आदिवासी हलबा संस्कृती

8
132

हलबा हा समाज वेदकालीन भारतात वस्ती करून राहणारा मानतात. त्या समाजाचे कुलगोत्र विशिष्ट आहे. ती जमात सूर्याची उपासक. तो समाज मध्यप्रदेशात ‘हलबा’ तर महाराष्ट्रात ‘हलबी’ या नावाने ओळखला जातो. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती असून त्याकरता लागणारे साहित्य म्हणजे हल (नांगर) व पेरणीयोग्य बी (बीज किंवा धान्य). त्यामुळे त्या समाजाला हलबा किंवा हलबी असे नाव पडले. मात्र दुसऱ्या व्यक्तीला सन्मानाने ठाकूर संबोधण्याची प्रथा त्या समाजात प्राचीन काळापासून आहे. उदाहरणार्थ, राऊत-ठाकूर, नाईक-ठाकूर इत्यादी. ठाकूर या शब्दाचा अर्थ शस्त्र धारण करणारा किंवा लढवय्या असा होतो.

समाजाचा इतिहास शहाण्णव कुळी वंशावळीमध्ये नमूद आहे. त्या कुळी म्हणजे हलबा/हलबी समाजाची उत्पत्ती आहे. यादव राजांच्या काळात म्हैसूर प्रांतात हलबाळू नावाचा राजा राज्य करत होता. तो समाज यादवांचे राज्य मोगलांनी बुडवल्यानंतर दुर्गाडीच्या (मरीआईच्या) महामारीत आणि महादुष्काळात इतर प्रांतांत विखुरला गेला.

ते लोक तांबडा घोडा, पिवळे निशाण, सूर्य व सूर्यफूल यांची पूजा करतात; त्याचप्रमाणे ते इष्टदेवता, दुर्गा, दंतेश्वरी, चंडी, वाघदेव, डोंगरदेव, बुडादेव, चिंधादेवी, खजरी, माराई, ठाकूर देव आणि खाड्यांची (तलवार) पूजा करतात.

समाज पुरातन काळापासून गड-किल्ल्यांमध्ये वसाहत करून राहत होता. त्यांचे वंशज गड-किल्ल्यात वास्तव्यास आहेत. पूर्वीच्या काळी हलबा/हलबी समाजाचे एकूण बावीस गडांमध्ये राज्य होते. ते पुढीलप्रमाणे –

१. बडेडोंगर, २. छोटे डोंगर, ३. नारायणपूर, ४. कोलर, ५. अंतागड, ६. कुदड्यानी, ७. बासला, ८. लोहत्तर, ९. कांकेर, १०. बस्तर, ११. बंडाजी, १२. माळवाड, १३. छिंदगड, १४. भामरागड, १५. भेरमगड, १६, बिजापूर, १७. मेंगोचिरा, १८. सिंहावा, १९. बिंद्रानवात गड, २०. झाडापापडा, २१. प्रतापगड, २२. कवडूल (जयपूर). त्या किल्ल्यांमध्ये त्यांचे वंशज वास्तव्य करत आहेत.

भारतात इंग्रजांचे राज्य असताना इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिने हलबा हा अव्वल दर्ज्याचा सैनिक मानून, त्यांच्या शूरपणावर खूष होऊन समाजातील काही सरदारांना जमीनदारी बहाल केली होती. त्या जमीनदारांचे वंशज त्या त्या ठिकाणी वास्तव्य करून आहेत. जसे भंडारा जिल्ह्यातील चिजगड, खजरी, पालंदूर, घाटबोरी, बाराभाटी (कुंबीटोला) या सर्व ठिकाणी राऊत घराण्याची जमीनदारी होती, तर डव्वा येथे कुरसुंगे जमीनदारी, चांदागड सोसरी येथे प्रधान जमीनदारी, झाडपापडा येथे पवार जमीनदारी आणि पळसगाव येथे चौधरी जमीनदारी होती. त्या समाजाचा आधुनिक काळातील प्रमुख व्यवसाय शेती व पोहे कुटणे, मोलमजुरी करणे आणि रानफुले व फळे गोळा करून उपजीविका करणे हा होय.

