अनोखे गुरू-शिष्य गायक भातखंडे-रातंजनकर-गिंडे

1
30
_Anokhe_Guru_Shishya_1.jpg

गुरू-शिष्य नात्याबद्दल कथा अनेक प्रचलित आहेत- प्रेमकथा, भक्तिभावाच्या कथा आणि गुलामीसदृश वागवण्याच्याही. पूर्वीच्या काळी, गुरुकुल पद्धतीत शागीर्द गुरूच्या घरी राहायचा, गुरूची सर्व प्रकारची सेवा करायचा आणि त्यातून गुरूची मर्जी राखली गेली तर त्याच्या कानी आणि गळी काही उतरायचे.

पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी मात्र त्यांचा परमशिष्य श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यास सर्वस्वी वेगळ्या पद्धतीने वाढवले. त्यांनी त्याला त्यांच्या पदराखाली घेऊन त्याचे मुलासारखे शिक्षण नव्हे, तर पालनपोषणदेखील केले; त्याला व्यावसायिकाची तालीम हवी म्हणून बडोद्याला उस्ताद फैयाज खाँ यांच्याकडे पाठवले. त्यांनी तेथे श्रीकृष्ण रातंजनकर याच्या कॉलेजशिक्षणाची व्यवस्थाही केली आणि त्याच्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्याच्या हाती लखनौच्या मॉरिस कॉलेजचा कारभार सोपवला. त्यांनी ‘त्यांच्या श्रीकृष्णा’ला त्याहून महत्त्वाचे म्हणजे गुरूने शिष्याला कसे वाढवावे हेही जणू शिकवले. त्यामुळे रातंजनकर यांनीदेखील त्यांच्या शिष्यांना प्रेमाने, आस्थेने वागवले/वाढवले. रातंजनकर यांना त्यांचे सगळे शिष्य अजूनही का मानतात हे त्यामुळे सहज समजण्यासारखे आहे. त्या शिष्यांत पं. कृष्णराव गुंडोपंत गिंडे यांचे स्थान विशेष आहे. कृष्णा हा बेळगावजवळील बलहोंगल या लहानशा खेड्यात जन्मला. तो नऊ भावंडांपैकी आठवा. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि ते संगीतात डुंबलेले असत. त्यामुळे कृष्णाच्या बालपणापासून त्याच्या गायनकलेला उत्तेजन मिळाले. कुमार गंधर्वही बेळगावचे. त्यामुळे त्यांचीही दोस्ती होती.

वडील डॉ. गुंडोपंत गिंडे यांनी कृष्णाला चांगले गुरू मिळावेत म्हणून प्रयत्न केले. कृष्णाचे मोठे भाऊ रामचंद्र हेही डॉक्टर होते. त्यांचा श्रीकृष्ण तथा अण्णासाहेब रातंजनकर यांच्याशी मुंबईत घरोबा होता. अण्णासाहेब कॉलेजमुळे लखनौला वास्तव्याला होते. ते फक्त सुट्टीत मुंबईला येत. त्यामुळे त्यांनी त्या छोट्या मुलाला शिकवण्याचे नाकारले. त्यांनी 1936 साली मात्र वेगळा विचार केला. ते मे महिन्याच्या सुट्टीत मुंबईला येत. कृष्णाच्या बेळगावच्या शाळेलाही तेव्हाच सुट्टी असे. अण्णासाहेबांनी डॉ. रामचंद्र यांना त्यांच्या भावाला मुंबईत आणण्यास सांगितले. तो अकरा वर्षांचा मुलगा सुरुवातीला बिचकला, पण मग रोज संध्याकाळी अण्णासाहेबांकडे शिकवणीसाठी जाऊ लागला.

_Anokhe_Guru_Shishya_3_0.jpgअण्णासाहेबांनी त्याला एके दिवशी विचारले, की ‘तू रोज अशी ये-जा करण्यापेक्षा येथेच का राहत नाहीस?’ तेव्हा, कृष्णा न बुजता त्यांच्याकडे राहण्यास तयार झाला. नवऱ्याचे नाव न घेण्याचा त्यावेळी रिवाज असल्यामुळे श्रीकृष्ण रातंजनकर यांच्या पत्नी या कृष्णाला ‘छोटू’ म्हणू लागल्या. मग त्याला सगळेच जण ‘छोटू’ म्हणू लागले. असा तो रातंजनकरांचा ‘छोटू’ झाला आणि पुढे तहहयात त्याच नावाने ओळखला गेला.

