आकाशवेडे हेमंत मोने

5
57
carasole

आपण जेथे राहतो तेथे किंवा त्याच्या आजूबाजूला छंदाने वेडावलेल्या व्यक्ती असतात पण ते आपल्याला माहीत नसते. आता, माझेच बघा ना! मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’ येथे गेली नऊ वर्ष राहतो. पण इतक्या काळानंतर, मी जेथे राहतो तेथून चार- पाच सोसायट्या सोडल्यानंतर ‘गोकुळ विहार’मध्ये एक आकाशवेडे राहतात असे मला अलिकडे समजले आणि अचंबाच वाटला! त्यांचे नाव आहे हेमंत वासुदेव मोने. ते व्यवसायाने शिक्षक. ते कल्याणच्या ‘अभिनव विद्यामंदिर’मध्ये नोकरी करत. त्यांचा शिकवण्याचा विषय विज्ञान आणि गणित. त्यांचा मुख्य छंद आकाशदर्शन. मोनेसरांना आकाशाविषयी आकर्षण ग्रॅज्युएट होईपर्यंत फारसे नव्हते आणि तत्संबधी जास्त माहितीही नव्हती. परंतु एकदा, सरांना पंडित महादेवशास्त्री जोशी लिखित ‘नक्षत्र लोक’ हे पुस्तक वाचण्यास मिळाले. महादेवशास्त्री यांनी त्या पुस्तकात आकाशासंबंधी माहिती, आकाशातील गूढ गोष्टी – त्या कधी दिसतात – त्या कशा पाहायच्या अशी माहिती आकर्षक रीतीने मांडली होती. मोनेसर त्या पुस्तकाने भारावून गेले. त्यांना वाटू लागले, की आकाशात इतक्या छान छान गोष्टी दडल्या आहेत आणि आपल्यासारख्या विज्ञान विषयाच्या शिक्षकाला त्याचा गंधही नसावा! मोनेसरांना आकाशातील गोष्टी पाहण्याचा मोह आवरेनासा झाला. मोनेसर आकाशदर्शनासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यांना एकामागोमाग एक आकाशदर्शनाच्या चाव्या मिळत गेल्या. त्या गूढ – चंदेरी दुनियेचा एकेक दरवाजा त्यांच्यासाठी उघडत गेला. या व्यक्तीला आकाशदर्शनाचे इतके वेड लागले, की शाळेतील आठ तास वगळले तर त्यांचा इतर वेळ फक्त आकाशदर्शनाची माहिती मिळवणे, ती इतरांना पुरवणे, इतरांमध्ये आकाशदर्शनाची गोडी निर्माण करणे यासाठी खर्च होऊ लागला.

मोने सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्नेही झालेली आहेत. आता फक्त हेमंत माने आणि त्‍यांच्‍या पत्‍नी अनघा मोने हे दोघेच घरी असतात. ते त्यांच्या छंदाला पूर्ण वेळ देतात. त्यांच्या मते, आकाशदर्शनासाठी दुर्बीण पाहिजेच असे नाही. आकाश खुल्या डोळ्यांनी व्यवस्थित पाहता येते. एकदा का ताऱ्यांची ओळख झाली, की त्यांचे स्थान दिवसा दिवसाला बदलते, पंचांगाप्रमाणे त्याला शोधणे आणि ओळखणे हा आनंद काही वेगळाच असतो! अशा रीतीने आकाशाशी नाते जोडले जाते.

