अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती…

0
85
_ambitame_naditame

‘हे नद्यांतील उत्तम, उत्तम माते आणि उत्तम देवी, आम्हा पामरांना ज्ञान आणि विवेक दे.’    

भारतीय समाज आणि संस्कृती यांची पायाभरणी गंगा-यमुना-सिंधू या नद्यांच्या साक्षीने झाली. नदीच्या पात्रात होणारे बदल आणि प्रवाहाच्या सतत बदलत्या दिशा यांनी अनेक शहरांवर महत्त्वाचे परिणाम केले. भारतातील सर्वांत जुनी संस्कृती-सिंधू संस्कृती इसवी सनपूर्व 2700 च्या आसपास वायव्य भारत-राजस्थान-पाकिस्तान या भागांत उदयाला आली. थर वाळवंट, पंजाब, दक्षिण सिंध, सिंधू-घग्गर-हाक्रा नद्यांची खोरी आणि बलुचिस्तान येथे वसलेली पुरातन संस्कृती. त्यांची आखीवरेखीव नगरे, नदीच्या आसऱ्याने वाढलेला तो पहिला नागर समाज. भारताच्या सामाजिक जीवनाचा तो पहिला अध्याय. हडप्पा आणि मोहेंजोदारो यांची नगररचना पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की सिंधू संस्कृती ही खरेच नदीच्या आणि पाण्याच्या आसऱ्याने वाढली होती. मोहेंजोदारोमध्ये उत्खननात सुमारे सहाशे ते सातशे विहिरी सापडल्या. म्हणजेच, त्या शहरातील प्रत्येक व्यक्तीला दर तीस-पस्तीस मीटर अंतरावर पाणी मिळेल अशी सोय केली गेली होती. गुजरातमध्ये धोलवीरा येथे सापडलेल्या अवशिष्ट शहरात जवळून वाहणाऱ्या दोन नद्यांचे पाणी कालवे काढून शहरात आणले गेले होते.

माणूस त्याच ‘कास्ययुगा’त तांबे आणि जस्त यांच्या मिश्रधातूचा उपयोग शिकला. अथर्ववेदात काही जागी ‘कृष्ण आयस’ म्हणजे काळ्या ब्राँझचा उल्लेख येतो व त्या सुमारास लोखंडाचा वापर सुरू झाल्याच्याही काही खुणा दिसतात. त्याच्या बऱ्याच नंतर लिहिल्या गेलेल्या महाभारतात लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेल्याचे दिसते. अथर्ववेदाचा काळ, त्यामुळे इसवी सनपूर्व १७०० च्या आसपास, लोहयुगाच्या सुरुवातीला निश्चित करता येतो. ऋग्वेद हा त्यापूर्वी काही शतके, इसवी सनपूर्व २००० च्या सुमारास रचला गेला. भाषेच्या जडणघडणीकडे पाहिले, तर ऋग्वेद हा इंडोयुरोपीयन भाषेतील सर्वांत जुन्या रचनेत मोडतो. गंगा-सिंधू-सरस्वती-शतद्रू या नद्यांच्या खोऱ्यातील पुरातन ऋषींनी रचलेला तो वेद. भारताचे पहिले साहित्य. सिंधू संस्कृतीच्या भौगोलिक कक्षा गंगेच्या पश्चिम किनाऱ्यापासून ते सिंधूच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत विस्तारलेल्या आहेत. सिंधू संस्कृतीचे अवशेष हरियाणामध्ये आलमगीरपुर, चंडीगढजवळ रोपर, राजस्थानात कुणाल, गुजरातेत लोथल आणि धोलवीरा, कालीबंगा, पाकिस्तानात हडप्पा, घणेरिवाला, मोहेंजोदारो, मेहरगढ आणि अफगाणिस्तानात मुण्डिगाक येथे सापडले आहेत. ऋग्वेदाच्या भौगोलिक कक्षा साधारण गंगेचा पश्चिम किनारा-हिमालय येथून सुरू होतात आणि त्या गांधार-वायव्य भारत येथे संपतात. ऋग्वेदाच्या त्या भौगोलिक कक्षा हडप्पा संस्कृतीशी मिळतात ही अजून एक लक्षात घेण्याची बाब. असेही म्हणता येईल, की हडप्पा समाज हा अनेक सांस्कृतिक-भाषिक घटकांनी मिळून बनलेला असावा आणि त्याच समाजातील काही लोकांनी ऋग्वेद रचला असावा.

सिंधू संस्कृतीला सिंधू, शतद्रू आणि सरस्वती या नद्यांनी वाढवले- विशेषत: सरस्वतीने. त्या नदीच्या काठी आणि तिच्या आसऱ्याने लोकांची घरेदारे, संसार वसला. तिच्याच पाण्याने त्यांची शेती बहरली आणि पशुधन वाढले. तिच्याच काठावर अनेक यज्ञयाग केले गेले. तिच्या ओघवत्या प्रवाहासोबत अनेक ऋषींच्या, कवींच्या प्रतिभेने वेद निर्माण केले. तिच्याच पाण्याचे अर्घ्य ऋषींनी सूर्याला दिले आणि त्यांनी तिच्या पाण्याने दिलेले धान्य इंद्र, सोम आणि वरुणाला वाहिले. ती सगळी संस्कृती पाण्यावर वाढली. त्यामुळे सारे वेद साहजिकच सरस्वतीचे गुण गातात, तिची स्तुती करतात. ऋग्वेद तर सरस्वतीच्या काठी रचला गेला. त्यात गंगा व सिंधू यांचे उल्लेख येतात, पण सरस्वती नदी ऋग्वेद रचनाकारांनी विशेष पूजली आहे. ऋग्वेद रचणाऱ्या कवींनी केलेली नद्यांची सुंदर वर्णने पहिल्या मंडलापासून वाचण्यास मिळतात. ऋग्वेदकर्त्यांनी दहाव्या मंडलाच्या नदीस्तुती सूक्तात पूर्व ते पश्चिम अशा सर्व नद्यांना आवाहन केलेले आहे –

‘हे गंगे, यमुने, सरस्वती, शतद्रू (सतलज), परुष्णी (इरावती-रावी), मी केलेली स्तुती ऐका! हे असिक्नी (चिनाब), मरुद्विधा, वितस्ता (झेलम) तुम्ही अर्जिक्या आणि सुषोमे यांच्यासोबत माझे आवाहन ऐका. तुम्ही प्रथम तृष्टमा, सुसर्तु, रसा आणि श्वेत्या यांच्यासोबत वाहता आणि मग हे सिंधू, तुम्ही कुभा (काबुल), गोमती (गोमल), मेहत्नू आणि कृमू (कुर्रम) यांच्यासोबत पुढे जाता.’

