधित समितीपुढे आनंदचे जुलैअखेर भाषण व्हायचे होते, परंतु त्याच्या पिताजींचे, अशोक बनसोडे यांचे २५ जूनला आकस्मिक निधन झाले. योगायोग असा, की आनंद त्यावेळी उत्तर अमेरिकेतील अलास्का राज्यातील शिखर सर करण्याच्या प्रयत्नात होता, तो त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मोहीम अर्धवट सोडून सोलापूरला परत आला.

आनंदच्या मोहिमेचे नाव आहे ‘जागतिक शांततेसाठी सप्तशिखर मोहीम’. त्याने आतापर्यंत सर केलेली एव्हरेस्टशिवायची शिखरे अशी – युरोपमधील शिखर माऊंट एल्ब्रुस (17 जुलै 2014), आफ्रिकेतील किलोमांजरो (15 ऑगस्ट 2014) आणि ऑस्ट्रेलिया खंडांतील माऊंट कोस्झीस्को (3 नाव्हेंबर 2014). या प्रत्येक ठिकाणी, त्याने भारताचा झेंडा फडकावला व सामाजिक आशयाची कोणती ना कोणती घोषणा कोरून ठेवली.

आनंदने एव्हरेस्टवर 19 मे 2012 रोजी तिरंगी झेंडा फडकावला.

आनंद बनसोडे सोलापुरातील गुजराथी मित्रमंडळाच्या मागे पत्र्याच्या झोपडीत राहत असे. आता तो कुमठा नाका येथे राहतो. आनंदचा जन्म तीन बहिणींनंतर झाला. आनंदचे बाबा, अशोक बनसोडे रिक्षा चालवत. त्यांचे टायर पंक्चरचे दुकानही आहे. वडील घरातील खर्च कसाबसा चालवण्याइतपत कमावायचे. आनंदची आई गृहिणी. ती खूप भाविक व भावनिक आहे. ती आनंदला बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणप्रेमाबद्दलच्या गोष्टी सांगायची, पण आनंदची शिक्षणात फारशी प्रगती नव्हती. त्याचे ‘एकदा पास तर तीनदा नापास’ असे नेहमी होई.

तो शाळेतील ‘ढ’ विद्यार्थी असल्याने त्याला जास्त मित्र नव्हते. त्यावरून शाळेत त्याला चिडवले जाई. त्यामुळे आनंद एकलकोंडाही झाला होता.

आनंदला अभ्यासाव्यतिरिक्तची पुस्तके वाचण्यात मात्र गोडी होती. त्याच्या वाचनात ‘अरेबियन नाइट्स’, ‘सिंदबादच्या सात सफरी’ अशी पुस्तके आल्याने त्याच्या बालमनावर परिणाम झाला. तो जगभर भटकावे, काहीतरी साहस करावे अशी स्वप्ने पाहू लागला. तो सोलापूरवरून जाणारे वेगवेगळ्या देशांचे मार्ग पृथ्वीच्या नकाशावर पेनने चितारत बसे. मुळात भित्रा आणि एकलकोंडा असलेला आनंद कागदावर साहसी स्वप्ने रंगवत असे! त्याच्या एकदा वाचनात आले, की ‘माऊंट एव्हरेस्ट’ हे जगातील सर्वोच्च शिखर आहे व ते भारताच्या उत्तर सीमेलगत आहे. त्याला ते शिखर चढण्याच्या कल्पना सुचू लागल्या. अभ्यासात पिछाडीवर असलेला आनंद हिमालय सर करण्याची स्वप्ने पाहतो हे ऐकून लोक त्याची टर उडवायचे, मात्र आनंदच्या मनात माउंट एव्हरेस्टने ठाण मांडले होते. आनंदने निर्धार केला, की “मी एवढ्या उंचीवर जावे, की त्या ठिकाणी माझा अपमान करण्यासाठी कोणी पोचू नये!” ध्रुव बाळाप्रमाणे सर्वोच्च आणि अढळपदी पोचण्याचे स्वप्नच ते! त्यावेळी आनंद बारा-तेरा वर्षांचा होता. त्याने चौदा वर्षांनंतर जगातील सर्वोच्च शिखर खरोखरीच काबिज केले!