कृष्णा हा रातंजनकर यांच्याकडे रुळल्यामुळे तो लखनौलाही जाऊ शकेल असा विश्वास डॉक्टर भावाला वाटला. त्याप्रमाणे कृष्णा लखनौला जाण्यास निघाला. तेव्हा डॉ. गुंडोपंतही त्यांच्या मुलाला दीर्घ प्रवासाआधी भेटण्यास म्हणून बेळगावहून आले होते! अण्णासाहेब त्यांना बोरीबंदर स्टेशनवर ट्रेन सुटण्यापूर्वी म्हणाले, ‘‘मी याला माझा मुलगा मानलेले आहे. तुम्ही त्याची यत्किंचितही काळजी करू नका.’’
त्या छोट्या मुलाला कॉलेज म्हणजे काय, अण्णासाहेब त्याचे प्राचार्य आहेत म्हणजे नेमके काय करतात याची कल्पना असणे शक्य नव्हते. कृष्णा त्याला एकटेच बसावे लागते म्हणून काही वेळाने रडू लागला. तेव्हा अण्णासाहेबांनी एका सेवकाला बोलावून कृष्णाला संस्था दाखव म्हणून सांगितले. त्यावेळी उपप्राचार्य नातूसाहेब तिसऱ्या वर्गाचा क्लास घेत होते. तेथे तो मुलगा जाऊन बसला. त्याच वर्गात ‘नंदू’ या नावाने ओळखले जाणारे एस.सी.आर. भटही होते. अशा तऱ्हेने कृष्णाच्या संगीत शिक्षणाची सुरुवात नव्याने झाली.

अर्थात कृष्णाला शिकवणे ही अण्णासाहेब त्यांची जबाबदारी मानत होते. त्यांचे कॉलेजातील काम संपले, की ते कृष्णाला शिकवू लागले. गायन शिकवत असताना, कृष्णाचे शालेय शिक्षणही चालू ठेवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे याची त्यांना जाणीव होती. पण लखनौला शाळेत घालायचे तर कृष्णाला हिंदी येणे आवश्यक होते. मग त्यांनी कृष्णाची दोन महिने हिंदीची पूर्वतयारी आणि गाण्याचा रियाज अशी कसून तयारी करून घेतली आणि वर, कृष्णाला हिंदी शाळेत घालण्यात आले. तेथे तो सहावीत जाऊ शकला आणि पुढे, दीड वर्षाने रीतसर संगीताच्या तिसऱ्या वर्गात दाखल झाला. कृष्णाने अठराव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला.
म्युझिक कॉलेजमधील शिक्षण चालूच होते. तेथे नंदभट हे विशारदच्या वर्गात असताना, कृष्णाच्या वर्गाला शिकवत होते. नंदभट हे उत्तम शिक्षक. शिवाय, त्यांचा कटाक्ष रियाजाबद्दल असे. कृष्णाचे पाठांतर त्यांच्या शिस्तीमुळे पक्के झाले. पुढे, त्याच पं. कृष्णराव गिंडे यांची ‘संगीताचा चालता-बोलता ज्ञानकोश’ अशी ख्याती झाली, त्याचे बरेचसे श्रेय त्या शिक्षणाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा अण्णासाहेबांसोबतच राहायचा. तो शालांत परीक्षा आणि संगीत विशारद परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत अण्णासाहेबांचा सर्व बाबतींत मदतनीस झाला होता. त्या नात्याने त्याला कॉलेजच्या सगळ्या कार्यक्रमांना मुक्तद्वार असे. अण्णासाहेबांकडे येणाऱ्या सर्व पंडित-उस्तादांच्या भेटीगाठीचा लाभ त्याला होत असे. त्यामुळे विविध प्रकारची संगीतविषयक ज्ञानसाधना कृष्णाला सहज शक्य होत असे. पाहुणे कलाकार आले, की त्यांना तंबोऱ्यावर साथ करणे हा त्याचा छंदच झाला होता. तेव्हा संपूर्ण हिंदुस्थानात फक्त आठ रेडिओ स्टेशने होती. त्यात लखनौ रेडिओ स्टेशनला विशेष महत्त्व होते. सर्व थोर गायक तेथे हजेरी लावत आणि बऱ्याच वेळा, ते कॉलेजातच मुक्काम करत. त्यामुळे कृष्णाच्या गाण्याला पैलू निरनिराळे पडत होते.