हलबा ही जमात महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती व भंडारा या जिल्ह्यांतील मध्यप्रदेशालगतच्या दुर्गम भागात खेडोपाडी आणि मागासलेल्या डोंगराळ भागात वसलेली आहे. (त्या जातींचा कोष्टी जातींशी संबंध किंवा रोटीबेटी व्यवहार नाही. कोष्टी जात महाराष्ट्रात सर्वत्र अधिक प्रमाणात शहरी भागात आढळून येते.) हलबा/हलबी समाज हा जास्त प्रमाणात मागस भागात वसलेला आहे. त्या समाजाचा संपर्क गोंडींसारख्या इतर आदिवासींबरोबर येतो.

समाजाची ‘हलबी’ भाषा असून विदर्भात मात्र त्यांच्याकडून अशुद्ध, हिंदीमिश्रित मराठी भाषा बोलली जाते. समाजातील पुरुषांचा पोषाख धोतर, कमीज व फेटा तर स्त्रियांचा पोषाख नऊवारी लुगडी व चोळी असा आहे. काही भागांत पुरुष गुढग्यापर्यंत दोन कासोट्यांचे धोतर नेसतात किंवा लंगोटी लावतात व अंगात बारा कशाची बंडी घालतात. स्त्रिया लुगडे गुढग्यापर्यंत विशिष्ट प्रकारे नेसतात. त्याला ‘हलबीनेस’ संबोधण्यात येते. स्त्रियांनी त्या नेसात मागे मोकळा पदर (शेव) सोडलेला नसतो. समाजातील काही लोक दारिद्र्यामुळे वर्तमानकाळीही अर्धनग्न अवस्थेत असतात. ते पहाडी भागात कंदमुळे, फळे, मोहाची फुले, वास्ते (बांबूचे कोंब) खाऊन उपजीविका करतात. समाजातील जास्तीत जास्त मुले आणि मुली आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. लोक दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांना त्यांच्या कुलदैवतांची आणि खांड्याची (तलवारीची) पूजा करतात. घरात असलेल्या इतर लोखंडी अवजारांचीही पूजा केली जाते. पोळ्याच्या सणाला नांगराची आणि बैलाची पूजा करतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावाच्या शिवेवर असलेल्या मार्बत या देवीची आळवणी करत ‘इळा-पिळा-राई-रोग-ढेकूण-मोंगसा घेऊन जा गे मारबद’ असे ओरडत मार्बत देवीच्या स्थानी जाऊन तेल-हळद वाहतात. त्यामुळे गावावर कसलेही संकट येत नाही असा आदिवासी हलबा/हलबी लोकांचा समज आहे.

आदिवासी हलबा समाजाचा विश्वास नैसर्गिक बाळंतपणावर आहे. बहुतांश बाळंतपणे घरीच होतात. समाजात मूल जन्माला आल्यानंतर बाळंतपणाची बातमी ताट वाजवून बाहेरील लोकांना दिली जाते. समाजात भूतबाधा आदी प्रथांवर विश्वास असल्यामुळे बाळ आणि बाळंतीण यांना भूतबाधा होऊ नये म्हणून तेंदूची काठी दरवाज्यात आडवी ठेवतात. बाळंतपणानंतर विटाळ (सुतक) मानतात. बाळंतपणानंतर, बाळाची नाळ झडल्यानंतर जो कार्यक्रम करतात त्याला ‘सूतूक’ म्हणतात. बाळाची झडलेली नाळ बाळंतिणीच्या खोलीत पुरली जाते. ‘सुतूका’च्या दिवशी संपूर्ण घर सारवून सर्व कपडे धोब्याकडे धुतले जातात आणि न्हाव्याकरवी बाळाचे जावळ (डोक्याचे केस) काढले जाते. समाजात ‘बारसे’ हा प्रकार नाही.