इमंमें गङ्गे यमुने सरस्वति शुतुद्रि स्तोमं सचता परुष्णया।     
असिक्न्या मरुद्धधे वितस्तयार्जीकीये शृणुह्या सुषोमया? 
तृष्टामया प्रथमं यातवे सजू: सुसर्त्वा रसया श्वेत्या त्या। 
त्वं सिन्धो कुभया गोमतीं क्रुमुं मेहत्न्वा सरथं याभिरीयसे? (10.75.5-6) 

त्या सुक्तातील क्रम पाहिला, तर ऋग्वेदाच्या भौगोलिक कक्षा पूर्वेला गंगा ते पश्चिमेला कुभा अशा मानता येतात. त्याचप्रमाणे सरस्वतीचे भौगोलिक स्थान गंगा- यमुना आणि शतद्रू यांच्यामध्ये निश्चित करता येते. ऋग्वेद म्हणतो, ‘हे नद्यांतील उत्तम, उत्तम माते आणि उत्तम देवी, आम्हा पामरांना ज्ञान आणि विवेक दे.’ 

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति। 
अप्रशस्ता इव स्मसि प्रशस्तिमम्ब नस्कृधि (2.41.16) 

सरस्वतीच्या पाच उपनद्या आहेत असा उल्लेख यजुर्वेदात (34.11) येतो. त्या पाच नद्या वेगाने सरस्वतीकडे जातात आणि नंतर त्या सरस्वतीच होऊन जातात असे म्हटले आहे. काही अभ्यासकांच्या मते, त्या पाच नद्या म्हणजे दृषद्वती (चौतांग?), सतलज, रावी, चिनाब आणि बियास या असाव्यात. सरस्वतीचा उल्लेख ‘वाग्देवी’ म्हणून यजुर्वेदातच नंतर आलेला आहे. त्या नदीच्या काठी रचले गेलेले वेद आणि ऋग्वेदापासून बुद्धी, मेधा आणि प्रतिभा यांच्याशी असलेला तिचा संबंध याची परिणती शेवटी तिला देवत्व प्राप्त होण्यात झाली असावी. ती ब्रह्माची पत्नी ज्ञान आणि सृजन यांच्या अतूट नात्याने झाली आणि सृजनातून निर्माण होणारी कल्पनाशक्ती आणि प्रतिभा यांचे प्रतीक म्हणून ती ब्रह्माची मुलगी अशीदेखील मान्यता पावती झाली.

त्याच नदीला अथर्ववेदात ‘धान्यदात्री’ म्हणून पूजलेले आहे. सरस्वतीकाठी राहणाऱ्या प्रजेला देवांनी मधुर आणि रसपूर्ण गहू दिला. तेव्हा मरुत शेतकरी झाले आणि शंभर यज्ञ करणारा इंद्र त्यांचा स्वामी झाला असे वर्णन अथर्ववेदात येते. सरस्वतीच्या काठी असणाऱ्या विस्तीर्ण शेतजमिनी आणि त्यातून पिकणारा रसाळ गहू; देवांनाही मोह व्हावा, त्यांनीही येऊन नांगर हाती घ्यावा अशी ती जमीन!

त्या सगळ्या वर्णनातून चित्र उभे राहते ते एका लांबरुंद आणि वेगवान नदीचे. हिमनद्या तिला पाणी पुरवतात, अनेक लहानमोठ्या नद्या तिला येऊन मिळतात आणि तीव्र उतारावरून ती गर्जना करत वाहते. ती यमुना-गंगा आणि शतद्रू यांच्यामधून वाहते. ती कुरुक्षेत्राच्या दक्षिणेला आहे. ती सुप्रभा आहे, कांचनाक्षी आहे, विशाला आहे, मनोरमा आहे. तिच्या लाटांनी टेकड्या उद्ध्वस्त होतात. ती धान्य देते आणि देवही तिच्या सुपीक जमिनीत शेती करतात. अनेक लोकांचे ती भरणपोषण करते. तिच्या लाटा विक्राळ आहेत आणि ती सर्व लोकांना पूज्य आहे. ती जगन्माता आहे. नद्यांची आई आहे. तिच्या काठी यज्ञ करणारे ऋषी राहतात. ती त्यांना यज्ञ करण्याची प्रेरणा देते. ती कवींची प्रतिभा होते आणि तिच्या काठावर वेद रचले जातात. ती ज्ञान देते, विवेक देते आणि सन्मार्गाला जाणाऱ्यांवर कृपा करते. एका नदीचे सामाजिक जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारे ते वर्णन! त्या संस्कृतीमध्ये सरस्वती हा फक्त पाण्याचा स्रोत नव्हता. ती आई होती, देवी होती, ज्ञानदात्री होती, अतिशुभा होती. पद्मासना-शुभ्रवस्त्रा-कलाविद्यादायिनी अशी सरस्वती पूजली जाते. तिचे ते आद्य रूप असावे का? सरस्वतीच्या पुरातन मूर्तींमध्ये असणारा कमंडलू, हंस, कमळ ही पाण्याशी निगडित प्रतीके आणि तिने हातात धारण केलेले वेद हे सरस्वतीच्या नदीरूपाचे काही अवशेष असावेत का? नदी ते देवी या स्थित्यंतराचा तो पहिला टप्पा असेल का? काहीही असले तरी ते चित्र एका मोठ्या वेगवान आणि महत्त्वाच्या नदीचे आहे हे निश्चित. हरिद्वार किंवा हृषिकेश येथील गंगा पाहिली, की त्या चित्राची आठवण होते. हिमालयात उगम पावणारी नदी त्या पर्वताच्या उतारावरून भरवेगात खाली येते आणि तिच्या गाळाने मैलो न् मैल जमीन समृद्ध करते.

वेदांनंतर सुमारे हजार ते दोन हजार वर्षांनी लिहिल्या गेलेल्या ब्राह्मणग्रंथांमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसते. पंचविंश ‘ब्राह्मणा’त सरस्वती उगमानंतर सोळाशे मैलांवर ‘विनशन’ या तीर्थात गुप्त झाली असा उल्लेख येतो. जैमिनीय ‘ब्राह्मणा’त सरस्वतीला ‘कुब्जमती’ म्हणजे नागमोडी वळणे घेत वाहणारी असे म्हटले आहे. त्याच ‘ब्राह्मणां’त सरस्वती संथ, शिथिल, भूमिगत झाल्याचे उल्लेख आहेत. त्यानंतरच्या संस्कृत साहित्यात सरस्वती लुप्त झाल्याचे संदर्भ परत परत येत राहतात. पतंजलीने इसवी सनपूर्व २ ते ५ या काळात कधीतरी होऊन गेले. त्यांनी आर्यावर्ताची व्याख्या ‘अदर्शनाच्या पूर्वेला, नैमिषारण्याच्या पश्चिमेला, हिमालयाच्या _ganga_yamunaदक्षिणेला आणि विंध्याच्या उत्तरेला असलेली भूमी’ अशी सांगितली आहे. मनुस्मृतीमध्ये  द्रिशद्वतिच्या आणि सरस्वती या नद्यांच्या मध्ये असलेल्या भूमीला ‘ब्रह्मावर्त’ असे म्हटलेले आहे. सरस्वतीचा ओझरता उल्लेख विष्णुपुराण आणि मार्कंडेय पुराण यांच्यामध्ये येतो. त्यानंतर जी साहित्यनिर्मिती झाली, त्यात लुप्त सरस्वतीचे उल्लेख सतत येत राहतात. ‘शाकुंतला’त वैतागलेला दुष्यंत एके ठिकाणी त्याच्या रूक्ष आयुष्याची तुलना कोरड्या पडलेल्या सरस्वतीशी करतो! सरस्वती लुप्त झाल्याचा मोठा परिणाम भारतीय साहित्य, संस्कृती आणि भूगोल यांच्यावर झालेला आहे!

