अलिबागचा पांढरा कांदा

4
130
carasole

अलिबाग गावाचे शहर कधी झाले, ते स्थानिकांना उमगलेच नाही. आता तर अलिबाग आतून बाहेरून बदलले आहे.

अलिबागच्या दोन गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत. एक म्हणजे अलिबागचा ‘कुलाबा किल्ला’ आणि दुसरी गोष्ट म्हणजे अलिबागचा ‘पांढरा कांदा’. आजही, अलिबागच्या पांढ-या कांद्याची चव कोणालाच ऐकणार नाही. दसरा झाला, नवान्न पौर्णिमा झाली, की दिवाळीचे वेध लागतात. मग कांद्याचे वाफे रस्त्याच्या दोन्ही बाजूंला दिसू लागतात.

अलिबाग तालुक्याचे जमिनीच्या बाबतीत दोन भाग. पहिला भाग खाडी किना-याचा खारेपाट व दुसरा भाग गोड्या जमिनीचा दुपिकी. गोड्या शेतीमध्ये एकदा का भाताची कापणी झाली, की जमीन ओलसर असतानाच नांगरणी सुरू होते. कार्लेखिंड उतरली, की पार रामराजपर्यत मेहनती शेतकरी जमिनीच्या ओलाव्याचा फायदा करून घेतात. तोंडलीचे मांडव उतरवून ठेवले जातात. तग धरून राहिलेले तोंडलीचे वेल बांधावर लावले जातात. त्यांच्या आडोशाने झेंडू, डेलिया, टपका, जर्मन, ऊनपावसाची फुलझाडे यांची रोपे लावली जातात व बाकी पालेभाजीची पेरणी सुरू होते. पांढऱ्या कांद्याची लागवड चांगली उघडी तपाटीची (ऊन पडणारी जागा) जागा बघून अलिबाग ते कार्लेखिंड या परिसरात सुरू होते. कांद्याचे अस्सल गावठी बी मळ्यातच पिढीजात पद्धतीने तयार केले जाते.शहाणा शेतकरी ‘हायब्रिड’ कांदयाच्या पाठी लागत नाही.बियाण्यासाठी एखादा वाफा दरवर्षी राखून ठेवला जातो आणि बोंडातून पांढ-या कांद्याचे काळे रवाळ बी जमवले जाते.

रोपे पारंपरिक पद्धतीने दिवाळीला तयार होतात. बी शेताच्या वरकस (शेतातील लागवडीखाली नसलेली मोकळी जागा) भागात काळजीपूर्वक पेरले जाते. वाळू किंवा माती मिसळून छान पेरणी झाल्यानंतर पेंढ्याच्या उबेखाली रोपे तयार होतात. कापणीनंतर मोकळ्या शेतात चांगली नांगरणी धरून ओल्या मातीतच हातभर अंतराचे चौकोनी वाफे आणि पाण्याचे दांडे बनवले जातात. शेताच्या कडेने कोबी, अल्कोल (भाजीचा प्रकार, नवलकोल), वांगी, टोमॅटो लावून नाहीतर फुलझाडे लावून पाण्याचा थेंब आणि थेंब वापरण्याचे नियोजन केले जाते.

कांद्याची वितभर रोपे वाफ्यात दलदल करून पुन्हा टाचली जातात. लावणी कुशल हाताने केली जाते. शेण, मच्छीचा कूट या नैसर्गिक खतावर पूर्वी कांदे जोपासले जायचे. त्यांचा गोडवा कायम राहवा व ते लवकर नासू नयेत म्हणून काळजी घेतली जाई. आता, कांद्याचा आकार युरिया आणि सुफला खतांच्या माऱ्यावर मोठा केला जात असला तरी जाणकार खवय्ये माळणीकडे खतावरचे कांदे न घेता कुट्यावरचे (सुकलेल्‍या मासळीचे नैसर्गिक खत) कांदे घेण्यास पहिली पसंती दाखवतात.