व्यक्ती मरण पावल्यास तिचे प्रेत स्मशानभूमीत दफन करतात; प्रेत दहन करण्याची प्रथा नाही. मृतदेह दफन केल्यानंतर मृत व्यक्तीच्या घरी तिच्या कुटुंबीयांना इतर नातेवाईकांकडून जेवण दिले जाते. त्यास ‘कडुघाटा’ असे म्हणतात. त्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या सोयीनुसार घरापर्यंत जाण्याचा जो कार्यक्रम होतो त्यास ‘गोडघाटा’असे म्हणतात. त्या दिवशी त्यांचे सोयरे व इतर नातेवाईक यांच्याकडून पागोटे, दुपट्टे अशा भेटवस्तू व पानसुपारी दिल्या जातात. त्यानंतरच त्या घरी सोयऱ्यांचे येणेजाणे सुरू होते.

लग्नात केल्या जाणाऱ्या विधींना ‘नेंग’ किंवा ‘दस्तुर’ असे म्हणतात. आईवडील आणि नातेवाईक मुलामुलींची लग्ने परस्पर जुळवतात. त्यासाठी मुलगा व मुलगी यांची संमती घेतली जात नाही. लग्नायोग्य मुलास मोहाच्या पानाची पत्रावळ आणि डोणा (द्रोण) तयार करता येणे आवश्यक आहे. लग्न जुळल्यानंतर प्रथम मुलीस व नंतर मुलास कुंकू लावून सुपारी फोडतात, तेव्हा लग्न पक्के झाल्याचे समजले जाते. मांगणी (महाजन रोटी) हा ‘दस्तुर’ केला जातो. त्यानंतर ‘पायधुनी (साखरपुडा) पानसुपारी’ असा कार्यक्रम असतो. लग्नाच्या आदल्या दिवशी (मंडपपूजन) वरवधूंचे आईवडील व त्यांच्या घराण्याचे दोन जावई (जोडपे), निवतकार उपवास करून वरवधूंचे पाय पाखरतात (पायधेनू). उपवास करणाऱ्या जावयामार्फत मोहाच्या झाडाचे बाराबुडे आणवून त्यांची पूजा लग्नमंडपात केली जाते. त्यात लग्नाच्या मंडपाकरता जंगलातून बैलगाडीवर आणलेल्या साहित्याला ‘मांडोधूरी’ असे म्हणतात. त्यात ‘मुंडा’ हा महत्त्वाचा घटक असतो. मुंड्यावर आदिवासींचे वैशिष्ट्य दाखवणारे कोरीव काम आणि रंगकाम केले जाते. मुंडा सालई, मोवई किंवा मोह यांच्या झाडापासून तयार करतात. त्याभोवती लिंपणासाठी शेतातून तेलमाती आणून मुंड्याभोवती बोहला तयार करतात. लग्नमंडप तयार झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडे निवतकाराच्या घराजवळ असलेल्या गावदेवीच्या मंदिरात तेल-हळद चढवल्यानंतर तीच हळद नवरदेव/नवरी यांना लावतात. त्यापूर्वी धागा आणि आंब्याची पाने यांचे तोरण यांनी मंडप सजवतात. अशा प्रकारे नवरदेव/नवरी आणि मंडप यांच्या पूजनाचा कार्यक्रम होतो.

