महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्थांच्या नावांमध्ये ‘अन्नपूर्णा परिवारा’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ही संस्था गरीब आणि गरजू महिलांच्या सक्षमीकरणाविषयी समग्र विचार करते. व्यवसाय, आरोग्य, कुटुंबाचा विकास, आरोग्य, निवृत्तीवेतन अशा अनेक आघाड्यांवर भक्कमपणे महिलांच्या पाठीशी उभी रहाणारी संस्था अशी अन्नपूर्णा परिवाराची ओळख आहे. अन्नपूर्णाच्या संस्थापक, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, डॉक्टर मेधा पूरव-सामंत यांना हा सेवेचा आणि तडफदारपणाचा वसा आणि वारसा त्यांचे आईवडील प्रेमा पुरव आणि कॉम्रेड दादा पुरव यांच्याकडून मिळाला, त्याचे त्यांनी आधारवडात रूपांतर केले.
आजमितीला सव्वा लाख शेअर होल्डर्स, बचत करणाऱ्या महिला आणि तीनशे पन्नास कर्मचारीवर्ग असलेल्या या संस्थेची माहिती सांगत आहेत पत्रकार आणि लेखिका वृषाली मगदूम. समतोल, समभान असणारा समाज घडवणे हे अन्नपूर्णा परिवाराचे उद्दिष्ट आहे. तेच उद्दिष्ट सर्व सजग माणसांचेही असते, असावे.
‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-सुनंदा भोसेकर
अन्नपूर्णा परिवार
गरीब, गरजू महिला व त्यांची कुटुंबे, ह्यांचे सक्षमीकरण हे उद्दिष्ट घेऊन, वंचित, कष्टकरी महिलांना आर्थिक पाठबळ देणारा अन्नपूर्णा परिवार पुणे, मुंबई येथे 1993 पासून अविरत कार्यरत आहे. अन्नपूर्णा परिवाराने गेली एकतीस वर्षे विनातारण कर्ज व अन्य बचत योजना राबवून महिलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करण्याचे काम केले आहे, करत आहे. 1993 साली लावलेल्या या रोपट्याचा वेल आज गगनावेरी गेला आहे. या महिलांचे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण करत अन्नपूर्णाने त्यांना स्वतःच्या मालकी हक्काच्या घराचे स्वप्नही दाखवले, त्याची पूर्तता अनेकजणींनी करताना जी कृतार्थता अनुभवली तिला शब्दात बांधता येणार नाही.
या महिलांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अन्नपूर्णाचे डॉक्टर सतर्क असतात. जीवन विमा, आरोग्य विमा, कुटुंब विमा, मालमत्ता हानी विमा; ह्या आर्थिक सुविधासुद्धा अन्नपूर्णा परिवारामध्ये एकवीस वर्षांपासून यशस्वीपणे राबवल्या जात आहेत.
हात-पाय थकले की औषधपाणी व इतर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी या महिलांना कोणाकडेही हात पसरावे लागू नयेत म्हणून ‘आधार पूर्णा निवृत्तीवेतन योजना’ अन्नपूर्णाने राबवली आहे. त्याच सोबत कष्टकरी महिलांचे भविष्य त्यांच्या मुलांमध्ये आहे, हे लक्षात घेऊन ‘वात्सल्य पूर्णा’ आणि ‘विद्या पूर्णा’ ह्या दोन प्रकल्पांअंतर्गत वस्ती वस्ती मध्ये पाळणा घरे आणि एकल माता – मुलांच्या शिक्षणासाठी अन्नपूर्णां परिवार आर्थिक मदतीचा हात देणारी शिष्यवृत्ती गेली एकवीस वर्षे सातत्याने पुरवत आहे. त्यामुळे हजारो मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.
हा सारा प्रवास खचितच सोपा नाही, बँकांचा दृष्टिकोन वेगळा असतो, बँका लघुवित्त कर्ज देत नाहीत, सावकार लुबाडतात, सतत कर्जाच्या ओझ्याखाली ठेवतात, अशा गरीब, गरजू पण जीवनात परिवर्तन आणण्याची आस असणाऱ्या महिलांपर्यंत अन्नपूर्णाच्या संस्थापक, सर्वेसर्वा, महिलांचा आधार, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, डॉ.मेधा पूरव-सामंत पोचल्या. त्यांनी या आमूलाग्र बदलासाठी दिवस रात्र एक केला. बँकानाही लाजवेल अशी गुणवत्तापूर्ण शिस्तबद्ध रचना विकसित केली. छोट्या प्रमाणात कर्ज देणे, पुन्हा पुन्हा कर्ज देत राहणे, बचत व कर्ज पुरवठा करणे अशी ही लघु वित्त रचना आहे.
