रवींद्र पिंगे हे मराठीतील नेटाने, सातत्याने, उमाळ्याने लेखन करणारे साहित्यिक होत. त्यांनी मुख्यतः ललित लेखन केले. त्यांनी कथा-कादंबरी हे वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत; पण ते वाचकप्रिय ठरले ते त्यांच्या छोटेखानी, प्रसन्न, उत्कट ललित लेखनामुळे. पिंगे यांनी पन्नासहून अधिक वर्षे, कोऱ्या कागदाच्या हाका ऐकत लेखणीचे वल्हे डौलाने वल्हवले. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हे समर्थ रामदासांचे सांगणे पिंगे यांच्याइतके कोणी मनावर घेतले नसेल. ते ‘लिहा, सतत लिहीत राहा’ असे ‘पेर्ते व्हा’च्या चालीवर सांगत असत आणि त्यांनी स्वतःही लिहिण्याचा तो वसा जपला. त्यांची वृत्ती एकही निरीक्षण, एकही अनुभव, एकही प्रवास वाया जाऊ द्यायचा नाही; त्याच्या नोंदी ठेवायच्या, अल्पाक्षरी–घाटदार लेख लिहायचे, आनंद घ्यायचा आणि द्यायचा ही होती. मरगळलेल्या मनांवर प्रसन्नतेचे शिंपण करत अक्षरांचे चांदणे रसिकांच्या ओंजळीत द्यायचे, जगण्याची उमेद वाढवायची ही त्यांच्यातील कलावंताची साधी, सरळ रीत होती.
पिंगे यांचा पहिला लेख ‘मौजे’त 4 जुलै 1951 ला प्रसिद्ध झाला. त्यांच्या निवडक लेखांचा ‘सर्वोत्तम पिंगे’ हा संग्रह 13 मार्च 2007 मध्ये आला. त्यांतील लेखांची निवड त्यांची स्वतःचीच आहे. पिंगे यांनी ‘मौज’, ‘साधना’, ‘सत्यकथा’, ‘माणूस’, ‘नवशक्ती’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ अशा मासिका-वृत्तपत्रांमध्ये भरपूर लिहिले. त्यांच्या लेखनाचे पस्तीस एक संग्रह निघाले. त्यांनी त्यातून ‘सर्वोत्तम’ तीस लेख निवडून वाचकांपुढे ठेवले आणि त्यानंतर दीड वर्षाने या जगाचा निरोप घेतला. ‘सर्वोत्तम पिंगे’मधील ‘संवाद स्वतःशी’ आणि शेवटचे तीन लेख एक व्यक्ती म्हणून आणि एक साहित्यिक म्हणून पिंगे यांची ओळख करून देणारे आहेत. स्पर्धा, द्वेष, मत्सर यांपासून दूर राहून जीवनातील आनंदाचा, सौंदर्याचा समरसून अनुभव घेणाऱ्या पिंगे यांना या जगातील दांभिकता, क्षुद्रता, पोकळपणा यांचे भान चांगले होते. त्यांनी या जगात कोणी कोणाचे नाही, आपणच आपला आनंद शोधायचा, आपणच आपली यत्ता ठरवायची आणि दक्षतेने त्याची नोंदही करायची हे विचारसूत्र सांभाळले. त्यांनी ‘घडले तेच पसंत’ असे म्हणून स्वतःच स्वतःसंबंधी लिहून ठेवले. “माझ्या जन्मशताब्दीची आठवणही कोणाला येणार नाही, पण अक्षरांचा बहुत श्रम केलेल्याची काही अधिकृत माहिती तरी लिहून ठेवलेली असावी” असे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी ‘संवाद स्वतःशी’ केला ! त्यांना साहित्यक्षेत्रातील एकूण वातावरण, नव्या-जुन्या लेखकांबद्दलची अनास्था, दुसऱ्याला अनुल्लेखाने मारणे, स्वार्थी वृत्ती, स्पर्धात्मकता बोचत असावी. म्हणून त्यांनी तो मार्ग निवडला असावा.