मोनेसरांनी आकाशवेड इतरांना लावण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग अवलंबले. त्यांतील एक म्हणजे – नभांगण हे दोन महिन्‍यांनी प्रकाश्‍ाित होणारे नियतकालिक . मोनेसरांनी ‘नभांगण’ हे नियतकालिक १९८२ साली चालू केले. त्यांनी त्यात ग्रह-ताऱ्यांविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. नवीन लोकांना तारे आणि ग्रह यांची ओळख व्हावी म्हणून, अमुक अमुक दिवशी शनी चंद्राच्या उत्तरेस असेल किंवा गुरु -चंद्राच्या उत्तरेस या या दिवशी असेल असे ते त्या नियतकालिकातून सूचित करत. मोनेसरसुद्धा चित्रपटातील सस्पेन्सप्रमाणे एका वेळी एक ग्रह/तारा या प्रमाणे वाचकांना माहिती पुरवत. त्यामुळे वाचकांची आकाशदर्शनाची गोडी वाढू लागली, वाचक ‘नभांगण’ची वाट पाहू लागले आणि त्‍या नियतकालिकाचा प्रसारही वाढला. मोनेसर ते नियतकालिक सतत त्यांच्या व्याख्यानांतून, आकाशदर्शनाच्या कार्यक्रमांतून लोकांसमोर आणत गेले. त्यामुळे त्याचा वाचक वर्ग वाढत गेला. मात्र मोनेसरांना पक्का असा वाचकवर्ग लाभला नाही, त्यांचा वाचकवर्ग फ्लोटिंग राहिला. पण मोनेसरांनी हार मानली नाही. त्यांनी ‘नभांगण’ एकतीस वर्षं चालवले. त्‍यांनी ‘नभांगण’ नियतकालिकाचा समारोप २०१३ साली समारंभपूर्वक केला.

मोनेसरांनी आकाशवाणीवरून १९७३ साली ‘आकाशदर्शन’ नावाचा अनोखा कार्यक्रम सुरू केला. आकाशवाणीवर जेव्हा ‘आकाश दर्शन’ हा कार्यक्रम सुरू होई तेव्हा श्रोते त्यांचा रेडिओ अंगणात घेऊन जात. मोनेसर त्या दिवशी त्यावेळची ग्रहांची/ताऱ्यांची, चंद्राच्या आजुबाजूची स्थिती हा संदर्भ घेऊन श्रोत्यांना मार्गदर्शन करत. आकाशवाणीवरील तो कार्यक्रम साधारण १९७७ पासून १९८४ पर्यंत प्रत्येक आठवड्याला सादर होई.

मोनेसरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आकाशदर्शनाचा छंद निर्माण करण्यासाठी एक क्लृप्ती लढवली. त्यांनी MKCL च्या सहकार्याने ‘आकाशाचे पुस्तक वाचुया’ या नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. मोनेसरांनी त्या प्रोजेक्टमध्ये दहा मुलांना आकाशदर्शनाचे प्रशिक्षण दिले. त्या मुलांवर जबाबदारी होती, की त्यांच्यापैकी प्रत्येकाने चाळीस शाळकरी मुलांना त्यांच्‍या गावात जाऊन आकाशदर्शनाचे धडे द्यावे. ‘आकाशाचे पुस्तक वाचुया’ हा कार्यक्रम जानेवारी आणि फेब्रुवारी २०११ या दोन महिन्यांत पार पडला. चारशे मुलांना खगोलशास्त्राची माहिती त्या दोन महिन्यांत दिली गेली. मोनेसरांनी त्या प्रोजेक्टमार्फत आकाशदर्शनाचे शिक्षण मुरबाड, डहाणू, पालघर अशा आदिवासी शाळकरी विद्यार्थ्यांना दिले.

बऱ्याच लोकांना खुल्या आकाशाखाली बसून गाणे ऐकणे आवडते. मोनेसरांनी नेमकी तीच गोष्ट हेरली आणि एका अफलातून कार्यक्रमाला जन्म दिला! त्या कार्यक्रमाचे नाव आहे ‘सूर नभांगणाचे’. त्या कार्यक्रमात, खुल्या मैदानात आकाशाखाली चंद्र, सूर्य, ग्रह, तारे यांविषयी जी मराठी गाणी आहेत ती नामवंत गायक गात असतात, मोनेसर त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. दोन गाण्यांच्यामध्ये मोनेसर चंद्र-ग्रह-ताऱ्यांची माहिती पुरवतात. शक्य झाल्यास स्लाईड शोही दाखवला जातो. मोनेसरांनी असे सहा कार्यक्रम कल्याण, पनवेल, गोव्यातील फोंडा येथपर्यंत सादर केले आहेत. कार्यक्रम खर्चिक असल्याने तो वारंवार होऊ शकत नाही.