मेधाताई बँक ऑफ इंडियामध्ये 1993 मध्ये नोकरी करत होत्या. त्यांना बँकेतून परत येत असताना पुण्यातील पौड फाटा या रस्त्यावर भाजीचा व्यवसाय करणाऱ्या महिला भेटत. मेधाताई त्यांच्याशी भाजी घेत असताना संवाद करत असत. त्या महिला खाजगी सावकाराकडून कर्ज घेत असत. सावकाराकडून त्या महिलांची लुबाडणूक होत असल्याचे मेधाताईंच्या लक्षात आले. मग मेधाताईंनी त्यातील नऊ महिलांना प्रत्येकी एक एक हजार रुपयांचे कर्ज दिले. त्या महिला भाजीचा व्यवसाय करून रोज पंचवीस रुपये परतफेड करत. स्वतः मेधाताई रोज त्यांचे हप्ते जमा करून घेत. त्यांचे कर्ज दोन महिन्यात फिटले, शिवाय त्यांची बचतही झाली. या निरक्षर महिलांसाठी तो आनंदाचा क्षण होता, त्यावेळी त्यांनी मेधाताईंचा हात जो घट्ट पकडला तो आजतागायत सोडलेला नाही. यामध्ये शेवंताबाई, अनुसयाबाई, जहिदाबी या महिला आहेत.
अल्प रकमेचे अल्पकालीन कर्ज उभे करून दिले, तर अनेक गरीब स्त्री-पुरुषांची जगण्याची वाट सुकर होऊ शकते हे, हा अभिनव प्रयोग यशस्वी झाल्याने मेधाताईंच्या लक्षात आले. बँका गरीबात गरीब महिलेपर्यंत पोचत नाहीत. जिला खरंच गरज आहे तिच्यापर्यंत पोचण्याची सावकार सोडून कोणतीच प्रामाणिक यंत्रणा समाजात अस्तित्वात नाही, हे त्यांच्या लक्षात आले. मेधाताईंमध्ये उपजतच एक धडाडीची कार्यकर्ती आहे. त्यांच्याकडे हा वसा व वारसा आई-वडिलांकडून आला आहे. त्या श्रमिकांच्या हक्कासाठी शेवटच्या घटकेपर्यंत कार्यरत असणाऱ्या कॉम्रेड दादा पुरव यांना पहातच वाढल्या. त्यामुळे त्यांनी बँक ऑफ इंडियातील उच्च पदाची नोकरी एका झटक्यात सोडली, वस्ती पातळीवरील महिलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी वयाच्या तेहतिसाव्या वर्षी एका उर्मीने व जिद्दीने या कामात स्वतःला झोकून दिले.
मेधाताईंनी आपले काम पुण्यातील स्वतःच्या घरात जिन्याखालच्या एका खोलीत सुरू केले. गोपीनाथ नगर, कोथरूड येथे दहा बाय दहाच्या खोलीत ज्या सभासदांना कर्ज वाटप केले ते सभासद आजही मेधाताईंच्या संपर्कात आहेत. मेधाताईंच्या घराच्या गच्चीत 1995 ते 2000 पर्यंत कार्यालय होते. त्यांनी अन्नपूर्णा परिवाराच्या मालकीचे पहिले ऑफिस कर्वेनगर वस्तीत 2003 साली घेतले. 1993 ते 2003 एवढ्या काळात सभासद संख्या नऊ या आकड्यावरून तीन हजार इतकी झाली. शून्यावरून पस्तीस लाख रूपये पोर्टफोलिओ झाला, तीस कर्मचारी काम करू लागले. वारजे येथे चौथे ऑफिस 2008 मध्ये सुरू झाले, सुवास्तू येथे सहा मजली इमारतीत सुसज्ज ऑफिस 2018 मध्ये सुरू केले. पुण्याप्रमाणेच मुंबईत काम 2003 पासून सुरू केले. मायक्रो फायनान्स, मायक्रो मायक्रो इन्शुरन्स इत्यादी उपक्रम नवी मुंबईतील वाशी येथील कार्यालयातून चालू आहेत. पुण्यातील सर्व सहाशे पन्नास वस्त्यांमध्ये एकूण बारा शाखा आहेत. मुंबईतील बाराशे वस्त्यांमध्ये एकूण दहा शाखांद्वारे प्रत्येक वस्तीमध्ये सेवा पोचवल्या जात आहेत.
