आगरी साहित्यातील समाजदर्शन

1
91

पेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता, आगरी बोलीत कथा, कादंबरी, कविता, ललित, आत्मचरित्र असे विविधांगी लेखन जोमाने केले जात आहे. आगरी साहित्यिकांनी आगरी बोलीचे नवे भावविश्व मराठी सारस्वताला दाखवले आहे; नवा अनुभव त्यामुळे रूजू झाला आहे. दुसऱ्या टोकाला, मराठीतील नामवंत समीक्षक म.सु. पाटील यांचे ‘लांबा उगवे आगरी’ हे आत्मचरित्रच आहे. त्यातून आगरी समाजजीवनाचे दर्शन घडते. पाटील यांच्या दुसऱ्या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार लाभल्याने आगरी लेखकांनाच प्रतिष्ठा लाभण्यासारखे वाटले. 

आगरी ही मराठीची नादमधुर बोली आहे. आगरी समाज ठाणे-रायगड जिल्ह्यांतील खारेपाटात (खाड्यांच्या टापूत) समुद्रकिनारी वसलेला आहे. नव्याने शिक्षित झालेले आगरी समाजातील लेखक त्यांचे भावविश्व, त्यांच्या वेदना-संवेदना शब्दात साकारू लागले आहेत. ‘सेझ’सारखी कादंबरी हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ती कादंबरी आगरी समाजासमोरील अनेक प्रश्न मांडते. आगरी लोकांच्या जमिनी औद्योगिकीकरण, विविध विकास प्रकल्प, शहरीकरण यांमुळे विक्रीस निघत आहे. त्यांच्या हाती गरजेपेक्षा जास्त पैसा येत आहे. आर्थिक समृद्धीमुळे घरोघरी येणाऱ्या पैशांच्या ओघात भावाभावांचे, आईबापांचे, मुलांचे, भावाबहिणीचे नातेसंबंध दुरावत आहेत. पैसा विनाश घेऊन येतो असे म्हणतात, तशी काहीशी अवस्था ही आहे. श्रद्धा-अंधश्रद्धा, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक विषमता, संघर्ष, राजकीय-आर्थिक शोषण यांमुळे नातेसंबंधातील तणाव, ग्रामव्यवस्थेचा कोसळणारा डोलारा, पुढील पिढीस जगण्यास आधार उरणार नाही. हे सारे चित्रण भेदक पद्धतीने त्या कादंबरीत येते.

अविनाश पाटील यांची ‘वस्ती नसलेले गाव’, वासंती ठाकूर यांची ‘ऊफल्या’, अनंत पाटील यांची ‘रायता’, ‘ठेपली’, ‘चावरे फुय’ व ‘तांदळाची भाकर’, इत्यादी कादंबऱ्यांतील आगरी समाजसंस्कृतीच्या दर्शनाने त्यांच्या जीवनाचे वेगळेपण सिद्ध केले. वैकुंठनाथ डंगर (दादर) यांची ‘कॉलेजीनी’ (1975), मुरलीधर म्हात्रे यांच्या ‘प्रेमकहाणी’ (1984) व ‘कलंकिनी’ (1990), परेन जांभळे यांची ‘जोडाक्षरे’ (2007), गजानन म्हात्रे यांची लिंगबदलासारखा वेगळा विषय घेऊन वैद्यकीय चमत्कार हाताळणारी कादंबरी – ‘तिची बायको’ (2008), अविनाश पाटील यांची कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरील कादंबरी – ‘दर्यादौलत’ (2008) या काही कादंबऱ्या जरी आगरी लेखकांच्या असल्या तरी त्या आगरी बोलीत नाहीत.

