Home व्यक्ती अवकाश निर्मिती – समाजहिताची तळमळ

अवकाश निर्मिती – समाजहिताची तळमळ

for frame

शाळेचा वर्ग चालू आहे. मुलांचे चेहरे उत्फुल्ल, त्यांच्या डोळ्यांत चमकतोय शिकण्याचा, कुतूहलशमनाचा, काहीतरी छान समजल्याचा आनंद. मुलं इतकी उत्साहात, ती जणू कोणतातरी खेळच खेळतायत! आणि खरंच, खेळच सुरू आहे तिथं. काही शिक्षक, शाळेचा एखादा कर्मचारी आणि काही मुलं असे सातजण एका ओळीत उभे आहेत. सात जणांना मिळून एक वाक्य तयार करायचंय. एक अर्थपूर्ण वाक्य. कुणालाच माहीत नाही, दुसर्‍याच्या मनात कोणता शब्द आहे. एकानं कोणतातरी शब्द उच्चारून सुरुवात करायची. पुढच्यानं त्यात भर टाकत त्यात अर्थ भरायचा. कर्ता, कर्म, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असे सहा शब्द आणि शेवटी विरामचिन्ह मिळून वाक्य तयार झालं. वाक्य तयार करणारी आणि बघणारी सारी मुलं आनंदानं टाळ्या पिटू लागली. सारा वर्ग एक नवी गोष्ट शिकल्याच्या आनंदानं भरून गेला.

हे दिवास्वप्न नाही. कोल्हापूरच्या ‘सृजन आनंद’ शाळेतलं हे वास्तववादी दृश्य आहे ‘मूलगामी’ या शॉर्ट फिल्ममधलं. कोल्हापूरला लीला पाटील यांनी ‘सृजन आनंद’ नावाचा शिक्षणक्षेत्रातला सुंदर प्रयोग साकार केला आहे. त्यांच्या अनेक वर्षांच्या ध्यासातून ते सुरेख स्वप्न साकार झालं आहे, त्या सुंदर स्वप्नाला या शॉर्ट फिल्ममध्ये बध्द केलंय. शॉर्ट फिल्मचा निर्माता, दिग्दर्शक अणि सर्वच काही आहे समीर शिपूरकर. त्याला सहाय्य आहे त्याच्या ‘अवकाश निर्मिती’च्या तरुण टीमचं. पंचवीस ते चाळीस या वयोगटातले हे सगळे तरुण अस्वस्थ आहेत. आजुबाजूला जे घडतंय त्याचा राग त्यांच्या मनांमध्ये खदखदतोय. जागतिकीकरणाच्या नावानं पाश्चिमात्य संस्कृतीचं जे आंधळं अनुकरण चाललंय – प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण, वस्तुकरण होत आहे, सामाजिक विषमतेची दरी भेडसावण्याइतकी रुंद बनत चाललीय, त्या सगळ्याविरुद्ध या मुलांचं काहीतरी म्हणणं आहे. समीर शिपूरकर आणि ‘अवकाश निर्मिती’च्या टीमनं शॉर्ट फिल्मसच्या माध्यमातून ते मांडायचा प्रयत्न चालवलाय. ‘मूलगामी’खेरीज पाबळच्या विज्ञानाश्रमावर ची ‘विज्ञानाश्रम – शिक्षणातून विकास’, डॉ. अनिल सदगोपाल यांची ‘उत्पादक काम और स्कुली शिक्षा’ या मुलाखतीवरची फिल्म अशा काही फिल्म्स त्यांनी तयार केल्‍या आहेत.

समीर मूळचा निपाणीचा. त्याचे वडील रमेश शिपूरकर आणि काका सुरेश शिपूरकर हे पुरोगामी चळवळीतले, मागच्या पिढीतले खंदे कार्यकर्ते. राष्ट्र सेवा दल, छात्र भारती यांच्याशी अगदी जवळून जोडले गेलेले. समीर त्याच वातावरणात वाढला. तो लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेचं बाळकडूच प्यायला.

इंजिनीयरिंगचं शिक्षण घ्यायला म्हणून समीर पुण्यात आला. त्यानंतर त्यानं दोन वर्षं विज्ञानाश्रमात काम केलं. तब्बल दहा वर्षं त्यानं इंजिनीयरिंग इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. तेव्हा त्याला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीतलं अमानवीपण बोचायला लागलं. त्‍यांच्‍या पत्‍नी अंजली चिपलकट्टी यांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. समीरनं नोकरी सोडून दिली. नंतर अंजलीचं पोस्टिंग अमेरिकेत झालं म्हणून ते तिकडे गेले.

