अस्वस्थ मी…

_Aswasth_3

बहुसंख्य मुंबईकरांप्रमाणे, मी रोज लोकलमधून प्रवास करतो. गर्दीतून वाट काढत, मी फलाटावर पोचतो, इतरांना धक्के मारत आत शिरतो, दरवाजावर उभा राहून प्रवास करतो. हे सगळं माझ्या अंगवळणी पडलंय. माझं ऑफिस चिंचपोकळीला आहे. मी रोज सकाळी जोगेश्वरीवरून दादरपर्यंत ट्रेननं येतो. मग मध्य रेल्वेवरून गाडी बदलतो आणि चिंचपोकळीला उतरतो. तोच प्रवास संध्याकाळी घरी जाताना उलट होतो. गेली दहा वर्षं मी ट्रेनचा प्रवास करतोय, पण मला अलिकडे आतमध्ये अस्वस्थतेची वेगळीच भावना अनुभवाला येतेय़. माझ्या आयुष्याचा भाग बनून गेलेला हा प्रवास करताना मी बिचकतोय़. हा प्रवास मला नकोसा वाटू लागलाय़. विचित्र गोष्ट म्हणजे ही अस्वस्थता या रोजच्या प्रवासातून निर्माण झाली हे मला कळलंय!

मुंबईतल्या माणसाला गर्दी नवीन नाही, पण तरीही रात्री कामावरून परतताना हा प्रवास मन अस्थिर करून जातो. चिंचपोकळीवरून गाडी पकडल्यानंतर मी जेव्हा दादरला उतरतो तेव्हाचं दृश्य त्या अस्वस्थतेत आणखी भर घालतं.

दादरचा फलाट क्रमांक १ रुंदीनं कमी आहे. गाडी जेव्हा फलाटावर येते तेव्हा फलाट ओसंडून वाहणारी, गाडीत चढण्याच्या प्रचंड ईर्ष्येनं उभी असलेली गर्दी नजरेस पडते. छाती दडपून टाकणारी गर्दी! गाडी फलाटावर येत असताना माणसं गाडीच्या एवढ्या जवळ उभी असतात की एखाद्या वेळेस कुणीतरी गाडीखाली येईल याची भीती वाटते. त्या क्षणी एवढी गर्दी तिथं मावते तरी कशी हा प्रश्नही प्रत्येकाला पडत असतो आणि त्याचं उत्तरही प्रत्येकाला तिथंच मिळतं! गर्दी मावलेली असते!

ही गर्दी केवळ फलाटावर नसते; फलाट संपून जिथं जिना सुरू होतो तिथं संपूर्ण जिन्यावर दोन्ही बाजूला गाडीची वाट पाहत उलटी रांग उभी असते. मधोमध जी थोडी जागा उरलेली असते तीमधून गाडीतून नुकतीच उतरलेली माणसं वर जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण समोरूनही फलाटावर येणारी नवी माणसं असतात. त्यामुळे खाली येण्यासाठी आणि वर जाण्यासाठी जबरदस्त स्पर्धा चाललेली असते. सगळ्यांसाठी ही ‘नेहमीची’ गोष्ट आहे़, पण या स्पर्धेला येऊ पाहणारं किंवा आलेलं अमानुष रूप मला अस्वस्थ करतं.

गाडीतून उतरणार्‍या प्रत्येकाला गाडीतून बाहेर पडायची घाई आणि चढणार्‍या प्रत्येकाला गाडीत शिरण्याची घाई असते. उतरणार्‍या लोकांपेक्षा चढणारे नेहमी जास्त आक्रमक असतात. मग त्यांना क्षणभरासाठी रोखता यावं यासाठी उतरणारे गाडी थांबण्यापूर्वीपासून जोरजोरात ओरडत, किंचाळत बाहेर पडतात. काही माणसं अशा आरोळ्या देत गाडीतून उतरली की बाहेरची गर्दी घिसाडघाई करत आत शिरू लागते. मग उतरणार्‍या लोकांमध्ये जे शेवटी असतात त्यांच्या नशिबी संघर्ष येतो. त्यांच्यातही एखादा अंगानं दुबळा असेल तर मग त्याला पुढच्या स्टेशनला जाऊन उतरावं लागलं म्हणून समजा!

ट्रेनच्या त्या गर्दीत शरीर अक्षरश: चुरगळून जातं. हातापायांना रक्तपुरवठा होऊ नये इतपत शरीर अवघडून जातं. शरीराचे हाल होतात ते होतातच, पण त्यासोबत मनावर ताण येतो तो वेगळा. पुढच्या स्टेशनला किती गर्दी मिळेल? उतरायला जमेल की नाही? उतरल्यावर पुढच्या ट्रेनला किती गर्दी असेल? तिथं चढायला जागा असेल का? विचारांची ही मालिका मन अस्थिर करत जाते. स्टेशन जवळ आलं की उतरण्याच्या विचारानं माणूस अधिकाधिक आक्रमक होत जातो.

ही अस्थिरता प्रवासापुरती मर्यादित राहत नाही़. ती व्यक्तीच्या जीवनापर्यंत पोचते़, कारण ताण इच्छित स्थानकावर उतरलं की नाहीसा होत नाही़. त्याचा अंश मनात शिल्लक राहतो. माणसं ताण स्वत:सोबत वागवत नेतात. आपल्या घरी, कामाच्या ठिकाणी त्याचे परिणाम काय होतात हे कोणालाही कळू शकतं, त्यांचा अभ्यास मात्र झालेला नाही.

