अनेपिक्षित –अफलातून!

0
25

– सुरेश टिळेकर

पुण्याच्या शनिवारपेठेतील मंदार लॉजचा मालक साहित्यप्रेमी आहे. त्यानं आपल्या लॉजमधला एक हॉल साहित्यविषयक कार्यक्रमासाठी देऊ केला आणि त्यातून आगळीवेगळी, रंगतदार मैफलच घडून आली. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडताना अंजली कुलकर्णी म्हणाल्या, की भोवताली जे झगमगाटी स्वरूपाचे मेगाइव्हेंटस पाहतो; तसा उत्सवी थाटमाट टाळून कार्यक्रमाच्या आशयावर लक्ष केंद्रित व्हावं ही आमची इच्छा आहे. ज्या कवीनं ‘लालकोवळा काळोख’, ‘ग्लोरिया’, ….

– सुरेश टिळेकर

पुण्याच्या शनिवारपेठेत मंदार लॉज आहे. तिथला मालक साहित्यप्रेमी आहे. तो लॉजच्या गल्ल्यावर बसून पुस्तकं वाचतो. त्यानं आपल्या लॉजमधला एक छोटासा, राऊंडटेबल कॉन्फरन्सला शोभेल असा हॉल साहित्यविषयक कार्यक्रमासाठी देऊ केला आणि त्यातून आगळीवेगळी, रंगतदार मैफलच घडून आली. पुण्यातली साहित्य, पत्रकारिता विश्वातली वीस-पंचवीस माणसं कार्यक्रमाला हजर झाली. कार्यक्रम आखला कवी नरेंद्र बोडके यांनी. पार्श्वभूमी मांडली अंजली कुलकर्णी यांनी. त्या म्हणाल्या, की भोवताली सर्वत्र जे झगमगाटी स्वरूपाचे मेगाइव्हेंटस पाहतो; तसा उत्सवी थाटमाट टाळून कार्यक्रमाच्या आशयावर लक्ष केंद्रित व्हावं ही आमची इच्छा आहे. ज्या कवीनं ‘लालकोवळा काळोख’, ‘ग्लोरिया’, ‘समुद्रकविता’ यांसारखी अस्सल कविता लिहिली आणि जो बेदखलपणे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पायरीवर मरून गेला, त्या गुरुनाथ धुरींच्या नावे पुरस्कार द्यावा म्हणून आम्ही एकत्र आलो. पुढाकार नरेंद्र बोडके यांनी घेतला. त्याच ओघात सुचलं, की एखाद्या ध्यानमग्न साधूप्रमाणे कवितेच्या, चिंतनाच्या गुहेमध्ये आत्मानंदात रमणारे मनस्वी कवी सुदेश लोटलीकर हेच या पुरस्कारासाठी लायक व्यक्ती आहेत! पुरस्कार प्रदान करायला येण्यास, वेगळ्या वाटांचा विचार करणारे लेखक श्याम मनोहर यांनी होकार दिला आणि या ‘कॉम्बिनेशन’मधून अफलातून, अनौपचारिक कार्यक्रम घडून आला.
 

खरंतर, पुरस्कार हे निमित्त होतं -कारण श्याम मनोहर यांनी त्यांच्या भाषणात जे मांडलं ते अंतर्मुख करायला लावणार होतं. ते भाषण नव्हतंच. ते प्रकट चिंतन होतं. ते म्हणाले, की “अनेक कवी कविता लिहितात. हरकत नाही. प्रत्येकाला कविता लिहिण्याचा हक्क आहे. कवी कुणीही होऊ शकतो. परंतु त्यापाठीमागे चांगली कविता लिहिली जावी असा ध्यास हवा. त्यासाठी कवींनी गटागटाने चर्चा केली पाहिजे, चांगल्या कवितेचे निकष शोधले पाहिजेत, आपल्या जाणिवा विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वत:ची साहित्यकृती तपासून बघायला पाहिजे. स्वत:वरचं प्रेम कमी करून, पार मन विस्कटून जाईपर्यंत स्वत:लाच प्रश्न केले पाहिजेत. खरंतर, साहित्यविश्वात अशी छोटी छोटी अनेक बेबीयुनिव्हर्स निर्माण झाली पाहिजेत. त्याद्वारे कवींनी अनुभव, शैली, मैत्रिणी, प्रतिमा यांबाबत गप्पासत्रं घडवून आणावीत. त्यातून एखादा प्रतिभावान कवी सापडायची शक्यता आहे. पण त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा.”
 

श्याम मनोहर ‘बेबीयुनिव्हर्स’ची कल्पना नुसती मांडून मोकळे झाले नाहीत तर ते म्हणाले, की “इथंच एखादं गप्पासत्र आपल्याला सुरू करता येईल. मी सांगतो, की इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकानं आपापली चांगल्या कवितेची व्याख्या इथं सांगायची. त्यातून चांगल्या कवितेचे निकष सापडतात का ते आपण बघायचं!”
 

कार्यक्रमाला आलेले लोक या गोष्टीसाठी अनप्रिपेअर्ड होते. पण तरीही -कदाचित म्हणूनच– एक चांगलं गप्पासत्र त्यानंतर त्या छोट्याशा हॉलमध्ये रंगत गेलं. सुरुवात अंजली कुलकर्णी यांच्यापासून झाली. त्यांनी सांगितलं, की आपलं जगणं एकाच वेळी एकूण तीन पातळ्यांवर सुरू असतं – आपल्याभोवती पसरलेला अवाढव्य, अफाट, विराट, भयंकर, रौद्रभीषण, विशाल, भव्य, प्रसन्न, सौंदर्यपूर्ण, लयताल-रंगरेषाबध्द असा विविधरूपी निसर्ग; जन्मापासून आपल्याशी रक्तानं-बिनरक्तानं, नात्यांनी-बिननात्यांनी, इच्छेनं-अनिच्छेनं, जोडलेली-तोडलेली असंख्य माणसं, माणसांचा समाज; आणि आपलं स्वत:चं अत्यंत गूढ, खोल, स्वत:लाच अनाकलनीय असणारं, अनेक उलथापालथींनी भरलेलं मन. या तिन्ही पातळ्यांवर सुरू असलेल्या जगण्याचा शोध घेणारी कविता ही कविता असते.
 

नरेंद्र बोडके म्हणाले, की कवितेतून निसर्गाचं डिकोडिंग झालं पाहिजे. संगीता बर्वे यांनी अनुभवाचं रूपांतर अनुभूतीमध्ये होतं तेव्हा चांगली कविता जन्माला येते असं सांगितलं. पत्रकार अरूण खोरे यांनी गांधीजी आणि रवींद्रनाथ यांच्या पत्रव्यवहाराचे दाखले दिले आणि कवितेविषयीचं आपलं मत मांडलं. दैनिक ‘सकाळ ’चे निरंजन आगाशे, राजीव बर्वे यांनीदेखील या चर्चेत सहभाग घेतला.
 

‘शब्दमित्र’ वाड.मयीन चळवळीतर्फे या कार्यक्रमाच्या संयोजनात पुढाकार घेतला गेला. सुदेश लोटलीकर यांच्या ‘आत्मखुणा’ या नव्या संग्रहाचा ‘कविवर्य गुरुनाथ धुरी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

सुरेश टिळेकर – (020) 26330615

About Post Author