आज वीस बोर्ड मेंबर्स, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ कन्सल्टंट, ॲडव्हायझरी बोर्ड मेंबर्स आहेत. साडेतीनशेहून अधिक स्टाफ, पंचेचाळीस हजार कर्जदार, सव्वा लाख शेअर होल्डर व बचत करणाऱ्या सभासद महिला आहेत. दोनशे कोटी रूपयांची उलाढाल होत आहे. कर्ज बचत विभाग, विमा योजना, पेन्शन, शैक्षणिक शिष्यवृत्ती, पाळणाघर या सुविधा देऊन महिलांचे सक्षमीकरण होत आहे.
मेधाताईंनी एकतीस वर्षांपूर्वी गरजू व गरीब महिलांसाठी काम करायचे ठरवल्यानंतर ह्या कामाचे सामाजिक, शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचे ठरवले. त्यांच्या Statistics ह्या मूळच्या विषयाबरोबरच बारा वर्षांचा बँकिंगचा अनुभव त्यांच्या गाठीला होता. तरीही त्यांनी पुण्याच्या ‘कर्वे समाज सेवा संस्थे’त सामाजिक कार्याची द्वी पदवी घेतली. त्यांचे त्या काळातही काम चालूच होते. त्या महिला व सक्षमीकरणाचा दोन महिन्याचा कोर्स ससेक्स युनिव्हर्सिटी लंडन येथे 1996 मध्ये करून आल्या. त्यानंतर मेधाताईंनी ‘लघु वित्त’ या विषयात पुणे विद्यापीठात पीएचडी केली. त्यांनी ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्याचे ज्ञान मिळवणे, ते ज्ञान अद्ययावत करणे हे आवर्जून केले.
त्यापुढे एक पाऊल म्हणजे स्वतःच्या कल्पना व ज्ञान वापरून या सर्व कामात शिस्त व लवचिकता आणण्याचे काम केले; जे त्या आजही करत आहेत. त्यासाठी त्यांना आजही रोज दहा ते बारा तास काम करावे लागते. अन्नपूर्णा परिवाराच्या सहा घटक संस्था आहेत. अन्नपूर्णा महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, अन्नपूर्णा परिवार विकास संवर्धन, वात्सल्यपूर्ण स्वयंरोजगार सेवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी पुणे, दादा पूरव रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अन्नपूर्णा महिला मंडळ मुंबई, पूर्णा ई सोल्युशन्स फाउंडेशन; या घटक संस्था गरीब महिला व त्यांची कुटुंब यांना सक्षम करण्यासाठी विना फायदा तत्त्वावर कार्यरत आहेत.
अन्नपूर्णा महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पुण्यात दापोडी, कर्वेनगर, सातारा रोड, विश्रांतवाडी, हडपसर, सिटी एरिया, धायरी शिवाजीनगर, पिंपरी, देहूरोड, येरवडा, पर्वती व शिवणे अशी बारा कार्यालये आहेत तर मुंबईत शेवरी, चेंबूर, कळवा, मानखुर्द, घाटकोपर, तुर्भे, कल्याण, ठाणे या ठिकाणी मिळून दहा कार्यालये आहेत. ती कार्यालये आज सतराशे पन्नास वस्त्यांमधून काम करत आहेत. पाच जणींचा एक गट केला जातो. ही एकजूट एक मूठ असते, गटातील महिलांना रू 35000/- चे प्रत्येकी पहिले कर्ज दिले जाते. आज 35000/- रूपयांपासून पाच/दहा लाख रुपयांपर्यंतचे लघुवित्त कोणतीही गॅरंटी व सुरक्षितता न घेता अन्नपूर्णा परिवारातून महिलांना दिले जाते. त्या कर्ज घेतात आणि शंभर टक्के कर्ज फेडतात.
