अमेरिकेतील मराठी शाळांचे प्रेरणास्थान – सुनंदा टुमणे (Coordinator of Marathi schools in America – Sunanda Tumne)

21
72

सुनंदा टुमणे

मराठी शाळा मराठी भाषा शिकण्यासाठी अमेरिकेत ठिकठिकाणी सुरू झाल्या आहेत आणि त्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली काही विशिष्ट नियमांनुसार सुरू आहेत. पण त्या शाळा नेमक्या कधी सुरू झाल्या, त्यांचा अभ्यासक्रम कसा ठरला? मराठी भाषेला अमेरिकेच्या शालेय शिक्षणात स्थान काय आहे? मराठी शिकल्यामुळे अमेरिकेतील मूळ मराठी वंशाच्या मुलांचा काही फायदा होतो का? होत असेल तर कोणता? असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आणि मी त्यांची उत्तरे शोधत कॅनडामधील मिसिसॉगा येथील सुनंदा टुमणे यांच्यापर्यंत पोचले! त्यांच्या मूळ प्रयत्नाने आणि प्रेरणेने तेथील मराठी शाळांना शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले असे मानले जाते. त्यामुळे मराठी भाषेचे बाळकडू मराठी वंशाच्या मुलांना सहज देता आले! अमेरिकेतील चार-पाच मराठी शाळांतील मुले नासिकच्या खासगी नभोवाणी केंद्रावरून बालविश्वसाठी मराठी नाटुकली अस्खलित सादर करत असतात.

कॅनडातील लहान मुलांना मराठी भाषा शिकवण्याचा श्रीगणेशा साधारण 1976 ते 1984 या काळात झाला. तो टोरांटो येथे काही मराठीप्रेमी लोकांनी घरात वर्ग चालवून केला. मराठी मध्यमवर्गीय मंडळी नोकऱ्यांसाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत 1960 ते 1970 च्या दशकात जाऊ लागली. दूरदेशी गेलेल्या त्या मंडळींना आरंभी फार कष्ट तेथे स्थिरावण्यासाठी घ्यावे लागले. त्यांतील शरद कावळे, मंदा टिळक, आनंद मनोहर, श्रीराम मुळगुंद अशी मराठी शिक्षकांची नावे तेथील रहिवाशांना आठवता. शिक्षक म्हणजे ते मुलांना हौसेने शनिवारी-रविवारी मराठी शिकवत, एवढेच. विद्यार्थ्यांची संख्या चार-पाच-सात अशी तुरळक असे. पण त्या मंडळींनी प्रयत्न सोडले नाही. सुनंदा टुमणे यांनी त्यांच्या मुलाला त्या वेळी त्या वर्गात दाखल केले होते. मंदा टिळक यांनी टुमणे यांना मुलांच्या शिक्षणात रस आहे हे ओळखले. त्यांनी सुनंदा यांनाही मराठी शिक्षिका होण्याची विनंती केली. सुनंदा यांनी ते काम समजावून घेतले आणि त्या शिक्षिका झाल्या! सर्वच शिक्षक ते काम स्वयंसेवी पद्धतीने व हौसेने करत होते.

सुनंदा हसत हसत म्हणाल्या, “अध्यापन क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना, माझ्या हातून शाळांसाठी कार्य घडले आणि मी त्या शाळांचा अभ्यासक्रम तयार केला हे कधी कधी मलाही खरे वाटत नाही. पण लोकांची उत्तम साथ मला वेळोवेळी मिळत गेली, त्यामुळेच ते शक्य झाले.” त्यांनी शाळा कशा तयार झाल्या याची हकिच नंतर सांगितलीखरं तर, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर आहे. माझ्या नोकरीतील पदामुळे मला प्रेझेंटेशन करण्याची सवय होती आणि त्याच माझ्या कलेचा उपयोग, मला मराठी शिकवण्याच्या कामी झाला.” सुनंदा टुमणे त्यांच्या घरातच मराठी शिकवू लागल्या. त्यांनी वर्ग सुरू केला. पाचसहा वर्षांची मुले ही मस्तीखोर असतातच. त्यांनी माझ्या घरातच भिंतींवर रेघोट्या काय मारल्या! जाजमाचे तुकडे काय केले! मुलांची संख्या वाढत चालली होती. ‘सुनंदामावशी छान शिकवते हे सगळ्यांना माहीहोऊ लागले. मग सतराअठरा मुलांना घरात सांभाळणे कठीण झाले, तेव्हा सुनंदा यांनी मुलांसाठी एखादा वर्ग सार्वजनिक ठिकाणी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना कॅनडामध्ये हेरिटेज लँग्वेजच्या प्रोग्रामखाली स्थानिक शाळा तसे वर्ग भाषाशिक्षणासाठी देऊ शकतात हे कळले. पण त्यांचा नियम असा होता, की त्यांना मुलांची संख्या वीसपंचवीस तरी असायला हवी होती आणि तो समाजही प्रमाणाने स्थानिक एकूण लोकसंख्येत मोठा असायला हवा होता. तेव्हा सुनंदा यांनी टोरांटो शहरात वेगवेगळ्या शिक्षकांकडे मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकत्र केली. ती संख्या पस्तीसच्या वर भरली. सुनंदा यांनी त्या सर्वांच्या सह्या घेऊन अर्ज केला आणि तो मान्य झाला! त्यांना बोर्डाने हेरिटेज लँग्वेज म्हणून मराठी भाषेच्या शिक्षणासाठी शाळेचे दोन वर्ग, फळाखडू या साहित्यासह दिले.