अमेरिकेत, कनेटिकटमध्ये समीरला त्याच्या अस्वस्थतेमधून बाहेर काढणारं छान काम सापडलं. तिथल्या स्थानिक केबल टीव्ही केंद्रावर समीरनं विनामोबदला पहिल्यांदा कॅमेरा हाताळला, इतरही तंत्रं शिकून घेतली आणि त्याच्या लक्षात आलं, की हेच आपलं काम आहे! भारतात परतल्यावर समीरनं सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या दोन-तीन फिल्म्ससाठी काम केलं. अतुल पेठे बरोबर माहितीपटाचं काम केलं.

समविचारी, कमिटेड मुलांचा ग्रूप जमत गेला आणि ‘अवकाश निर्मिती’ची सुरुवात झाली. त्याची बायको अंजली, अमितराज देशमुख, स्वप्नाली पाटील, मेदिनी डिंगरे, शिल्पा बल्लाळ, छाया गोलटगावकर, राधिका मूर्ती, बन्सीधर किंकर यांचा त्यात समावेश आहे. शिवाय अतुल पेठे, संग्राम गायकवाड यासारख्‍या मित्रांची सर्व प्रकारची मदत आणि वैचारिक देवघेव या सर्वांना समाजजीवनाशी जोडून घेणारं काम करायचं आहे. जागतिकीकरणाच्या वरवंट्याखाली भुईसपाट होणारं इथलं सारं काही हे त्यांच्या अस्वस्थतेचं कारण आहे. समीर सांगत होता, “व्यापकत्त्वाशी जोडून घेणारं इथलं समाजमन मला महत्त्वाचं वाटतं. इथल्या लोकांची बुद्धिमत्ता, त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या इच्छा-आकांक्षा यांना न्याय देणार्‍या व्यवस्था इथं पाहिजेत,”

ग.प्र. प्रधानांची सर्वात शेवटची मुलाखत समीरनं केली होती. अत्यंत उत्कट आणि जणू संपूर्ण जीवनाचं सार आता शेवटचं सांगून टाकायचं आहे अशी ही सुंदर, सर्वस्पर्शी मुलाखत झाली. त्यात ते म्हणाले आहेत, “अर्थकारण हे फार फार महत्त्वाचं झालं असलं तरीही मानवी मूल्यं आणि समतावादी विचार बाजूला सारून चालणार नाही.” तो विचार पोचवण्याचं काम आम्ही फिल्म्सच्या माध्यमातून करतोय, समीर उत्कटतेनं बोलत होता.

समीरनं फिल्म्स करण्यासाठी शिक्षण हाच विषय का निवडला याविषयी उत्सुकता होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ताकद आणि समाजाचं जीवन यांतलं नातं लोकांपर्यत खर्‍या अर्थानं पोचवायचं असेल, त्यांच्यापर्यंत विज्ञानाचा दृष्टिकोन पोचवायचा असेल तर शिक्षण हेच त्याचं माध्यम असलं पाहिजे हा समीरचा आग्रह आहे.

“यात demystificationचा मुद्दाही आहे.” समीर सांगत होता. “आपल्याकडे ज्ञानाचा बागुलबुवा केला जातो. एकतर ते काहीतरी अत्यंत पवित्र किंवा गुप्त आहे असं भासवलं जातं. असं प्रत्येक क्षेत्रात होतं. रचनाच अशी असते की ते सामान्यांना कळूच नये. पण विज्ञानाश्रमात यंत्र हातात आलं की मुलांना ते प्रथम मोडायला सांगितलं जातं. यंत्र तोडून, मोडून त्याची रचना पाहा असं सुचवलं जातं. मुळात विज्ञान म्हणजे काय? केवळ परीक्षानळी, मायक्रोस्कोप? आणि तंत्रज्ञान म्हणजे काय? त्याचा जीवनाशी काय संबंध आहे, ते समजण्यात, वापरण्यात कुठला आनंद लपलेला आहे हे मुलांपासून लांब ठेवलं जातं. आपला परिसर, आपल्या भोवतीचा निसर्ग हाच केवढा मोठा अभ्यासक्रम आहे हे जीवनोपयोगी कामं शिकून, त्यातले पैशाचे व्यवहार समजून घेऊन विक्रीपर्यंतची कामं तिथं मुलं करतात. प्रयोगातून शिकणं, निरीक्षण करणं, अनुमान काढणं या केवळ प्रयोगशाळेत करण्याच्या गोष्टी नाहीत तर प्रत्यक्ष जीवनातही त्यांचा अवलंब करण्याचं महत्त्व तिथं मुलांवर बिंबवलं जातं. कार्यकेंद्रित शिक्षण हा तिथल्या शिक्षणाचा गाभा आहे, म्हणून विज्ञानाश्रमावर फिल्म करायचं ठरवलं.