लघुवित्त ही महिलांची अतिशय महत्त्वपूर्ण गरज आहे, लघु कर्ज, लघुबचत, लघुविमा या गोष्टींचाही समावेश आहे, महिलांना प्रशिक्षण दिले जाते, प्रत्येक विभागात एक वस्ती प्रतिनिधी असते ती महिलांना एकत्र करणे अन्नपूर्णा परिवाराची माहिती पोचवणे हे काम करते, वस्ती प्रतिनिधीची दर महिन्याच्या सात तारखेला मीटिंग असते, त्यामध्ये वस्तीतील कामाची चर्चा, महिलांच्या समस्या व गरजा समजून घेतल्या जातात, वस्ती प्रतिनिधी या नेतृत्व गुण असलेल्या असतात, दर महिन्याच्या प्रशिक्षणातून तयारही होतात. दर महिन्याला लोन सर्विस ऑफिसरताई जाऊन कर्जवाटप, कर्जवसुली आरोग्याचे दावे व इतर गोष्टींवर काम करतात. त्यानंतर सर्विस एक्झिक्युटीव्ह या सर्व सेवा देणारे कर्मचारी बाकी कागदपत्रे जमा करून नोंदी करतात. प्रत्येक विभागात एक ब्रँच मॅनेजर असते, त्यानंतर (पीएम, एस एम, डी एम असतात) अन्नपूर्णा परिवार विकास संवर्धन हा विभाग ना नफा तत्वावर चालतो.
अन्नपूर्णा महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कर्ज-बचत या सुविधा घेणाऱ्या महिलांसाठी असून; या महिलांमार्फतच हा विभाग चालवला जातो. अपघात, मृत्यू आरोग्याच्या समस्या यामध्ये कुटुंबाला मदत केली जाते, जोडीदाराच्या मृत्यूनंतर वीस हजार रूपयांची मदत तात्काळ दिली जाते. कर्जाचे हप्ते माफ केले जातात. अन्नपूर्णा परिवाराने शेकडो प्रसिद्ध हॉस्पिटल बरोबर जोडूनही घेतले आहे. त्यामुळे सभासदांना आर्थिक सवलत मिळते. त्याखेरीज अन्नपूर्णाचे दोन डॉक्टर मुंबई व पुणे येथे चोवीस तास सभासदांना आरोग्य सेवा द्यायला उपलब्ध असतात.
अन्नपूर्णाने असंघटित महिलांसाठी ‘दीर्घ बचत योजना’ राबवल्या आहेत, या कार्यक्रमामधून महिलांना सामाजिक सुरक्षा मिळते. अन्नपूर्णा परिवारात महिलांचा सहभाग व निर्णय क्षमता महत्त्वाचे मानले आहे. महिलांना जेव्हा सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातात तेव्हा तिच्या कुटुंबाचाही विचार केला जातो, कुटुंबालाही सर्वतोपरी मदत केली जाते, अन्नपूर्णाने ‘समूह फायदा’, ‘समूह कल्याण’ यावर भर दिला आहे. सुरुवातीला महिला छोटी छोटी कर्जे घेत राहतात आणि त्यानंतर अन्नपूर्णाशी जोडल्या गेल्या की मोठी कर्जे घेत अन्नपूर्णाच्या सर्व सेवा घेत राहतात, शेवटी निवृत्ती वेतनही येते.
मेधाताईंच्या मते गरीब लोक एकत्रित आले, की परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांना दिशा देण्याचे काम आपण केले पाहिजे. मेधाताईंनी या सर्व उलाढालीत स्वतःसाठी आर्थिक परताव्याची कधीही अपेक्षा केली नाही. त्यांच्या मते अन्नपूर्णानेही यंत्रणा उभी करताना उपाय शोधला नाही तर सर्व सेवांची शिस्तबद्ध रचना केली व ती राबवली. आज भाजीवाल्या, मासे विक्री करणाऱ्या अशा तळागाळातील असंख्य महिलांबरोबर पुणे व मुंबई शहरातील सर्व झोपडपट्टयांतून अन्नपूर्णा काम करत आहे. मराठवाडा व इचलकरंजी येथेही अन्नपूर्णा परिवाराचे काम चालू आहे. या कामातून छोट्या छोट्या उद्योजिका तयार झाल्या आहेत. सर्वांगीण सामाजिक विकास झाला असून जो देशाला विकासाकडे घेऊन जात आहे. समतोल, समभान असणारा समाज घडवणे हे अन्नपूर्णा परिवाराचे उद्दिष्ट आहे.
– वृषाली मगदूम 9322255390 vamagdum@gmail.com
अत्यंत आवश्यक काम जिद्दीने मोठ्या प्रमाणावर व प्रदीर्घ काळ करणाऱ्या मेधा सामंत व त्यांच्या सहकाऱ्यांवं मनभरून कौतुक.
अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मेधा ताईंचे आहे.
खूप छान लेख आहे.