‘वस्ती नसलेले गाव’ (2004) ही कादंबरी आगरी लोकसंस्कृतीचे वास्तव दर्शन घडवणारी आहे. अविनाश पाटील यांनी खारेपाटातील आगरी समाज समुद्रात बुडी मारून वाळूचा व्यवसाय करणारा मचवेकरी चितारून वेगळे विश्व मराठी साहित्यात आणले आहे. आगरी बोलीचे गोड मोहक रूपही तीमध्ये अनुभवण्यास मिळते. कादंबरीच्या प्रस्तावनेत अर्जुन घरत म्हणतात, की देशात स्वातंत्र्याची पहाट नव आशाआकांक्षा घेऊन आली, परंतु प्रगतीची किरणे हजारो लोकांपर्यंत पोचली नव्हती. खेड्यातील, वस्तीतील, डोंगरकपारीतील, करोडो लोक किरणांची वाट पाहत आहेत. ते प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. पाण्यासाठी सार्वजनिक तलाव (जो माणसासाठी व जनावरांसाठी एकच आहे), शिक्षणाच्या सोयी इत्यादीसाठी वर्षानुवर्षें वाट पाहत आहेत. देव्हार गावाच्या उद्ध्वस्त जीवनाची कथा म्हणजेच ही कादंबरी – ‘वस्ती नसलेले गाव’ (पृष्ठ 3).

‘ऊफल्या’ (2005) ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात लेखन करणारी जी लेखक मंडळी आहेत त्यात उरणच्या ज्येष्ठ लेखिका वासंती ठाकूर यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. त्यांनी ‘ऊफल्या’ ही लघुकादंबरी साकारली आहे. आधुनिकीकरणाचे ग्रामसंस्कृतीवर अतिक्रमण होत आहे. शहरांच्या सान्निध्यातील गावांचा चेहरामोहरा त्यामुळे बदलला आहे. प्राचीन परंपरा, रीतिरिवाज काळाच्या ओघात अस्तंगत होत आहेत. एकूण मानसिकताच नव्हे तर ग्रामीण जीवनातील अनेक चांगल्या गोष्टी नष्ट होऊन आधुनिकतेच्या नावाखाली नव्या अनिष्ट गोष्टी ग्रामजीवनाला ग्रासू पाहत आहेत. भूमिपुत्रांना नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘ऊफल्या’ची निर्मिती जे.एन.पी.टी.च्या प्रकल्पाची लागलेली झळ जाणवून झाली आहे. त्यांनी प्रकल्पग्रस्त समाजजीवनाची कथा व व्यथा मांडण्यासाठी कादंबरी या वाङ्मयप्रकाराचे योग्य असे माध्यम निवडले. मात्र, त्यांनी कादंबरीला आवश्यक असा विशालपट लेखकासमोर असताना त्या विषयावर लघुकादंबरीत संक्षिप्तपणे विवरण केले आहे.

रायता चावरे यांच्या ‘फुय’, ‘ढेपली’ या कादंबऱ्यांमध्ये स्त्रीजीवनाची स्पंदने, आंदोलने – त्यातून तडफेने पेरलेले क्रांतिबीज आणि त्यातूनच दिमाखाने उभी राहणारी ग्रामीण स्त्री, जी सुशिक्षित समस्त स्त्रीजातीचेसुद्धा प्रतिनिधीत्व करते. ती कादंबरी म्हणजे भाषाप्रौढत्व, कल्पनाविलास, वाङ्मयीन चमत्कृती यांच्या भरीस न पडता, खाऱ्या मातीतून सहज सुंदर फुलणारे निरागस फूल म्हणता येईल. अनंत पाटील यांच्या लेखणीतून खलाटीतील रसरसलेले भावविश्व पाझरले आहे.

आत्मचरित्र लिहिण्याची सुरुवात आगरी बोलीत अलिकडे झाली आहे. ते अत्यंत मर्यादित आहे, पण उत्साही लेखक त्या प्रकाराकडे वळत आहेत. नवे प्रवाह त्या रूपाने रुढ होत आहेत. मागील पिढीतील आगरी लोकांचे जीवनानुभव त्यात चित्रित झालेले आहेत. त्यामधून पूर्वी शिक्षण घेणे किती कष्टदायक होते व जीवनमान गरिबीमुळे किती हलाखीचे होते हे चित्रित झाले आहे. आगरी समाजाचा भूतकाळ त्यामुळे ज्ञात होण्यास मदत होते. सुचेता थळे यांचे ‘अवतीभवती’ (2009) हे आगरी बोलीतील पहिले व उत्तम आत्मचरित्र म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. उरण येथील नागाव या त्यांच्या गावाचे अप्रतिम वर्णन त्यात आढळते. पुस्तक वाचकांना साठ-सत्तर वर्षें मागे घेऊन जाते. कादंबरी त्या काळातील आगरी संस्कृती, समाजजीवन, चालीरीती वाचकासमोर दृश्यात्मक उभी करते.