नवरदेवाची वरात बैलगाडीमधून नेली जाते. नवरदेव नवरीच्या मंडपात येण्यापूर्वी लग्नतांदूळ आणणारा लग्नतांदळ्या वरपक्षाकडील लग्नतांदूळ घेऊन येतो. तो वधुमंडपी मुंड्याला पाच फेरे पूर्ण करून लग्नतांदुळाचे गाठोडे मंडपाला खोचतो. ती नवरदेवाची वरात येत आहे याची आगाऊ सूचना असते. मुलामुलीकडील लोक त्याला जेवण घालतात. नवरदेवाची वरात प्रथमत: जानोसाघरी जाते. त्याचवेळी नवरीकडील किमान पाच सुवासिनी नवरदेवाच्या गाडीची धूर (धुरा) अडवून नारळ फोडतात. नंतरच, नवरदेव खाली उतरतो व मागणीचा कार्यक्रम होतो. त्यावेळी वरपक्षाकडील मंडळी नवरीच्या मंडपात जाऊन नवरीला कुंमकुमतिलक लावतात व हातात विड्याची पाने देतात आणि नवरीचे कपडे व दागिने त्यांच्याकडे सोपवतात. नंतर नवरदेवाकडील हळद नवरीला लावून नवरीकडील हळद नवरदेवाला लावली जाते. नवरदेव त्याची हळद लग्नमंडपाच्या दाराशी आल्यानंतर तोरणात उभा राहतो, तेव्हा नवरीचा भाऊ तलवार किंवा खांड्यांचे वार करून म्हणजेच क्षत्रियाची भावना ठेवून नवरदेवास सलामी देतो व तांदळाचा टिका देऊन बक्षिसी मिळवतो. नंतर मुलीची आई पाच महिलांसह नवरदेवाचे तोंड पाहण्याकरता येते. त्यावेळी नवरीची आई भाताच्या पिठाचा पेटता दिवा नवरदेवाच्या पायाजवळ ठेवते. नवरदेव उजव्या पायाच्या अंगठ्याने दिवा विझवतो. त्यानंतर पाय धुऊन व टिका देऊन नवरदेवास लग्नमंडपी आणले जाते. दरम्यान, नवरदेवाजवळील हातपंखा (इंजना), नवरीची बहीण हिसकावून पळवून नेते. नंतर लग्नतांदळाचे गाठोडे सोडून मुलीची भांग शेंदराने भासऱ्याकरवी (नवरदेवाचा मोठा भाऊ) भरली जाते. नवरा-नवरीस समोरासमोर उभे करून मध्ये आंतरपाट धरला जातो. पाच मंगलाष्टके म्हणून लग्न लावले जाते. त्यात ब्राह्मण नसतो. मात्र भाल्याची (न्हावी) उपस्थिती आवश्यक आहे. त्यानंतर ‘ढेड्याचा नेंग’ केला जातो. त्यात नवरदेव व नवरी, दोघांनाही मुंड्याभोवती पाच वेळा फिरवले जाते. प्रसंगी गुलाल, रंग व हळद यांचा उपयोग एकमेकांच्या चेहऱ्यास लावण्यासाठी केला जातो व दोघांनाही आंघोळ घालून ‘चिखलरोंडीचा’ कार्यक्रम पूर्ण केला जातो.

वरात नवरदेवाच्या घरी परत येण्यापूर्वी नवरीचा मामा पेटता लामणदिवा घेऊन, वरमंडपी मुंड्याला पाच फेरे मारून दिवा मंडपाला खोचतो. त्यानंतरच वर-वधू मंडपात येतात. त्यापूर्वी नवरदेवाचा मामा दांडपट्टा फिरवून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतो. वर मंडपात येऊन बाणाने वडे छेदतो व घरातील कुलदेवतांचे दर्शन घेतो. हलबा/हलबी समाजात हुंडापद्धत नाही. उलट, वरपक्ष वधुपित्यास ऐपतीनुसार देज (दहेज) देतो. देज फक्त धान्य स्वरूपात दिली जाते. लग्नसमारंभात प्रत्येक दस्तूर पार पाडताना त्याला अनुसरून गाणी गायली जातात. उदाहरणार्थ,

“झिमूर झिमूर पाणी पडेवा | सिरपूर गावच्या मैदानी |
तेथी का आखरी बारी दुबारी | तेथे डाय चरे बोंडागाय |
बहुला गायीचा शेण | आम्ही आणिला गो बाळा |
आम्ही करू सडासारवण ||
सानगडी शहरी लाला | कोष्ट्याचा मैतर |
तेथे का निपजे धोतराची जोड | बापाचा लाडका धोतर पैराव |
माय यावे बाप यावे | तेल हळद चळावे |
बहिण यावे भाऊ यावे | तेल हळद चळावे ||”

नवरदेवाची आई लग्नात कधीही सहभागी होत नाही. समाजात कुळाप्रमाणे प्रत्येक कुळाचे वेगवेगळे देव आहेत. जसे राऊत सहा देवे, गावराणे सात देवे, मानकर पाच देवे, मलये सात देवे. समाजात कुलगोत्र मानले जाते. जसे मानकर-कुरसंगे, लटये-राणे-वडगये, चवारे-मेंडके- घासले-भोगारे-वाडई या कुलगोत्रांमध्ये सोयरीक संबंध होत नाहीत. तसेच, दुधाचे नाते असलेले लग्नसंबंध जुळत नाहीत.