पिंगे यांना निसर्गाची, प्रवासाची; एकूणच भटकंतीची आणि मनसोक्त गप्पांची विलक्षण ओढ होती. कोकणातील उपळं हे त्यांचे गाव. त्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. विजयदुर्गच्या खाडीच्या काठावरचे ते गाव. त्या गावाचे- तेथील निसर्गसौंदर्याचे, माणसांचे संदर्भ त्यांच्या लेखनात येतात. त्यांनी गावाचे आत्मीयतेने वर्णन ‘सुंदर माझं गाव – केशरी कमळ’ या लेखात त्याचे आत्मियतेने वर्णन केलेले आहे. गावाची, कोकणच्या मातीची अनिवार ओढ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अविभाज्य घटक होता. तेथील निसर्गसमृद्ध, शांत जीवन, साधे पण मायाळू घर, खाडीतील ताजी मासळी हे त्यांचे परमसंतोषाचे विषय होते. त्यावर लिहिताना त्यांच्या लेखणीला बहर आलेला दिसतो. जीवनाचा आनंद वखवखशून्यतेने घेण्याची त्यांची वृत्ती त्याच लेखसंग्रहातील ‘एक सुंदर योग जमून आला’ या लेखात दिसते. दादर चौपाटीवर सकाळी साडेदहाच्या सुमारास ‘सुखाचं फूल’ या पिंगे यांच्या कथेवर बेतलेल्या दूरचित्रवाणी – नाट्याचे बाह्यचित्रीकरण सुरू होते. त्यावेळी चित्रिकरणात सामील असलेल्या सर्वांमधील स्पर्धा, उच्च यश मिळवण्याची धडपड पिंगे दूरवरून चहाचे घुटके घेत न्याहाळत होते. पूर्णपणे शांत, अलिप्त ! त्यांतील सुख त्यांना मोलाचे वाटले. लहानसा, साधा लेख, पण पिंगे यांची जीवनदृष्टी व्यक्त करणारा. त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय हेच आहे. त्यांनी गंभीर, तत्त्वचिंतनात्मक असे लेखन केले नाही, पण त्यांना वरवर साध्यासरळ, लहानशा दिसणाऱ्या अनुभवांत, निरीक्षणांत, घटना-प्रसंगांत असे काही निके (अस्सल) सत्त्व स्पर्शून गेलेले असते, की त्याचा आविष्कार मनाला भिडणारा ठरतो ! वाचक पिंगे त्यांना मनोमन दाद देतो.
ललितमधुर, ओघवती, प्रसन्न भाषाशैली हे पिंगे यांचे वैशिष्ट्य आहे. एकादा छोटासाच अनुभव, पण ते इतक्या उत्कटतेने, जिव्हाळ्याने सांगतात, की वाचक त्यात कधी आणि कसा गुंगून जातो ते कळतही नाही. ते कळेपर्यंत लेख संपलेला असतो. पिंगे यांचे लेखन अल्पाक्षरत्व, प्रासादिकता, रसाळता या गुणांनी नटलेले आहे, पण नुसत्या शैलीच्या सौंदर्यावर लेखक वर्षानुवर्षे उभा राहू शकत नाही. लेखनाच्या आशयाची उंची त्याचे मोल ठरवत असते आणि आशय लेखकाच्या व्यक्तिमत्त्वातून आकार घेत असतो. पिंगे यांची जीवनाकडे पाहण्याची सश्रद्ध, सौंदर्यवादी, आनंदनिर्भर, भावनाशील दृष्टी त्यांच्या लेखनात सतत जाणवते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे रंग त्यांच्या लेखनाशी एकरूप झाल्याचे दिसते. त्यांना अनेक थोर व्यक्तींचा प्रत्यक्ष, तर काहींचा ग्रंथवाचनातून सहवास घडला. त्यांच्यावर आणि त्यांच्या लेखनावर काही संस्कार माणसांच्या गाठीभेटी, प्रवास आणि मनसोक्त वाचन यांतून झाले.