ए.डी. पाटील यांचे ‘पत्रावळ’ (2010) हे उत्तम आत्मचरित्र आहे. लेखक म्हणतो, की त्याला ‘पत्रावळी’ने जगण्याचे बळ दिले. ‘टाक्यापासून टांचणीपर्यंत असा माझा प्रवास आहे, दीर्घ काळाच्या तपश्चर्येचे कथानक मोठे मिठ्ठास आहे.’ लेखकाचे गाव उरण तालुक्यातील सारडे हे आहे. त्याचे बालपण त्या गावात गेले. त्या गावाबाबत खूप आठवणी पुस्तकात येतात. निम्म्याहून अधिक भाग गावातील घडामोडींवर खर्ची पडतो. लेखक बालपणीचा, शालेय शिक्षणाचा खडतर प्रवास, गरिबी, प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले शिक्षण यांची मांडणी करतो. ‘शालन नाय जाय तर नको जावू दे, घालील पत्रावलीला टांक, बाकी काय त्याचे नशीब त्याचे पाठी’. (आपण नाही शिकलो तर रानातील पाने जमवून त्याच्या पत्रावळी करून पोट भरायची वेळ येईल, आता शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.) लेखकाच्या बालसुलभ मनाचे चित्रण वेधक झालेले आहे.

व्ही.के. पाटील हे ‘आलो कोठून कोठे’ (2015) या पुस्तकाचे लेखक आहेत. ते ‘तांबडशेत’ (पेण) येथील; शासकीय सेवेतून निवृत झाले आहेत. त्यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. ते त्यांचा मचव्यावर वाळू विंफवा (किंवा) रेती उपसणारा खलाशी ते एक कार्यालयीन हेडक्लार्क असा प्रवास कसा झाला? त्या करता कोण कोण माणसे देवदुतासारखी वाटेत भेटली? असे सारे वर्णन करतात. त्यात महाडचे ज्येष्ठ साहित्यिक माधव पोतदार, प्रभाकर भुस्कुटे, राजकीय नेते शांताराम फिलसे, अशोक साबळे व विविध चांगलेवाईट अधिकारी, भलीबुरी माणसे यांचे उल्लेख येतात. माणसे गतस्मृतींवर, गेलेले दिवस आठवत जगत असतात. त्यातूनच अनमोल आठवणींवर आधारित उत्तम आत्मचरित्रे आकारास येतात व महत्त्वाचे ऐवज ठरतात. ‘खाडीकाठची हिरवळ’ (2012 ) हे आत्मचरित्र ‘आगरी दर्पण’ मासिकात 2011 ते 2012 मध्ये क्रमश: प्रसिद्ध झाले आहे. लेखक का. ध. पाटील यांनी त्यांच्या वेशणी (ता.उरण) गावाबाबत व शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाबाबत त्या आत्मचरित्रातून चाळीस-पन्नासच्या दशकातील परिस्थितीबाबत माहितीपूर्ण लिहिले आहे. ते आगरी समाजाचा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध कालखंड व्यक्त करतात. आगरी समाजातील सर्व लेखकांचा शिक्षणासाठीचा संघर्ष जवळपास सारखा आहे. जीवनशैलीतही फरक नाही. गरिबी, अज्ञान या समान गोष्टी दिसून येतात. सण, उत्सव, रीतिरिवाज यांबाबत मात्र विभागनिहाय माहिती मिळते. मागील काळातील माहितीचा खात्रीशीर ऐवज म्हणूनही त्या सर्वांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचे महत्त्व आहे.