_Anokhe_Guru_Shishya_2.jpgकृष्णा गिंडे त्यांना उत्तम तालीम मिळाल्यामुळे अठराव्या वर्षांपासूनच लखनौ रेडिओ स्टेशनवर गाऊ लागले. ते रातंजनकर कुटुंबातील एक 1936 ते 1951 अशी सलग सोळा वर्षें झाले होते. ते सुट्टीतही मुंबईला यायचे ते बेळगावला स्वत:च्या घरी जाण्यासाठी नव्हे; तर ते अण्णासाहेबांच्या घरीच राहायचे. मुंबईत डॉ. रामचंद्र आणि गणपतराव हे त्यांचे दोघे मोठे भाऊ स्थायिक झाले होते, तरी कृष्णा त्यांच्याकडे उतरत नसत. तेच मग कृष्णाला भेटण्यास अण्णासाहेबांकडे येत असत. अण्णासाहेब आणि कृष्णा परस्परांशी इतके एकरूप झाले होते, की गुरू त्यांचा सगळा व्यवहार त्या शिष्यामार्फत करत असत. अण्णासाहेबांना बंदिशी सुचल्या, की कृष्णा त्या लिहून काढण्याचे काम करत असे. शिष्याने स्वररचना केल्या तरीही त्या गुरूच्या कल्पनेशी काही वेळा तंतोतंत जुळत.

अर्थात तो सहवास कधीतरी संपणार होता. त्या ताटातुटीच्या वेळच्या दोन घटना हृद्य आहेत. गिंडे लखनौ सोडण्यापूर्वी सगळा हिशेब पूर्ण करत बसले होते. अण्णासाहेब ते पाहिल्यावर त्यांना म्हणाले, ‘‘आता यात वेळ काढू नकोस. घरी पोचल्यावर सगळा हिशेब कर. मी काही द्यायचे असतील तर कळव. तू द्यायचे निघत असतील तर काही काढू नकोस.’’ अण्णासाहेबांना त्यांचा तो पुत्रवत शिष्य दूर जाणार ही भावना क्लेश देत होती. अण्णासाहेबांना कृष्णाला निरोप देण्यासाठी स्टेशनवर जाणेही तापदायक वाटले. त्यांनी निघताना कृष्णाला एक पाकिट दिले. त्यात एक बंदिश होती. त्यांनी ‘वियोगवराळी’ हा नवीन राग त्यासाठी तयार केला होता. वियोगाची ती भावना इतकी प्रखर होती, की ती आशीर्वादपर बंदिश अण्णासाहेब किंवा गिंडे मैफलीत कधीच गाऊ शकले नाहीत. अखेरीस, नंदभट यांनी ती गिंडे यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती कार्यक्रमात पहिल्यांदा गायली.

अण्णासाहेबांनी त्यांच्या शिष्याला महत्त्वाची आणखी एक भेट दिली होती. ती त्यांच्या प्रेमळ गुरुबंधूंची! नंदभट हे अण्णासाहेबांचे शिष्य. एका अर्थाने, तेही गिंडे यांना गुरुस्थानी होते. गिंडे मुंबईत फेब्रुवारी 1952 मध्ये आले. ते काही काळ मोकळे होते. त्यांना नंदभट यांनी त्यांच्या काही शिकवण्या दिल्या. गिंडे त्यानंतर ‘भारतीय विद्याभवन’च्या संगीत शिक्षापीठात शिकवू लागले. चिदानंद नगरकर हे प्राचार्य आणि नंदभट हे त्यांचे गुरुबंधू. फादर फ्रॉक्स हे जर्मन संगीतज्ञ नगरकर यांच्याकडे काही निमित्ताने आले असताना, त्यांच्याबरोबर परदेशी जाण्याची संधी नगरकर यांनी गिंडे यांना उपलब्ध करून दिली. गिंडे यांचे संगीतज्ञान नगरकर यांच्या सोबतच्या कामाने आणि युरोप दौऱ्यादरम्यान फुलत गेले.