मोनेसरांनी पुढाकार घेऊन राज्यभरातील आकाशाशी नाते जोडलेल्या आकाशप्रेमींना आमंत्रित केले. त्यांनी त्या निमित्ताने कल्याण-डोंबिवलीतील आकाशप्रेमींना एकत्र आणून ‘आकाश मित्र मंडळा’ची स्थापना केली. तसे पहिले संमेलन १९८६ मध्ये झाले. संमेलनात मान्यवरांची व्याख्याने झाली. प्रत्येकाकडे असलेली ग्रह-ताऱ्यांची माहिती, त्यांचे फोटो यांचे आदानप्रदान झाले. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत कशी या विषयी चर्चा झाली. संमेलनाचा सर्व आकाश प्रेमींना एकत्र आणणे आणि स्वतःसोबत सर्व आकाशप्रेमींना ग्रह-ताऱ्यांची माहिती देऊन प्रगल्भित करणे हा उद्देश सफल झाला. संमेलनात जयंत नारळीकर यांनी उपस्थिती लावली. त्या कार्यक्रमामुळे खगोल शास्त्राभ्यासाची वलये भारतभर पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला, की राष्ट्रीय पातळीवर पहिले संमेलन पुणे येथे १९९१ मध्ये आयोजित केले गेले. मोनेसर म्हणतात, की राज्यस्तरीय संमेलन २००९ पर्यंत बारा वेळा झाले. राष्ट्रीय पातळी वर बारा खगोलशास्त्र संमेलने आयोजित झाली आहेत.

‘आकाश मित्र मंडळ’ खगोलशात्राचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्यामध्ये विशिष्ट घटनांचे निरीक्षण जसे – सूर्यग्रहण , चंद्रग्रहण , उल्का वर्षाव , बुधाचे-शुक्राचे अधिक्रमण, सावलीचा प्रयोग, खगोलशात्र अभ्यास वर्ग, प्रदर्शनात भाग, रोड शो करणे. त्या मध्ये ‘सावली’चा प्रयोग म्हणजे आपण जेथे असाल त्या ठिकाणचा अक्षांश खगोलशास्त्रानुसार शोधणे.

दर वर्षी नारायणगाव येथे २८ फेब्रुवारीला विज्ञान दिनी, विज्ञान प्रदर्शन GMRT आयोजित करते. ‘आकाश मित्र मंडळ’ त्या प्रदर्शनात २००४ पासून सातत्याने भाग घेत असते. ते मंडळ त्या प्रदर्शनात खगोलशास्त्राचे तक्त्ते आणि प्रतिकृती मांडून खगोल शास्त्र सोपे करून लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करते. मंडळाकडून तक्त्ते आणि ग्रह-ता-यांच्‍या प्रतिकृती मारुती व्हॅन मध्ये मांडून खगोलशास्त्राच्या प्रचार आणि प्रसारासाठी ‘रोड शो’चेही आयोजन केले जाते.

मोनेसर कल्याणमध्ये ‘आकाश मित्र मंडळा’तर्फे आकाश दर्शनाचे वर्ग चालवतात. तो कोर्स सोळा रविवारांचा आहे.

‘आकाश मित्र मंडळा’ने जे जे लोक खगोलशास्त्राशी वर्षानुवर्षें निगडित आहेत, त्या सर्वांची माहिती जसे नाव, गाव, दूरध्वनी क्रमांक आणि आकाशदर्शनात जर एखादे चांगले काम हातून झाले असेल तर ते काम, असा खगोलशास्त्री यांचा संग्रह असलेली डिरेक्टरी प्रकाशित केली आहे.

INTERNATIONAL ASTRONOMY OLYMPIYAD स्पर्धा दर वर्षी आयोजित होत असते. त्या स्पर्धेत प्रत्येक शाळेमधून खगोल शास्त्राची परीक्षा घेतली जाते. त्यात देशभरातून तीनशे मुले निवडली जतात. त्या तीनशेमधून पुढे पुन्हा परीक्षा घेऊन फक्त पन्नास आणि पुन्हा चाळणी करून फक्त पाच मुले निवडली जातात. त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडून खगोल शास्त्राचा अभ्यास करून घेतला जातो. आणि मग पुढे ते पाच विद्यार्थी देश पातळीवर जगातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करतात.