पाण्याचे डोरे व पकटी (कच्‍ची विहीर व त्‍यावर पाणी बाहेर काढण्‍यासाठी केलेली बांबूंची व्‍यवस्‍था) या दोन गोष्टी कमी झाल्या असल्या तरी शेतातच खट्ट करून ‘शेकटी’ बनवली जायची. आडवे वासे टाकून डोऱ्याच्या मध्यापर्यंत जाण्याची सोय असायची. माणूस बांबूच्या व फळीच्या आधाराने तेथे जाऊन बांबूच्या टोकाला अडकावलेली बादली डोऱ्याच्या पाण्यात टाकायचा. खेचण्यास त्रास होऊ नये म्हणून त्या बांबूला आडवा वासा जोडून त्याच्या मागच्या टोकाला एक जाते नाहीतर मोठा दगड बांधलेला असायचा. वाशाच्या मागील बाजूला केलेल्या वजनामुळे विनासहाय भरलेली पाण्याची बादली वर यायची आणि मग छोट्या दांड्यातून पाणी झुळझूळ करत फिरायचे, अगदी शांतपणे. ते पाणी प्रत्येक वाफ्याला समान प्रमाणात पसरले जायचे. पांढऱ्या कांद्याची रोपे आधी आठवड्यातून तीन वेळा, मग दोन वेळा पाण्याची अशी पाळी देऊन जोपासली जात. शेतकरी मार्गशीर्षात मुबलक भाजीपाला अलिबागकरांना पुरवतात आणि त्या पाठोपाठ कांद्याच्या वेण्या बांधण्याचा सीझन सुरू होतो.

कांद्याच्या वेण्या ही अलिबागची स्पेशालिटी. अगदी ‘पेटंट’ म्हणायला हरकत  नाही! कांद्याची उपटलेली रोपे शेतातच आडवी करून ठेवली जातात. पहाटेच्या दवात त्याच्या लडी तयार करतात. लडी एकत्र बांधून कांद्याची माळ तयार केली जाते. अनेक घरांत श्रावण येईपर्यंत पांढरा कांदा खाण्यास पुरला पाहिजे असा आग्रह असतो. म्हणून एखाद्या खोलीत बांबू अडकावलेला दिसतो. त्याच्यावर रांगेत माळा लटकावल्या जातात. चुलीवरील तवीतील (एक भांडे) कालवण आणि कोलम जातीचा भात, समोरच्या माळेतून ओढून काढलेले एक-दोन कांदे… तेथेच मुटका मारून कांदा फोडायचा आणि त्याच्या चवीने मनसोक्त जेवण हा अलिबागकरांचा खास ब्रह्मानंद! ‘तुमच्या चायनिजला व कॉण्टिनेण्टलला त्याची सर येणार नाही’ – ही अस्सल अलिबागकरांची भावना.

शेकटाच्या शेंगाचे आंबट वरण किंवा वालाच्या दाण्यांची आमटी असो, आख्खे कांदे टाकल्यावर त्याची चव ज्याला माहीत नाही तो खरा ‘अलिबागकर’ असूच शकत नाही. पांढरा कांदा अनेक रोगांवर रामबाण उपचार ठरायचा. भाजलेला कांदा व ओवा यांचे उपचार पोटांच्या विकारावर गावात चालायचे. तापात कांद्याच्या रसाच्या घड्या कपाळावर पडायच्या. गरिबाच्या घरी पाहुण्याला गावठी टोमॅटो, पांढरा कांदा, खोबरे यांची कोशिंबीर मिळाली नाही तर ताट अपुरे वाटायचे.

होळीच्या दरम्यान वडाच्या पारंब्याला रस्त्यालगत त्या माळा अडकावून येणा-या जाणा-याचे  लक्ष वेधले जाते. उरलेले शेतकरी मुंबर्इच्या पोराची मनीऑर्डरची वाट न बघता असा शेतमाल विकून त्यांचे दिवस ढकलत असतात. कांद्याच्या माळांच्या जोडीला गावठी भाजीही विकली जाते.

आठवडा बाजारात माळणी टोपल्यांतून कांद्यांच्या माळा आणतात. ते मणाच्या भावात मोजले जातात. किंमत मणाची सांगितली जाते व एखादा नवखा पाहुणा माळ्याच्या जोडीचा भाव ठरवतो. माहेरकरणींना आगोटीच्या (पावसाळ्यासाठी खाद्यपदार्थांची तयारी करून ठेवणे.) सामनाबरोबर कांद्याच्या माळा, चिंचेचे गोळे आणि पायलीभर वाल दिले जातात.

पांढरेच दिसणारे मोठे कांदे देशावरून आले तरी अलिबागवर प्रेम करणा-याची चव बदलली नाही. अलिबागच्या कांद्याची मागणी वाढतच राहिली.

