अनुभव अमेरिकेत शिकवण्याचा

3
65

मी अमेरिकेत ऑस्टिन शहरात माध्यमिक शाळेत गेली दहा वर्षें शिकवत आहे. इतक्या वर्षांनंतर, मला माझ्या तेथील शाळेबद्दल तितकीच माया, प्रेम वाटते जितकी आपुलकीची भावना माझ्या ठाण्याच्या लाडक्या सरस्वती शाळेबद्दल वाटते. जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांबद्दल काही कारणाशिवाय वाईट बोलले जाते तेव्हा मला वाटते, की मी त्यांची बाजू मांडली पाहिजे, कारण ती माझी मुले आहेत. शिक्षण हा एक उदात्त पेशा आहे म्हणून मी शिकवत नाही किंवा मी दुसरा कोठलाच पर्याय नव्हता म्हणूनही शिकवत नाही. मी शिकवते, कारण मला शिकवण्यास आवडते, मजा येते. मी माझे काम मनापासून करते आणि त्यात मला समाधान मिळते.

मी शिक्षणक्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत 2002 साली आले. पण शिकताना लक्षात आले, की वर्गात न शिकवता नुसत्या शैक्षणिक सिद्धांताविषयी बोलणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे. म्हणून मी शिक्षकाचा कोर्स 2004 साली केला. अमेरिकेत शिक्षण ही सरकारी जबाबदारी आहे. सरकारी शाळा फुकट असतात आणि आश्चर्य म्हणजे अनेकदा, त्या उत्तम असतात. सरकारी शाळांना पब्लिक स्कूल म्हणतात. सर्व मुले सरकारी शाळेत जातात. नागरिक ज्या भागात राहतो त्या भागातील शाळेत त्याच्या मुलाला प्रवेश देणे शाळा व्यवस्थापनास अनिवार्य असते. तेथे प्रवेशासाठी रांग लावावी लागत नाही आणि पैसेही लागत नाहीत. प्रायव्हेट शाळा आहेत पण त्या फार महाग आहेत. तेथे फार श्रीमंत व्यक्ती जातात. गरीब, मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय पालक मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवणे पसंत करतात. बऱ्याचदा, चांगल्या प्रसिद्ध शाळांजवळची घरे महाग असतात. कारण पालक मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी त्या भागात राहणे पसंत करतात. भेदभाव तेथेही आहे. गरीब वस्तीतील आणि मध्य/उच्चमध्यम वस्तीतील शाळांच्या दर्ज्यामध्ये बराच फरक असतो.

मी गणित-विज्ञान विषयाची शिक्षक आहे. माझे विद्यार्थी आठवीतील म्हणजे तेरा-चौदा वर्षांचे, अगदी अडनिड्या वयाचे. मला आल्यानंतर जवळजवळ तीन वर्षांनी खऱ्या अमेरिकन माणसांची ओळख झाली, ती शाळेच्या पहिल्या दिवसापासून. शाळेच्या पहिल्या दिवसाची मुलांना जितकी धाकधूक वाटते तेवढीच शिक्षकांनाही वाटत असते. मला दहा वर्षानंतरसुद्धा दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवसाआधीच्या रात्री झोप नीट लागत नाही. शिक्षक मुलांना जोखतात आणि मुले शिक्षकांना. मुले वर्गाचा ताबा घेण्यास थोडीशी जरी संधी दिसली तरी त्यासाठी तयारच असतात! मग शिक्षकाची भंबेरी उडते. मला पहिल्या वर्षी सगळेच नवीन होते. आता, मी ‘पहला साल भगवानके नाम’ असे म्हणते आणि विषय बदलते.