असे पाच विद्यार्थी निवडल्यानंतर त्यांची तयारी करून घेण्याचा मान आणि जागतिक पातळीवर त्या विद्यार्थ्यांचे टीम लीडर म्हणून रशियाला जाण्याचा मान हेमंत मोनेसरांना २०१० मध्ये मिळाला होता.

बंगलोर मधील ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स’ या संस्थेने आकाशदर्शनाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने एक उपक्रम हाती घेतला होता. त्या उपक्रमात एक दुर्बीण बनवायची होती. जे आकाशदर्शनाशी निगडित आहेत अशा देशपातळीवरील फक्त शिक्षकवर्गाची यादी तयार करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या यादीमध्ये हेमंत मोनेसरांचा पहिला क्रमांक होता. हेमंत मोनेसर दोन विद्यार्थ्यांसोबत बंगलोरला गेले. ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स’ने सर्व साहित्य आणि आवश्यक मदत पुरवून प्रत्येक ग्रुपला दुर्बीण बनवण्यास प्रोत्साहित केले. दुर्बीण तयार झाल्यानंतर ती दुर्बीण प्रत्येकाला भेट म्हणून देण्यात आली. त्याचा उद्देश एकच आकाशाशी नाते असणारा परिवार वाढवणे. अर्थातच मोनेसर ती दुर्बीण घेऊन अधिक जोमाने कामाला लागले हे वेगळे सांगायला नकोच.

मोनेसर प्रत्येक श्वास घेतात ते आकाशातील तारे-ग्रहांचा विचार करतच. मोनेसरांनी प्रत्येक संधीचा आणि प्रत्येक क्षणांचा वापर खगोलशास्त्राचा प्रचार आणि प्रसार यांसाठीच वापरला.

मोनेसरांचे आकाशाविषयीचे लेखन अनेक नियतकालिकांत वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे. ‘नुसत्या डोळ्यांनी आकाशदर्शन’ आणि ‘ग्रहणे चंद्र सूर्याची’, ‘ग्रहण पुस्तिका’, ‘आकाश – गमती  जमती’ ही पुस्तके मोनेसरांनी प्रसिद्ध केली आहेत. मोनेसरांनी ‘१९८० चे सूर्य ग्रहण’, ‘हॅलेचे धूमकेतू’, ‘रामानुजन आणि गणितातील गमती जमती’ या विषयावर एक हजारापेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.

मोनेसरांना त्यांच्या खगोलीय कार्यासाठी २००४ मध्ये ‘कल्याणरत्न पुरस्कार’, १९७५ मध्ये ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या स्पर्धेत ‘कृत्रिम उपग्रह’ या विषयावर निबंध लिहून पारितोषिक, १९८० मध्ये ‘मराठी विज्ञान परिषद – संगमनेर’ येथे ‘विज्ञान प्रसारक’ म्हणून पुरस्कार, आदर्श शिक्षक म्हणून १९८६ मध्ये गौरव; तसेच, १९९१ व २००१ मध्ये जनगणनेच्या कामाबद्दल राष्ट्रपती पदक व सन्मानपत्र मिळाले आहे.

