अजिंठा-वेरूळ – वेध खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून

0
49
carasole

आजच्या आधुनिक युगात अत्यंत प्रगत अशा उपकरणांचे साह्य घेऊन खगोलशास्त्राच्या अंगाने अजिंठ्यात संशोधन केल्यास काय रत्ने हाती लागतील, याबद्दल पुरातत्त्व शास्त्राचे प्राध्यापक असलेले अरविंद जामखेडकर यांच्या मनात उत्सुकता होती. त्यांचा विद्यार्थी आणि खगोल अभ्यासक म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अजिंठा आणि वेरूळच्या गुंफांची रचना खगोलशास्त्रीय दृष्टीने कशी आहे यावर संशोधन होणार होते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक मयंक वाहिया यांची या कामी साथ होती. मग 21 जूनचा ‘मुहूर्त’ पाहून निघालो. 21 जून म्हणजे विष्टंभ बिंदू. सूर्य त्या दिवशी जास्तीत जास्त उत्तरेकडे सरकलेला असतो. त्यामुळे तो दिवस उत्तर गोलार्धात मोठ्यात मोठा असतो. त्या दिवसाला सर्व प्राचीन वाङ्‌मयातही खूपच महत्त्व आहे. त्या दिवशी उगवत्या सूर्याचा प्रकाश सरळ आत गुंफेत बुद्ध मूर्तीवर पडतो का, याचा शोध घ्यायचे आम्ही ठरवले.

अजिंठा – खगोलीय दृष्टिकोनातून निरीक्षणे

अजिंठा हा एकूण तीस बौद्ध गुंफांचा समुदाय आहे. त्या सर्व गुंफा दगडातून वरून खाली कोरून काढल्या आहेत. वरून पाहता तो समुदाय घोड्याच्या प्रचंड नालाप्रमाणे दिसतो. त्यापैकी पहिल्या दोन गुंफांमध्ये मुख्य मूर्तीशिवाय अनेक भित्तिचित्रे आहेत. पद्मपाणी आणि वज्रपाणी ही केवळ अप्रतिम समजली जाणारी रंगीत चित्रे तेथे पाहता येतात. अजिंठामधील ते प्रसिद्ध विहार आहेत. त्याउलट सव्वीस क्रमांकाची गुंफा प्रसिद्ध चैत्य आहे. त्या दोन गुंफा समोरासमोर आहेत. आमचे निरीक्षण तेथून सुरू झाले. “गंमत म्हणजे पहिली गुंफा 21 जूनच्या सूर्योदय रेषेशी जवळजवळ समांतर आहे, हे आमच्या ताबडतोब लक्षात आले. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी जेव्हा ती कोरली गेली तेव्हा असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राशी ती शून्य अंशाचा कोन करत असावी. त्याउलट तिच्या विरुद्ध दिशेत असलेले चैत्य 22 डिसेंबरच्या सूर्योदयरेषेशी खूपच समांतर आहे. हे चैत्य त्या सुमारास असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राशी शून्य अंशात असावे असे नवीन निरीक्षण पुढे आले. त्यामुळे मग पौर्णिमेला उगवत्या चंद्राचा प्रकाश बुद्धप्रतिमेवर पडत असावा. बौद्ध धर्मात चंद्राच्या पौर्णिमांना महत्त्व असल्यामुळे कदाचित प्राचीन भिख्खूंनी गुहांची रचना अशा प्रकारे केली असेल काय?
अजिंठाची निर्मिती करण्यास सुमारे सातशे वर्षे लागली आणि ती ख्रिस्तानंतर सुमारे पाच शतके सुरू होती. वाकाटक राजांच्या काळात तेथे कलेचे सर्वांत उंच शिखर गाठले गेले होते. जर आमची ही निरीक्षणे प्रस्थापित झाली, तर त्या काळच्या विज्ञानावर उत्तम प्रकाश पडू शकेल. तेव्हाची भूमिती, गणित, खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र या शाखांचा किती विकास झाला होता, याचा नवीन अंदाज आपल्याला येऊ शकेल. अजिंठाच्या सर्व गुंफांची खगोलीय दृष्टिकोनातून बारकाईने निरीक्षणे सुरू आहेत. त्यावरून पूर्ण अनुमाने निघायला एखादे वर्ष जाईल.