माझा वर्ग फक्त माझा असतो. शिक्षक त्यांच्या वर्गातच असतात. मुले वर्ग विषयानुसार प्रत्येक तासाला बदलतात. प्रत्येक वर्गात साधारण तीस-पस्तीस मुले असतात. मी एकाच वर्गात पूर्ण दिवस (आणि पूर्ण वर्ष) असल्यामुळे माझा वर्ग म्हणजे माझे घरच होते. मला हवी तशी वर्गाची मांडणी करू शकते. मी मलाच माझ्या वरच्या भिंती नुसत्या मोकळ्या राहिलेल्या बोरिंग वाटतात. मी त्या सजवते. माझ्या वर्गात भिंतीवर दिसेल – पिरिऑडिक टेबल, parts of atom, posters of Rutherford and Neil Bohr कारण मी केमिस्ट्री(Chemistry) शिकवत आहे. पण गेल्या महिन्यात, मी सगळीकडे Maps, Posters of universe, Rockets, Solar system लावले होते. कारण मी पृथ्वी आणि अवकाश शिकवत होते. मुलांचे उत्कृष्ट काम भिंतीवर लागले, की त्यांना आनंद होतो. ते सगळे करण्यास वेळ खूप लागतो, पण मी ते करून घेते. वर्ग माझा असल्यामुळे थोडा जास्त वेळ देण्याची माझी तयारी असते.

विज्ञानाचा प्रत्येक वर्ग प्रयोगशाळा असतो. मुलांना प्रयोग करण्यासाठी दुसरीकडे न्यावे लागत नाही, पण प्रयोगासाठी Lab Assistant ची मदतही मिळत नाही. मी माझे प्रयोग ठरवते, मीच मांडते आणि मीच नंतर उचलून ठेवते. मला आठवते, की ठाण्याला माझ्या शाळेत छान प्रयोगशाळा होती, पण आमच्या वर्गाला तिकडे चान्स दोन आठवड्यांतून एकदा मिळायचा. एकदा, आठवीत, वालावलकरबार्इंनी वर्गातच एक बीकर आणला आणि आम्हाला शिकवताना पटकन Sodium Hydroxide पाण्यात मिसळल्यावर किती गरम होते ते बीकरला हात लावून बघण्यास सांगितले. छोटीशी गोष्ट, पण ती वीस वर्षांनंतरही माझ्या चांगली लक्षात आहे. माझ्या मुलांना तसे अनुभव मिळावेत म्हणून मला बरीच तयारी करावी लागते. परीक्षानळ्या काही वेळा फुटतात, पाणी कधी सांडते, कधी कोणाचे म्हणणे असते, की Acid ला हात लावून खरेच भाजते का ते बघावे, काळजी बरीच घ्यावी लागते. कधी कधी, मी काही वेगळे प्रयोग करते. त्या प्रयोगांसाठी महाग गोष्टी लागत नाहीत (उदाहरणार्थ, अरविंद गुप्ता यांची खेळणी) पण पूर्वतयारी करावी लागते.

अभ्यासक्रम पूर्ण करणे, नोट्स लिहिणे, होमवर्क देणे- न केल्यास ओरडणे, परीक्षेची तयारी, पेपर तपासणे हे सगळे कोठल्याही शिक्षकाला चुकत नाही. पण माझ्या लक्षात आले, की ते सगळे करताना अधुनमधून माझ्या आणि मुलांच्या आवडीच्या काही गोष्टी केल्या तर दिवस आनंदी होऊ शकतात, मुलांना आणि मलाही. अमेरिकेत मला अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागतो, पण पाठ्यपुस्तकातून शिकवावे लागत नाही. म्हणजे न्यूटनचे नियम पाच-सात दिवसांत शिकवायला हवेतच, पण कशा प्रकारे, ते मी ठरवू शकते. विज्ञान शिकवताना प्रयोगांमुळे वर्गात उत्साह असतो. गणित शिकवताना तशी संधी जरा कमी मिळते. गणिताचे प्रयोग असतात आणि ते शिकताना/शिकवताना उपयोगी असतात पण त्या विषयी नंतर कधीतरी.