हरिश्चंद्र ओझा यांच्या मतानुसार, ‘छत्तीसगड विभागात हलबी भाषा बोलली जाते. ती भाषा कोष्टी भाषेशी मुळीच जुळत नाही. दोन्ही भाषांचा परस्परांचा काहीही संबंध नाही.’ मानववंश संस्कृतितज्ज्ञ डॉ. ग्रियर्सन यांनी हलबा/हलबी जमातीचा आणि हलबी भाषेचा व संस्कृतीचा अभ्यास करून हलबा/हलबी ही प्राचीन आदिवासी जमात आहे असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे रसेल यांच्या ‘ट्राईब अँड कास्ट ऑफ दि सेंट्रल प्रोव्हिन्सेंस ऑफ इंडिया’ या पुस्तकात हलबा/हलबी संबधी सविस्तर माहिती (पान क्रमांक १९२) दिलेली आहे.

त्या समाजाचे स्वतंत्र भाट असून ते पांढरी (गोंगले, जिल्हा भंडारा) येथे राहतात. भाटांच्या पोथ्यांमध्ये आदिवासी हलबा/हलबी समाजातील सर्व कुळांची वंशावळ दिलेली आहे.

– यशवंत मलये

About Post Author

8 COMMENTS

 1. विदर्भातील हलबा विषयी ज्याना…
  विदर्भातील हलबा विषयी ज्याना हलबा कोष्टी संबोधन्यात येते. जेंव्हां की ते कोष्टी नाही. कोष्टी ही कोणतीच जात नसुन ती व्यवसायी दृष्टीकोणातूण आलेली आहे. आपण जी आदिवासी हलबा संस्कृती बद्ल जी माहिती दिली आहे ती अगदी त्याच्यांशी जुळते आजही बहुतांशकडे गावोगावीं शेेती व्यवच्यांशी.आपले मत प्रदर्शित करा.

 2. विदर्भातील हलबा विषयी ज्याना…
  विदर्भातील हलबा विषयी ज्याना हलबा कोष्टी संबोधन्यात येते. जेंव्हां की ते कोष्टी नाही. कोष्टी ही कोणतीच जात नसुन ती व्यवसायी दृष्टीकोणातूण आलेली आहे. आपण जी आदिवासी हलबा संस्कृती बद्ल जी माहिती दिली आहे ती अगदी त्याच्यांशी जुळते आजही बहुतांशकडे गावोगावीं शेेती व्यवसायांशी आहे.आपले मत प्रदर्शित करा.

 3. दुल्हा देव बद्दल माहिती…
  दुल्हा देव बद्दल माहिती असल्यास ती सविस्तारपणे कळवा

 4. महाराष्ट्रातील कोष्टी…
  महाराष्ट्रातील कोष्टी समाजाशी हलबा आदिवासींचा संबंध नाही असे आपण जे लिहिले आहे ते अर्धसत्य आहे. रसेल यांच्या संशोधनात “हलबानी विणकरिचा व्यवसाय स्वीकारला आणि ते तेथील कोष्टी समाजात मिसळले व आपली जुनी ओळख विसरले” असे स्पष्ट लिहिले आहे. याबाबत आपण काहीही मत व्यक्त केले नाही. विदर्भातील जे कोष्टी स्वतःला हलबा म्हणवून घेतात, ज्यांना हलबा कोष्टी असे ओळखण्यात येते ते हलबा आहेत किंवा नाही हा मुद्दा बाजूला ठेवा…परंतु रसेल म्हणतो त्याप्रमाणे ज्या हलबानी विणकरिचा व्यवसाय केला व जे कोष्टी समाजात मिसळून स्वतःची जुनी ओळख विसरले त्यांचे संशोधन करणे व त्यांना त्यांचे संवैधानिक हक्क मिळवून देणे ह्या गोष्टी तर करू शकता !!!