नद्या कोरड्या होण्याची कारणे अनेक आहेत. गंगेसारख्या हिमनदीमधून उगम पावणाऱ्या नद्या पाण्यासाठी हिमनदीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. हिमनदीच्या वितळण्याचे प्रमाण आणि पर्यायाने पृथ्वीचे तापमान यांवर lशा नद्यांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. कृष्णा, गोदावरी, नर्मदा या नद्या पावसावर अवलंबून असतात आणि त्या जोडीला त्यांच्या उपनद्या त्यांना पाणी पुरवतात. त्यांतील कोठल्याही गोष्टीत घडलेला बदल नदीच्या प्रवाहावर आणि पर्यायाने आजूबाजूच्या जीवसृष्टीवर परिणाम करू शकतो. नदी कोरडी होण्याचे मुख्य कारण म्हणजे नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या हिमनद्या-उपनद्या यांच्यात होणारे बदल किंवा पाऊस-हवामान यांच्यातील बदल. त्यामुळे नदीचा पाणीपुरवठा अचानक बंद होणे, पावसाळा आणि बाकीचा काळ यांच्या गणितात काही गोंधळ झाला तरीही नदीच्या प्रवाहावर त्याचा परिणाम होतो. नदीला वेगवान पूर कमी काळात जोरदार पाऊस आणि बाकीचा पावसाळा कोरडा अशा स्थितीत येतात, पाणी पात्रात टिकत नाही आणि नदी बाकीचा काळ कोरडीच राहते. प्रत्येक नदीच्या प्रवाहात किती पाणी वाहू शकते आणि किती पाणी जमिनीत मुरते याचा एक समतोल असतो. ते जमिनीत मुरणारे पाणी आणि प्रत्यक्ष प्रवाहात वाहणारे पाणी यांचा समतोल बिघडला तर नदीच्या पुराची तीव्रता अचानक वाढते. शहरीकरणामुळे अनेक नद्यांचे पाणी जमिनीत मुरू शकत नाही आणि म्हणूनच त्या नद्यांना तीव्र आणि दीर्घकाळ टिकणारे पूर येतात. तसे तीव्र पूर नदीच्या किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर झीज करतात आणि मग नदीच्या पात्राची रुंदी आणि त्यातून वाहणारे पाणी याचे प्रमाण फिसकटते, पर्यायाने नदीचा वेग मंदावतो. थोडक्यात, नदी कोरडी होणे किंवा लुप्त होणे ही सगळी प्रक्रिया अतिशय संथ असते आणि तिचा वेग अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यातही सरस्वतीसारखी मोठी नदी असेल तर त्या प्रक्रियेला अजून वेळ लागतो.

सरस्वती नदी कोरडी होण्याची सुरुवात इसवी सनपूर्व 2100 च्या आसपास झाली आणि ती पूर्णपणे लुप्त साधारण इसवी सनपूर्व 1000 च्या सुमारास झाली. त्या लुप्त होण्याचे अनेक उल्लेख आणि कथा वेद आणि ब्राह्मणोत्तर साहित्यात येत राहतात.

‘सरस्वती’ नदी म्हणजे सरोवरांनी भरलेली असे वर्णन महाभारतात आहे. तिच्या सरोवरात हंस, क्रौंच विहार करतात तेथे आहे आणि महाभारत तिच्या गुप्त होण्याचे ठिकाण विनाशन, अदर्शन किंवा कुरुक्षेत्र आहे असेही सांगते. महाभारताच्या शल्यपर्वात, युद्ध हरलेला दुर्योधन जेव्हा सरोवरात लपतो आणि पांडव त्याला शोधत येतात तेव्हा तीर्थयात्रेहून परतलेला बलराम तेथे दाखल होतो. त्या ठिकाणी बलरामाच्या तीर्थयात्रेचे मोठे वर्णन आहे. बलरामाने किती आणि कोणती तीर्थे पाहिली, तेथे किती गायी दान केल्या, किती आणि कसे यज्ञ केले याचे लांबलचक वर्णन तर कंटाळवाणे आहे, पण त्या वर्णनात सरस्वती गुप्त होण्याच्या अनेक कथा सापडतात. सरस्वती हिमालयात ‘पलक्ष’ येथे उगम पावते, विनाशनामध्ये गुप्त होते आणि शिवोद्भेद व नागोद्भेद येथे पुन्हा प्रकट होते असे महाभारतात सांगितले आहे. सरस्वती पुष्कर-कुरुक्षेत्राजवळ अनेक सरोवरे निर्माण करते असेही वर्णन काही ठिकाणी आहे. विश्वामित्राने जेव्हा वसिष्ठाच्या मुलांचा वध केला, तेव्हा वैतागलेल्या वसिष्ठाने हातपाय बांधून नदीत उडी घेतली, पण नदीने त्याची बंधने सोडवली. ती नदी म्हणजे विपाशा (बियास). नंतर, त्याने दुसऱ्या नदीत उडी मारली, तर त्याच्या तेजाने घाबरून नदी शंभर धारांनी वाहू लागली, ती म्हणजे शतद्रू (सतलज). यजुर्वेदात सतलज ही सरस्वतीची उपनदी आहे असे म्हटले आहे. तिच्या पात्रात झालेला तो बदल आणि सरस्वतीचे गुप्त होणे यांचा काही संबंध असेल का? बलरामाने त्याची आज्ञा मोडणाऱ्या यमुनेला नांगराने खेचून आणले अशी कथा हरिवंश पुराणात येते. यमुना आणि सतलज यांच्या पात्रांतील ते बदल नक्की काय सुचवतात? उथत्य ऋषीने त्याची बायको पळवणाऱ्या वरुणाला वठणीवर आणण्यासाठी साठ हजार सरोवरे रिती केली आणि सरस्वतीला लुप्त होण्याची आज्ञा दिली अशीही एक कथा महाभारतात येते. म्हणजे महाभारत काळात, पुष्कर आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर सरोवरे असावीत का? अंदाजाला निश्चित जागा आहे. मग प्रश्न असा पडतो, की उगमापासून साधारण दोन-तीनशे किलोमीटर अंतरावर वेगाने वाहणारी सरस्वती, सरोवरे निर्माण होण्याइतकी संथ का झाली? वेदोत्तर साहित्य आणि महाभारत यांत सांगितलेली गुप्त होण्याची ठिकाणे अधिकाधिक पूर्वेला कशी काय आहेत?

