Home साहित्य पुस्‍तक परिचय आठवणीतील पाऊले – दिशादर्शी साठवणी

आठवणीतील पाऊले – दिशादर्शी साठवणी

carasole

मो.शि. (उर्फ बापुसाहेब) रेगे यांच्या (‘आठवणीतील पाऊले’) या पुस्तकात त्यांनी वयाच्या परिपक्व थांब्यावर गतकाळच्या आठवणी जागवल्या आहेत. या आहेत आठवणी, सुजन मनानं जागवलेल्या.

आठवणींचे केंद्रबिंदू आहेत दादासाहेब रेगे. कारण त्यांच्या संस्कारांतून बापुसाहेब घडले, वाढले, वागले. महत्त्वाचे अन्य घटक म्हणजे, स्वत:चे व्यक्तिमत्त्व असलेली ‘बालमोहन’ शाळा, शिक्षक आणि मुलं.

हा ग्रंथ म्हणजे शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा इतिहास आहे; संस्कारांची महती सांगणारा हितोपदेश आहे, विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिशा देणारी मनकथा आहे. बापुसाहेब रेगे म्हणतात, ‘मी शिक्षणसेवा आणि बालसेवा यांचे व्रत घेतले.’ त्याचे प्रत्यंतर पुस्तकाच्या पानापानातून येतं. सव्वातीनशे पानांच्या पुस्तकांतील दोनशे अठ्ठयाहत्तर पाने त्याची प्रचिती देतात. पुढची पाने व्यक्तिगत नातेसंबंधातली, सन्मान-गौरव यांचा कृतज्ञ उल्लेख करणारी वगैरे आहेत पण त्यातही शिक्षकांनी त्यांच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या भावना उद्धृत करण्यासारख्या आहेत.

उपमुख्याध्यापिका त्यांच्या मनोगतात म्हणतात –

“आपल्या स्वभावाला एक
सौजन्यशीलतेची किनार आहे
आपल्या तत्त्वांना एक धार आहे.
आपल्या अनुभवसंपन्न विचारांना
दूरदृष्टीची जोड आहे.
सर्वाप्रती आस्था, आत्मीयता
हे आपल्या वृत्तीचे एक वैशिष्ट्य आहे”…

या मनोगतातून शिक्षक-प्राचार्य यांचे नातेसंबंध स्पष्ट होतातच शिवाय हेही लक्षात येते, की दादासाहेब असताना बापूसाहेब त्यांचे बोट धरून चालले खरे, पण त्यानंतरही त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे बोट त्यांनी सोडले नाही.

बालवयातल्या आठवणी जागवताना त्यांनी लिहिलेले वाक्य लक्षात घेण्यासारखे आहे. जेवावे कसे हे दादांनी त्यांना शिकवले. त्यावर ते लिहितात, ‘त्यांचे अनुकरण मी श्रद्धेने आणि निष्ठेने करी’ आणि पुढे उदाहरण देतात ते छडीचे. दादांजवळ ते छडीची मागणी करतात. स्वत:चे वर्चस्व दाखवणारी छडी न देता दादा त्यांना ज्ञानाचं बीजारोपण करणारा खडू-फळा देतात. आणि आठवणीत रमलेले बापुसाहेब म्हणतात, ‘त्या खडूचा स्पर्श मला आजही जाणवतो…’

बालमोहन कशी सुरु झाली याचे साद्यंत वर्णन पुस्तकात आहे. एका शाळेचा आकार घेण्याचा तो काळ आणि तो आकार देणारे हात या दोन्हीही गोष्टी, नवीन उपक्रम हाती घेणाऱ्यांना दीपस्तंभासारख्या वाटतील. मध्ये मध्ये येणारे व्यक्तिगत संदर्भ बाजूला ठेवून वाचत गेल्यास ‘बालमोहन’चा पूर्ण इतिहास-घडणें, विस्तार पावणे, आकार घेणे – लक्षात येईल.