सोलापूर हा सपाट, मैदानी प्रदेश आहे. छोट्या आनंदला पर्वत नक्की कसा असतो तेदेखील माहीत नव्हते. त्याने तुळजापूरचा घाट बसमधून बघितला होता. तेवढाच काय तो त्याचा जमिनीपासूनच्या उंचीचा अनुभव! पर्वताशी तुलना करण्यासाठी त्याच्या पाहण्यातील उदाहरण म्हणजे उस्मानाबादचा हातलादेवीचा डोंगर! एव्ह‍रेस्ट पर्वताची उंची हातलादेवीच्या डोंगरापेक्षा जास्तीत जास्त दुपटीने असेल अशी कल्पना तो करायचा.

आनंद नववीत नापास झाला आणि त्याच्या वडिलांनी त्याला स्वतःसोबत गॅरेजवर काम करण्यास नेले. वडील आनंदला त्याच्या वाचनाच्या छंदामुळे बिनकामाचा म्हणत. मात्र आईने सर्वांचा विरोध पत्करून त्याला नववीमध्ये पुन्हा प्रवेश मिळवून दिला. त्यासाठी त्याची शाळा बदलली. बहीण, अंजलीही त्याला अभ्यासात मदत करी. आनंदच्या तिघी बहिणी आता लग्न होऊन सासरी गेल्या आहेत. त्यांचे सासर सोलापुरातच आहे. आनंद छोटेमोठे काही वाचत असेच. त्यातून त्याला विविध विषयांत गोडी निर्माण झाली. आनंद खूप अभ्यास करून दहावी अडुसष्‍ट टक्के गुणांनी पास झाला. दहावीनंतर, आनंदला वडिलांनी ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’त डिझेल मेकॅनिक या ट्रेडला प्रवेश घ्यायला लावले. तो निर्णय आनंदच्या इच्छेविरुध्द असल्याने त्याचे मन पुन्हा अभ्यासात लागेना. मुलाची ओढ बापाला कळत नव्हती आणि बापाचे सुरक्षित, स्थिर आयुष्याचे प्रेम मुलाला समजत नव्हते. तरीही आनंदने ITI मधला ‘डीझेल मेकॅनिक’ कोर्स चांगल्या गुणांनी पूर्ण करून आईच्या पाठिंब्याने अकरावीला प्रवेश घेतला. दुसरीकडे त्याचा नोकरीसाठी शोध सुरू झाला; त्याचे रेल्वे खात्यातील नोकरीसाठी, परीक्षांसाठी अनेक राज्यांत फिरणे झाले. त्याच्या वाचनात प्र.के. घाणेकरांचे ‘एव्हरेस्ट – राजा हिमशिखरांचा’ हे पुस्तक आले. त्याच्या एव्हरेस्ट चढण्याच्या स्वप्नाला तरारून कोंब फुटू लागला. आनंदने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण कसे व कोठे मिळेल या माहितीसाठी बराच पाठपुरावा केला. पण त्याला त्‍या क्षेत्रातले माहितगार सोलापुरात गवसले नाहीत. मग त्याने पुण्यात अशा व्‍यक्‍तींची शोधमोहीमच हाती घेतली. तेव्हा त्याची भेट पुण्यातील गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांच्याशी झाली. त्‍यांना पाहताच आनंदच्या तोंडून आपोआप “सर, मला माउंट एव्हरेस्ट सर करायचे आहे.” हे वाक्य निघून गेले. सुरेंद्र शेळके हे पुण्यातील गिर्यारोहक. त्यांची विद्यार्थ्यांत विश्वास निर्माण करण्याची हातोटी विलक्षण आहे. त्यांनी आनंदची धडपड प्रथमदर्शनी ओळखली. आनंदलाही शेळकेसर जणू त्याच्या अंतर्मनातील आवाज ओळखतात असे वाटले. त्याने शेळकेसरांवर मनापासून विश्वास ठेवला. एव्हरेस्टसंबंधीची माहिती मिळवण्‍याच्‍या ओघात त्याने ‘हिमालयीन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’चा पत्ता मिळवला. आनंद त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर पाऊल ठेवत होता.