त्यांनी साधारण दोनशेहून अधिक व्यक्तिचित्रणे लिहिली. ते थोर व्यक्तींवर लिहिताना, त्यांचे श्रेष्ठत्व वर्णन करताना त्यांचे दोष, मर्यादा दाखवण्यासही कचरत नाहीत. त्यांनी कुमार गंधर्वांचे शांत, तृप्त जग, डी.जी. – एक अवलिया, एक वादळ शांत झालं (हंसा वाडकर), जयप्रकाश, बालगंधर्व, दुर्गा भागवत, बा.भ. बोरकर, अमृता प्रीतम, पं. रविशंकर, सैगल अशा अनेकांची व्यक्तिचित्रणे उत्कटतेने रेखाटली आहेत. व्यक्ती लेखनातून मोजक्या शब्दांत डोळ्यांपुढे उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या कथांमध्येही दिसते. ‘प्राजक्ताची फांदी’ या कथेत रेखाटलेले दोन-तीन ओळींचे व्यक्तिदर्शन किती परिणामकारक आहे ते पाहवे – “ताई : वय सत्तरीच्या पलीकडे. डोक्याला कुंकू नाही. केस निम्मे काळे, शरीर म्हातारे, जीभ तरुण. शरीराची हालचाल पाखरासारखी चपळ. चर्या खंबीर.” अशा व्यक्तिविशेष वर्णनाबरोबर निसर्गाचीही सुंदर वर्णने त्यांच्या लेखनातून वाचण्यास मिळतात. त्यांनी ‘युद्धनौकेवरला एक दिवस’ या लेखात केलेले सागराचे वर्णन वाचनीय आहे. “सिंधुसागर ! निळा निळाभोर तळ्यातल्या पाण्यासारखा शांत, पारदर्शक सिंधुसागर ! अंघोळ घालून तीट लावलेलं बाळ पाळण्यात शांतपणे झोपी जावं तसा हा निळा निळा कोवळा सिंधुसागर अगदी शांतपणे झोपी गेलेला दिसतो… झोपी गेलेल्या बाळानं गालातल्या गालात क्षणभर हसावं तसे हे कोवळे तरंग भासतात !” लहान बाळ त्यांच्या स्वतःच्या जीवनात नातवाच्या रूपाने आले, तेव्हा त्यांनी आजोबा झाल्याचा तो आनंद, ‘आनंदपर्व’ या लेखसंग्रहात इतक्या मुक्तपणे, भरभरून, जिवीच्या जिव्हाळ्याने व्यक्त केला आहे की हे नेहमीचे, साधेसुधे क्षण किती सुंदर असतात आणि ते किती सुंदरतेने व्यक्त करता येतात त्याची प्रचीती येते !
पिंगे अशा कोमल, हळुवार अनुभवांबरोबर पंजाबी धाब्यावरील फर्मास खाद्यसंस्कृतीची ओळखही मोठ्या चवीने करून देतात. चवीने आयुष्य जगणे हाच त्यांचा मूलमंत्र होता. पण आयुष्यातील त्या आयामांची व्याप्तीसुद्धा संकुचित नव्हती. ‘माती जिथली अबीर गुलाल’ हा भारताच्या सरहद्दीवरील अनुभव व्यक्त करणारा लेख मुळातून वाचण्यास हवा. पिंगे यांनी पेट्रापूर या पश्चिम बंगालमधील एका खेड्यापासून ते हस्नाबादपर्यंत म्हणजे भारतीय प्रदेशाच्या अखेरच्या कोपऱ्यापर्यंत प्रवास केला. ते पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्या सरहद्दीवरील माणसांना, निर्वासितांना भेटले. त्यांनी त्यांच्या व्यथा, वेदना, हृद्गत जाणून घेतले. ते निर्वासितांचा निरोप घेताना उदात्त भावना त्यांच्या मनात दाटून आली. “ते माझे आहेत, मी त्यांचा आहे आणि आम्ही एकमेक सर्वांचे आहोत.” इच्छामती नदीचे पात्र हीच येथील सरहद्द. त्या जलमय सरहद्दीचे वर्णन करताना ते लिहितात, “ह्या नदीचं गंगाजलही भारताचं, म्हणजे माझंच. चांदण्यात वाहणाऱ्या त्या गंगौघाला नमस्कार करून परतताना फक्त एक विचार मनात फडफडला- ही आपली पुरातन भूमी कशी नक्षत्रासारखी सुंदर आणि अद्भुत आहे !’ माणूस आणि निसर्ग हे त्यांचे जिव्हाळ्याचे, श्रद्धेचे विषय. पण ती श्रद्धा डोळस होती. ‘जगद्गुरूंचा सोवळा मठ’ या लेखातील कालडी, शृंगेरी येथील मठांचे, पेरियार नदीचे, शंकराचार्यांच्या दर्शनाचे वर्णन दृष्टिगोचर आहे, पण पिंगे यांना तेथील जातीयता, सभोवतालचा समाज, राष्ट्रीय घडामोडी यांपासून अलिप्त राहून एका विशिष्ट वर्तुळात जगणे आवडलेले नाही.
पिंगे यांचे इंग्रजी साहित्याचे वाचन विपुल होते. त्यांनी त्या आधारावर आणि स्वतंत्रपणेही सदरलेखन खूप केले. त्यांनी पुण्याच्या ‘दैनिक तरुण भारत’मध्ये ‘पिंपळपान’ या सदरात पाश्चात्य लेखक आणि त्यांच्या कलाकृती यांवरील लेख लिहिले. प्रिस्टलेची अखेरची मुलाखत, पर्ल बकचे कनवाळू आत्मचरित्र, थॉमस हार्डी, गॉन विथ द विंड ही मागरिट मिचेल लिखित अमेरिकन कादंबरी असे काही लेख पुढे पुस्तकरूपाने आले. ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’मध्ये ‘सॉमरसेट मॉम’, ‘पर्ल बक’, ‘अज्ञात हेमिंग्वे’ हे सुरेख लेख समाविष्ट झालेले आहेत.