सुनंदा मोरखडकर या सजग व जिज्ञासू लेखक आहेत. त्या आगरी समाजातील पहिल्या ‘राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या’ आदर्श शिक्षक आहेत. त्यांचे वय ऐंशीच्याही पुढे आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ‘स्मृतिगंध’ या आत्मचरित्रात चितारलेला कालखंड हा स्वातंत्र्यपूर्व व नंतर असा आहे. तत्कालीन आगरी समाजाची जीवनप्रणाली त्यामुळे कळून येते. गाव पिण्याचे पाणी, वीज अशा अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असे. त्यांनी गावापासून दूर शेतावरच्या घराचे (बेड्यावरचे) जीवन चितारलेले आहे. आज रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या सुविधा बऱ्याच अंशी सहज उपलब्ध आहेत. परंतु ज्या काळात त्या सुविधा नव्हत्या तेव्हा आगरी समाज कसा कष्टाचे जीवन जगत होता याचा वास्तववादी पुरावा त्या आत्मचरित्रातून अनुभवण्यास मिळतो. ती एका सामान्य शिक्षिकेची असामान्य कहाणी आहे.

ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉ. म.सु. पाटील यांचे ‘लांबा उगवे आगरी’ हे आत्मचरित्र. त्यांचे मुंबईत येणे, सहकारी खात्यात कारकुनी करताना शिक्षण घेणे, मग अलिबाग येथे प्राध्यापक होणे… नंतर ते अन्य अनेक ठिकाणी फिरले. शेवटी, पालघर येथे प्राचार्यपदावरून निवृत्त झाले. त्यांची कन्या नीरजा धुळेकर याही नामवंत साहित्यिक आहेत. लांबा याचा अर्थ भाताच्या शेतात उगवणारे रोप असा आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीतील ती ओवी त्यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक म्हणून वापरली आहे. आगरीचा प्राकृत भाषेशी खोलवरीलसंबंध आहे. अनेक प्राकृत शब्द आगरी बोलीत वापरले जातात. ते शीर्षक त्यांची नाळ त्यांच्या आगरी मातीशी घट्ट असल्याचे दर्शवते. मसुंचे ते आत्मचरित्र त्यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे.

आगरी कथालेखकांत ठळक नावे पुढे येतात ती म्हणजे परेन शिवराम जांभळे व प्रा. शंकर सखाराम यांची. तसेच, अविनाश पाटील, मोहन भोईर, चंद्रकांत पाटील, भानुदास पाटील, ए.डी. पाटील यांची, गजानन म्हात्रे, एम. एन. म्हात्रे यांनीदेखील आगरी बोलीत आंतरिक जाणिवेतून आगरी कथा लिहिली आहे. समीक्षकांनी प्रादेशिकतेची फूटपट्टी लावून त्यांना वेगळ्या पंक्तीत बसवण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्या कथा वेगळा जीवनानुभव देऊन जातात. आगरी समाज शहरीकरणाच्या, औद्योगिकीकरणाच्या वरंवट्याखाली भरडला जात आहे, नामशेष होत आहे. त्यामुळे या लेखकांच्या कथा धारदार आहेत. भानुदास पाटील यांच्या ‘दुभंग’मधील कथा. अविनाश पाटील यांच्या ‘शंकरपट’मधील कथा, परेन जांभळे यांच्या ‘बिलोरी निबिड’मधील कथा, शंकर सखाराम यांच्या ‘झोंज’ व ‘घुगाट’मधील कथा… त्यांतील दाहकता जाणवल्याशिवाय राहत नाही. आगरी बोलीत म्हण आहे, की ‘ज्याचा मरा त्यालाच लरा!’ म्हणजे ज्याच्या नातलगाचे मयत झाले आहे तोच रडतो, इतर लोक फक्त बघत उभे राहतात. आगरी बोलीतील कथांचेही तेच सूत्र आहे. ज्यांनी सोसले, भोगले तेच संवेदना व्यक्त करू शकतात, त्यांचे भावविश्व मांडताना दिसतात.