बिल्डरांचे व उद्योजकांचे लक्ष अलिबागच्याही जमिनींवर गेले. विकास आराखडावाल्यांनी बहुतेक जमिनी निवासी क्षेत्र म्हणून जाहीर केल्या. जमिनीचा तुकडा विकला तरी लाखो रुपये येऊ लागले. गावठाणे विस्तारत गेली. शेताच्या वाटण्या पडल्या. अलिबागला सूज आल्यासारखे ते शहर तिन्ही बाजूंला फोफावत गेले. सारवलेल्या घरात राहण्याचा कंटाळा आला. टप्याटप्याने त्यात बदल होत गेले. मोजार्इक टार्इल्स नंतर स्पार्टेक आली. तिचाही कंटाळा आल्यानंतर मार्बोनार्इट लादी बसली. कौले काढून स्लॅबची घरे झाली. अलिबागकर सुधारले पण पांढऱ्या कांद्याचा भाव वाढतच गेला. माळेची किंमत शंभर-सव्वाशे रुपयांवर जाऊन पोचली. आता दोन-चार माळा घरी येतात. मुलांना पावभाजीवर लाल कांदा फूड प्रोसेसरमधून बारीक चिरून लागतो. मुठीने कांदा फोडणे त्यांना ‘हायजेनिक’ वाटत नाही. होळी होताच खतावर वाढलेले कांदे माळेतून गळू लागतात. घरातील ‘सिनिअर सिटिझन’ त्या रोडावत जाणाऱ्या माळेकडे एकटक बघत राहतात आणि त्यांचे दिवस मोजत राहतात.
पांढरा कांदा ही तर तालुक्याची ओळख, पण शहर तिचाच घास घेर्इल, की काय याची काळजी वाटते.

– विलास के. नार्इक 9422 493030/ 9763693030  ,vvkknn26@yahoo.com, vilas@vilasnaik.com

हर्षद कशाळकर लिहितात
पांढऱ्या कांद्याचे पीक अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, काल्रे, तळवली या गावांमध्ये घेतले जात असे. त्यानंतर शेतकरी अलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड करू लागले. पूर्वी अलिबाग तालुक्यात शंभर हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड होत असे. कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाऊ लागली. मागील वर्षी दोनशेनव्वद हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. अलिबाग तालुक्यात दोनशेपंचेचाळीस हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.

 

About Post Author

Previous articleदीपक कलढोणे यांची संगीत मुशाफिरी
Next articleप्रतिभावंत कवी संजीव!
अॅड. विलास नाईक हे मूळचे अलिबागचे. ते गेले सव्‍वीस वर्ष वकिली करत आहेत. त्‍यांनी जिल्हा सरकारी वकील आणि विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे. ते अनेक बॅंका, सहकारी संस्था, नगरपालिका, महानगरपालिका व सरकारी कंपन्या यांचे कायदेशीर सल्लागार आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'एक ना धड' व 'कळत नकळत' ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'एक ना धड' या पुस्तकाला कै. राजा राजवाडे साहित्य पुरस्कार मिळाला आहे. नाईक यांना रायगड जिल्हा परिषदेने 'रायगडभूषण' पुरस्काराने गौरवले आहे. तसेच वकील व्यवसायातील योगदानाबद्दलच 'अॅड. दता पाटील स्मृती पुरस्कार' देण्यात आला आहे. नाईक यांचे लेखन अनेक वृत्‍तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. ते एक उत्तम वक्ता, चित्रकार, लेखक, निवेदक व प्रतिथयश वकील म्हणून परिचित आहेत.

4 COMMENTS

  1. Very nice article..and very
    Very nice article..and very true.as I am from alibag I love the ” pandhre kande””. Thanks for such article..

  2. ऎसे होउ नए यासाठी काय करावे?
    ऎसे होउ नए यासाठी काय करावे?

  3. छान लेख। अलीबाग ची पर्यटन
    छान लेख। अलीबाग ची पर्यटन क्षेत्र या व्यतिरिक्त आणखी एक ओळख सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  4. मी बेळगाव जिल्हा कर्नाटक…
    मी बेळगाव जिल्हा कर्नाटक येथून आहे, आपला लेख वाचला अलिबागच्या कांद्या बाबत छान माहिती मिळाली. आम्हाला रोपे तयार करून देणाऱ्या शेतकऱ्यांचा संपर्कासाठी मोबाईल नंबर मिळतील का?

Comments are closed.