आषाढाच्या पहिल्या दिवसानिमित्ताने
कवी कालिदासाचे हे स्मरण…
अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्….
– श्रीप्रकाश अधिकारी
आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कवी कुलगुरू कालिदासाचे स्मरण करावयाचा दिवस. पण या कवीचे विस्मरण सा-या वर्षांत कधीतरी होते का? रघुवंश, कुमारसंभव, मालविकाग्नी मित्र, शाकुंतल, ऋतुसंहार, मेघदूत या काव्याची ओळख असलेला रसिक वर्षभरांतील विविध ऋतुकालात या काव्याचा प्रत्यय घेत असतो. प्रवासात असताना डोंगराला चाटून वळण घेत जाणारं नदीचं पात्र दिसलं, की ‘निक्षेपणाय पदमुधृतमुद्वहत्नि मार्गाचलाव्यतिकराकुलितेवसिंधू शैलाधिराजतनया न ययौ न तस्थौ’ हा, कुमारसंभवातील, पार्वतीने रूप बदलून आलेल्या स्वत: महादेवाकडूनच आपली स्वत:ची निदा ऐकल्यावर, व्रतस्थ असताना अधिक काही ऐकण्यापेक्षा निघून जाणं चागलं असा विचार करून उचललेलं पाऊल पण पुढे न जाताच थांबणं या प्रत्यक्ष कृतीतील कवी कालिदासाने उचललेला शब्दग्रथित जिवंतपणा कॅमेरामनलादेखील साधेल की नाही असाच आहे.
मुंबईहून रत्नागिरीकडे जाताना अशा कित्येक नद्या आपल्याला दिसतील! कोलाडजवळची नदी पाणी कमी वाहत असताना पुलावरून पाहिली, की आठवतो तो ‘रेवां द्रक्षस्युपलविषमे विन्ध्यपादे विशीर्णा भक्तीच्छेदैरिव विरचिता भूतिमड्गे गजस्य’ – विंध्य पर्वताच्या पायथ्याशी वाहणारी विखुरलेली रेवा हत्तीच्या पाठीवर त्याला सजवण्यासाठी पट्टे ओढले असावेत अशी दिसेल.
इंद्रधनूची मजा तर कोकणात वारंवार पाहायला मिळते. सह्याद्रीचे सुळके आणि त्यावर वाहात येणारे काळे ढग, मध्येच पडणारे इंद्रधनुष्य – ‘रत्नच्छायाव्यतिकर इव प्रेक्ष्यमेत्पुरस्ता व्दल्मीकाग्रात्प्रभवति धनु:खण्डमाखण्डलस्य.’
कोकण रेल्वेने, बसने अथवा कारने फिरत असताना ‘शाकुंतला’तील ‘न मे दुरे किंचित क्षणमपि न पार्श्वे रथजवात्’ हा श्लोक आठवला, की आपण कण्व मुनीच्या आश्रमात कधी जातो ते कळत नाही. गाडीच्या खडखडाटातदेखील आश्रमातील शांती जाणवू लागते. निर्भयपणे फिरणारे प्राणी अंत:चक्षूच्या पडद्यावर दिसू लागतात. आफ्रिकेतील मसाईमाराच्या जंगलातदेखील हरीण, झेंब्रे, सिंह यांच्या डोळ्यांत निर्भयता दिसत होती, कारण हे प्राणी त्या जंगलात मुक्तपणे फिरत असतात आणि त्यांना पाहणारी माणसे मात्र बंद पिंज-याच्या गाडीतून त्यांना बघत असतात.
तसेच, मग आपण दिलीप राजाबरोबर गायी चारण्यासाठी जंगलात जाऊन पोचतो. तिथली वनराई… ‘शामायमानानी वनानी पश्यन्’ राजा त्या सृष्टिसौंदर्याचा आस्वाद घेत असताना कामधेनूची मुलगी नंदिनी… ‘गंगाप्रपातांतविरुढष्पं गौरीगुरोर्गव्हरमा विवेश’वरून गंगेचा धबधबा पडत असलेल्या गुहेमध्ये शिरावी त्याच क्षणी आपण बसलेल्या गाडीचा कर्कश्श ब्रेक लागावा आणि ‘रश्मिश्विवादाय नगेंद्रसक्ताम निवर्तयामास नृपस्य दृष्टी’…. लगाम खेचल्याप्रमाणे राजाची दृष्टी गाईच्या किंकाळीने खेचून घेतली तशी आपली अवस्था व्हावी. अशा प्रवासात खिडकीत एकटेच बसून या काव्यसृष्टीत गढून जाण्याची मजा काही औरच आहे!
पावसाला सुरूवात होण्याआधी धुळवाफेचा पेरा करतात. आपल्या गाडीने एखादे वळण घेतले आणि डोंगरमाथा गाठला की नांगरलेली अशी जमीन दिसते. मृगाच्या पावसाचे थेंब पडत असतील किंवा पडून गेले असतील तरी…. “सद्य: सीरोत्कषणसुरभि”… तो गंध नाकात भरून राहतो आणि घरी खिडकीत बसूनही या ओळी म्हणताना, तो मृदगंध बाजूला दरवळताना जाणवतो. तसाच समोर काळाभोर मेघ आकाशात वा-यावर जाताना दिसावा… ‘अद्रे श्रृडगं हरति पवन: किंस्विदिति’… अरे हा वारा पर्वताचे शिखरच वाहून नेतो आहे की काय असं त्या मुग्धसिद्धांगनांसारखे आपल्यालाही वाटावे, तोच मेघ एखाद्या शिखरावर विसावावा… “नूनं यास्यत्यमरमिथुनप्रेक्षणीयामवस्था मध्ये श्याम: स्तन इव भुव: शेषविस्तारणाण्डु:’… आमराईच्या फिकट पिवळ्या रंगाने झाकलेल्या पर्वताचा पीतगौर कांतीसारखा दिसणारा उतार आणि शिखरावरचा काळाभोर मेघ देवयुगुलांना पृथ्वीचा शोभायमान झालेला उरोज आहे असे वाटेल.
हे आणि असे कितीतरी कल्पनाविलास कालिदासाच्या काव्याला अमर करून गेले आहेत. ‘मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेत:’… सुखी माणसाचे मनदेखील मेघ पाहून चलबिचल होते. या सत्याचा अनुभव सर्वानाच येतो. दोन हजार वर्षांपूर्वी संस्कृत भाषेत लिहिलेल्या या अनमोल खजिन्याची ओळख नवीन पिढीला व्हावी अशी अपेक्षा बाळगणे उचित नव्हे का?
– श्रीप्रकाश अधिकारी
shriprakashadhikari@yahoo.com