आगरी कविता साधारणत: 19894 च्या सुमारास लिहिली जाऊ लागली. तो समाज ‘सिडको आंदोलना’त गाव व जमिनीविषयीच्या अस्मितेमुळे आक्रमक झाला. प्रकल्पग्रस्तांची लेखणी सरसावली, आंतरिक तळमळ कागदावर उतरली. नवी शिक्षित पिढी त्या कामी पुढे आली. त्यांची जमीन त्यांना जीवापाड प्रिय होती. ती उद्ध्वस्त होतानाची तडफड आगरी बोलीतील कवितांत आली आहे. माणसाभोवतीचा परिसर हा भोवतीच्या भौगोलिक वास्तवातून व सांस्कृतिक जीवनातून तयार झालेला असतो. माणसाभोवतीचे सांस्कृतिक जीवन हेही मुळात भौगोलिक वास्तवातून जन्मलेले असते. आगरी प्रकल्पग्रस्त त्याच भौगोलिक बदलातून जात असल्याने, भूमिहीन होत असल्याने त्यांच्या साहित्यात, कवितांत त्या बदलाचे पडसाद उमटलेले दिसून येतात. तो जमीन प्रकल्पास विकताना आकाडतांडव करतो, थयथयाट करतो. त्यावर अनेक कवींनी लिहिले आहे. अरुण म्हात्रे यांनाही तो मोह आवरलेला नाही. ते ‘सेझ’वर केलेल्या कवितेत म्हणतात-

ही धरती अमुची आई, ही जन्माची पुण्याई
प्राण गेला तरीही देणार कुणाला नाही

अविनाश पाटील हे आगरी कवितेतील महत्त्वाचे नाव. जांभळे त्यांच्याबद्दल म्हणतात, “या कविमित्राला चिंतनपर प्रवृत्ती लाभली आहे. अभंगाची भावव्याकुळ शब्दकळा त्याच्या कवितेत आहे. कवीचे चिंतन एकाच वेळी दोन पातळ्यांवर भावते. ते अनेक वेळा आत्मपर स्तरावर रेंगाळताना दिसते, तर काही वेळा ते सामाजिक स्तरावर घुटमळताना आढळते.” अविनाश पाटील कवितेत म्हणतात-

लाटी वलाटी
झगरा आमचे ललाटी
जमीन झाली पलाट तवशी
लोणी खातं तलाठी
इसरुन जेलू पऱ्या
उधाणलेला दऱ्या
हिरवी शेता न फुलेली भाता
नै वाजं घुंगूरकांठी (आगोट-२००६)

पुंडलिक म्हात्रे स्वत: प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना सिडको व जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या वेदनांची पूर्ण जाण आहे. परेन जांभळे हे पुंडलिक म्हात्रे यांच्या कवितेविषयी म्हणतात, प्रकल्पग्रस्तांचा इतिहास, भूगोल; पर्यायाने आदिम लोकसंस्कृतीच भुईसपाट होत आहे. विकासाची सुमधुर फळे भलत्याच वर्गाला मिळत असून, मूळ भूमिपुत्रांना मात्र तो विषवृक्ष वाटत आहे. प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट, नेते मंडळींची दुटप्पी नीती, स्वार्थी व संकुचित गावपुढाऱ्यांचे मुजोर वागणे, पैसा व उपभोग या नादापायी उद्ध्वस्त झालेले कृषिवल भावजीवन यांचा तटस्थपणा आणि परखडपणे घेतलेली झाडाझडती संबंधितांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. एवढेच नव्हे तर व्यथावेदनेचा तो पंचनामा झिणझिण्या याव्यात अशा रोखठोक शैलीत कथन केला आहे –

आमचा बापुस पुन आनचा
आमची आय येच गावानची
मंग आमाला कामाला लावाला
हारकत काय तुमची?

असा थेट रोकडा सवाल आव्हानात्मक वाटतो. आगरी संस्कृतीच्या अवघ्या अस्तित्वालाच सुरूंग लागला गेला आहे. भूगोल तर बुलडोझरने भुईसपाट होत आहे. प्रकल्पाची उभारणी ही आगरी लोकजीवनाच्या छाताडावर होत आहे. परिवर्तनाचे हे विकासचक्र आहे असे सांगितले जाते, पण वस्तुस्थिती मात्र विपरीत आहे. ते विकासचक्र आहे की भकासचित्र आहे? (आजूसचा नंगोट – 2011)