प्रत्येक नदीच्या आयुष्याचे तीन टप्पे असतात : तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य. ते टप्पे नदीचा उतार, प्रवाहाचा वेग, झीज करण्याची क्षमता आणि उगमापासून कापलेले अंतर यांवर ठरतात. नदी उगम पावल्यानंतर काही अंतर तरुण असते. तरुण नदी तीव्र उतारावरून वाहते, तिच्यामध्ये मोठे धबधबे, भोवरे असतात आणि तिचा प्रवाह प्रचंड वेगवान असतो. तरुण नद्या शक्यतो सरळ रेषेत वाहतात. नदी मोठाले धोंडे त्या स्थितीत सहज वाहून नेते. तरुण नदीच्या पात्राची खोली रुंदीपेक्षा साहजिकच जास्त असते, कारण पाण्याच्या वेगाने होणारी झीज काठापेक्षा पात्रामध्ये अधिक प्रमाणात असते. नदीची रुंदी पुढे पुढे वाढते आणि खोली कमी होत जाते. जसा उतार कमी होतो तशी नदी ‘प्रौढ’ होते आणि तिचा वेग साहजिकच कमी होतो. नदीचे पात्र त्या टप्प्यात रुंद होते आणि ती नागमोडी वळणे घेत वाहते, कारण वाटेत येणारे अडथळे ओलांडून जाण्याइतका वेग पाण्याला तेव्हा नसतो. नदी समुद्रापाशी पोचते तेव्हा ती ‘वृद्ध’ होते. नदीचे पात्र त्या टप्प्यावर अजून रुंद होते आणि वेग अजून कमी होतो. त्या वेळेस समुद्राचे पाणी नदीच्या पात्रात घुसून खाडी निर्माण होते. वेग अतिशय कमी झाल्याने उरलासुरला सगळा गाळ संगमापाशी जमा होतो आणि सुंदरबनसारखे त्रिभुज प्रदेश निर्माण होतात. हे नदीच्या त्या तीन अवस्थांचे उत्तम उदाहरण म्हणजे जबलपूर, भेडाघाट येथील नर्मदा, ओमकार-महेश्वर येथील नर्मदा आणि भडोच येथील नर्मदा आहे. नर्मदा ही जबलपूरपाशी धुवांधार धबधबे निर्माण करणारी, भेडाघाटला खोलच खोल दरी कापून काढणारी अशी तरुण आहे, नर्मदा ओंकार-महेश्वर येथे नागमोडी वाहणारी प्रौढ आहे आणि नर्मदा ही भडोचला विस्तीर्ण पात्र असलेली शांत, वृद्ध आहे.

सरस्वतीचे ऋग्वेदातील वर्णन पाहिल्यावर वाटते, की त्या ऋषींनी सरस्वती कोठेतरी उत्तरेला पंजाब किंवा हरियाणा येथे तिच्या ऐन तारुण्यात बघितली असावी. तो तरुण अवस्थेचा टप्पा पुढील हजार-दोन हजार वर्षांत उत्तरेला सरकत गेला आणि समुद्राला जाऊन मिळणारी सरस्वती मध्येच कोठेतरी लुप्त झाली. ‘ब्राह्मणां’नी वर्णन केलेली कुब्जमती हे नदीच्या संथ, शिथिल अशा प्रौढ अवस्थेचे उदाहरण आहे, तर कुरुक्षेत्राजवळ सरोवर निर्माण करणारी सरस्वती जवळजवळ वृद्धावस्थेतील आहे. प्रवाहाचा वेग पाण्याचा पुरवठा नसल्याने कमी कमी होत गेला असावा किंवा अजून काही कारणांनी, जमिनीचा उतार आणि प्रवाहाचा वेग यांत काहीतरी गडबड झाली असावी.

सिंधू संस्कृतीचा उत्कर्षाचा काळ इसवी सनपूर्व 2600 ते 1900 हा होता. त्या संस्कृतीच्या लयाची सुरुवात १८००-१७०० मध्ये झाली. गंगेच्या खोऱ्यात वस्ती साधारण इसवी सनपूर्व 1200 मध्ये सुरू झाली. काही लोक नर्मदेजवळ गेले, तर काही विंध्य ओलांडून अजून दक्षिणेला गेले. सरस्वती गुप्त होण्याचा काळ हा साधारण त्याच काळाशी जुळतो, कारण त्यानंतरच्या सगळ्या साहित्यात सरस्वती गुप्त झाल्याचे उल्लेख दिसतात. सिंधू संस्कृतीच्या पुरातत्त्वीय अवशेषांची अनेक ठिकाणे ही मुख्यत्वे घग्गर-चौतांग नद्यांच्या काठी आणि त्या नद्यांसोबत पार चोलीस्तानपर्यंत विखुरली गेली आहेत. सिंधू संस्कृतीचे अवशेष पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत घग्गर आणि चौतांग नद्यांच्या खोऱ्यात जवळपास चोवीसशे ठिकाणी मिळाले आहेत. तुलनेत, ते अवशेष गुजरात, पाकिस्तान (सिंधू) आणि इतरत्र चौदाशे ठिकाणी सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीच्या उत्कर्षकाळातील सुमारे एक-तृतीयांश अवशेष तर फक्त सरस्वतीच्या खोऱ्यात मिळाले आहेत. अवशेषांची ती संख्या असे सांगते, की सिंधू संस्कृती मुख्यत्वे घग्गर-चौतांग (म्हणजे सरस्वती-दृषद्वती) नदीच्या आसऱ्याने वाढली आणि तिच्यासोबतच लयाला गेली. ती प्रक्रिया साहजिक वाटते, कारण ज्या नदीवर जास्तीत जास्त लोकसंख्या अवलंबून होती, ज्या नदीला देवता मानून पूजले गेले, तीच नदी कोरडी झाल्यावर लोक जाणार तरी कोठे? एक संस्कृती, एखादा समाज नदीवर जर इतका अवलंबून असेल, तर त्या नदीसोबत त्या समाजाचा ऱ्हास होणारच. प्रश्न असा पडतो, की इतकी प्रचंड नदी लुप्त झाली तरी कशी आणि आज ती आहे कोठे?