सुनंदा यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. शाळेचे उपक्रम निरनिराळे अस. स्किट्स सादर करणे, कधी पिकनिक, कधी कुकिंग क्लास करून एकत्र जेवणे... मुले त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत शिकत होती. ते पाहून या बाबतीतील साशंक पालक लोकांचा विरोध मावळू लागला. शिकणाऱ्या मुलांच्या संख्येत भर पडत गेली. मराठीची ओढ जागी होऊ लागली. शाळा हे तिचे निमित्त दिसू लागले. पुढे,कॅनडातील बोर्डाने आंतरराष्ट्रीय भाषा या प्रोग्रामच्या संदर्भात काही भाषांना मान्यता देणे सुरू केले. सुनंदा त्या संदर्भातील मीटिंगला मराठीचे महत्त्व समजावून देण्यासाठी भारताचा नकाशा घेऊन गेल्या. त्यांनी मूळ महाराष्ट्र कोठे आहे? त्याची लोकसंख्या किती? मराठी भाषा बोलणारे कॅनडात किती आहेत? इत्यादी मराठीची सविस्तर माहिती देऊन बोर्डाला विश्वास वाटण्यासाठी एक प्रेझेंटेशनच केले. ती सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी इंटरनेट किंवा माहितीचे स्रोत सहज उपलब्ध नव्हते. सुनंदा यांचे प्रेझेंटेशन परिणामकारक ठरले आणि बोर्डाने मराठीला मान्यता दिली. त्यापूर्वी पंजाबी, गुजराती व हिंदी या भारतीय भाषांना तशी मान्यता तेथे मिळालेली होती.

वर्ग आणि फळा तर मिळालापण पुस्तके आणि वह्या यांसाठी टोरांटो मराठी भाषिक मंडळाची भरघोस मदत व सहकार्य सातत्याने मिळाले. सर्व बृहन महाराष्ट्र मंडळांची एक मीटिंग फिलाडेल्फिया येथे 2007 मध्येहोणार होती. त्यासाठी लीना देवधरे यांना (बी.एम.एम.च्या कार्यवाह, टोरांटो – कॅनडा) आमंत्रण आले होते. त्यांना सुनंदा यांचे कार्य माहीहोते. देवधरे यांनी त्या मीटिंगमध्ये सुनंदा यांनी तो विषय मांडावा म्हणून सुनंदा यांना कॅनडातून फिलाडेल्फियाला आग्रहाने नेले. सुनंदा टुमणे हे नाव तोपर्यंत कोणाला माहीत नव्हते. लीनाच्या आग्रही विनंतीवरून सुनंदा व विजया बापट (यादेखील नॉर्थ करोलिना येथे मराठी शाळा चालवत होत्या.) यांचेमराठी शाळाया विषयावर सत्र झाले. सुनंदा यांनी भाषणात सांगितले, की महाराष्ट्र मंडळांच्या उपक्रमांना पुढील पिढीलाही जोडून घ्यायचे असेल तर मराठी भाषेचे शिक्षण त्यांना द्यायलाच हवे, नाहीतर ते केवळ मंडळापासून नव्हे तर परिवारापासूनही दुरावण्याची शक्यता आहे.” सुनंदा यांना आठवते, की श्रोते हळुहळू त्या विषयाकडे आकृष्ट झाले आणि त्यांच्या लक्षात आले, की (सुनंदा यांचा) मराठी शाळेचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. काही जणशाळाया संकल्पनेबाबत साशंक होते. एवढे शिक्षक कोठून आणायचे? अभ्यासक्रम कोण ठरवणार? असे अनेक प्रश्न विचारले गेले. पण सुनंदा व लीना यांनी ठामपणे सांगितले, की आम्ही त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू आणि बृहन महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेबी.एम.एम. मराठी शाळाहा प्रकल्प प्रथम हाती घेतला. सर्वांनी प्रकल्पाला मान्यता दिली.

