अवनी: मतिमंद मुलांना मायेचे छत्र!

1
82

‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय’ गेली दहा वर्षें कल्याणजवळील मुरबाड या ठिकाणी कार्यरत आहे. समाजात मतिमंद मुले ही वेडी म्हणून हिणवली जातात, दुर्लक्षित राहतात. तशा दुर्लक्षित, गरीब मुलांना केवळ शिक्षण मिळावे एवढ्याकरता नाही तर त्यांना सर्वसामान्यांसारखे मुक्त जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी प्रतिभा इरकशेट्टी यांनी मुलांचे ते निवासी विद्यालय सुरू केले आहे. प्रतिभा मूळ ठाण्याच्या आहेत. त्या शाळेची स्थापना २००८ साली झाली. शाळेला महाराष्ट्र शासनाची मान्यता २००९ साली मिळाली.

गरीब, आदिवासी पाड्यातील अशिक्षित पालक त्यांच्या पाल्यांमध्ये असलेली कमतरता आरंभी ओळखू शकत नाहीत. त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. तशात मुले मतिमंद असतील तर शेवटच्या टप्प्यात येऊन वेडी होण्याची शक्यता असते. क्वचित कोणाचा मृत्यू होतो. वास्तवात, प्रतिभा यांच्यावरच तसा प्रसंग उद्भवला होता. त्यामुळे त्यांच्या कामास जिव्हाळ्याचा स्पर्श लाभला आहे. प्रतिभा या माहेरून चाबुकस्वार. त्यांचे माहेर व सासर, दोन्ही परिवार सोलापूरचे. त्यांचा जन्म व शिक्षण मात्र ठाण्यात झाले. त्यांचा विवाह १९९१ साली झाला. त्यांचे पती हयात नाहीत.

प्रतिभा यांना लग्नानंतर योग्य वर्तणूक मिळाली नाही, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की समाजात त्यांच्यासारख्या गरजू स्त्रिया अनेक आहेत. प्रतिभा यांनी तशा महिलांसाठी नगरपालिकेच्या सहाय्याने बचतगट १९९६ पासून सुरू केले. त्यांनी एकूण वीसएक बचतगट आणि तीन संस्था काढल्या. त्यानंतर त्यांनी महिलांसाठी आयटीआयची इन्स्टिट्यूट, पापडाची कंपनी, नगरपालिकेच्या घरघंटी, शिलाईमशीन अशा उपक्रमांत; तसेच, अनुदान मिळवून देण्याचे काम सुरू केले. त्यांनी पुरुषांनाही त्या लाभात समाविष्ट करून घेतले. त्यांना त्या कार्यासाठी पुरस्कार मिळाले. त्यामुळे त्यांची उमेद वाढत गेली. ते कार्य करत असताना, त्यांना जाणवले, की ती मंडळी सक्षम झाली आहेत. प्रतिभा यांना त्या टप्प्यावर समाजासाठी आव्हानात्मक काही काम केले पाहिजे असे वाटू लागले. त्यांनी त्यांच्या दृष्टीने ते काम म्हणजे मतिमंद मुलांना जगण्याचा हक्क देणे असे ठरवले.

प्रतिभा यांना ही जाणीव होण्याचे एक कारण म्हणजे त्यांची बहीण मतिमंद होती. त्यांचे आईवडील अशिक्षित होते. ते बहिणीमधील बौद्धिक कमतरता समजू शकले नाहीत. त्यामुळे उपचारांअभावी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिच्या आजाराचे मूळ कारण समजले. त्यावेळी प्रतिभा दहा वर्षांच्या होत्या. त्यामुळे त्यांनी मनोदुर्बल मुलांना सांभाळले जाईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे ठरवले. त्यांनी तशा मुलांना शेवटपर्यंत स्वत:च्या मुलासारखे सांभाळायचे असेही ठरवले. ‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालया’स प्रारंभ तशा भावनेतून छोट्या दोन मुलांना घेऊन झाला.

अ – अन्न, व – वस्त्र आणि नी – निवारा या तीन गरजा पुरवणारी संस्था म्हणजे ‘अवनी’. शाळेची पायाभरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने झाली. एकनाथ यांचे सहाय्य अडचणीच्या प्रत्येक वेळी होते असे प्रतिभा म्हणाल्या. विद्यार्थी वाढत गेले तसे विद्यालयही वाढले. चाळीतील भाड्याच्या चार खोल्यांनी सुरू झालेल्या शाळेचे रूपांतर दहा वर्षांत दोन इमारतींमध्ये झाले आहे. त्यांनी व्यक्तिगत मालमत्ता विकून दोन-अडीच कोटी रुपये उभे केले. इमारतीसमोर कंपाउंड, फळबागा, स्वच्छ शौचालय, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, दोन बोअर, मुलांना खेळण्यास बगीचा, फळबागा, रेणुकादेवीचे मंदिर अशा सर्व सोयी आहेत. जणू ते रिसॉर्टच वाटते. शाळेत चव्वेचाळीस मुले निवासी असून शंभरहून अधिक मुले आरोग्य सुधारून त्यांच्या घरी गेली आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊ लागली आहेत. त्यांच्याकडे सव्वाशे मुलांच्या प्रवेशासाठी मागणी आहे.

