अनकाई किल्ला – यादवकालीन टेहळणीनाका

carasole

अनकाई हे नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पुरातन गाव असून जिल्ह्यातील सर्वात उंच व मजबूत असा किल्ला तेथे आहे. ते डोंगर अनकाई-टनकाई या नावाने ओळखले जातात. किल्ले समुद्रसपाटीपासून बत्तीसशे फूट उंचावर व अनकाई गावठाणपासून नऊशे फूट उंचावर आहेत. यादवकालीन एका ताम्रपटात (इसवी सन ९७४) त्या किल्ल्याचा उल्लेख ‘एककाई दुर्ग’ असा केलेला आहे.

अनकाई डोंगराच्या पायथ्याशी जैन लेणी आहेत. अनकाई डोंगरावर पुरातन किल्ल्याचे अवशेष आहेत. तो किल्ला व तेथील लेणी सुमारे एक हजार ते पंधराशे वर्षांपूर्वीची आहेत. अनकाई हे गावदेखील त्या काळापासून अस्तित्वात असावे. पुरातन अनकाई गावाची वसाहत अनकाई डोंगरपायथ्याशी गावठाण हद्दीत होती.

अनकाई डोंगरावरील किल्ल्याचा उपयोग यादव काळापूर्वीपासून टेहळणी नाका म्हणून केला जात असे. डोंगरशिखरावरून खानदेश भागातील व गोदावरी खोऱ्यातील विस्तृत प्रदेशावर नजर ठेवणे शक्य होई. यादव काळात त्या किल्ल्यावर कायमस्वरूपी किल्लेदार व शिबंदी वास्तव्य करून राहत असत. शत्रू सैनिकांच्या हालचालींची माहिती देवगिरी किल्ल्यावर रवाना करण्यासाठी घोडेस्वार तैनात होते. किल्ला मजबूत व अजिंक्य असा होता. डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी सात मजबूत दरवाजे आहेत. रामायणकाळात त्या डोंगरावर अगस्ती मुनींचे वास्तव्य होते अशी कथा आहे.

अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर स्वारी (तेरावे शतक) केली होती तेव्हा किल्ल्याचा विध्वंस झाला होता. जैन लेण्यांची देखील मोडतोड करण्यात आली होती. अनकाई-टनकाई हा किल्ला मोगल सम्राट शहाजहानचा सरदार खानखनान याने स्वारी करून १६६५ मध्ये ताब्यात घेतला. मॅकडॉवेल या इंग्रज सेनापतीने एकही गोळी न झाडता तत्कालीन किल्लेदाराकडून किल्ला खाली करून (१८१८) घेतला होता.

किल्ला भग्नावस्थेत असून किल्ल्याची तटबंदी मात्र मजबूत आहे. किल्ल्यात मध्यभागी हौदासारखे दगडी बांधकाम आहे. तेथून उत्तरेकडे बाहेर पडण्यासाठी भुयारी रस्ता आहे.

किल्ला व जैन लेणी या सुरक्षित वास्तू (प्रोटेक्टेड मॉन्युमेंट) असून पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहेत. अनकाई किल्ला व आजुबाजूच्या परिसरास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेला आहे.

अनकाई किल्ला व आसपासच्या परिसरात पुरातत्त्व खात्यामार्फत उत्खनन कार्य त्वरित सुरू करण्यात यावे जेणेकरून तेथील किल्ल्याचा व अनकाई गावाचा इतिहास उलगडू शकेल, अशा आशयाचे निवेदन अनकाई गावच्या सरपंच सौ. आशा नामदेव सोनावणे यांनी संचालक पुरातत्त्व खाते, नाशिक यांना पाठवले आहे.

– नारायण क्षीरसागर

(येवले दर्शन पुस्तकावरून उद्धृत- संक्षिप्त व संस्कारित)

About Post Author

3 COMMENTS

  1. खंडू वस्ताद यांचा इतिहास ?
    खंडू वस्ताद यांचा इतिहास ?

  2. Kilyacha shevatacha
    Kilyacha shevatacha killedararache Nav latif khan note yacha ullekh Apalyala Shreemanyogi ya kadambarit baghayala milel Killyachya mahitit bharch padali Age badho

Comments are closed.