महाराष्ट्रातील बालभारतीची पुस्तके अमेरिकेतील मुलांना मराठी शिकवण्यासाठी उपयोगाची नव्हती. भारत आणि अमेरिका यांतील परिसर, हवामान आणि जीवनमान यांत खूपच फरक असल्यामुळे बालभारतीच्या बाराखडीतील चित्रे अमेरिकेतील मुलांना कळण्यासारखी नव्हती. औत, विहीर अशांसारखी चित्रे ही समजणारी नव्हती. वेगळा अभ्यासक्रम बनवणे गरजेचे होते. “पण मग अभ्यासक्रम कसा असावा याची काही रूपरेषा तुमच्या मनात होती का?” या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना सुनंदा हसल्या आणि म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना शिकवताना कधी तेच शिक्षकांचे गुरू बनतात. मी अगदी छोट्या पाच ते सात वर्षांच्या मुलांना शिकवताना, मी मराठीत एक वाक्य फळ्यावर लिहिलेनायगरा हा एक मोठा धबधबा आहे.’ आणि विचारात पडले, की धबधबा या मुलांनी पाहिला नाही. नदीसुद्धा पाहिलेली नाही. मग त्याना त्या शब्दाचा अर्थ कसा सांगायचा? तेवढ्यात एक छोटा मुलगा म्हणाला, “सुनंदामावशी, यू डोण्ट नो, नायगरा इज अ बिग फॉल.” आणि मला कल्पना सुचली, की ज्या गोष्टी मुलांना माहीत आहेत, त्या प्रतिमा घेऊनच पुस्तक बनवावे. तेथील सृष्टी आणि निसर्ग यांतून अक्षरओळख करून द्यावी. उदाहरणार्थ, ‘‘ ‘नायगराचा’! सुनंदा यांना आंतरराष्ट्रीय मुलांना त्यांची मूळ भाषा दूरदेशी कशी शिकवावी याचे गमक कळले होते. पण तरीही त्यांना शिक्षणक्षेत्रातील काही व्यक्तींशी सल्लामसलत करून अभ्यासक्रम ठरवणे आवश्यक वाटत होते.

लीना देवधरे आणि सुनंदा यांनी मग भारताची ट्रिप केली. महाराष्ट्रातीपुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अशा ठिकाणी भेटी दिल्या, तर काही महाविद्यालयांना भेटी दिल्या. पण सर्वांचे म्हणणे हेच होते, की आमचा अभ्यासक्रम ठरलेला आहे, तोच तुम्ही वापरा.’ खरे तर, त्यांना अमेरिकेतील समस्या समजत नव्हती. अखेर, भारती विद्यापीठाला भेट दिल्यावर त्यांचा योग्य तो संवाद झाला. लीना देवधरे यांच्या ओळखी आणि प्रयत्न यांमुळे त्या सर्व विद्यापीठांशी भेटीगाठी शक्य झाल्या. भारती विद्यापीठाचे तंगराव कदम, महादेव सगरे यांनी विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ सिंधू कुलकर्णी यांची ओळख करून दिली आणि एकत्र काम करण्यास सांगितले. मग दोघींनी एकमेकींच्या कल्पना समजून घेऊन अभ्यासक्रम कसा असावा याचा आराखडा तयार केला. बी.एम.एम. मराठी शाळा समितीने बी.एम.एम. कार्यकारिणीच्या मदतीने भारती विद्यापीठ या संस्थेशी संलग्नतेचे काम पूर्ण केले. समितीने भारत आणि अमेरिका येथील शिक्षणतज्ज्ञ, मराठी भाषा जाणकार, आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रम सूची, पाठ्यपुस्तक महामंडळ आणि अनेक अनुभवी शिक्षक यांच्या मदतीने बी.एम.एम. मराठी शाळांसाठी तीन स्तरीय अभ्यासक्रम तयार केला. त्या अभ्यासक्रमाला भारती विद्यापीठ (पुणे) यांची मान्यता मिळाली. तसेच, बी.एम.एम. आणि भारती विद्यापीठ (पुणे) यांच्यात उत्तर अमेरिकेत सर्वत्र एकछत्री मराठी शाळा उपक्रम सुरू करण्याबाबत करार झाला. अमेरिकेतील मराठी वंशाच्या व अमराठी मुलांसाठी मराठीचा अभ्यासक्रम तयार करण्याचे श्रेय प्रामुख्याने सुनंदा यांना जाते. त्यांना त्या कामात विजया बापट यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. बृहन्महाराष्ट्र मंडळाने (बी.एम.एम.) त्यांच्या छत्राखाली असलेल्या शाळांना एकच अभ्यासक्रम लागू केला. अभ्यासक्रम व प्रशिक्षण बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून मिळू लागलेअभ्यासक्रमात मुलांची इयत्ता ठरवणे ही पुढील पायरी होती. त्यांना तेथे लेव्हल्स म्हणतात. सध्या मराठीचे तसे पाच स्तर आहेत. प्रत्येक लेव्हलला विद्यार्थ्याला काय आणि कोठपर्यंत शिकवायचे हे निश्चित झाले. अक्षरओळख, वाचन, संवाद, निबंध लिहिणे व पुढे वक्तृत्व अशा त्या लेव्हल्स आहेत.