शेळके सरांनी दिलेल्या माहितीनुसार तो उत्‍तर काशीतील ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग’मध्ये पोचला. तेथे त्‍याने गिर्यारोहणाचा बेसिक कोर्स पूर्ण केला. त्‍या कोर्ससाठी लागणारे पाच हजार रुपये आनंदच्‍या बहिणीने वडिलांना न सांगता, स्‍वतःचे दागिने गहाण ठेवून दिले होते. मात्र त्या कोर्सनंतर आनंदला घरातून विरोध सुरू झाला. ‘हे धोकादायक काम करून काही मिळत नाही. इथून पुढे असे उद्योग बंद’ असे घरी त्याला घरातून ठणकावून सांगण्यात आले. मात्र आनंदला पुढील गिर्यारोहणाच्‍या प्रगत प्रशिक्षणासाठी जायचे होते.

शेळकेसरांनी ‘हिमालयीन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’, दार्जीलिंग येथे चौकशी करून आनंदला मे २००८ च्या कोर्ससाठी जागा मिळवून दिली. कोर्ससाठी लागणारे बूट, पायमोजे इत्यादी साहित्य विकत घेतले. कोर्ससाठी लागणारे बूट, पायमोजे इत्यादी साहित्य विकत घेतले. त्याच्याजवळ तिकिटालाही पैसे नव्हते. प्रवासाच्या एक दिवस आधी आनंदच्या आईला व बाबांना तो प्रकार समजला. रात्री सगळे झोपी गेल्यावर आनंद पहाटे चार वाजता उठून घरच्यांना काही न सांगता बेधडक प्रवासाला निघाला! सर्वांना सकाळी कळले, की आनंद घरातून निघून गेला आहे! आनंदने घरातून निघून गेल्‍यानंतर 2008 मध्‍ये गिर्यारोहणाचे दोन कोर्स पूर्ण केले. आनंदच्या कुटुंबियांनी त्‍याची आशा सोडून दिली होती.

आनंद स्‍वतःच्‍या इच्‍छेप्रमाणे शिक्षण घेऊ लागला, मात्र त्‍याला यश मिळत नव्हते. आनंदला त्‍या अॅडव्हान्स कोर्समध्ये बी ग्रेड मिळाला. त्‍यामुळे त्याला २०१० मध्ये एव्हरेस्ट चढाईसाठी प्रयत्न करणे शक्य झाले नाही. तो खूप निराश झाला. तोपर्यंत त्याने एकाहत्तर टक्‍के गुणांनी बी.एससी. परीक्षा पास केली. आनंदने गिर्यारोहण व एव्हरेस्ट या स्वप्नांना भविष्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला व त्‍याने पुढील शिक्षणासाठी नियोजन केले.

आनंद पुणे विद्यापीठामधून एम.एससी. करू लागला. तेथे होस्‍टेलमध्‍ये राहत असताना त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तो एका शिखरावर उभा राहून तिरंगा फडकावत होता. आनंदला ते स्वप्न आठवले. त्या‍ने मनाला आलेली मरगळ झटकली आणि तो पुन्हा एकदा मनाली येथील गिर्यारोहण संस्थेत अॅडव्हान्स कोर्सला जाण्यास निघाला. तेही घरच्यांशी खोटे बोलूनच!

