आद्य शंकराचार्य

2
51
carasole

वेदांताचे तत्त्वस्वरूप समजावून देणा-या तत्त्ववेत्त्यांमध्ये आद्य शंकराचार्य यांची योग्यता सर्वश्रेष्ठ दर्जाची मानली जाते. त्यांना अवघे बत्तीस वर्षें (इ.स. 788 ते 820) आयुष्य लाभले. त्यांनी अलौकिक बुद्धिमत्तेने भारत खंडाला हालवून सोडले. त्यांनी वैदिक धर्माची प्रतिष्ठापना भक्कम पायावर पुन्हा केली. वेद हे ईश्वरप्रणीत आहेत असे त्यांचे प्रतिपादन आहे.

आचार्यांचा जन्म केरळमध्ये मलबारात नीला आणि चर्णी नद्यांच्या संगमावर कालटी गावी नंबुद्री ब्राह्मणाच्या कुळात झाला. आचार्यांच्या आईचे नाव आर्याम्बा व वडिलांचे नाव शिवगुरू. आचार्य नदीत स्नान करतेवेळी, मगरीने त्यांचा पाय धरला. त्यांनी त्यावेळी आईकडून संन्यासाश्रमाची परवानगी घेतली आणि त्यांनी त्यांची सुटका मगरमिठीतून व त्याचबरोबर संसारबंधनातून करून घेतली.

गौडपादाचार्यांचे शिष्य गोविंद यती यांनी आचार्यांना संन्यासदिक्षा दिली. त्यामुळे गौडपादाचार्य हे आचार्याचे आजेगुरू समजले जातात. सत्याचे श्रवण-मनन करा, ध्यानधारणा करा, आचार्यांनी त्यांचे मंथन केले. आचार्यांनी ते आठ वर्षांचे असताना वेद मुखोद्गत करून घेतले व नंतर चार वर्षांत, त्यांनी सर्व शास्त्रांचे अध्ययन पुरे केले. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बद्रिकेदार येथे शांकरभाष्य रचले. मंडनमिश्रांसार‘ख्या प्रकांड पंडितास त्यांच्या वाक्चातुर्याने पूर्ण अद्वैती बनवले. त्याशिवाय आचार्यांचे सुरेश्व्र, हस्तामल, पद्मपाद, त्रोटक वगैरे शिष्य होते. आचार्यांनी त्यांना धर्मप्रचारासाठी चारी दिशांना पाठवले.

शंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यात बादरायण सूत्रे, भगवद्गीता व उपनिषदे यांवर मिळून पंधरा भाष्यग्रंथ, शिव, विष्णू, चण्डी, सूर्य वगैरे देवतांना उद्देशून ‘दक्षिणामूर्ती’’ स्तोत्र लिहिले. त्यांनी भारतभर दोन वेळा परिभ्र‘मण केले. चारी दिशांना शृंगेरी, द्वारका, जगन्नाथपुरी, बद्रिकेदार व सर्वांत शेवटी श्रीनगर येथे सर्वोच्च पीठ स्थापन केले. वैदिक धर्माची पताका सर्वच ठिकाणी रोवली. आचार्यांनी वैदिक तत्त्वज्ञान व वैदिक धर्म (हिंदूधर्म) या दोहोंचेही पुनरुज्जीवन केले.

शंकराचार्यांचा मायावाद ऋग्वेदात अथवा उपनिषदग्रंथांत स्पष्टपणे मांडला नसला तरी माया या शब्दाचा अर्थ देवतेची अलौकिक शक्ती व परमात्मा, जीवात्मा हा मायाशक्तीने युक्त आहे. शंकराचार्यांनी मायावादास खंबीर पायावर उभे केले. ‘ब्र‘ह्म सत्यम् जगन्मिथ्या गीता ब्रह्मवो नापर’ यातच मायावादाचे सगळे स्वरूप ग्रंथित झाले आहे. शंकराचार्यांच्या मते, ब्रह्मच पारमार्थसत्य, सद्चित्य व आनंदस्वरूप आहे. पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब जसे सूर्यापासून निराळे नसते, तसाच अविद्येमध्ये प्रतिबिंबित झालेला आत्मा हा जीवात्मा समजला जातो.

अशा महान स्मृतीला अभिवादन करताना जगाने म्हणावे, आचार्यं देवोः भव।

एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार आणि धर्मसाम्राज्याचे संस्थापक आद्य शंकराचार्य यांची जयंती वैशाख शुद्ध पंचमीला असते. काजळी धरलेली वैदिक धर्माची ज्योत शंकराचार्यांच्या विशुद्ध आचरणाने व अफाट ग्रंथनिर्मितीमुळे पुन्हा प्रकाशमान झाली. आनंदलहरी, दक्षिणामूर्तीस्तोत्र, चर्पटपंजरी, हरिमीडे स्तोत्र, सौंदर्यलहरी ही स्तोत्रे विशेष प्रसिद्ध आहेत.

– यशवंत बागडे

‘आदीमाता’ वरून

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.