आज त्या भागाचा भूगोल पाहिला, तर शिवालिक टेकड्यांमधून तीन नद्या उगम पावताना दिसतात. अंबाला हा जर मध्यबिंदू धरला तर दक्षिणेला चौतांग-मार्कंडा, उत्तरेला डांगरी आणि तिच्याही उत्तरेला एक क्षीण प्रवाह दिसतो ती घग्गर. घग्गर अजून उत्तरेला, शिवालिक टेकड्यांच्या वर दग्शाई या खेड्यापाशी उगम पावते आणि तेथून दक्षिणेला राजीपूर-पिंजोर येथे सपाटीवर येते. पंचकुलामार्गे चंदिगढमध्ये प्रवेशताना एक अत्यंत लहानशी, छोट्या टेकड्यांनी वेढलेली नदी ओलांडून जावे लागते. तीच ती घग्गर. ती पंचकुला-धाकोली येथून अजून उजवीकडे वळते आणि अंबालाच्या उत्तरेकडून हरियाणामध्ये प्रवेशते. तेथून पुढे ती ‘हाक्रा’ हे नाव घेऊन राजस्थानात जाते आणि अनुपगढजवळ भारताची सीमा ओलांडते. ती तेथून पुढे पाकिस्तानात ‘नरा’ या नावाने दक्षिणेला वळून चोलीस्तान वाळवंटात लुप्त होते. घग्गर ही एक सर्वसामान्य नदी आहे. ती फक्त पावसाळ्यात वाहते. तिला बाकीच्या वेळी पाणी नसते. राजस्थानात आणि पंजाबात तर त्या नदीचे विस्तीर्ण पात्र कधीकधी कोरडे पडलेले दिसते, पण भूगोल, इतिहास आणि भूगर्भशास्त्रातील अनेक पुरावे, वेदांनी दिलेले भौगोलिक संदर्भ नि:संशय निर्वाळा देतात, की अत्यंत सर्वसामान्य असलेली कोरडी, केविलवाणी घग्गर हीच सरस्वती आहे. तिच्या बाजूच्या डांगरी, मार्कंडा आणि चौतांग या नद्याही तशाच केविलवाण्या आणि कोरड्या. एकूणच सतलज आणि यमुना यांच्यामधून वाहणाऱ्या त्या नद्या पावसाळी काळात वाहणाऱ्या आणि त्यांची पात्रे मर्यादित _sindhukalin_bahulyaअसलेली. त्यांच्या दोन्ही बाजूंचा प्रदेश मात्र यमुना, गंगा, सतलज, रावी, बियास अशा भरभरून वाहणाऱ्या मोठमोठ्या नद्यांनी व्यापलेला आहे. लक्षात घेण्याजोगी अजून एक गोष्ट म्हणजे सिंधू ते घग्गर या सगळ्या नद्या नैऋत्येला वाहणाऱ्या, साधारण समांतर आहेत, तर यमुनेपासून पूर्वेच्या नद्या या आग्नेयेला जाणाऱ्या. यमुना काही अंतर नैऋत्येला जाते आणि एक सफाईदार वळण घेऊन, परत आग्नेयेकडे वाटचाल करते. त्याचा अर्थ असा, की जमिनीचा उतार यमुनेच्या पश्चिम किनाऱ्यापासून नैऋत्येला आहे आणि तो यमुनेच्या पूर्वेपासून आग्नेयेला आहे. यमुना आणि घग्गर यांच्यातील काहीसा उभारीचा प्रदेश त्या दोन्ही उतारांच्या मध्ये भिंत म्हणून उभा आहे. उत्तर भारतात जमीन तशी सपाट, पण तरीही त्या भिंतीच्या दोन्ही बाजूंचे उतार 0.03 टक्के इतके आहेत. म्हणजे शंभर मीटर सरळ रेषेत चाललो, तर जमिनीच्या उंचीमध्ये तीन मीटरचा फरक पडतो. ती सारी व्यवस्था इतक्या नाजूक तोलावर आधारलेली आहे- जमिनीचा उतार अगदी हलकेच कलला, तरी नदीच्या पात्रात आणि प्रवाहात मोठा फरक पडेल अशी. जमिनीचा उतार कसा कलतो? सरस्वतीसोबत दृषद्वतीदेखील कोरडी झाली का? मग चौतांग आणि मार्कंडा या कोणत्या नद्या आहेत? यमुना अचानक आग्नेयेकडे का वळते?

राजस्थानात जैसलमेर ओलांडून पुढे गेलो, की थरची मरुभूमी सुरू होते. तो वाळूचा ऐसपैस समुद्र दोन लाख चौरस किलोमीटरमध्ये, सतलजच्या दक्षिणेपासून कच्छच्या रणापर्यंत पसरलेला आहे. नैऋत्य मान्सून वारे भारतात जूनमध्ये प्रवेशतात. पूर्ण भारतावर वृष्टी करत जेव्हा उत्तरेला जातात तेव्हा अरवली पर्वतांत त्यांच्यातील सगळी आर्द्रता निघून जाते. म्हणजे जो काही पाऊस पडायचा तो अरवलीमध्ये पडतो आणि तेथून वर, राजस्थानात आणि पाकिस्तानात सगळे वारे कोरडे जातात. ते प्रचंड वाळवंट गेली दोन लाख वर्षें अवर्षण असल्यामुळे तयार झाले आहे. ते वेगाने वाढत आहे. त्या मरुभूमीत अनेक जुनीपुराणी ओसाड नगरे आणि वस्त्या गाडल्या गेल्या आहेत. वाळूचे लहान लहान डोंगर घग्गर नदीच्या कोरड्या पात्रात अनेक जागी दिसतात. कितीतरी कल्पे त्यांच्या पोटात दडलेली. बेफाम वेगाने वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्याचा नदीने घडवलेल्या, झिजवलेल्या त्या भूमीवर अंमल आहे. नदीने तयार केलेले काठ, तिचे जुने पात्र, तिने कधी काळी हिमालयातून आणि अरवलीमधून आणलेले धोंडे, गोटे आणि वाळू, पुरांमध्ये तिने आणून टाकलेला सुपीक मऊ गाळ हे सारे वाऱ्याने आणून टाकलेल्या वाळूच्या प्रचंड पडद्याआड गेलेले आहे. नदी जेव्हा नागमोडी वळणे घेत वाहते तेव्हा वळणावर तिचा वेग कमी होतो. तशा वेळी, नदी तिच्यातील गोटे, वाळू हे काठावर टाकून पुढे जाते. त्या जमा झालेल्या थरांमुळे नदीचा वेग अजून कमी होतो आणि ती फक्त वाळू जमा करण्यास सुरुवात करते. नदी तिचे पात्र सोडून पुराच्या वेळी जेव्हा पसरते तेव्हा आजूबाजूच्या जमिनीवर चिखलमातीचा मऊ थर निर्माण होतो. नदी किती अजस्त्र असेल त्याची कल्पना केवळ त्या थरांच्या जाडीमुळे येऊन जाते. कित्येक ठिकाणी, त्या नदीची पात्रे पाच किलोमीटर रुंद दिसतात आणि त्यांच्या काठी वाळूचे अनेक डोंगर. तिच्या काठी कधी काळी नांदती असलेली घरेदारे, गावे काळाच्या पांघरुणात आहेत. कधी कधी, वाळूचे ते पांघरूण काढले जाते आणि सगळा इतिहास बोलका होतो! जुन्या विटा, खेळणी, अलंकार, शस्त्र, मुद्रा, जीवाश्म बाहेर निघतात. जुन्या विहिरी आणि शेते दिसतात. कित्येक नगरांत तर नांगरलेल्या शेतजमिनी वाळूच्या खाली गाडलेल्या सापडल्या. माणसे त्यांच्या शेतीची, नांदत्या घराची, त्यांच्या गावाची पर्वा न करता निघून गेली, ती का? माणसे तशा ओसाड प्रदेशातही राहिली, ती कशाच्या आधाराने? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ते वाळवंट अवर्षणाने निर्माण झाले की त्यातून वाहणारी एकमेव मोठी नदी लुप्त झाल्यामुळे? थर वाळवंटातील सतत बदलत्या हवामानाचे चित्र पाहिले तर लक्षात येते, की तो भाग इसवी सन पूर्व 12,000 पासून तसाच रुक्ष होता. तेथे पाऊस इसवी सनपूर्व 6000 ते 4000, इसवी सनपूर्व 2200 ते 2000 या काळात वाढला आणि त्यानंतर, परत तो प्रदेश कोरडा झाला. म्हणजेच, सरस्वतीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना त्या लहरी हवामानाची सवय होती आणि तशा विचित्र वातावरणात नदी हा त्यांचा एकमेव आधार होता. ती नदी मग बऱ्यापैकी पाऊस पडत असूनही, कोरडी का पडली असावी असा अजून एक प्रश्न उभा राहतो.

