आजची वाचनसंस्कृती

0
33
_Aajchi_Vachansanskruti_1.jpg

‘साहित्य अकादमी’ला चौसष्ट वर्षें पूर्ण झाली (संस्थेची स्थापना 12 मार्च 1954). त्या निमित्ताने अकादमीने रामदास भटकळ यांचे ‘आजची वाचनसंस्कृती’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ते व्याख्यान ‘साहित्य अकादमी’च्या तळघरातील सभागृहात होते. सभागृहात अठरा- वीस जण उपस्थित होते. तेथे मराठीसह इतर काही भाषांची आणि लेखकांची विविध पुस्तके यांचे प्रदर्शन भरवले गेले होते. रामदास भटकळ यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांच्या बोलण्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा स्वाभाविक जाणवतो. त्यांनी त्यांचे व्याख्यान साहित्यक्षेत्रातील काम आणि वैयक्तिक जीवनातील अनुभव या गोष्टींच्या आधारे दिले.

भटकळ यांनी ते महाविद्यालयात असताना, राघवन अय्यर या गांधी विचारवंतांचे भाषण ऐकले होते. त्यात अय्यर असे म्हणाले, “वाचन करताना नुसते वाचन केले जाते, की त्या वाचनाचा परिणाम होतो ते पाहिले पाहिजे.” त्यानुसार त्यांनी ते विचार अनुसरले. त्यामुळे भटकळ यांना वाचन संस्कृतीबद्दल वाचन केल्यानंतर त्यावर विचार करण्यास हवा. वेळ घालवण्यासाठी म्हणून नुसते वाचन करणे म्हणजे वाचन संस्कृती जोपासणे नव्हे असे वाटते.

सध्या इबुकचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्याचा ग्रंथव्यवहारावर (छापील) होणाऱ्या परिणामांबाबत बोलताना भटकळ म्हणाले, की ज्ञान कोणत्या स्वरूपात लोकांपर्यंत आले यापेक्षा त्याचे माध्यम बदलताना त्यातील विचार बदलत नाहीत ना या गोष्टीकडे लक्ष दिले गेले पाहिजे. ज्ञानाचा प्रसार होणे महत्त्वाचे आहे. त्यांनी ऑनलाईन साहित्य प्रसारातील धोके सांगितले, की ‘व्हॉटस् अॅपवर किंवा अन्य सोशल मीडियावर संवाद साधताना नवीन भाषेचा/लिपीचा- छोटे-छोटे शब्द (short forms) करून मेसेज पाठवणे, म्हणून अर्थ समजत नाही. त्यामुळे नवी विचारप्रवृत्ती आणि वाचनप्रवृत्ती यांचा उदय होत आहे असे जाणवते.

सध्याचे वाढते लेखन पाहता, त्यांना नवीन येणाऱ्या लेखनाची काळजी वाटते. भटकळ यांच्या मते, सध्या कविता करण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, लोक ललित लेखनही करतात. असे लेख व्हॉटस् अॅपवर सर्रास बघण्यास मिळतात. त्यामुळे ललित लेखन करण्यापेक्षा समकालीन लेखन व्हावे असे त्यांना वाटते. त्याबाबतीत उदाहरण म्हणून त्यांनी कुमार भावे यांचे नाव सांगितले.

प्रिंट मीडिया बाबतीत बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्रात प्रिंट मीडिया समृद्ध आहे. त्याच्या उदाहरणादाखल, टीव्हीवर, इंटरनेटवर बातम्या पाहण्यास आणि वाचण्यास मिळतात, तरी वर्तमानपत्रांचा खप वाढतच आहे असे त्यांनी सांगितले. त्यालाच दुजोरा देताना ते म्हणाले, की पूर्वी घराच्या मांडणीमध्ये आठवड्याभराची वर्तमानपत्रे मावत असतील तर आता तेथे फक्त तीन ते चार दिवसांची वर्तमानपत्रे मावतात, इतकी वर्तमानपत्रांची पाने वाढली आहेत!

इबुकचे प्रमाण जरी वाढले असले, तरी छापील पुस्तके विकत घेऊन वाचणारा वाचक वर्ग मोठा आहे असे मत मांडताना, उदाहरणादाखल ते म्हणाले, की सिनेमे ऑनलाईन पाहता येतात. तरी थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची मज्जा वेगळी असते. अगदी तसेच पुस्तकांच्या बाबतीत आहे.

शालेय शिक्षण हे मातृभाषेत असण्यास हवे, म्हणजे मुलांना ज्ञान व्यवस्थित मिळेल आणि मुले चुकीचे इंग्रजीही शिकणार नाहीत. त्याबाबतीत गांधीजींच्या जीवनातील उदाहरण देताना ते म्हणाले, की गांधीजींच्या आश्रमात दोन तमिळ मुले होती. त्या मुलांना शिक्षण देण्यासाठी गांधीजी स्वत: तमिळ शिकले. भटकळ यांनी दुसरे समकालीन उदाहरण दिले ते मेधा पाटकर यांचे- त्या आदिवासी मुलांना त्यांच्या बोलीभाषेत शिकवतात. साहित्यसंमेलनात पुस्तकांची विक्री होते. त्यावरून वाचनसंस्कृती ठरवायची का यावर बोलताना ते म्हणाले, की “पुस्तकांची विक्री आणि वाचनसंस्कृती यांचा काही संबंध नाही. साहित्यसंमेलनात कोट्यवधी रुपयांची पुस्तके विकली जातात. जर तसे असेल तर, माझ्या ‘प्रकाशना’ची निदान सरासरी पुस्तके तरी विकली जाण्यास हवीत!” भटकळ यांना ते आकडे अविश्वसनीय वाटतात.