ग्रंथातील ‘शिक्षक शिबीर’चा पूर्ण भाग प्रत्येक शिक्षकानं आणि शिक्षणसंस्थेच्या चालकांनी मनन करण्याजोगा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षकाची लक्षणे त्यांनी चौदा प्रकारची सांगितली आहेत. अध्यापन कौशल्य, व्यासंग वगैरेच्या सूचना देत त्यांनी अनेक महत्त्वाच्या अंगांचा उल्लेख केला आहे. त्यातला शिक्षक कसा असावा या संबंधीच्या मतांकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.

• शिक्षक कसा असावा?
• शिक्षक मनाने निरोगी असावा.
• तो खिलाडूवृत्तीचा असावा.
• त्याच्या मनात विद्यार्थ्यांबद्दल अपार सहानुभूती असावी.
• त्याला उत्तम विनोदबुद्धी असावी.
• तो आशावादी असावा.
• शिक्षणाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन शास्त्रीय असावा.
• स्वत:च्या पेशावर त्याची निष्ठा असावी.
• तो नेहमी विद्यार्थी असावा.
• त्याच्या कार्यात संशोधनाची बैठक असावी.

‘बालमोहन’ने सुरु केलेल्या योजना, नव्या प्रथा, विविध उपक्रम यांची तपशीलवार नोंद पुस्तकात आढळते. बापुसाहेबांचे व्यक्तिगत अनुभव तर आहेतच, पण त्यांनी बारकाईने अभ्यास करुन केलेल्या नोंदी एका शिक्षणसंस्थेचा इतिहास म्हणून दखलपात्र आहेत.

बापुसाहेब रेगे म्हेणतात, की या पुस्त्काचे नाव ‘आठवणीतील पाऊले’ हे ठेवण्याामागचा उद्देश असा, की मी माझ्या इच्छाापूर्तीसाठी त्या  वाटेने गेलो. त्या वाटेवर माझ्या पावलांचे ठसे उमटले. ते ठसे लोकांच्याे किंवा प्रसंगांच्या् रूपाने माझ्या ह्दयात घर करून बसले. त्याला मी अभिव्याक्ती चे स्वररूप दिलेले आहे. मी त्यां पायवाटेत असलेले दगडधोंडे, काटे हळूच काढतो, बाहेर फेकून देतो. तिथे फक्तं सकारात्मक आठवणींचाच भाग आहे. ते आत्चाटेरित्र नव्हे, त्या साठलेल्या आठवणी आहेत.

पुस्तकातील  ‘मूल्यशिक्षण विचार’ (पान २५६), बालदिनाची प्रतिज्ञा (पान २७५), ‘एक जबरदस्त हादरा, इमारतीला!’ (पाने २८०) वगैरे मजकूर मुळातूनच वाचायला, अभ्यासायला हवा.

मी परदेशात गेले असता तिथे भेटलेल्या भारतीयांनी ‘बालमोहन’च्या अनेक आठवणी गहिवरून जागवल्या. त्यात दादासाहेबांचा उल्लेख हमखास असायचा. बापुसाहेबांविषयी आदरभाव व्यक्त व्हायचा.

ग्रंथ वाचना त्या भावनांमागचा कार्यकारणभाव उलगडला. ‘बालमोहन’ने विद्यार्थी कसे घडवले, उत्तम नागरिक करण्याचे संस्कार कसे केले, हे या पुस्तकाचे वाचन करताना लक्षात आले. असे शेकडो विद्यार्थी घडवण्यामागे ‘बालमोहन’चे संस्थापक दादासाहेब रेगे आणि संवर्धक डॉ. मो.शि. तथा बापुसाहेब रेगे आण त्यांचे समर्थ शिक्षक यांचे योगदान किती मोठे आहे हे जाणवते.

आठवणीतील पावले
डॉ. मो.शि. तथा बापुसाहेब रेगे.
पृष्ठे ३२५, मूल्य ३०० रुपये

About Post Author

1 COMMENT

  1. बालमोहन आणि रेगे यांच्या एका
    बालमोहन आणि रेगे यांच्या एका चपखल जमलेल्या नात्याची साद्यंत माहिती कळण्यासाठी पुस्तक लवकरात लवकर विकत घेतलेच पाहिजे. धन्यवाद.

Comments are closed.

Exit mobile version