नव्या दोन तंत्रांनी प्रश्नांची उत्तरे काहीशी सोपी केली. 1985 च्या सुमारास थर्मोल्युमिनोसन्सडेटिंग आणि आयसोटोपडेटिंग नावाची तंत्रे शोधली गेली. पाण्यात जर का काही अस्थिर अणू असतील, तर त्यांच्या प्रमाणावरून पाण्याचे वय आयसोटोपडेटिंगमध्ये सांगता येते. हायड्रोजन – तीन आणि कार्बन – चौदा हे अणू त्यासाठी वापरले जातात. हायड्रोजन – तीन या अणूचे पाण्यातील प्रमाण साडेबारा वर्षांत निम्मे होते. म्हणजे, हायड्रोजन-तीन जितका जास्त, तितके पाणी नवीन किंवा पावसाने आलेले असा निष्कर्ष काढता येतो. सरस्वतीच्या कोरड्या पात्रात 1995 मध्ये जेव्हा बोअरवेल खोदल्या गेल्या, तेव्हा साधारण पन्नास-साठ मीटरवर पाणी लागले आणि त्या पाण्यात हायड्रोजन-तीनचे प्रमाण खूपच कमी होते. त्या प्रमाणावरून ते पाणी साडेचार ते पाच हजार वर्षें जुने आहे असे लक्षात आले. एकेकाळी, त्या पात्रातून वाहणाऱ्या नदीमधूनच ते पाणी खाली वाळूमध्ये झिरपले असणार.

नद्या किंवा वारे जेव्हा वाळूचे कण एका ठिकाणी जमा करतात, तेव्हा त्या कणांवर पडलेला सूर्यप्रकाश त्यांत त्याची थोडी ऊर्जा सोडून जातो. त्यानंतर वाळूच्या नवीन थराखाली ते कण झाकले गेले, की ती ऊर्जा थोडी थोडी कमी होत जाते. वाळूचा तो कण जर त्यानंतर एकदाही सूर्यप्रकाशात आला नसेल, तर त्यातील ऊर्जेच्या प्रमाणावरून तो कधी झाकला गेला, पर्यायाने नदीने किंवा वाऱ्याने तो कधी आणून टाकला ते थर्मोल्युमिनोसन्सडेटिंगमध्ये सांगता येते. वाळूचा प्रत्येक कण त्याने पाहिलेल्या शेवटच्या सूर्यप्रकाशाची स्मृती घेऊन बसलेला असतो. त्याच्या आठवणीत डोकावून पाहिले, की मजेशीर अनेक गोष्टी समजू लागतात. ते तंत्र सरस्वतीच्या पात्रातील वाळूसाठी जेव्हा वापरले गेले, तेव्हा तिच्या पात्रातील वाळू ही दोन वेगवेगळ्या कालखंडांत जमा झाल्याचे दिसून आले. जुनी वाळू बावीस ते सव्वीस हजार वर्षांपूर्वी जमा झाली आणि त्यावरील नवा थर नदीने तीन हजार ते सहा हजार वर्षांपूर्वी आणून टाकला. म्हणजेच हडप्पा संस्कृती अस्तित्वात असताना, ती नदी वाहती होती. पुढे, काही कारणांनी तिचा वेग कमी होत गेला आणि नंतर, तो दलदल निर्माण करण्याइतका संथ होऊन, अखेर, नदी लुप्त होऊन गेली!

संथ नदी मोठ्या प्रमाणावर गाळ जमा करते आणि वेगवान नदी मोठ्या प्रमाणावर झीज करते. नदिप्रवाहाचा वेग बदलण्याचे चक्र जर का सतत येत राहिले तर नदी गाळ ठरावीक काळापर्यंत जमा करते. ती त्या जमा झालेल्या गाळातच तिचा मार्ग कापून ठरावीक काळापर्यंत पुढे जात राहते. त्यामुळे नदीचे किनारे पायऱ्यांसारखे दिसू लागतात. घग्गर, चौतांग आणि मार्कंडा या नद्यांच्या पायऱ्या जर का पहिल्या, तर त्यामध्ये हिमालयातून, विशेषत: खूप उंचीवरून आणलेले अनेक धोंडे दिसतात. ते धोंडे शुभ्रपांढरे, हिरवे किंवा काळसर रंगांचे आणि खूप जुन्या- सुमारे एकशेऐंशी कोटी वर्षें जुन्या खडकांचे आहेत. जेथे घग्गर किंवा मार्कंडा उगम पावतात त्या शिवालिक टेकड्यांमध्ये गुलाबी, तपकिरी असे वाळूचे, मातीचे सहज फुटणारे, भुगा होणारे खडक आहेत. जर त्या नद्या शिवालिक टेकड्या आणि आजूबाजूला उगम पावत असतील, तर ते जुन्या खडकांचे तुकडे त्यांनी कोठून आणले असावेत? त्या नद्यांची जुनी पात्रे खोदून पाहिली गेली, तेव्हा साधारण सात-आठ मीटर खोलीवर तपकिरी रंगाची, अभ्रकाचे चमचमते तुकडे असलेली मऊ वाळू मिळू लागली. राजस्थानातील वाळू अभ्रक नसलेली, खरबरीत आणि पिवळ्या रंगाची. मग ती वेगळीच रेती आली कुठून? गंगा, यमुना, सतलज या हिमालयातून खूप उंचावरून येणाऱ्या नद्या अगदी तशीच वाळू घेऊन वाहत आहेत. म्हणजेच त्या नद्याही एकेकाळी हिमालयात उंचावर असलेल्या हिमनद्यांतून उगम पावल्या असल्या पाहिजेत आणि त्यांनी ते धोंडे व वाळू तेथून आणली असली पाहिजे.

भूगर्भशास्त्रज्ञांनी मार्कंडा आणि चौतांग नद्यांचा, प्रवाहाविरुद्ध दिशेने जाऊन 1998 मध्ये अभ्यास केला तेव्हा त्यांना तीन हिमनद्या सापडल्या. त्या तिन्ही हिमनद्या यमुनेची उपनदी ‘तोंस’ हिला पाणी पुरवतात. तोंस नदी गढवाल-हिमालयातून जाऊन; पुढे, यमुनेला मिळते. त्याशिवाय मार्कंडा, चौतांग आणि घग्गर या तिन्ही नद्या तशा लहान असूनही, मोठाल्या पात्रांतून वाहतात. घग्गर नदीने तिची पात्रे आणि प्रवाहाची दिशा अनेकदा बदलल्याच्याहीअनेक खुणा गुगल अर्थ किंवा तत्सम सॉफ्टवेअरमध्ये दिसतात. त्याचा अर्थ असा होतो, की एकेकाळी त्या नद्या हिमनदीमधून येणाऱ्या पाण्यावर मुख्यत्वे अवलंबून होत्या आणि काही कारणाने, त्या हिमनद्या तोंस नदीला पाणी देऊ लागल्या.