आनंदने दार्जिलिंगच्‍या इन्स्टिट्यूटमधील प्रशिक्षण पूर्ण केले. त्‍याने सव्वीस दिवसांच्या अॅडव्हान्स कोर्सनंतर २०१० साली एका बंगाली टीमसोबत टी-२ या शिखराच्या मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला. ते शिखर तोपर्यंत कोणीही सर केलेले नव्हते. आनंदचे कोर्समधील गिर्यारोहणाचे प्रयत्न वगळले तर ती त्याच्या आयुष्यातील पहिली मोहीम होती. त्या काळात लेह-मनाली या भागात ढगफुटी झाली होती. आनंद त्याच भागात होता. त्याला व बंगाली गिर्यारोहकांना अत्यंत कठीण व जिवावर बेतलेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. इकडे, आनंदच्या घरी लेह-मनालीच्या बातम्या पाहून खूप काळजीचे वातावरण होते. त्यांचा मुलगा नक्की कोठे आहे ते विचारायला आनंदच्या बाबांनी सुरेंद्र शेळके यांना फोन केला. त्यांनी आनंद सुखरूप आहे एवढेच सांगितले. कुटुंबीयांनी पुणे विद्यापीठात जाऊन चौकशी केल्यावर सत्य समोर आले, की आनंद घरी खोटे बोलून पुन्हा एकदा गिर्यारोहणाला गेला आहे. त्याच्या बाबांना खूप दिवस झोपच आली नाही. तिकडे आनंदची प्रगती जोरात होती. अखेर, ४ ऑगस्ट २०१० या दिवशी समुद्रसपाटीपासून १९,७७७ फूट उंच असलेल्या T-2 या शिखरावर आनंदने आणि त्याच्या सोबतच्‍या शेर्पांनी तिरंगा फडकावला. आनंद त्‍या शिखरावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरला. त्यात क्षणी त्याच्यासोबत शिखरावर आलेल्या शेर्पा रुद्रने आनंदला म्हटले, “तुम्हारे विश्वास ने यह कर दिखाया”.

पण एव्हरेस्ट अजून बाकी होते! ते शिखर आनंदला सारखे खुणावत होते. तो नव्या मोहिमेच्या तयारीला लागला. पैशांची जमवाजमव सुरू झाली. अनेकांना भेटणे, अर्ज देणे, बँक मॅनेजरांना भेटणे इत्यादी… त्याने आठ महिन्यांच्या कालखंडात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक बड्या मंडळींच्या भेटी घेतल्या, पण अपमानाशिवाय त्याच्या वाट्याला काही आले नाही. आनंदने त्याच्या गिर्यारोहक अमेरिकन मित्राला, स्‍टीव्‍हला पैशांच्या तजविजीबाबत मेल लिहिला. स्टिव्‍हने आनंदला अमेरिकेत पैशांची जमवाजमव करण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले. त्‍याने आनंदला अमेरिकेहून कागदपत्रे पाठवली. शेळके सरांनी आनंदला कागदपत्रांच्‍या बाबतीत मदत केली आणि त्या बळावर आनंद अमेरिकेला निघाला! त्याच्या प्रवासासाठी आनंदचे मेहुणे देवीदास गायकवाड यांनी थोड्या पैशांची व्यवस्था केली. आनंदने परतीचे तिकिट न घेताच २१ जुलै २०११ रोजी अमेरिकेसाठी उड्डाण केले. परतीचे तिकीट न घेता अमेरिकेत प्रवेश करणे सोपे नसते. मात्र आनंदने तयार केलेली कागदपत्रांची फाईल एवढी व्‍यवस्थित होती, की त्‍याला परतीच्‍या तिकीटाशिवाय अमेरिकेत प्रवेश दिला गेला. आनंदची ती अमेरिकाभेट मात्र सफल ठरली. त्याला तेथील वास्तव्यात काही मित्र, शुभचिंतक भेटले. त्यांनी आनंदला एव्हरेस्ट चढाईसाठी मदतही केली. त्यांच्या सहकार्याने आनंद १५ ऑगस्ट २०११ रोजी कॅलिफोर्निया राज्यातील माउंट शास्ता हे शिखर चढला. त्या नंतर तो सहा महिने अमेरिकेतच राहिला – डिसेंबर २०१२ मध्ये भारतात आला.

आनंदला भारतात आल्यानंतर पुण्यातील ‘सागरमाथा गिर्यारोहण संस्थे’च्या ‘मिशन एव्हरेस्ट २०१२’ बद्दल माहिती मिळाली. एव्हाना, आनंदच्या घरच्यांच्या मनात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाला होता. त्यांनी त्याला साथ देण्याचे ठरवले होते. त्यांनी आनंदच्या मोहिमेसाठी कमी पडत असलेली रक्कम राहते घर गहाण टाकून, कर्ज काढून उभी केली. आनंदचे आयुष्यात प्रथमच पक्के पाऊल पडले होते!