मोनेसर राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचाही प्रचार आणि प्रसार करत असतात. त्या तारखांचा वापर दैनंदिन कारभारात झालाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय सौर दिनदर्शिका २२ मार्च १९५७ या दिवशी अंगीकृत केली. तो दिवस म्हणजे सौर दिनदर्शिकेप्रमाणे १ चैत्र १८७९ असा होता. परंतु असे सारे असले तरीही दिनदर्शिका वापरली जात नाही, कित्येक लोकांना तर ती माहीतही नाही. मोनेसर ‘सौर तारखेचा अवलंब करा’ असे नेहमी म्हणत असतात. ते दैनंदिन कारभारात आणि प्रत्येक चेकवर सौर तारीखच टाकतात. सुरुवातीला त्यांचा चेक एका बँकेने पास केला नाही. मोनेसर त्या बँकेच्या मॅनेजरला जाऊन भेटले. त्यांनी त्यांना राष्ट्रीय कॅलेंडर वापरात आणण्याचे परिपत्रक दाखवले. मॅनेजरांनी तो चेक तसाच पास करून घेतला. मोनेसर फक्त चेक पास करून घेऊन थांबले नाहीत तर त्यांनी चेक न वठल्यामुळे जो दंड लावण्यात आला होता तोही परत मिळवला. त्यांच्या प्रयत्नांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने त्यांच्या डायरीवर सौर तारखा छापण्यास सुरुवात केली आहे.

मोनेसरांनी पाठपुरावा करून शिक्षण विभागाकडून शालेय दाखल्यांवर ग्रेगोरियन आणि राष्ट्रीय कॅलेंडर या दोन्ही तारखा दर्शवाव्या असे परिपत्रक काढून घेतले आहे.

त्यांना रेल्वेविषयीही विशेष आकर्षण आहे. भारतीय नागरिकास त्याच्या गावाला जाणाऱ्या रूटवर कोणकोणती रेल्वे स्टेशने येतात हे जर त्याला भारताच्या नकाशावर दाखवता आले तर किती छान वाटेल अशी कल्पना मोनेसरांच्या डोक्यात आली. त्यांनी भारतीय रेल्वेच्या सर्व मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या रूटचा अभ्यास केला आणि १४५० मेल/एक्सप्रेस गाडयांचा रूट ते भारताच्या नकाशावर LED लाईटच्या साहाय्याने दाखवतात. तो चमत्कारच वाटतो. मोनेसर असे विलक्षण छांदिष्ट आहेत व त्याचबरोबर अभ्यासूपण आहेत. अशी माणसे विरळाच!

हेमंत मोने,
९८२ ०३१ ६३१५
hvmone@gmail.com

– मनोहर बागले

About Post Author

5 COMMENTS

  1. Detail Information abour Mr.
    Detail Information abour Mr. Mone. Good work By Mr. Mone & Good write up by Mr. Bagale.

  2. अतिशय उत्तम कार्य आणि तेही
    अतिशय उत्तम कार्य आणि तेही प्रसिद्धी किंवा पैसा यांच्या मोहात न अडकता मोनेसर करत आहेत. त्यांना पुढील प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा

  3. मोने सर, सर्व प्रथम आपले
    मोने सर, सर्व प्रथम आपले मनःपूर्वक अभिनन्दन।
    आपल्याला इथे वाचून आनंद झाला। सर मी आपला विद्यार्थी होता आणि तसे पाहिल्यास मी आज ही तुमचा विद्यार्थी आहे. अभिनव मध्ये असताना तुमची अभ्यासक्रम शिकविन्याची पद्धतच मुळात आकर्षक आणि उत्सुकता वाढविनारि होती। मला आठवतय तुमच्या राहन्याच्या थिकनात आणि मी राहन्याच्या थिकनात तितकेसे अंतर नव्हते. आम्हा काही विद्यार्थ्यांना तुम्ही काही वेळा अंधार पदल्यावर संध्याकाळी टेरेस वरुन आकाशबद्दल माहिती सुद्धा दिली आहे. एक शिक्षक आणि एक संशोधक मी नेहमीच तुमच्यात पाहत आलो आहे. आज ही तुमच्या सोबत आकाश निरिक्षणबद्दल बोलताना तेव्हाचीच गच्ची आठवते. मला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तुमच्या सोबत आकाश भ्रमण करायला नक्कीच आवडेल.
    बरे वाटले बोलून।
    मझ्याकडून तुम्हाला मनःपूर्वक शुभेछ्या ।
    तुमचा विद्यार्थी,
    मंगेश कदम,
    पुणे,
    संपर्क क्र. – 9970537420

  4. उत्तम कार्याची सविस्तर माहिती
    उत्तम कार्याची सविस्तर माहिती. धन्यवाद.

Comments are closed.