“World of Work आणि World of Education ही दोन स्वतंत्र विश्वं असतात असा समज आहे. काम वेगळ्या लोकांनी करायचं असतं आणि ज्ञान वेगळ्या लोकांनी घ्यायचं असा समज समाजात खोलवर रुजलेला आहे, पण ही दोन्ही जगं एकत्र आणायला पाहिजेत हा विचार तिथं केलेला आहे.”

समीर सांगत होता, की “आपली शैक्षणिक धोरणं सारखी बदलत असतात. पण पुढच्या पन्नास वर्षांसाठी काय धोरण असायला हवं, पुढच्या पन्नास वर्षांतलं शिक्षण कसं असेल त्या दिशेनं आमचा प्रवास आहे. तशी मांडणी आम्ही करत आहोत. त्यासाठी जनसामान्यांपर्यंत आणि धोरणांपर्यंत पोचणं हे आमचं उद्दिष्ट आहे.”

डॉ.अनिल सदगोपाल यांची ‘उत्पादक काम और स्कूली शिक्षा’ या फिल्ममधली मुलाखत शिक्षणविषयक समजूत स्पष्ट होण्याचा फार महत्त्वाची आहे. गुणवत्‍तापूर्ण शिक्षण सार्वत्रिक करण्यासाठी व्यवस्था आमूलाग्र बदलावी लागेल आणि त्यासाठी दीर्घकाळ काम करावं लागेल याचं भान हा माहितीपट देतो.

ज्येष्ठ विज्ञानप्रसारक अरविंद गुप्ता यांच्याशी या ग्रूपची वैचारिक जवळीक आहे. रमेश पानसे यांच्याही विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. पानसे यांनी मानवी मेंदूच्या शिकण्याच्या क्षमतांच्या संदर्भात मांडलेल्या विचारांची बैठक त्यापाठीमागे आहे.

समीरच्या शिक्षणविषयक या फिल्म्स तीन स्तरांवर काम करतात. जे शिक्षक आहेत त्यांना त्यातल्या methodologies दिसतात. ‘मूलगामी’ बघून अनेक शिक्षक म्हणतात- आम्ही अशाच पद्धतीनं गणित, भूगोल, भाषा शिकवू. किंवा काही वेळा त्यांना वाटतं, की हे सगळं चित्र फिल्ममधून ‘छान छान’ दिसतं, पण आम्ही ते तसं शिकवू शकू का? आम्हाला तसं स्वातंत्र्य आहे का? जे या मेथडॉलॉजीच्या पलीकडे जातील त्यांना त्यातून शिक्षणशास्त्र जाणवू लागेल. शिक्षण का, कसं आणि कशासाठी या प्रश्नांपर्यंत पोचतील, शाळापातळीवर त्याचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करतील आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यापाठीमागचं राजकारण, अर्थकारण, समाजकारण आहे त्यात उतरावं लागेल. भूमिका घ्यावी लागेल. हे झालं शिक्षणक्षेत्रातबाबत. पण ”हे केवळ शिक्षणाच्‍या क्षेत्रापुरतं सीमित नाही. भूमिका घेणं हे सर्वच क्षेत्रांशी संबंधित आहे. भारतीय माणसाच्‍या समग्र जीवनाशी संबंधित आहे. आज माझ्या अस्तित्वाला हीन लेखलं जातं, तू मूर्ख आहेस, कनिष्ठ आहेस, असं सांगितलं जातं. त्याविरुद्ध हे आवाज उठवणं आहे. भारतीय व्‍यवस्‍थांचं सार्वभौमत्‍व जतन करण्‍याची भावना त्‍या इथलं शिक्षण कसं असावं हे मेकॉलेच्‍या काळात बाहेरच्‍या लोकांनी ठरवलं आणि आज अशी परिस्थिती आहे की, परदेशी कंपन्‍या इथं शाळासुद्धा काढायला निघाल्‍या आहेत. मागे आहे. अशानं काही वर्षांनंतर भारतीय शिक्षणव्यवस्थाच उखडून जाईल, त्याला हा विरोध आहे.” -समीर बजावतो.

“आमच्या या तिन्ही फिल्म्स मिळून हेच मांडायचा प्रयत्न आम्ही केलाय” समीर सांगतो. “प्रत्येकानं आपापल्या स्तरावर याच्याशी जोडून घेणं, त्यात भर टाकणं आवश्यक आहे. किमान react व्हावं असं आमचं म्हणणं आहे.”