आनंदची एव्हरेस्ट मोहीम २३ मार्च २०१२ ला सुरू झाली. आनंद अनेक अडचणींचा सामना करत, अनेक अनुभव गाठीला बांधत एव्हरेस्ट काबिज करण्याच्या दिशेने मजल-दरमजल करत होता. अखेर, तो १९ मे २०१२ रोजी सकाळी ११ वाजून २९ मिनिटांनी जगातील सर्वोच्च शिखरावर, माउंट एव्हरेस्ट वर पोचला! समुद्रसपाटीपासून २९,०२९ फूट उंच असलेल्या जगाच्या त्या कळसावर भारताचा तिरंगा फडकावताना आनंदच्या मनात देशप्रेमाच्या भावना जागृत झाल्या. त्याने आई-बाबांचे, शेळकेसरांचे मनोमन स्मरण केले. ते ध्येय गाठण्यासाठी ज्या अनेकांनी त्याला सहकार्य केले, त्‍या साऱ्यांची आठवण त्याच्या मनात दाटून आली. सत्तावीस वर्षांच्या आनंदने तो पराक्रम केला तेव्हा त्याच्या घरीच नव्हे तर साऱ्या परिसरात ‘आनंद’ पसरला. तोपर्यंत आईवडिलांना त्यांचा मुलगा काय करतो याची नीटशी कल्पनादेखील नव्हती. त्याचे गिर्यारोहणाचे वेड, त्याचा गिरिभ्रमणाचा छंद याबद्दल साऱ्यांच्या मनी असलेल्या शंका आनंदच्या एव्हरेस्ट पराक्रमाने दूर सारल्या. आनंदला माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी वीस लाख रुपये खर्च आला.

आनंद एव्हरेस्ट सर करून थांबला नाही. त्याने २०१४ मध्ये युरोपमधील शिखर माऊंट एल्ब्रुस (१७ जुलै २०१४), आफ्रिकेतील माऊंट किलोमांजरो (१५ ऑगस्ट २०१५) आणि ऑस्ट्रेलिया खंडांतील माऊंट कोस्झीस्को (३ नोव्हेंबर २०१४) ही सर्वोच्च शिखरे सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा विक्रम केला. त्याने त्याची प्रत्येक मोहीम एका सामाजिक विषयाला समर्पित करून गिर्यारोहणाला समाजकार्याची जोड दिली आहे. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांमध्ये झाली आहे. त्या रेकॉर्डसाठी त्याला विश्वविक्रमांच्या विद्यापिठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली आहे. सध्या, तो युनायटेड नेशन्स सोबत स्त्री-पुरुष समानतेवर व स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी कार्य करत आहे.

आनंद म्हणतो, की त्याच्या प्रत्येक मोठ्या मोहिमेला दोन ते वीस लाख रुपयांपर्यंत खर्च आला. ते पैसे हितचिंतक, व्यावसायिक यांच्याकडून उभे राहिले. उदाहरणार्थ जी अलास्कातील मोहीम अर्धवट सोडून त्याला परत यावे लागले. तिचा खर्च सहा लाख रुपये होता. तो निधी सोलापूरच्या व्यावसायिकांनी दिला. आरंभीचे पैसे कुटुंबीयांकडून उभे करावे लागले. पुढे, मुख्यत: पुणे-सोलापूरचे व्यावसायिक त्याला मदत करत गेले. या कामी रत्नाकर गायकवाड, प्रमोद साठे, सुहास गांधी, कुमारदादा करजगी यांच्याकडून सहाय्य झाले असे त्यांच्या तोंडून येते. आनंदाला सोलापूरचे अभियंता राजेश जगताप यांची मोठ्या भावाप्रमाणे साथ मिळत असते. निधीसाठी बरीच यातायात करावी लागते, परंतु शिखर सर करून आले, की जी सफलता मिळते त्या आनंदाला तोड नसते. आनंद सांगतो, की त्याच्यामध्ये कष्ट करण्याची जिद्द आली ती वडिलांकडून. ते दिवसाचे चौदा-पंधरा तास काम करत. रिक्षा चालवतच, पण व्हिल बॅलन्‍सींग आणि टायर पंक्चर काढण्याचे त्यांचे कौशल्य असे, की व्हिल बॅलन्‍सींसाठी उस्मानाबाद, लातूरवरून वाहने येत.