माझी मुले (विद्यार्थी) सगळी गुणी बाळे नाहीत किंवा सगळी वाया गेलेली, अभ्यासाची पर्वा नसलेली उनाड कार्टीही नाहीत. कोठल्याही शिक्षकाची सगळी मुले एकसारखी नसतात. अमेरिकेतील मुलेही मुलेच असतात, अगदी मी आणि माझ्या मैत्रिणी शाळेत आगाऊपणा करायचो तसाच त्या मुली करतात, कालची Best Friend आज बोलत नाही म्हणून रडतात; शिक्षक आणि पालक अभ्यास सोडून त्यांना Movies, Basketball, Music यांतच रस आहे म्हणून आरडाओरड करतात, मुले मस्ती करतात- मी त्यांना शिक्षा देते. कधी कोणी Cheating करतो. मी त्याच्या आईला फोन करते, वर शून्य मार्कपण देते. चौदा वर्षांच्या मुलांना नेहमी वाटते, की त्यांना कोणीच समजून घेत नाही, त्यांचे आईवडील त्यांचे शत्रू आहेत आणि त्यांना वाटते, की खरे तर, त्यांनाच, सर्व Decision Making चे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. मला ‘अमेरिकन कल्चरल शॉक’ची जी भीती वाटत होती, ती मुलांना मुले म्हणून बघितल्यावर दूर पळाली.

अमेरिकेत वेगळेपण आहे – जवळजवळ सगळ्यांकडे फोन असतो; वर्गात फोन वापरला तर जप्त केला जातो आणि त्यावरून मुले नको तेवढा वाद घालतात. मुलांना Snapchat, Instagram विषयी अतोनात आकर्षण असते. याच वर्षी एक मुलगी मला म्हणाली ‘Miss, do you really use Facebook…oohhh…that’s so old School’. शाळेचा युनिफॉर्म नसतो, त्यामुळे रोज वेगळे कपडे. मुली कधी कधी अती करतात, मग मुख्याध्यापकांकडे पाठवा वगैरे करावे लागतेच. कधी सांगावे लागते, ‘शाळा ही लोकशाही नाही. इकडे मी म्हणेन तो नियम.’ मग चिडचिड होते. लोकांना धास्ती वाटते ती Girlfriend, Boyfriend प्रकरणांची. बऱ्याचदा Boyfriend, Girlfriend या Show off या सदरात मोडणाऱ्या गोष्टी असतात. कधी, त्यात गंमत असते. त्यात शारीरिक म्हणजे हात धरणे, Hug करणे एवढेच घडते. मी त्यांना विज्ञान शिकवताना Health And Sexuality विषयी जाणूनबुजून सांगते. काही मुले फार पुढे जातात, पण तो नियम नाही तर नियमाला अपवाद आहे.

इकडे एक वेगळाच प्रश्न असतो. माझे जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थी त्यांच्या खऱ्या आईवडिलांबरोबर राहत नाहीत. त्यांचे आईवडील विभक्त झालेले असतात आणि मुलांची वर्षाचे अर्धे दिवस आईबरोबर आणि अर्धे दिवस बाबांबरोबर अशी विभागणी झालेली असते. कधी आईवडील, दोघेही दुसरे लग्न करतात. पण त्याची सवय अमेरिकन समाजाला झाली आहे. समुपदेशक मुलांना त्याविषयी मदत करतात. माझ्या पहिलीतील मुलाला Divorce म्हणजे काय हे माहीत आहे, कारण त्याच्या वर्गात कोणी मुलाने सांगितलेले असते, की त्याला दोन बाबा आणि दोन आई आहेत. कोणी नसते प्रश्न विचारत नाही आणि मुले समजून घेतात. कधी कधी, अभ्यास का केला नाही याला कारण सांगतात, “आईकडे राहिलो होतो आणि काल मी बाबांकडे होतो”. मला पूर्वी अशा कारणांचे वाईट वाटायचे, पण लक्षात येते, की कोणाचे कारण खरे आणि कोण थापा मारत आहे!

भारताच्या मानाने अमेरिका हा श्रीमंत देश आहे खरा, पण आमच्या शाळेत तीस-चाळीस टक्के विद्यार्थी ‘Free And Reduced Lunch’ म्हणजे ज्यांना दुपारचे जेवण शाळेत फुकट किंवा सवलतीत मिळते असे आहेत. तशा मुलांचे आईवडील बऱ्याचदा दोन-तीन नोकऱ्या करतात. मुलांना लहान भावंडांना सांभाळावे लागते. बऱ्याच मुलांची मातृभाषा इंग्रजी नसते. त्यांचे पालक सुशिक्षित नसतात किंवा पालक तुरुंगात असतात/आजारी असतात आणि मुले आजी-आजोबांबरोबर राहत असतात. अभ्यास करण्यास पोषक वातावरण नाही/कोणी Role Model नाही, मग मुले साहजिकच वाईट मार्गाला लागण्याचे प्रमाण जास्त. मग शाळा मुलांना आपलेसे करण्याचा प्रयत्न अभ्यासापेक्षा खेळ किंवा वाद्य, नाटक अशा गोष्टींच्या माध्यमांतून करते.