पिंगे यांनी विविध वाङ्मयप्रकारांतील भरपूर लेखन केले. उदाहरणार्थ ‘आनंदव्रत’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ इत्यादी प्रवासवर्णने, ‘परशुरामाची सावली’ ही कादंबरी, ‘सुखाचं फूल’, ‘प्राजक्ताची फांदी’, हे कथासंग्रह, ‘सुखसंगत’ हा व्यक्तिचित्रणसंग्रह, ‘मोकळे आकाश’, ‘आनंदाची फुले’, ‘प्रकाशाची खिडकी, ‘आनंदपर्व’ इत्यादी ललित लेखसंग्रह असे. त्यांनी काव्यलेखन केले नाही मात्र त्यांच्या सगळ्या लेखनाला काव्यात्मतेचा स्पर्श आहे.
परमेश्वर, आई-वडील, निसर्ग यांच्यावर श्रद्धा, योगायोगांवर विश्वास, माणसाच्या जगण्याचा अर्थ आणि अर्थशून्यता यांचे आंतरिक भान ही त्यांची वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात उमटली. ‘मी कुटुंबाला कायम धरून राहिलो’ असे उन्मेखून सांगणाऱ्या पिंगे यांना माणसा-माणसातील जिव्हाळा, स्नेह, माया यांची कदर होती. त्यांना माणसाच्या अस्तित्वाचा, असण्याचा आणि नसण्याचाही अर्थ आतल्या आत उमगला होता. त्यांनी त्यांचा प्रकृतिधर्म ओळखून निष्ठेने लेखन केले. त्यासाठी त्यांची आकाशवाणीवरील नोकरी पूरक ठरली. त्यांना माणसे खूप जोडता आली, अनेकांच्या प्रतिभेला आवाहन करता आले, त्यांनी महत्त्वाच्या वाङ्मयीन नोंदी ठेवल्या, अनेकांच्या उपयोगी पडता आले, याचा त्यांना निर्भेळ आनंद आणि अभिमान होता. लेखकाचे जगणे आणि त्याचे लिहिणे सुरेल होते ते अशा सुसंवादी नात्यांनी. म्हणूनच पिंगे यांचे लेखन हे ‘आनंदपर्व’च आहे – ते स्वत: आणि त्यांचे वाचक या दोघांच्याही लेखी !
रवींद्रनाथ रामचंद्र पिंगे (जन्म: 13 मार्च 1926 मृत्यू: 16 ऑक्टोबर 2008)
साहित्य
ललित लेखसंग्रह
- मोकळे आकाश,2. मुंबईचे फुलपाखरू, 3. पिंपळपान, 4. बकुळ फुले;नि फुले मोहाची, 5. आनंदाची फुले, 6. केशरी कमळ, 7. आनंदपर्व, 8. प्रकाशाची खिडकी
कथासंग्रह
- सुखाचे फुल, 2. प्राजक्ताची फांदी
कादंबरी
- परशुरामाची सावली
व्यक्तिचित्रण
- सुखसंगत, 2. शतपावली, 3. देवाघरचा पाऊस, 4. पश्चिमेचे पुत्र, 5. दिवे- लामणदिवे, 6. अंगणातले चांदणे
प्रवासवर्णन
- आनंदव्रत,2. आनंदाच्या दाही दिशा
निवडक लेखांचा संग्रह
- सर्वोत्तम पिंगे
– मेधा सिधये 95884 37190 medhasidhaye@gmail.com
उत्कृष्ट लेख. पिंगे यांच्या लेखनाचं आणि व्यक्तिमत्त्वाचं मर्म जाणून घेऊन संपूर्ण वाङ्मयीन कारकिर्दीचा नेमका आढावा या लेखात घेतला आहे. धन्यवाद!
पिंगे यांच्या वरील लेख, पिंगे यांच्या शैलीत निर्मळपणे लिहिला आहे, लेख छान आहे, पण एका गोष्टीचा उल्लेख त्यात नाही, तो म्हणजे अनेक नामवंतांच्या सत्काराप्रसंगी दिल्या गेलेल्या मानपत्रांचे लेखन त्यांनी केले होते.
Khup chaan lekh ,amhala ssc la tyaanche koknatil diwas nawacha chhan dhada hota , jo mumbaiche phulpakhru pustakatun ghetalela hota .