राजकारण आणि क्रिकेट या दोन गोष्टींनी संस्कृतीवर आघात केला आहे असे ते म्हणाले.

भारतीय संस्कृतीमध्ये कर्तृत्ववान व्यक्तींना देव मानण्याची प्रथा रूढ झाली आहे. त्यामुळे प्रसिद्ध लेखकाने लेखनात चुका केल्या असतील, तर त्या शोधाव्यात असा प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे उपलब्ध सर्व साहित्य हे छाननी करून अभ्यासावे ही जाणीवच नष्ट झाली आहे. त्याकरता पुस्तकांच्या समीक्षणांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हावे. त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व व्यक्तींना त्यांची मते त्या पुस्तकावर मांडण्यास द्यावी. मी ‘यशवंतराव चव्हाण विद्यापीठा’मध्ये पुस्तक समीक्षणाचा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा तेथे विविध ठिकाणांहून पन्नास व्यक्ती स्वखर्चाने आल्या होत्या. त्या सर्व पन्नास व्यक्तींनी त्यांची पुस्तकाबाबत मते मोकळेपणाने मांडली.

वाचनसंस्कृतीमध्ये व्यक्तीच्या परिचयातील किंवा भाषेतील लेखकांचा विचार नसावा, त्याकरता वेगवेगळ्या भाषांतील लेखन करणा-या व्यक्ती पाहण्यास हव्यात. कारण प्रत्येक लेखकाला त्याच्या भाषेत विचार मांडणे सोयीस्कर असते. त्यामुळे त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या भाषांतील लेखकांचे लेखन पाहावे.

नवीन लेखकांनी साहित्याच्या बाबतीत धोके आणि संधी ओळखाव्या आणि जुने उत्तम लेखन पुढे न्यावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी खाद्यसंस्कृतीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, जसे खाद्यसंस्कृती ही पिठल्यापासून पिझ्झापर्यंत बदलली. तसेच लेखनाच्या बाबतीत होऊ शकते. म्हणून उत्तम लेखन पुढे न्यावे.

लेखन करताना विचारस्वातंत्र्य असावे, असे त्यांचे मत आहे. ‘लेखन करताना कोणाला वाईट वाटेल? लोक पसंत करतील का? असे विचार करून लेखन करणे चुकीचे आहे. लेखकाला वाटणारी अशी बंधने म्हणजे विचारस्वातंत्र्यावर बाधा आहे.’

मराठी भाषेबद्दल त्यांना प्रेक्षकांमधून एका व्यक्तीने प्रश्न विचारला, की मराठी कोठेतरी मागे राहिली आहे का? त्याबाबतीत ते म्हणाले, की त्यांचा मराठी-मराठी या धोरणाला विरोध आहे. भाषेमध्ये विविध शब्द समाविष्ट झाले, की भाषा समृद्ध होते. तेच मराठीच्या बाबतीत होत आहे. दिवसाची सुरुवात करताना त्यांच्या घरात न्याहारी हा शब्द कोणी उच्चारत नाही. त्यासाठी नाश्ता हाच शब्द उच्चारला जातो. कोणी ‘ब्रेकफास्ट’ असा इंग्रजी शब्दही वापरत नाही. नाश्ता हा शब्द उच्चारण्यास सोयीस्कर असल्याने तो मराठी भाषेत अप्रत्यक्ष समाविष्ट झाला आहे. त्याबाबतीत त्यांनी अत्रे यांच्या ‘दिनूचे बिल’ या कथेचे उदाहरण दिले. अत्रे यांनी त्या कथेत ‘बिल’ हा शब्द वापरला आहे. त्यावरून भाषा रुळते; ती मुद्दाम रुळवण्याचा विषय येथे नाही. त्यामुळे कोणत्या भाषेचा कोणत्या भाषेवर अन्याय होतो अशी काही गोष्ट नाही. त्यांनी त्यांचे भाषेबद्दल असे मत व्यक्त केले.

भटकळ यांनी आजच्या वाचनसंस्कृतीमधील माध्यम, भाषा, साहित्यसंमेलन अशा विविध विषयांवर भाष्य केले. त्यातून वाचनसंस्कृतीचे विविध पैलू समजले. त्यामुळे वाचनसंस्कृतीची जुनी स्थिती आणि सद्य स्थिती यांतील फरक कळला. त्यांनी सोशल मीडियामुळे उदयास येणाऱ्या नवी लिपी/भाषा/विचार या बाबींकडे लक्ष वेधले. त्यांच्या व्याख्यानातून प्रिंट मीडियाच्या सध्याच्या सकारात्मक अस्तित्वाची जाणीव झाली.

– विकास ठाकरे

About Post Author