 5. समाजातील प्रत्येक व्यक्ती…
  समाजातील प्रत्येक व्यक्ती साठी माहिती आवश्यक आहे उत्कृष्ट लेखन केल्या बद्दल लेखकाचे धन्यवाद.

 6. विदर्भात विशेषतः पुर्वीचा…
  विदर्भात विशेषतः पुर्वीचा बेरार सध्याचा अमरावती महसूल विभाग हा प्राचीन हलबी आदिवासी यांचे ठिकाण आहे. भारतीय जनगणना ( बेरार प्रांत ) 1881 मध्ये हलबी लोकसंख्या 2205 आहे. 1891 मध्ये 2841 आणि 1901 मध्ये 3131 अशी आहे.
  भारत सरकारने भारतातील हलबा, हलबी आणि हलाबा हे त्या त्या भागात हलबा गटात मोडतात अशी लोकसंख्या Census of India – 1901 मध्ये एकत्र केलेली आहे.
  Page no. 285
  Halba ( Halbi, Halala )= 90131

  Page no 326

  Andhman – 00002
  Bombay. -00036
  Berar. – o3131
  C P. – 86962
  Total -. 90131

  Page no – 558

  Halba 86962 Central provinces
  Halbi. 3131 Berar

  महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे अधिनिस्त असलेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी सन 1881 ते 1931 या स्वातंत्र्य पुर्व जनगणनेतील आणि महसूल विभागाच्या अभिलेख्यात स्पष्टपणे हलबी अशी नोंद आहे. अशा अनुसूचित जमातीच्या नागरिकांना अनुसूचित जमातीच्या सवलतीपासुन दुर ठेवण्यासाठी हलबी या जमातीचा संशोधनात्मक अहवाल केलाच नाही आणि अनुसूचित जमातीच्या सवलती नाकारण्यासाठी हलबी अनुसूचित जमातीचे असलेले आडनावे हलबा कोष्टी यांची नमूद करून अहवाल केले आहेत.

  अमरावती महसूल विभागात सुर्यवंशी हलबा ठाकूर या नावाची बिगर अनुसूचित जमात वास्तव्यास आहे. या लोकांच्या जनगणना या 1881 पासून ते 1931 या सहा दशकाचे जनगतनेत रजपूत लोकसंंखेत समावेश करण्यात आला आहे. या बिगर आदिवासी गटाचे लोकांच्या शालेय व महसुली नोंदी मध्ये हलभी अशा नोंदी आहेत. हलभी ही अनुसूचित जमात नाही. मात्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती यांनी चिरीमिरी घेऊन अनेकांना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्रे दिलेली आहेत.
  महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडे तक्रारी करून काही दखल घेतली जात नाही. याचे मुख्य कारण आदिवासी विकास विभागाचे सचिव पासून सर्व उपसचिव, अवर सचिव, आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे हे सर्व लबाडीचा खेळ खेळत आहेत.

  आदिवासी विकास विभागाचे उपसचिव श्री लक्ष्मीकांत गो ढोके यांनी तर सर्वोच्च न्यायालयात हलबी ही कोष्टी जातीची उपजात आहे आणि तिचा समावेश महाराष्ट्र शासनाने विशेष मागास प्रवर्गात केला आहे असे नमूद करून खोटे प्रतिज्ञापत्र करून बनावट यादी करून न्यायालयात सादर केली आहे.

 7. Halba samajacha itihas…
  Halba samajacha itihas shahannav kuli vanshavali madhe namud aahe tar ti shahannav kuli vanshavalichi prat kiva mahiti kiva tyachi prat kuthun midel yachi mahiti sangavi.

 8. Halba samajacha itihas…
  Halba samajacha itihas shahannav kuli vanshavali madhe namud aahe tar ti shahannav kuli vanshavalichi prat kiva mahiti kiva tyachi prat kuthun midel yachi mahiti sangavi.

Comments are closed.