समीरच्या ग्रूपनं या फिल्म्स राष्ट्रपतींपर्यंत, राजकारणी, नेते, शासकीय अधिकारी यांच्यापर्यंत पोचवण्याचे प्रयत्न केले आहेत. त्या जनसामान्यांपर्यंत पोचाव्या यासाठी त्यांनी त्या Internet वर मोफत उपलब्ध ठेवल्यात. प्रत्येक फिल्मचं मराठी, हिंदी, इग्रजी भाषांत रूपांतर चालू आहे.

समीरचा ग्रूप विचारवंत वसंत पळशीकर यांच्यावर फिल्म करत आहे. समग्र मानवी जीवन, त्याचं कल्याण, मानवी मूल्यं आणि मानवी भावना वर याव्यात याच्यासाठी अनाग्रही तरीही ठाम पद्धतीनं विचार मांडणारे वसंत पळशीकर यांच्या विचारांचं दर्शन त्यात असेल, ‘स्टोरी ऑफ स्टफ’ या गाजलेल्या फिल्मचं मराठी रूपांतरही शिपूरकर यांच्‍याकडून करण्‍यात आलं आहे. ही फिल्‍म लाख’माला’ची गोष्ट या नावाने प्रसिद्ध करण्‍यात आली आहे.

हे सगळे तरुण स्वत:ला एका व्यापक चळवळीशी -ज्याला आज alternative media किंवा independent media म्हटलं जातं त्याच्याशी जोडून घेतात. समाजाच्या व्यापक हिताशी film making च्या माध्यमातून स्वत:ला जोडून घेतात. त्यांना समाजाकडून पैसे मिळतात तरीही कित्येक वेळा पैसा अपुरा पडतो. ते आपलं कौशल्य, बुद्धिमत्ता, वेळ, पैसा याचं मूल्य करत नाहीत. पण हे कायम स्वरूपी कसं चालणार याची चिंता त्यांना आहे.

अंजली कुलकर्णी : 3-विघ्नहर अपार्ट, जयवर्धमान सोसायटी, बिबवेवाडी रस्ता, पुणे 411037

भ्रमणध्वनी : 9922072158, इमेल : anjalikulkarni1810@gmail.com

समीर शिपूरकर, मोबाइल – 9422089310, इमेल – sameership@yahoo.com 

हे झालं शिक्षण क्षेत्राबाबत. पण “हे केवळ शिक्षणाच्या प्रश्नापुरतं सीमित नाही. भूमिका घेणं हे सर्वच क्षेत्रांशी संबंधित आहे. भारतीय माणसाच्या समग्र जीवनाशी संबंधित आहे, आज माझ्या अस्तित्वाला हीन लेखलं जातं, ‘तू मूर्ख आहेस, कनिष्ठ आहेस’ असं सांगितलं जातं. त्याविरुद्ध हे आवाज उठवणं आहे. भारतीय व्यवस्थांचं सार्वभौमत्व जतन करण्याची भावना त्या पाठीमागे आहे. इथलं शिक्षण कसं असावं हे मेकॉलेच्या काळात बाहेरच्या लोकांनी ठरवलं. आणि आता अशी परिस्थिती आहे की परदेशी कंपन्या इथं शाळासुद्धा काढायला निघाल्या आहेत. अशानं काही वर्षांनंतर भारतीय शिक्षणव्यवस्थाच उखडून जाईल, त्याला हा विरोध आहे.” -समीर बजावतो.

About Post Author

Previous articleस्वस्तिक – भारतीय संस्कृतीचे मंगल प्रतीक
Next articleदेऊळ, लवासा आणि विकास
अंजली कुलकर्णी या पुण्‍याच्‍या कवयित्री. त्‍यांनी आतापर्यंत काव्‍यसंग्रह, ललित लेखसंग्रह, संपादीत अशी एकूण बारा पुस्‍तके लिहिली आहेत. त्‍यांनी लिहिलेले 'पोलादाला चढले पाणी' हा रशियन कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्‍यांनी अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीतून अनुवाद केले आहेत. त्‍यांच्‍या लेखनाला आतापर्यंत महाराष्‍ट्र राज्‍य शासन, यशवंतराव प्रतिष्‍ठान यांसारख्‍या संस्‍थांकडून अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी - 9922072158

2 COMMENTS

  1. वैचारिक व अन्तर्मुख करणारे,…
    वैचारिक व अन्तर्मुख करणारे, अप्रतिम कार्य.

Comments are closed.

Exit mobile version