सुनंदा टुमणे यांचा जन्म देवास (मध्य प्रदेश) येथे झाला. त्यांचे वडील शेतीतज्ञ होते, त्यांनी निरनिराळ्या साखर कारखान्यांत मानाच्या हुद्यावर कामे केली. त्यांची आई ऊसाची शेती बघायची. सुनंदा यांचे प्राथमिक शिक्षण देवास, हरदा येथे झाले. माध्यमिक शिक्षण महाराष्ट्रातील मराठी शाळांत झाले. सुनंदा टुमणे यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत पुस्तके उर्दू काव्य भरपूर वाचले. त्यांना शास्त्र व भाषा दोन्हींची खूप ओढ आणि आवड आहे. सुनंदा टुमणे यांनी गणित व शास्त्र या विषयांत बी.एससी पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर पदवी Ryerson University, Toronto येथून मिळवली. त्या वर्णन करतात, “साडीवेणी घातलेली ऐंशी मुलांत मी एकच मुलगी विद्यार्थीनी, इलेक्ट्रिकल इंजिनीयर म्हणून पहिले काम करताना पँट सूट/ड्रेसेस घातले.त्यांचे पती मदन टुमणे आर्किटेक्ट होते. ते डिसेबर 2019 मध्ये दिवंगत झाले. त्यांना दोन मुलगे आहेत. एकाचे लग्न झाले असून, सून, नात आहे. त्या मराठी भाषिक मंडळाच्या (President,Home and school Association) 1994 साली अध्यक्ष होत्या. त्यांनी तेथे मराठी पुस्तकांचा विभाग पाच वाचनालयांत सुरू केला. (Under Govt. grant International Languages) त्या सांगतात, “मी पंधरा वर्षांपर्यंत महाराष्ट्रातून दरवर्षी दोन-तीन हजार मराठी पुस्तके मागवत होते. वाचक मागणी मंदावल्याने आता फक्त संदर्भ वाचनालयात मराठी पुस्तके आहेत. वाचनालयांतून हटलेली ती पुस्तके विकून मंडळासाठी निधी जमा केला!”

बी.एम.एम.च्या छत्राखाली असलेल्या सर्व शाळांवर देखरेख करण्यासाठी आणि प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी बी.एम.एम.ने एक शाळा समिती नेमली आहे. सुनंदा टुमणे या त्या समितीच्या संचालक आहेत. त्यांना कोमल चौकर (सहाय्यक संचालक) आणि सोना भिडे (शाळा प्रशासक) या साथ देत आहेत.