वेरूळ – संपात बिंदूंचे भान ठेवून निर्मिती

वेरूळ हा भारतीय कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना. वेरूळमध्ये जैन, बौद्ध आणि हिंदू असे तिन्ही धर्म गुण्यागोविंदाने नांदताना आढळतात. प्राचीन कलाकारांनी तेथे एकूण चौतीस गुंफांची निर्मिती केली. तिन्ही धर्मीयांचे अनुयायी उपासना करण्यासाठी तेथे येत असत. कातळ वरून खाली कोरत येऊन बनवलेली शिल्पे अजरामर ठरली आहेत. जैन, बौद्ध आणि हिंदू गुंफा एकमेकांच्या “खांद्याला खांदा’ लावून उभ्या आहेत. त्यांतील प्रचंड कैलास लेणे तर सर्व गुणांचा मुकुटमणी आहे. त्याची निर्मिती संपात बिंदूचे भान ठेवून केलेली आहे. तेथे शिवाची भलीमोठी पिंडी असून, भाविक तिचे पूजन करतात. जवळच ‘छोटा कैलास’ ही जैन गुंफा स्थापत्याचा उत्कृष्ट आविष्कार मानली जाते. गुंफा संपात बिंदूंशी समांतर बांधलेली आहे. त्यावर “शुकनासिका’ नावाचे छोटेखानी; पण सुंदर मंदिर आहे. सूर्य वसंत संपात किंवा शरद संपात बिंदूशी आला, की त्यातील प्रतिमेला आपल्या किरणांनी स्नान घालतो. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांत सूर्य, चंद्र आणि तारे यांना विशेष स्थान आहे. त्यामुळे आपल्या तत्त्वज्ञानात त्यांचा सतत संदर्भ येत राहतो. जगातील बहुतेक सर्व धर्मांना ती गोष्ट लागू होते. अर्थातच मग प्राचीन स्थापत्यकारांनी धर्म, पंथ आणि खगोलशास्त्र यांची सांगड घातली नसती तरच नवल! त्या काळी खगोलशास्त्राचा उल्लेख ‘ज्योतिःशास्त्र’ म्हणजे तेजःपुंज अवकाशस्थ ज्योतींचे विज्ञान असा केला जात असे. आता सामान्यतः प्रश्‍न असा पडू शकेल, की हे सर्व कशासाठी करायचे, काय गवसणार इतके प्रयत्न करून? सामान्यांना त्याचा काय फायदा? हे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. आपला समाज प्रगत होत आहे. विज्ञानाची कास धरून अनेक विषयांत प्रगती करत आहे. त्याच वेळी ‘पुराणातील वांगी पुराणात बरी’ अशी काहींची धारणा होणे शक्‍य आहे; पण ती तितकीशी बरोबर नाही, कारण प्राचीन काळी सामान्यांना समजेल, उमजेल आणि पचेल अशा शब्दांत कथांच्या स्वरूपात विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, नैतिकता अशा अनेक महत्त्वाच्या आणि विविध पैलूंवर पुराणांनी भाष्य केले. त्यांनी ग्रहणात राहू आणि केतू यांचे महत्त्व सांगितले. त्या बिंदूंना राक्षसांची उपमा दिली, ती त्या ठिकाणी सूर्यबिंबाचा र्‍हास होतो, हे सर्वसामान्यांना समजावून सांगण्यासाठी. भारतीयांना ग्रहणाचे विज्ञान पाचव्या शतकापूर्वी ज्ञात होते. पुराणांत, ब्राह्मणांत, उपनिषदांत अनेक चित्र-विचित्र गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. एकट्या मत्स्यपुराणात चौदा हजार ऋचा आहेत. त्यातील विज्ञानाला अनुसरून किती आहेत, हे शोधून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी असे संशोधन प्रयत्न आपण केलेच पाहिजेत.

संपात बिंदू आणि विष्टंभ बिंदू म्हणजे काय?

पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते, त्या वर्तुळाचा अक्ष आणि तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष एकमेकांशी 23.5 अंशांचा कोन करतात. जमिनीवरून पाहता सूर्य पृथ्वीभोवती फिरताना भासतो. तो ज्या मार्गावरून फिरतो, त्याला ‘आयनिक वृत्त’ असे म्हणतात. ते वृत्त आपल्या विषुववृत्ताशी 23.2 अंशांचा कोन करते. ती दोन वृत्ते परस्परांना फक्त दोन बिंदूंत छेदतात. त्या बिंदूंना ‘संपात बिंदू’ असे म्हणतात. त्या बिंदूंवर वर्षातून दोनदा सूर्य येतो, मग त्या दिवशी बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते. ते दोन 21 मार्च आणि 21 सप्टेंबर, असे दिवस असतात. त्या दिवशी सूर्य अचूक पूर्वेला उगवतो आणि अचूक पश्‍चिमेला मावळतो. जगातील सर्व धर्मांमध्ये या दोन बिंदूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील अनेक प्राचीन वास्तू यांच्या अनुषंगाने बांधल्या आहेत. त्याला भारतही अपवाद नाही.
त्याशिवाय आणखी दोन बिंदू आपणास माहीत हवेत. आयनिक वृत्तावर फिरता फिरता सूर्य कधी जास्तीत जास्त उत्तेरकडे जातो, तर कधी जास्तीत जास्त दक्षिणेकडे. पहिला दिवस येतो 21 जून रोजी आणि दुसरा येतो 22 डिसेंबर रोजी. 21 जून रोजी असते ‘उत्तरायण’ आणि दिवस सर्वांत मोठा, तर 22 डिसेंबर रोजी असते ‘दक्षिणायन’, तेव्हा दिवस असतो सर्वांत लहान आणि रात्र मात्र सर्वांत मोठी. ‘विष्टंभ’ आणि ‘अवष्टंभ’ बिंदू म्हणतात ते हेच. ते दोन दिवस सूर्याच्या सीमा दर्शवतात. आपल्या पुराणात आणि प्राचीन वाङ्‌मयात त्यांना फार महत्त्व आहे. त्यांचाही विचार पूर्वीच्या वास्तुरचनाकारांनी केला होता आणि त्याप्रमाणे आपले तंत्रज्ञान विकसित केले होते.
खगोलशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ, स्थापत्यविशारद आणि अभियंते यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अनेक विषयांतील तज्ज्ञ एकत्र आल्याशिवाय असे संशोधन शक्‍य नाही. मग संगणक, जीपीएस उपक्रम आणि आधुनिक लेसर उपकरणांच्या मदतीने सुरू झालेला शोध येत्या दशकात आपल्या ज्ञानात खूपच भर घालेल यात शंका नाही. आधुनिकतेमध्ये ‘प्राचीनता’ आणि प्राचीनतेमध्ये “आधुनिकता’ यांचा जागरूकपणे समन्वय साधणे आवश्‍यक होऊन बसले आहे. असा समन्वय भविष्यातील आपल्या सर्वांगीण प्रगतीचे मूळ असणार आहे.
पराग महाजनी

9881201875, 020-24380177

www.paragmahajani.com

About Post Author