ट्रेनमधून प्रवास करत असताना पावलोपावली आक्रमकतेला तोंड द्यावं लागतं. दरवाजावर, दोन सीटमधल्या जागेत किंवा इतर कुठेही उभं असताना प्रत्येकाला आपापली जागा जाण्याची आणि मिळालेली जागा टिकवण्याची भीती वाटत असते. आत येणारा प्रत्येकजण जास्त आक्रमक असेल या भावनेतून प्रत्येक व्यक्ती आधीच आक्रमकतेचा बुरखा पांघरून घेते. मग चुकून लागलेला लहानसा धक्काही भांडण सुरू करायला पुरेसा ठरतो. ते दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू भासतात. भांडणार्‍यांपैकी बसलेला उतरला की उभा असलेला बसतो. झाली भूमिकांची अदलाबदल. हे चक्र पुढे सुरूच राहतं. या घटना अगदी लहान वाटतात, पण त्या घडण्याचं कारण गंभीर आहे. एखाद्या माणसाला हत्या करण्यासाठी उद्युक्त करणं जेवढं गंभीर आहे तेवढंच व्यक्तीला या कोंदटल्या प्रकारे विचार करण्यास आणि वागण्यास उद्युक्त करणंही गंभीर आहे. ‘गर्दीला मन नसतं’ ही गोष्ट या प्रवासात तंतोतंत अनुभवाला येते. प्रवासातल्या या घडामोडी पाहिल्या की या गर्दीतल्या अनेक व्यक्तींची मने आणि संवेदना त्या वेळेपुरत्या हरवलेल्या असल्याचं जाणवतं. एक व्यवस्था माणसाच्या 'माणूसपणावरच थेट आघात करत असते!

गर्दीनं भरलेला फलाट आणि दंगल उसळावी तसा सुरू असलेला गोंधळ अंगावर काटा आणतो. पाठोपाठ, 'हीच का आमची व्यवस्था?' असा विचार मनात येतो. त्या गदारोळात अनेकदा माणसं पडतात, धडपडतात, हमरीतुमरीचे प्रसंग येतात, मारामार्‍या होतात. पण ट्रेनमध्ये हे असं घडणार हे सगळ्यांनी गृहीत धरलेलं आहे.

तो सगळा गोंधळ माझ्या अंगावर येतो़. त्या सगळ्या झगडणार्‍या शरीरांना माणूस म्हणावं का? हा प्रश्न मनात येतो. मी जी परिस्थिती पाहतो त्यात मला जगणं कमी आणि ओरबाडण्याचा, जनावरांसारखा भांडण्याचा प्रकार जास्त दिसतो. माणूसपणाच्या कुठल्याच व्याख्येत ते जगणं बसवता येत नाही़. ते सगळं माणसांवर वाईट परिणाम करतंय. पण सगळ्यांच्या डोळ्यांसमोर घडत असून कुणालाच त्याचं सोयरसुतक नाही!

प्रदूषण, अन्नधान्यातील भेसळ, सिगारेट-गुटखा या गोष्टी आरोग्यावर वाईट परिणाम करतात, म्हणून त्यांच्याविरुद्ध ओरड होते, मोहिमा काढल्या जातात. पण इथं शरीराची हेळसांड होत असताना, मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतानाही याकडे कुणाचंच लक्ष नाही!

प्रत्येक माणसाच्या आत क्रौर्य दडलेलं असतं. ती त्याची आदिम भावना आहे. हे क्रौर्य आणीबाणीच्या प्रसंगी वर येतं. का येतं? याचं साधं कारण म्हणजे, माणसाला जेव्हा असुरक्षित वाटतं तेव्हा तो स्वत:च्या रक्षणासाठी पेटून उठतो़. गाडीच्या प्रवासात, माणूस रागावलेला दिसत असेल, पण प्रत्यक्षात तो घाबरलेला असतो. कारण त्याला प्रतिकार करता येण्यासारखा नसतो. हा विचित्र कोंडमारा आहे. असे 'आणीबाणीचे प्रसंग' दादर, कुर्ला, ठाणे, अंधेरी अशा अनेक स्थानकांवर दररोज सारखे येतात आणि क्रौर्याच्या वेगवेगळ्या, कमी-अधिक स्वरूपांचं दर्शन होतं असतं. त्यात हतबलता अधिक असते.

मी कधी कधी विचार करतो, की जेवढा वेळ मी ट्रेनमधून प्रवास करतो तोपर्यंत 'मी माणूस आहे' ही गोष्ट जाणीवपूर्वक विसरून जावी. कारण इतर बहुतेकजण ती विसरलेले असतात. अनेकांच्या स्वत:च्या माणूसपणाचा दररोज विसर पडण्याचं अंगवळणी पडलंय. माणसं काही वेळासाठी आपले संस्कार, भावभावना, इतरांना समजून घेण्याची वृत्ती, समंजसपणा… सार्‍या गोष्टी विसरून जातात; खोटं जगत असतात आणि ही बाब कुणालाच, खुद्द त्यांनाही गंभीर वाटत नाही!

किरण क्षीरसागर
9029557767
thinkm2010@gmail.com
 

About Post Author

Previous articleदु:ख, वेदना आणि मृत्यू
Next articleढासळते आधारस्तंभ
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767