उत्तर भारताचा प्रदेश जर का गुगल अर्थ किंवा भारत सरकारच्या ‘भुवन’ या सॉफ्टवेअरमध्ये पाहिला तर काही गोष्टी प्रकर्षाने नजरेत भरतात. एक म्हणजे कोरड्या पडलेल्या अनेक नद्या कुरुक्षेत्र ते हिस्सार या भागात आणि सिरसा ते पाकिस्तानची हद्द या भागांत एकमेकींना समांतर जाताना दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक सरळ रेषा साधारण आग्नेय-वायव्य या दिशेला जाताना जोधपूर-उदयपूर, बिकानेर, दिल्ली या भागांत दिसतात. त्या सगळ्या रेषांना प्रस्तरभंग किंवा फॉल्ट म्हणतात. जमिनीत काही हालचाली होऊन, अचानक तणाव निर्माण झाला किंवा अचानक प्रचंड दबाव पडला, तर खडकांना मोठाल्या भेगा पडतात. त्या भेगांवरून खडक घसरतात, ढकलले जातात किंवा एकमेकांच्या डोक्यावर चढतात. जमीन त्या गोंधळामुळे हलते, थरथरते आणि भूकंप होतात. गुजरातमध्ये 2001 मध्ये झालेले भूकंप, हिमालयात वरचेवर होणारे भूकंप किंवा कोयनेत होणारे भूकंप तशाच रेषांच्या हालचालींमुळे झालेले आहेत. सिंधू नदी तशाच एका भूकंपाने तिची दिशा बदलती झाली आणि त्यामुळे मोहेंजोदारो शहर ओस पडले. ते सगळे फॉल्ट जमिनीखाली कित्येक किलोमीटर खोल गेलेले आहेत आणि अजूनही त्यांची हालचाल चालू आहे असे पेट्रोलच्या शोधासाठी केलेल्या सर्व्हेमध्ये दिसले. जेथून यमुना हिमालय उतरून येते, तेथील खडक रेषांवरून चार वर्षांत जवळजवळ एक फूट घसरले आणि ती घसरण गेल्या काही शतकांत सुमारे वीस मीटर इतकी मोजली गेली आहे. जेथे एकेक मीटरचा फरक महत्त्वाचा, तेथे त्या वीस मीटर घसरणीने काय गोंधळ माजवला असेल त्याचा विचारच केलेला बरा!

_sarswatideviत्या हालचालींमुळे मोठे भूकंप झाल्याच्या नोंदी 1294, 1423, 1966 या वर्षांमध्ये आहेत आणि त्या भूकंपांच्या खुणा अनेक पुरातत्त्वीय अवशेषांतदेखील दिसून येतात. काही लहान वस्त्यांचे अवशेष राजस्थानात, घग्गरच्या डावीकडील काठावर असलेल्या कालीबंगा या गावात 1969 मध्ये सापडले. तेथे उत्खनन चालू असताना, मातीचे थर एकमेकांवरून घसरले आहेत असे दिसून आले. जमिनीला मोठ्या भेगा पडल्याचे दिसले. ती चिन्हे भूकंप झाल्याची आहेत. जमीन गदागदा हलल्यामुळे वरची माती सैल झाली, तिला भेगा पडल्या आणि मातीचे थर वरखाली झाले. तीस ते चाळीस सेंटिमीटरची ती घसरण भूकंप जवळपास सहा-साडेसहा रिश्टर एवढा तीव्र झाल्याचे दर्शवते. तेथील काही घरांच्या भिंतींना भूकंपांमुळे चक्क घड्या पडल्या आहेत. काही घरांच्या भिंती वाकल्याचे आणि त्यांची डागडुजी केल्याचे चित्र लोथल येथेही दिसते. ते भूकंप इसवी सनपूर्व 2700 आणि इसवी सनपूर्व 2200 मध्ये झाले. त्या विनाशक भूकंपांच्या स्मृती त्या अवशेषांनी जपलेल्या आहेत. ते भूकंप प्रस्तरभंगाच्या उलथापालथीने झाले असावेत असा तर्क करता येतो. कारण कालीबंगा येथे उत्खननात अनेक छोटे छोटे प्रस्तरभंग दिसतात. ते छोटे प्रस्तरभंग एखाद्या प्रचंड प्रस्तरभंगाच्या शाखा असाव्यात का? सरस्वती तशा प्रचंड मोठ्या प्रस्तरभंगावरून वाहते आणि यमुनाही तशाच एका प्रस्तरभंगावरून जाते. त्या सगळ्या भौगर्भिक हालचाली आणि त्या भागात दिसणाऱ्या अनेक कोरड्या नद्या यांचे काय नाते असेल? बलरामाने नांगराने खेचून आणलेली यमुना आणि वसिष्ठाला घाबरून शतधारांनी वाहणारी सतलज या कथा भारतीय पूर्वजांनी कशावरून रचल्या असतील याचा विचार केला आणि त्याच जोडीला महाभारतकार नदी कोरडी होण्याची लक्षणे कशी अचूक नोंदवतात हे पाहिले तर महाभारत रचणाऱ्या कवींच्या निरीक्षणाचे फार कौतुक वाटते.

घटना साधारण अशा घडल्या असतील. सुमारे साडेतीन-पावणेचार हजार वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड भूकंपाने पूर्वेकडील उतार कलला असेल, सरस्वतीची पूर्वेकडील शाखा- तोंस नदी तिचे हिमनदीमधून येणारे पाणी घेऊन पूर्वेला वळली असेल आणि सरस्वतीचा पाण्याचा मुख्य स्रोत बंद झाला असेल. त्याच भूकंपाने सतलजच्या पश्चिमेचा उतार वाढला असेल आणि सतलज तिचे पात्र बदलत बदलत पश्चिमेला सिंधूला अडीच हजार वर्षांपूर्वी मिळाली असेल. सतलज आणि सरस्वती यांची सतत बदललेली ती पात्रे म्हणजेच आज उत्तरेला दिसणाऱ्या अनेक कोरड्या नद्या. सतलज शंभर धारांनी वाहू लागली याचा अर्थ तिची पात्रे सतत बदलत गेली असा लावला तर सगळी गोष्ट उलगडते. सतलज पश्चिमेला गेली, यमुना पूर्वेला गेली आणि सरस्वतीचे पाण्याचे दोन मुख्य स्रोत बंद झाले. प्रत्येक नदीची झीज करण्याची क्षमता ठरावीक असते. ती क्षमता काही वेळा समुद्राची पातळी वाढली किंवा पात्राचा उतार बदलला तर बदलते आणि नदीचा वेगही बदलतो. तशा वेळी, नदी तिच्या उगमाकडे जास्त झीज सुरू करते. ती क्रिया जर तशीच चालू राहिली तर शेवटी नदी तिच्या भूप्रदेशाची भिंत कापून दुसऱ्या नदीच्या क्षेत्रात आक्रमण करते आणि दुसऱ्या नदीला अजून तीव्र उतार तयार करून देते. साहजिकच, तसा तीव्र उतार मिळाला की दुसरी नदी तिचे पात्र सोडून आक्रमक नदीच्या पात्रातून वाहू लागते किंवा असेही म्हणता येईल, की एक नदी भूप्रदेशाची भिंत फोडून दुसऱ्या नदीचे पाणी सरळसरळ पळवते! त्या प्रकाराला नावही नदीचौर्य (River piracy) असे आहे! तोंस नदीचा बदललेला प्रवाह म्हणजे यमुनेने चक्क सरस्वतीचे आणि दृषद्वतीचे पाणी पळवण्याचा प्रकार आहे. भूकंपाने यमुनेच्या पात्राचा उतार कमी झाला, त्यामुळे यमुनेने पश्चिमेकडे जाऊन, भूप्रदेशाची भिंत फोडून तोंस नदीचे पाणी पळवले. त्यामुळे एकेकाळी पश्चिम वाहिनी असलेली यमुना अचानक एक वळण घेऊन आग्नेयेला वळली आणि त्यामुळे सरस्वती मात्र कोरडी पडत गेली!