रामनाथ म्हात्रे आणि मुकेश कांबळे या दोघांनी संयुक्तपणे लिहिलेला ‘निंगोलीचे पानी’ हा आगरी कवितांचा काव्यसंग्रह रसिकमान्य झाला. त्यांचा गाव, घणसोली, बेलापूर, तुर्भे असा परिसर, त्यांचे कॉलेजमित्र त्यांच्या कवितेत आढळून येतात. कवितासंग्रहाला आजोबाचे नंगोट (सुरकं) हे नाव का दिले त्याबाबत रामनाथ म्हात्रे म्हणतात, माझे आजोबा फकीर बालाजी म्हात्रे यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. लहानपणी ते मला शेतावर घेऊन जात. त्यावेळी उन्हापासून बचाव व्हावा म्हणून ते त्यांच्या नंगोट्याच्या सावलीत घेत. पाऊस आला की ते म्हणायचे, ‘बाला, नंगोट्यान ये, नयतं भिजशील.’ त्यांच्या नंगोट्याच्या उबेने माझे मन भारावले गेले आणि त्या क्षणांची सोबत होती, म्हणूनच हा माझा कवितासंग्रह झाला. वर्षानुवर्षें जे मूळ रहिवासी तुर्भे-बेलापूर-वाशीगाव परिसरात राहत होते त्यांच्या घरादारावर, सुपीक जमिनीवर नांगर फिरवून त्यांना भिकेला लावले व नवी मुंबई वसवली.

स्थनिकांचे घरावं फिरवुनशी नांगर
सिरकुनी रचला सिमेटचा डोंगर
पयले मिलाचं तल्या बावीच पानी
आता तं मुनसुपालटीची मनमानी
आई गो आई ईच काय गो बाई

जीला गो बोंलतान नवी मुंबई

प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश हा आगरी कवितेचा किंबहुना आगरी साहित्याचा विषय आहे. हास्यविनोद आगरी कवितेत आहेच. रामनाथ म्हात्रे यांच्यासारखे कवी तो विषय लीलया पेलताना दिसून येतात. आगरी समाजाच्या भावनांचा उत्तम आविष्कार त्या कवितांतून साकार झालेला आहे. ‘मांदेलीसाठी व्हरका बुरला’ ही म्हण रामनाथच्या कवितांमधून अस्सल आगरी तडका घेऊन आलेली आहे.

दादोपंत नावाच्या एका मराठा गृहस्थाने लळिते 1842 सालात मुंबई मुक्कामी करून दाखवण्यास सुरूवात केली. त्यांच्या हाताखाली शिकून पुण्याचा सावजी मल्लपा, बडोद्याचा वाघोजीबुवा व मुंबईचा पाटीलबुवा (आगरी) असे तीन इसम तयार झाले. पाटीलबुवांच्या हाताखाली शिकून जी मंडळी तयार झाली, त्यात कोळभाटवाडीतील (कुलाबा-मुंबई) विठोबा रोटकर-आगरी यांचे लळित व विशेष करून त्यांतील ‘माया मच्छिंद्र’ आख्यान फारच उत्तम होत असे. ते पाहण्यास सर्व (मुंबई) शहर लोटे. लोणघरचे (अलिबाग) आगरी नाटककार भ.ल. पाटील यांनी1936 च्या सुमारास चार ग्रामीण नाटके लिहिली. त्याचे प्रयोग महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर झाले. साहित्याच्या इतिहासकारांनी मात्र दुर्दैवाने त्या आगरी नाटककाराची योग्य दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे ते उपेक्षित राहिले. त्यांचे पहिले नाटक ‘स्वधर्मासाठी’. त्या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग शहापूर (अलिबाग-रायगड) येथे झाला. त्यांचे ‘जमीनदार’ हे दुसरे नाटक 1935 साली सादर झाले. त्या नाटकाचे तीनशेहून अधिक प्रयोग झाले. सावकारीने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नाटकाचे स्वागत केले. बेळगाव, धारवाड या कर्नाटकातील मराठी भाषिक भागातही ‘जमीनदार’ या नाटकाचे हाउसफुल्ल प्रयोग झाले. सावकार, जमीनदार यांनी त्या नाटकावर बंदी घालण्याचे प्रयत्न केले, पण लोकाश्रय लाभलेली ती नाटके खूप लोकप्रिय होती.