‘अवनी’मध्ये चार शिक्षक व दहा कर्मचारी आहेत. मुले सकाळी उठल्यावर, अंघोळी झाल्यावर योग करतात. त्यानंतर त्यांची शाळा सुरू होते. शाळेत मुलांना शिक्षणाचे बंधन नाही. त्यांना जे आवडेल ते काम शिकवले जाते. त्यातून मुलांना कंदील, पणत्या, मेणबत्या, कागदी पिशव्या, राखी बनवण्याची कला अवगत झाली आहे. त्यांचे वर्कशॉप दीड वाजेपर्यंत घेतले जाते. अडीचपर्यंत जेवण. जेवणात सात्त्विक आहार असतो. काही वेळा मांसाहार दिला जातो. त्यासाठी गावठी कोंबड्या पाळण्यात आल्या आहेत. जे जेवण मुलांसाठी असते तेच कर्मचारी आणि पाहुण्या व्यक्ती घेतात. दर महिन्याला शंभर व्यक्ती पाहुण्या म्हणून शाळेत येत असतात. त्यामध्ये मुलांचे पालक, मुलांना भेटण्यास येणाऱ्या व्यक्ती व अन्य प्रमुख व्यक्ती यांचा समावेश असतो. कार्यशाळा दुपारी अडीचनंतर पुन्हा ४.३० वाजेपर्यंत भरते. नंतर मुलांचा खेळाचा कार्यक्रम. मुले कपडे मातीने माखेपर्यंत खेळतात. मुले खेळ आटोपून, अंघोळ करून शरीराला तेल लावून, जेवून झोपी जातात.

प्रतिभा सांगतात, की “मुले मतिमंद असूनही शाळेत फुलपाखरांसारखी बागडतात, त्यांना जे हवे ते करतात आणि मुक्तपणे जगतात. तेच तर आमचे ध्येय असते. मुलांना झोपण्यासाठी खाट, मनोरंजनासाठी टीव्ही उपलब्ध आहे. मुलांनी ठाण्यातील क्रीडास्पर्धेत सहभाग घेतला होता.

‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालया’ला सरकारी मदत नाही किंवा त्यांना आर्थिक मदत पुरवणारी कोणत्याही प्रकारची स्वेच्छा संस्था किंवा व्यक्ती नाही.” प्रतिभा, त्यांची मुलगी रुचिका आणि त्यांचा मुलगा ऋषीकेश त्या शाळेसाठी गेली दहा वर्षें झटत आहेत. प्रतिभा यांनी विद्यालयाला सोयी-सुविधा पुरवण्यासाठी स्वत: कंत्राटी कामे केली आहेत. ती कामे नगरपालिकेच्या शाळांना-अंगणवाडीला खिचडी पुरवणे, कोलशेतमध्ये तीन एकरचे शेड बसवणे, पार्किंगची व्यवस्था करणे अशा प्रकारची आहेत. त्यांनी ठाण्यामधील वागळे इस्टेट या भागात शंभरहून अधिक विहिरी साफ करून घेतल्या. ठाणे जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात विहिरी साफ करणाऱ्या प्रतिभा या पहिल्या व्यक्ती होत्या. त्या कार्यासाठी त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्या महाराष्ट्रातील चार हॉस्पिटलमध्ये कपडे पुरवण्याचे काम करत आहेत. त्या कामांमधून येणारे आर्थिक उत्पन्न हे शाळेसाठी वापरले जाते.

अनेक लोक शाळेला भेटी देतात. लग्नाचा वाढदिवस, मुलांचे जन्मदिवस, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी असे कार्यक्रम शाळेत होतात. त्या दिवसापुरती मुलांच्या जेवणाची सोय होते. त्या व्यतिरिक्त पाच-दहा हजार रुपयांची मदत केव्हातरी मिळते. मुलांना प्रवेशासाठी शुल्क घेतले जात नाहीच. उलट, गरीब पालक भेटण्यास शाळेत आले, की त्यांना घरी परत जाण्यासाठी पैसे शाळेतून दिले जातात.

‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय’ भक्कम उभे आहे. त्याचे श्रेय प्रतिभा आणि त्यांचा मुलगा ऋषीकेश व मुलगी रुचिका यांना जाते. प्रतिभा स्वतः ग्रॅज्युएट आहेत. ऋषीकेश त्याची नोकरी सांभाळून शाळेचे व्यवस्थापन पाहतो. रुचिका यांनी मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्या विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना यशवंतराव मुक्त विद्यापीठातर्फे उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रुचिका यांच्या लग्नात नातेवाईकांसोबतच ‘अवनी विद्यालया’तील मुले होती – त्यांनी अनाथ आश्रम आणि कन्याशाळेतील मुले यांनाही लग्नाचे निमंत्रण दिले होते. अशी कणव त्या कुटुंबाच्या जीवनातच भरलेली जाणवते. प्रतिभा यांना सामाजिक कार्यामुळे ‘समाजसेविका’, ‘ठाणे गौरव’, ‘हिरकणी’ हे पुरस्कार मिळाले आहेत. प्रतिभा सांगतात, “माझी मुले मोठी झाली आहेत. मुलीचे लग्न मनाप्रमाणे पार पडले आहे, मुलगा स्वावलंबी आहे. मला माझीही काळजी नाही. काळजी आहे ती फक्त माझ्या शाळेतील मुलांची.” प्रतिभा यांनी मतिमंद मुलांना केवळ आसरा न देता त्यांना मायेचे छत्र दिले आहे.

प्रतिभा इरकशेट्टी -९८६९९८२९०४, ९२२३८५३२४४
संस्थापक, अध्यक्ष अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय
मु.पो. माळ, ता. मुरबाड, जि. ठाणे

– नेहा जाधव, nehajadhav690@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. मी विद्यालयाची सर्व माहिती…
    मी विद्यालयाची सर्व माहिती वाचली असून .मला मा.सस्तापंकाचा अभिमान आहे
    माझा मुलगा मतिमंद (AUTISUM) आहे. तो १४ वर्षाचा आहे.आपल्ला विद्यालयात प्रवेश मिळेल का
    धन्यवाद
    ८९२८०८६३११

Comments are closed.