अमेरिकेत खेळांवर लोकांचे फार प्रेम आहे. अभ्यासाएवढे (काकणभर जास्तच) महत्त्व खेळांना दिले जाते. खेळाडू शाळेत सर्वात जास्त लोकप्रिय असतात. बऱ्याचदा शाळा खेळाच्या टीममुळे प्रसिद्ध होतात. Volleyball, Basketball, American Football, Soccer, Track And Field या खेळांचे संघ प्रत्येक शाळेत असतात. विद्यार्थी त्यांच्या खेळांसाठी खूप मेहनत करतात. मग शाळांनी विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष होऊ नये म्हणून नियम केला, की ‘No Pass No Play’. आम्ही शाळेच्या संघात राहायचे असेल तर पास झालेच पाहिजे असा बडगा दाखवतो. खेळाच्या टीमांसारखेच शाळेचा बँड, Orchestra आणि नाटकाचे संघही असतात. मुलांना शाळेत येण्यासाठी कारण बऱ्याचदा खेळ, नाटक, बँड हेच असते. पण खरे सांगा – चौदा वर्षांची किती मुले केवळ अभ्यासासाठी म्हणून प्रेमाने शाळेत जातील?

शिक्षक म्हणून मला मुलांचा राग येतो का? रोज एकदा तरी. अर्थात राग येतो. विद्यार्थी उलट उत्तरे देतात, एक मुलगा वही-पेन्सील कधीच आणत नाही, मुले थापा मारतात – नियम पाळत नाहीत – अभ्यास पूर्ण करत नाहीत, कितीतरी गोष्टी! आम्ही पण आमच्या शिक्षकांना असा त्रास दिला असणारच. एकदा आमचा अर्धा वर्ग गृहपाठ केला नाही म्हणून खाली बसला होता. वर्गात बाकाखाली बसून गुपचुप डबा खाल्लेला मला आठवत आहे. मैत्रिणीला पाठवलेली चिट्ठी पकडली गेली तर ती पूर्ण वर्गासमोर वाचावी लागेल याची धास्ती मला सतत असायची.

अमेरिकन शाळांचे मोठे वेगळेपण म्हणजे ‘स्पेशल एजुकेशन’. तो या सिस्टिमचा फार मोठा गुण आहे. मी शाळेत असताना मला कधीही अपंग मुले दिसली नाहीत. अमेरिकेत ‘Inclusive Education’ – सर्वसमावेशक शिक्षणाला फार महत्त्व आहे. जी व्यंगे दिसतात (शारीरिक व्यंगे) आणि जी दिसत नाहीत (Hidden Disabilities like Autism, Dyslexia, Dysgraphia, ADHD, Diabetes, Depression and Many More). अशा सर्व मुलांना शिक्षण देणे ही शाळेची जबाबदारी मानली जाते. त्या मुलांना वेगळे मानले जात नाही. बाकीच्या मुलांना लहानपणापासून सर्व प्रकारांची मुले वर्गात असण्याची सवय असते. त्यामुळे कोणालाही त्यात विशेष काही वाटत नाही.  स्पेशल एज्युकेशन, पाठयपुस्तक न वापरता शिकवणे आणि आणखी बऱ्याच गोष्टी पुन्हा कधीतरी. 

कविता करंदीकर, kkavita@gmail.com

 

 

About Post Author

3 COMMENTS

  1. कविता आवड म्हणून हे क्षेत्र…
    कविता आवड म्हणून हे क्षेत्र निवडणारे अगदी विरळांच .खरच तूझे कौतूक आहे तूझ्या पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा

  2. छान माहितीपूर्ण लेख. पुढील…
    छान माहितीपूर्ण लेख. पुढील भागाची प्रतीक्षा.

Comments are closed.