आकाशगंगा

0
81

पौराणिक कल्पनेनुसार आकाशगंगा म्हणजे एकचक्र रथात बसून ज्या मार्गाने जातो तो मार्ग होय. दुस-या ग्रंथात म्हटले आहे, की वामनावतारात विष्णू तिथे पाऊल टाकत असताना ते एका अंड्याला लागून अंडे फुटले. त्यातून निघालेला प्रवाह म्हणजे आकाशगंगा. बहुतेकांना स्वर्गारोहण करण्याची शिडी म्हणजे आकाशगंगा होय असे वाटते. स्वर्गातील अमरावतीला आकाशगंगेने वेढले असल्याचा उल्लेख भागवतात आहे.

आकाशगंगेचा पट्टा उत्तर धु्वाच्या तीस अंश जवळून जातो. याची जास्तीत जास्त रुंदी अंदाजे पंचेचाळीस अंश तर कमीत कमी पाच अंश आहे. आकाशगंगा धनू व वृषभ ह्या समुहात क्रांतिवृत्ताला (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीच्या मार्गाला) साठ अंश छेदते. खगोलीय विषुववृत्ताला गरूड व शुंगाध या समूहात सुमारे बासष्ट अंशांत छेदते. आकाशगंगेच्या दक्षिण भागात जास्त तारे आहेत.

पृथ्वीसह अनेक ग्रह-उपग्रह, बहुग्रह आणि मंगळ व गुरू ह्यांच्यामधील असंख्य लहानमोठे खडक ह्यांनी सूर्यकुल बनले आहे. सूर्यासारख्या असंख्य ता-यांचा समूह म्हणजे आकाशगंगा होय. आकाशगंगेप्रमाणे अनेक समूह आकाशात आहेत, त्यांना दीर्घिका म्हणतात.
आकाशगंगेत सुमारे शंभर अब्ज तारे असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो. या तार्‍यांखेरीज अभ्रिका, रूपविकारी तारे, तारकायुग्मे, तारकागुच्छ वगैरे निरनिराळे घटक आहेत. आकाशगंगेच्या पट्ट्यात त्या सर्वांची फार दाटी झाल्यामुळे व त्यांच्या प्रकाशामुळे आकाशात एक दुधाळ पट्टा दिसतो.

आकाशगंगेच्या बाहेरून तिच्या पातळीतील एखाद्या बिंदूकडे पाहिल्यास ती मध्यभागी जाड व कडेला चपटी अशी सर्वसाधारणपणे बहिर्गोल भिंगाकार दिसेल. यातील सर्वांत तेजस्वी भागात अतिउष्ण व अतितेजस्वी तारे आहेत. या भागात साधारणपणे मध्यापासून निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर सूर्यकुल आहे. आकाशगंगेचा व्यास सुमारे तीस हजार पार्सिक इतका प्रचंड असून मध्यभागी ती सुमारे पाच हजार पार्सिक जाड आहे. सूर्यमध्यापासून सुमारे आठ हजार तीनशे पार्सिक दूर असून तिथे जाडी सुमारे एक हजार पार्सिक आहे.
पार्सिक हे खगोलशास्त्रीय अंतर मोजण्याचे परिमाण आहे. एक पार्सिक म्हणजे ३.२६ प्रकाशवर्षं. प्रकाशाचा वेग दर सेकंदास तीन लाख किलोमीटर आहे. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षांत तोडलेले अंतर. आकाशगंगेचा व्यास तीस हजार पार्सिक किंवा सुमारे अठ्याण्णव लक्ष प्रकाशवर्षे आहे. आइन्स्टाईन च्या सिद्धांतानुसार विश्वातील कोणतीही वस्तू प्रकाशाच्या वेगाने किंवा त्याहून जास्त वेगाने प्रवास करू शकत नाही. तरीपण समजा, आकाशगंगेच्या व्यासाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत प्रकाशाच्या जवळपासच्या वेगाने प्रवास केला तर एक कोटी वर्षे उलटून जातील. यावरून आकाशगंगेची व्याप्ती लक्षात येईल.
आपल्‍या आकाशगंगेचे नाव ‘मंदाकिनी’ (Milky Way) असे असून ती 100 प्रकाशवर्षे रुंद आहे. आपल्‍या आकशगंगेच्‍या केंद्रापासून आपली सूर्यमाला 27,700 प्रकाशवर्षे दूर आहे. आकाशगंगा हा विश्‍वाचा सर्वांत मोठा ज्ञात भाग आहे. आपल्‍या सूर्यमालेपासून 6 कोटी प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्‍या एका आकाशगंगेचा व्‍यास 55 हजार प्रकाशवर्षे एवढा प्रचंड आहे.
आकाशगंगेची रचना :

