पूर्वी असलेल्या बेटांवर सरंक्षणासाठी किल्ले बांधलेले होते. तशा आठ-नऊ किल्यांच्या नोंदी आढळतात. त्यामधील काही किल्ल्यांचे अस्तित्व पूर्ण नाहीसे झाले आहे तर काही कसेबसे तग धरून आहेत. तशा किल्ल्यांपैकी एक म्हणजे धारावीचा किल्ला होय. धारावीच्या किल्ल्याचे मूळ नाव रिवा (RIWA). मात्र धारावी परिसरात असल्यामुळे तो मुख्यत्वेकरून धारावीचा किल्ला म्हणूनच ओळखला जातो. त्या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात झाले असल्याने त्यास ‘काळा किल्ला’ असेही संबोधले जाते. तिथे त्या नावाचा बसस्टॉपदेखील आहे.
काळा किल्ला अनोखा आहे. तो भुईकोट किल्ला असून त्याचा आकार त्रिकोणी आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला दरवाजा नाही. शिडीवरून तटबंदीवर चढायचे आणि आत उतरायचे. आत उतरण्यासाठी मात्र पाय-या बांधल्या आहेत. किल्ल्याचा आतील भाग कच-याने भरलेला आहे. त्यातून प्रवेशद्वार आणि जीना यांचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या अस्तित्वात असलेल्या अवशेषांत काळ्या दगडात बांधलेली किल्ल्याची भिंत आणि त्यावरील किल्ला १७३७ साली बांधल्याची माहिती देणारा दगडी शिलालेख यांचा समावेश होतो. शिलालेखावर ‘Built By Order of the Honorable Horn Esq. President and Governor of Bombay in 1737’ असा मजकूर कोरण्यात आला आहे. त्याखाली ‘इंजिनीयर’ या नावाने स्वाक्षरी आढळते. शिलालेख किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरील बाजूस आहे. किल्ल्यावर एक भुयार आढळते. ते भुयार सायनच्या किल्ल्यापर्यंत जात असल्याची वदंता आहे.
धारावीच्या जगप्रसिद्ध झोपडपट्टीचा विस्तार किल्ल्याच्या भोवतीही वाढलेला असल्यामुळे किल्ल्यापर्यंत पोचणे अवघड झालेले आहे. किल्ल्याच्या अठरा-वीस फूट उंचीच्या तटबंदीवर झाडीही वाढू लागली आहे. त्या झाडांच्या मुळांनी तटबंदीला मोठी हानी पोचत आहे. काळा किल्ल्याची तटबंदी एकदा का ढासळली तर परिसरातील झोपडपट्टी किल्ल्याचा केव्हा घास घेईल हे कळणारही नाही.
(आधार – प्रमोद मांडे यांनी ‘महान्यूज’मध्ये लिहिलेला लेख.)