आनंद M.phil (Physics) शिकत आहे. त्याच वेळी तो राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत संशोधनात गुंतला गेला आहे. त्याला Doctorate in Record MAKING या उपाधीने सन्मानित करण्यात आले. तो शाळा-कॉलेजात आणि इतर संस्थांत भाषणे देण्यासाठी जातो. त्याचा त्याला आर्थिक मोबदला मिळतो. शिवाय United Nations तर्फे ‘HeForShe’ Person म्‍हणून गौरवण्‍यात आले आहे. आनंदने त्याच्या गिर्यारोहण क्षेत्रातील अनुभवांवर आणि संघर्षावर आधारित ‘स्वप्नातून सत्याकडे’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याने त्या पुस्तकाचे प्रकाशन आदिवासी मुले आणि पारधी समाजातील अनाथ मुले यांच्या हस्तेे केले. सध्‍या आनंद महाराष्‍ट्रातील विक्रमवीरांना नामांकन देण्‍यासाठी ‘महाराष्‍ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ची स्‍थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आनंदचा स्वप्नातून सत्याकडे जाणारा मार्ग त्याच्या अंतरंगात होता. त्याने फक्त त्या मार्गावरून चालण्याचे धाडस केले. त्याचे स्वप्न हीच त्याची प्रेरणा होती. त्याची ती स्वप्नपूर्ती इतरांना प्रेरणा देणारी ठरली आहे.

आनंदबद्दल त्याचे सहकारी काय म्हणतात?

जो मिकी म्हणतो… “एव्हरेस्टपासून हजारो मैल दूरवर अमेरिकेत मला एव्हरेस्टचे स्वप्न पाहणारा आनंद भेटला. त्याचा स्वत:वर खूप विश्वास होता. आनंद प्रेरणादायी आहे. तो सांगतो, की ”एकापुढे एक पाऊल टाकून सर्वांत अवघड शिखर सर करा. जगातील सर्व जादू तुमच्यामध्ये सामावली आहे. फक्त अंतरंगात पाहा व पाऊल उचला.”

मिगामा शेरपा म्हणतो… “तू एव्हरेस्ट सर करणे व तेथे भारताचे राष्ट्रतगीत वाजवणे यामुळे भारतीय बांधवांना दुहेरी आनंद दिला आहेस.”

DAN MILMAN (अमेरिका) म्हणतो… “तुझे अभिनंदन फक्त यासाठी नाही, की तू जगातील सर्वोच्च शिखर सर केलेस, तुझे अभिनंदन यासाठी की तू तुझ्या अंतरंगातील सर्वोच्च उंची गाठलीस.”

साझी ली व्हार्गा (हॉलिवूड अभिनेत्री, निर्माती) म्हणते… “माझ्यासाठी एक भारतीय मुलगा प्रेरणा बनला आहे. आयुष्यातील वाईट काळातही सकारात्मक विचार करून पुढे जाणारा आनंद मला भेटला. त्याच्यासारखे स्वप्नवादी युवकच भारत देशाची शक्ती आहेत.”

आनंद अशोक बनसोडे
९७३०२७७७५९
डी-७६, भारतनगर, कुमठा नाका, सोलापूर ४१३००३
www.anandbansode.com

– श्रीकांत पेटकर

About Post Author

17 COMMENTS

 1. Khup chan. Abhiman watto a an
  Khup chan. Abhiman watto Anand baddal. Prayatnala yashachi jod milali ki dhey prapt vote. Well Dan.

 2. आनंद आपले अभिनंदन.तुझे साहस
  आनंद तुझे अभिनंदन. तुझे साहस इतरांना माहित होऊ दे. जय ..हो….जय भारत…..!

 3. सोलापूरातीलच नाही तर संपूर्ण
  सोलापूरातीलच नाही तर संपूर्ण जगातील असंख्य तरुणांचा आनंद आदर्श आहे. We proud of You Anand………

 4. आनंद बनसोडे

  आनंद बनसोडे,
  उत्तुंग कामगिरी।।।
  उडी मारुन बेधडक स्वप्‍नामागे धावायला प्रोत्साहन दिलेस तू!!!