 

आकाशगंगेच्या रचनेचा विचार करतांना प्रामुख्याने मध्यवर्ती तबकडीच लक्षात घेतली जाते. आपली आकाशगंगा सर्पिल प्रकारच्या दीर्घिकेत मोडते. असंख्य तार्‍यांनी बनलेले अनेक सर्पिल बाहू असे या दिर्घिकेचे वैशिष्टये आहे. दोन सर्पिल बाहूमधील जागा सामान्यत: वायू आणि धूलिकण यांनी व्यापलेली असते. अकाशगंगेचे किमान तीन सर्पिल बाहू आपल्याला माहीत झाले आहेत. आपली सुर्यमाला अकाशगंगेच्या मृग या सर्पिल बाहूची घटक आहे.
अकाशगंगेतील सुर्यभ्रमण :

 

अकाशगंगेच्या केंद्रापासून ३५,००० प्रकाशवर्षे अंतरावर सुर्याचे स्थान आहे. या अंतरावरून आकाशगंगेच्या केंद्राभोवती एक प्रदक्षिणा पुर्ण करण्यासाठी सुर्यमालेला सुमारे २५ कोटी वर्षे लागतात. प्रति सेकंदाला सुमारे २५० किलोमीटर या वेगाने सुर्याचे हे भाषांतरांवरूनरमण चालते. सुर्य जन्माला आल्यापासून एकूण २० प्रदक्षिणा पुर्ण केल्या आहेत. आकाशगंगेत एकंदर किती तारे असावेत, याचा काही निश्चित अंदाज करता येत नाही. साधारणत: किमान १०० अब्ज ते २०० अब्ज तारे अकाशगंगेत असावेत. त्यामध्ये श्वेत बटू, न्यूट्रान तारे, कृष्णविवरे, सुर्यासारखे मध्यम प्रतिचे तारे, राक्षसी आणि महाराक्षसी तारे या सर्वाचा सामावेश आहे. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी प्रचंड वस्तूमानाचे एक कृष्णविवर असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
गॅलिलिओ ने १६१० मध्ये प्रथमच दुर्बीणीतून आकाशगंगेचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याने आकाशगंगेचा दुधाळ रंग तिच्यातील जवळ जवळ असलेल्या असंख्य तार्‍यांमुळे दिसतो असा निष्कर्ष काढला. विल्यम हर्शेल याने अठराव्या शतकाअखेरीस व त्याचा पुत्र जॉन हर्शेल याने १८३४-३८ या काळात आकाशगंगेच्या विविध भागांतील तार्‍यांची नोंद केली. पृथ्वीवरून आकाशनिरीक्षण करताना ढगाळ वातावरण, धूळ इत्यादींचा अडथळा होतो. यासाठी नासाकडून हबल नावाची दुर्बीण अंतराळात सोडण्‍यात आली आहे. तिच्याद्वारे अवकाश निरीक्षण केले जाते. प्रत्यक्ष ता-यापासून निघणार्‍या प्रकाशाबरोबर क्ष-किरण, अतिनील किरण, विश्वकिरण, इन्फ्रा रे इत्यादींच्या साहाय्याने अचूक माहिती मिळवली जात आहे. त्यामुळे भविष्यकाळात आकाशगंगेच्या स्वरूपावर नवा प्रकाश पडू शकेल.
संदर्भ: १. मराठी विश्वकोश,खंड पहिला, पृ. ८८९-८९०

२. भारतीय संस्कृतिकोश, खंड पहिला, पृ. ३८२

सुरेशवाघे, दूरध्‍वनी – 022-28752675

About Post Author