सिंधू संस्कृतीमधील पिढ्यांनी त्यांची नदी हळूहळू कोरडी होताना चार हजार वर्षांपूर्वी पाहिली असेल, तेव्हा त्यांना काय वाटले असेल? जेव्हा ती विशाल नदी मरणपंथाला लागल्याची चिन्हे दिसण्यास लागली असतील, तेव्हा त्या सगळ्या नगरांत किती चलबिचल झाली असेल? त्या सगळ्या प्रक्रियेत त्या माणसांचा कसलाही दोष नव्हता, तरी त्यांना देशोधडीला लागण्याची वेळ आली. जेव्हा नदी तिच्या कर्माने हळूहळू मृत्युपंथाला लागते, तेव्हा तिचे मन तिला कसे खात नाही? जेव्हा मी माझ्या शहरातून वाहणाऱ्या नदीला एखाद्या नाल्याची कळा आलेली पाहतो, जेव्हा मी माझ्या नदीचे पूर पूर्वीपेक्षा जास्त तीव्र झालेले बघतो, तिच्या काठावरील जीवविविधता कमी होताना जेव्हा मला दिसते, तेव्हा नकळत काळाची चक्रे उलटी फिरून मला सिंधू संस्कृतीच्या एखाद्या ओसाड नगरात आणून सोडतात आणि त्या माणसांच्या मनात झालेली कालवाकालव मी चार हजार वर्षांनंतरही अनुभवू शकतो…

सरस्वती कोरडी पडली, लुप्त झाली. तिच्या काठावर राहणारे लोक तिच्या आठवणी घेऊन पाण्याच्या शोधात दूर दूर गेले. ती माणसे सरस्वतीला विसरली नाहीत. त्या नदीने त्यांच्या समाजाचा, संस्कृतीचा पाया घातला होता. तिने त्यांच्या प्रतिभेला जाग आणली होती, त्यांच्याकडून वेद लिहवून घेतले होते. त्यांच्यातील पूज्य ऋषींनी त्या नदीकाठी यज्ञ केलेले होते. तिच्या पाण्याने त्यांची शेती, त्यांच्या गायी, त्यांची मुले-माणसे अफाट वाळवंटामध्येही जगवली होती. तिच्या प्रचंड पात्रात, तिच्या काठच्या वाळूवर त्यांच्या पिढ्यानपिढ्या खेळल्या होत्या. त्यांचीही जीवनदात्री लुप्त झाली; पण विस्मृतीत गेली नाही. तशी ती विसरली जाणारही नव्हती. ती सारी संस्कृती तिच्या गतवैभवाच्या स्मृती घेऊन हळूहळू गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आश्रयाला गेली. त्या नद्यांनी उदार मनाने त्या समाजाला आश्रय दिला. सरस्वतीच्या पाण्याने भरून वाहणाऱ्या यमुना आणि गंगा एका नवीन संस्कृतीच्या जीवनदात्री बनल्या. सरस्वती नदी म्हणून आज पूज्य नसेल, पण तिचे दैवीरूप पूजनीय आहे. पाणी देऊन माणसाला जगवणारी नदी आज ‘ज्ञानदा’, ‘मोक्षदा’ म्हणून पूजली जात आहे. तिने वाळूमध्ये कधी काळी सोडून दिलेले पाणी कित्येक माणसांची तहान भागवत असेल. पण त्याहीपेक्षा तिने आधीच्या पिढ्यांना जो ज्ञानमार्ग दाखवला त्याचे पावित्र्य फार मोठे आहे, म्हणून तिला अनेक सारस्वतांनी पूज्य मानलेले आहे. अनेक प्रतिभावंतांनी त्यांचे ग्रंथ लिहिताना तिने ‘भावार्थाचे गिरिवरू’ निर्माण करावेत म्हणून तिला विनवले आहे. अनेक विदेशी संशोधकांनी तिच्या शोधासाठी संस्कृतचे धडे गिरवले आहेत. कित्येक भूशास्त्रज्ञांनी तिच्या शोधात त्यांची आयुष्ये खर्च केली आहेत. तिच्या कोरड्या पात्राच्या सोबतीने उन्हातान्हात अनेक जण मैलोन् मैल चालले आहेत, अनेकांनी तिने आणून टाकलेली वाळू, दगडधोंडे आणि पाणी यांचा अभ्यास केला आहे. तिने भूगर्भातील हालचाली आणि अत्यंत नाजूक तोलावर आधारलेली नदीची सगळी व्यवस्था यांचे कोडे उलगडण्यास मदत केली आहे. तिने लुप्त होऊनही अनेक शास्त्रज्ञांची, संशोधकांची प्रतिभा जागवली आहे. गंगा आणि यमुना यांचा संगम प्रयागला होतो. काळ्या रंगाची कालिंदी शुभ्र रंगाच्या गंगेत मिसळून दिसेनाशी होते. हा साधा, दोन नद्यांचा संगम नाही- संगम त्रिवेणी आहे. तेथे अरुण वर्णाची सरस्वती गुप्त रूपात वाहते असे सांगितले जाते. ते खरेही असेल, कारण यमुनेत जे पाणी वाहत आहे ते तसे पाहिले, तर सरस्वतीचेच आहे. गंगाही प्रयागच्या पुढे सरस्वतीचे पाणी वाहून नेत आहे. सरस्वतीचे जीवनदायिनी हे रूप गंगा आणि यमुना यांच्या स्वरूपात मिसळून गेले आहे. सरस्वतीचे पाणी आटले असेल, तिचे नदी म्हणून अस्तित्व संपले असेल, पण अधिष्ठान प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात आहे. ज्ञानदात्री, विद्यादायिनी या रूपांत, वेदांनी म्हटल्याप्रमाणे खरेच, तिने सर्व जग व्यापलेले आहे. मला वाटते, इतका सुंदर पुनर्जन्म कोणालाच मिळाला नसेल!

– अश्विन पुंडलिक 
ashwin3009@gmail.com

संदर्भ : 
१) डॅनिनो मायकेल (2010), द लॉस्ट रिव्हर ऑन द ट्रेल ऑफ द सरस्वती, पेंग्विन बुक्स इंडिया. 
२) सन्याल, संजीव (2012) लँड ऑफ द सेव्हन रिव्हरर्स, पेंग्विन बुक्स इंडिया. 
३) वालदिया, के. एस. (2013) रिव्हर सरस्वती वॉज अ हिमालयन बॉर्न रिव्हर, करन्ट सायन्स, व्हॉल्यूम 104. 

About Post Author