 5. THE YOUTH WHO DARES TO SEE
  THE YOUTH WHO DARES TO SEE SVAPNA & WHO WORKS TOWARD IT, NO ANY BOUNDARY CAN HESITATE FROM TO ACHIEVE HIS SVAPNA.. ANNANDA PROVED IT.
  CONGRETS “””””

 6. Anand ji, tumhi je kele aahe
  Anand ji, tumhi je kele aahe tyachi kalpana karne shakya naahi. Khara swapnatun satyakade janara marg tumhi dakhavala ahe.dhanyavaad evdi prerana dilyabaddal.

 7. तुमच्या या प्रेरणेने मी सुधा
  तुमच्या प्रेरणेने मी सुद्धा एव्‍हरेस्‍ट शिखर मोहिमेचे स्वप्न बघतोय.

 8. जिद्द व अपार प्रयत्न असले
  जिद्द व अपार प्रयत्न असले की माणूस काहीही करू शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण. असेच उदंड यश मिळो हीच सदिच्छा.

 9. सर्वोच्च ऊंचीवर नेहमीच मोकळी
  सर्वोच्च उंचीवर नेहमीच मोकळी जागा असते. अशी अनेक सकारात्मक यशदायी वाक्ये डाॅ. आनंद बनसोडे यांच्या नवीन “स्टेपिंग स्टोन टु सक्सेस” या पुस्तकात वाचायला मिळतात. मस्तच book आहे हे!

 10. आनंद तुज्या सारखे विचार जर
  आनंद तुज्या सारखे विचार जर भारतातील सर्व लोकांचा असेल ना तर भारत हा महान तर आहेच पण महा सत्ता होईल मला तुज्या वर गर्व आहे तुझे आभिनंदन

 11. अनेकांची प्रतीक्षा संपली…

  अनेकांची प्रतीक्षा संपली…
  गेली अनेक महीने ज्या क्षणाची वाट पहात होतो तो क्षण काल दुपारी आला..महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशन “मनोविकास प्रकाशन” ने प्रकाशित केलेले “ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा” हे पुस्तक माझ्या हातात पडले.. या महिन्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यत हे पुस्तक उपलब्ध होणार आहे..
  2013 मधे आलेल्या माझ्या “स्वप्नातुन सत्याकडे” या पुस्तकानेच अनेकांचे आयुष्य बदलून टाकले होते.. काही जणांना तर आत्महत्येच्या विचारापासून पराव्रुत्त्त् करून यशाची उंची गाठून दिली होती.. आता “ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा” या पुस्तकात माझ्या लहानपणीपासून ते जगातील 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा प्रेरक प्रवास शब्दबद्द केला आहे..
  लहानपणी मी 9 वी नापास झाल्यानंतर वडिलांसोबत गाड्यांचे पम्चर काढण्याचे कामही मी केले आहे..त्या अपयशी काळातच ‘एव्हरेस्टवीर’ बनण्याची बीजे पेरली होती.. लहानपणापासून मी माझ्या वडिलांना खूप कष्ट करताना पाहिले आहे. छोट्याश्या गॅरेजमधे बसलेले, पूर्ण शरीर घामाने भरलेले, कपाळावरुन घामाचे थेंब ते चाकावर घातलेल्या प्रत्येक घावागनिक खाली पडत असत.. त्यांची ही मेहनत करणारी छबी माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणास्त्रोत आहे..म्हणूनच वडिलांच्या या मेहनतीला सर्वस्व मानून पुस्तकाच्या कवरपेजवर अर्ध-मेकँनिक-अर्ध-गिर्यारोहक ही प्रतिमा घेतली आहे..
  “स्वप्नातून-सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे फक्त त्यावरून चालन्याचे धाडस अंगी बाळगावे लागते आणि एखादी गोष्ट जेव्हा मनापासून हवी असते तेव्हा ती मिळवून देण्यासाठी सारे विश्वच मदतीला धावून येते” हा विश्वास मनात ठसवनारे हे पुस्तक अनेकांचे आयुष्य बदलून टाकेल यात शंका नाही..
  हे पुस्तक पुढील आठवड्यात आपल्या नजीकच्या बुक-शॉप मधे उपलब्ध असेल..

  -आनंद बनसोडे
  (विश्वविक्रमी गिर्यारोहक, मोटीव्हेशनल स्पिकर-ट्रेनर, लेखक)

Comments are closed.