अमेरिकाहा अनेक राज्ये मिळून बनलेला (युनायटेड स्टेट्स) भारतासारखा देश आहे. परंतु तेथे राज्यांना स्वातंत्र्य व स्वायत्तता जास्त आहे. त्यामुळे आता तर, अमेरिकेतील काही राज्यांनी मराठीला सेकंड लँग्वेजचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मराठी शिकणाऱ्या मुलांना हायस्कूलमध्ये परदेशी भाषा (मराठी) शिकल्याबद्दल श्रेयगुण (क्रेडिट्स) मिळतात. ते गुण त्यांना युनिव्हर्सिटी प्रवेशासाठी उपयुक्त ठरता.

सुनंदा यांची दुर्दम्य च्छाशक्ती, इतर सर्व शिक्षकवर्गाचा सहयोग, त्यांचे निःस्पृह सहकार्य आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचा भक्कम पाठींबा यांमुळे उत्तर अमेरिकेतील मराठी शिक्षणाचा पाया नियोजनबद्ध रचला गेला आहे.

सुनंदा टुमणे bmmshalainfo@gmail.com

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

मेघना साने 98695 63710meghanasane@gmail.com

मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या तो मी नव्हेचसुयोगच्या लेकुरे उदंड झाली या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी कोवळी उन्हेया स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.

————————————————————————————————————————————

About Post Author

21 COMMENTS

 1. महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडत आहेत आणि अमेरिकेत मराठी भाषा शिकण्यासाठी धडपड व त्यातून सुनंदाताईंच्या धडपडीला यश येऊन सुरू झालेली मराठी शाळा… केव्हढा विरोधाभास जाणवतो…पण वाचून खूप आनंद झाला

 2. हा शिक्षण उपक्रम आकारात येणे फार अवधी लागला असेल असाच एक कला उपक्रम मी विदेशात राबवायचे आयोजन केले होते,परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही

 3. मराठी भाषा जोपासण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे . मराठी असे आमुची मायबोली .

 4. हो.आधी विरोध पत्करावा लागतो.अनेक शंका वगैरे यांचे निरसन मग तो उपक्रम!

 5. सुनंदाताई व टिमने खूपच परिश्रम घेऊन ध्येय तडीस नेले त्या बद्दल त्यांचे व मेघनाताई तुम्ही या ध्यासापोटी त्यांच्या पर्यंत पोहोचून आम्हालाही ही माहिती मिळवून दिलीत या बाद्दल तुमचेही अभिनंदन..

 6. मराठी भाषेची पताका सातासमुद्रापार अमेरिकेत फडकावणाऱ्या टिमला जेवढे जास्त धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच पडतील.खुप छान माहिती वाचायला मिळाली.लेख लिहीणारे व आमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या टिमलाही धन्यवाद.

 7. अनपेक्षित अपूर्व आनंद झाला.दिदी चा परिचय वाचून,दीदी रविराज गंधेच्या, भगिनी.त्याचं कार्य अजोड,आम्लांन,मराठी प्रेमातून उमललेल्या रोपट्याचा आत्ता झालेला प्रगतिभरा अवकाश याचे कौतुक वाचतांना अभिमान वाटला.दिदींना हार्दिक शुभेच्छा…

 8. मराठी भाशेच्या शाळा महााराााष्र्टाातून बंद होतायत.या दु:खद सत्याावर सुनंदााताईंच ,एकघरे तााईच कार्य खरोखर गौरवास्पद आहे.किमान भारतातील एका स्वायत्त संस्थेने त्यांना पुर्ण सहकााार्य दिल म्हणून पुढची वाटचााल कल्पकतेने झााली.लेख सविस्तर व मााहितीपुर्ण आहे मेघना.

 9. खूप सुंदर लेख व माहिती. अमेरिकेत मराठी शाळांनी मूळ धरलंय हे पाहून आनंद झाला.

 10. सुनंदाताईंचे अभिनंदन. जगातील सर्व महाराष्ट्र मंडळांनी ….जेथे आहेत त्या देशात मराठी शिकवण्याचे कार्य सुरू करावे…. ही देवी सरस्वतीकडे प्रार्थना. भारतमातेचे…मराठी भाषेचे ऋण …काही अंशी फेडण्यासाठी ही एक संधी आहे. आपले जे चांगले आहे त्याचा आदर आपण केला तरच दुसरे करतील.

 11. आदरणीय टुमणे मॅडम करत असलेले मराठीच्या अध्यापनाचे कार्य थोर आहे, थिंक महाराष्ट्र मुळे हे कार्य सर्वदूर पोहोचले, टुमणे मॅडम d थिंक महाराष्ट्र यांचे मनःपूर्वक अभिनदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here