मोहन भोईर यांच्या ‘तरवा’ या नाटकाने आगरी बोलीतील नाटकांची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने पंचवीस वर्षापूर्वी रोवली. ‘तरवा’ हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत 1988 साली आले. ते सिडकोच्या महोत्सवात सादर केले गेले. ते नभोनाट्य स्वरूपात मुंबई आकाशवाणीवरही आले. ते अंधश्रद्धेला झुगारणारे बंडखोर नाटक म्हणून लोकप्रिय झाले. तो आगरी बोलीत नाटक सादर करण्याचा अलिकडील मोठा प्रयत्न होता. एल.बी. पाटील हे नाटककार म्हणून राज्य नाट्यस्पर्धेत गेली अनेक वर्षें नवे नाटक घेऊन उतरत असतात. त्यांची ‘हुतात्मा मांडवान पांडव’, ‘उद्यासाठी घर जपावं असं’, ‘चौकटीबाहेरची चौकट’, ‘एक सांज कांठावरची’, ‘देश माझा धर्म’, ‘मूठभर माती’, ‘पाहुणी’, ‘तुकोबाची जिजा’ (संगीत नाटक), ‘लफड आलं अंगाशी’, ‘धुमशान’, ‘एसईझेर’, ‘मेघा नांवाची आदिवासी वस्ती’, ‘बाय चालली इवानान’ अशी जवळपास पंधरा नाटके पुस्तक रूपानेही प्रकाशित झाली आहेत. त्या नाटकांपैकी ‘मांडवान पांडव’, ‘एसईझेर’, ‘बाय चालली इवानान’ ही तीन नाटके आगरी बोलीत आहेत. आगरी बोलीत आणखीही नाटके आली. त्यामध्ये ‘देईन बगराव पाय’ (बबन पाटील), ‘सातबाराचा उतारा’, ‘हाय त्या बरा हाय’ (मोहन भोईर), ‘टोकन आयलय ना याला’ (स्वप्नील तांडेल), ही नाटके आली. ‘वनवा इझल का’ (वसंत पाटील), तसेच ‘धनी माजा दारोड्या’ (गणपत पाटील) यांचे हे नाटक पुन्हा नव्याने रंगभूमीवर दाखल झाले आहे. ‘आवरा केला फुकट गेला’ (हरिश्चंद्र भोईर), ‘नटी आली रं पोरानू’ (धनाजी भोईर), ‘आगरी पेण’ (रंजन ठाकूर), ‘धुरकुस’ (गजानन म्हात्रे), ‘देव दरीच हाय’ (चंद्रकांत पाटील), ‘देव घरा आयला’ (धनेश्वर म्हात्रे) इत्यादी नाटकेही आहेत. ‘मांडवाचे मंघारी, चाललंय काय’ (2000), नंदकुमार म्हात्रे यांनी आगरी बोलीतील नाटकाला व्यावसायिक परिमाण मिळवून देण्याचे मोठे काम या नाटकाद्वारे केले आहे. एका आगरी बोलीतील नाटकाचे चारशेहून अधिक प्रयोग होऊन तिकिट खिडकीवर हाऊसफुल्लचा बोर्ड कल्याण-डोंबिवलीसह ठाणे, वाशी व मुंबईत आजही लागला जातो. आगरी बोली आता समाजाभिमुख होत असल्याचे ते द्योतक असून अन्य भाषिकही आगरी बोलीतील नाटकांची रूची घेत आहेत. ते आगरी ठसका अनुभवण्यास नाट्यगृहात येऊ लागले आहेत.

शाहिरांनी त्यांचे रचनाकौशल्य आगरी बोलीत व प्रमाण बोलीतही पणाला लावले आहे. शाहीर आत्माराम पाटील यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. शाहीर राघवदास कोपरकर. दामुबुवा जोहेकर, कमळ माया पाटील हे आगरी समाजाचे शाहीर त्यांचा ‘ठसा’ उमटवून कायम लक्षात राहतील.
आगरी साहित्यातून संशोधनाची नवीन क्षेत्रे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

– दीपक म्हात्रे, 9892982079

About Post Author

1 COMMENT

  1. अप्रतिम,कौस्तुकास्पद आहे…
    अप्रतिम,कौस्तुकास्पद आहे
    आपल्या समाजातिल लोकांना या माध्यमातून जाग करणं, त्यांच्या व्यथा मांडणं
    आपलि संस्कृतीचि ओळख होत आहे व ति अभ्यासलि जात आहे , खुप छान

Comments are closed.