रातंजनकर यांचा शिष्यवर्ग एकमेकांना सांभाळून होता. तो अण्णासाहेबांचा सल्लाही शिरसावंद्य महत्त्वाच्या बाबतींत मानत होता. ‘श्री वल्लभ संगीतालया’चे स्वामी श्री. वल्लभदास हे उस्ताद फैय्याज खाँ यांचे शिष्य म्हणजे रातंजनकर यांचे गुरुबंधू. त्यांच्यामुळे गिंडे आणि भट, दोघेही पुढे ‘श्री वल्लभ संगीतालया’त शिकवू लागले. दोघांचेही शिक्षण लखनौला झाले होते. त्यामुळे त्यांच्या सांगीतिक विचारांत साधर्म्य होते. ती जोडगोळी यशस्वी ठरली. डॉ. रामचंद्र हे पुढील अभ्यासासाठी कॅनडाला गेले असताना, कृष्णाच्या लग्नाची जबाबदारीही नंदभट यांनी घेतली. गुरू रातंजनकर यांच्या परवानगीने कृष्णाचे लग्न मीरा कोप्पीकर या मुलीशी ठरवले.

रातंजनकर हे लखनौच्या संस्थेतून निवृत्त झाल्यावर काही काळ खैरागढम् येथील ‘इंदिरा संगीत विश्वविद्यालया’चे कुलगुरू होते. पुढे काही काळ, ते मुंबईत ‘श्री वल्लभ संगीतालया’त मानद गुरू होते. तेव्हा त्यांच्यातील गुरू-शिष्य नाते पुन्हा एकदा उमलून आले. रातंजनकर यांना बंदिश सुचली, की ते एका पोस्टकार्डावर लिहून गिंडे यांना पाठवत आणि पुढील सर्व संस्कार गिंडे करत. रातंजनकर यांच्या बंदिशी बरीच वर्षें ‘पॉप्युलर बुक डेपो’ प्रसिद्ध करत असे. त्यावेळी मुद्रितशोधनापासून सगळी उस्तवार गिंडे हेच करत असत. बंदिशी जुन्या, खिळे जुळवण्याच्या पद्धतीने छापणे किचकट आणि नवीन संगणक प्रणाली पुरेशी तयार झालेली नसल्याने; पुढे, गिंडे यांनी त्यांच्या जवळजवळ सातशे बंदिशी त्यांच्या सुवाच्य अक्षरात लिहून काढल्या आणि त्यांचे ऑफसेट पद्धतीने मुद्रण केले. त्यासाठी त्यांनी ‘आचार्य रातंजनकर फाउंडेशन’ची स्थापना केली. त्यांनी गुरूने अपूर्ण ठेवलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे व्रत घेतले होते. त्यांनी त्यांच्या अनेक व्याख्यानांतून गुरूने आणि परात्पर गुरू भातखंडे यांनी सांगितलेले संगीतशास्त्र उलगडून दाखवले. रातंजनकर यांनी जवळजवळ पंचवीस राग नव्याने प्रचलित केले होते. त्यांनी स्वत: त्या साऱ्या बंदिशी गाऊन त्यांचे ध्वनिमुद्रण केले. अनेकांना त्यांचे ज्ञान खुले करून दिले. गुरू-शिष्यांची ती जोडी अनोखी ठरली.

‘घराणे’ हा शब्द प्रचलित झाला तेव्हा बहुतेक शिष्यवर्ग हा कुटुंबातीलच असायचा. बंदिशी या वारसा हक्काने किंवा हुंडा म्हणून दिल्या जायच्या. त्यात बदल हळुहळू होत गेला. भातखंडे-रातंजनकर-गिंडे हे भारतीय जातिव्यवस्थेनुसारही वेगवेगळे; तरीही हा सांगीतिक संकर हिंदुस्थानी संगीताच्या दृष्टीने सुखकर ठरला.

– रामदास भटकळ, ramdasbhatkal@gmail.com

(लोकसत्ता, २२ जुलै २०१८ वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleलिविंग इन रिलेशनशिप, ऐंशी वर्षांपूर्वी – महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश
Next articleझोतचे फेरलेखन गरजेचे!
रामदास भटकळ यांचा जन्म 5 जानेवारी 1935 साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. त्यांनी चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एलएल. बीचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून एम.ए. पूर्ण केले. पॉप्युलर या मराठी पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. त्यांनी प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या ‘इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस’मध्ये तीन महिन्याची नोकरी केली. त्यांनी यु.एस.स्टेट डिपार्टमेंटच्या निमंत्रणावरुन 1965 साली अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला. रामदास भटकळ यांनी ‘बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन’ व ‘कॅपेक्सिल’ या निर्यातदारांच्या संस्थेच्या ‘बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल’चे अध्यक्षपद भुषविले आहे. त्यांनी ’द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया’, ‘जिगसॉ’, ‘मोहनमाया’, ‘जगदंबा’, ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. भटकळ हे महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9820871408

1 COMMENT

Comments are closed.