अच्युत गोडबोले या मुसाफिराची यशोगाथा!

3
98
carasole

अच्युत गोडबोले या व्यक्तीची ओळख औरंगाबादला झालेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान-मुंबई-च्या एका कार्यक्रमात आठ वर्षांपूर्वी झाली आणि त्यांचा झपाटून टाकणारा उत्तुंग असा प्रवास हळुहळू माझ्यासमोर उलगडत गेला. अच्युत गोडबोले त्या कार्यक्रमात ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ या विषयावर बोलले होते. तो विषय श्रोत्यांच्या मनापर्यंत सहजपणे पोचवण्याची त्यांची विलक्षण हातोटी मला जाणवली. पुढे, त्यांची भेट अनेक कारणांनी होत गेली. मी त्यांच्या लिखाणातील एक महत्त्वाची साक्षीदार आणि सहकारी या नात्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर पाहू शकले.

अच्युत गोडबोले यांचे संगणकावरील ‘संगणकयुग’, संगीतावरील ‘नादवेध’, व्यवस्थापनावरील ‘बोर्डरूम’, विज्ञानावरील ‘किमयागार’, अर्थशास्त्रावरील ‘अर्थात’, गुलामगिरीवरील ‘गुलाम’, नॅनोटेक्नॉलॉजीवरील ‘नॅनोदय’, स्टीव्ह जॉब्ज या तंत्रज्ञाचे आत्मचरित्र ‘स्टीव्ह जॉब्ज’, मानसशास्त्रावरील ‘मनात’, चंगळवादावरील ‘चंगळवादाचे थैमान’, गणितावरील ‘गणिती’ आणि सहा दशकांचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहास उलगडवणारे त्यांचे आत्मचरित्र ‘मुसाफिर’…  यांतील बहुतांशी पुस्तकांच्या लेखनप्रक्रियेत मी त्यांच्यासमवेत होते आणि त्यांचे वेळोवेळी वाचन केले होते. त्यांचा त्या सर्व विषयांतील व्यासंग आणि अभ्यास पाहून भारावूनही गेले होते.

माझी आणि अच्युत गोडबोले यांची ओळख झाली, तेव्हा त्यांनी त्यांच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कामाचा जवळपास निरोप घेतला होता आणि पूर्ण वेळ लिखाण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आयुष्याचा फार मोठा भाग कम्प्युटर्समधील क्षेत्राने व्यापला होता आणि त्या क्षेत्रातील बलाढ्य कंपन्यांतील त्यांचा अनुभव, त्यांची कामाची पध्दत मला जाणून घ्यायची होती. खरे तर, त्यांचा बायोडेटा आणि सर्व क्षेत्रांतील प्रतिष्ठित पुरस्कार पाहून वाचणाऱ्याला दडपण येतेच, पण प्रत्यक्ष त्यांच्या भेटीत मात्र बायोडेटामुळे आलेले दडपण नाहीसे होते. त्याचे कारण त्यांच्यात असलेला साधेपणा! त्यांच्यातील साधेपणा हाच त्यांच्या कॉर्पोरेट जगतातील कारकिर्दीत अडथळा म्हणून आला असेल का? असाही प्रश्न मनात होता. त्यांनी इतक्या मोठमोठ्या कंपन्यांत काम कसे केले असेल? त्यांच्या त्या क्षेत्रातील अनुभवाबद्दल त्यांच्या ‘बोर्डरूम’ आणि ‘मुसाफिर’ मधून कार्यशैलीची बरीचशी माहिती हाती येते आणि त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकास ती खरोखर अनुभवण्यासही मिळते.

आयआयटीत अभ्यासाबरोबर संगीत, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, तंत्रज्ञान, विज्ञान, गणित यांसारख्या अनेक विषयांवर मित्रांसोबत वाद-चर्चा अच्युत गोडबोले यांच्या होत असत. व्यवस्थापन हा विषय त्या वेळी फारसा महत्त्वाचा म्हणून त्यांच्यासमोर नव्हता. पण आयआयटीतून पासआऊट झाल्यावर आदिवासी चळवळीत झोकून द्यायचे ठरवले आणि तेथे अच्युत गोडबोले यांना व्यवस्थापनाचा पहिला धडा गिरवण्यास मिळाला. आदिवासी भागात आदिवासींची संघटना बांधत असताना मॅनेजमेंटची तत्त्वे त्यांना प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळाली. अंबरसिंग महाराज नावाचे गृहस्थ त्या अशिक्षित, अडाणी, भिल्ल आदिवासींचा नेता म्हणून होते. त्यांच्याकडून चांगले नेतृत्व म्हणजे काय, ते कसे तयार होते, कुणावर कुठली कामे सोपवावीत, ती झाली आहेत की नाहीत हे कसे तपासावे, सहकाऱ्यांना काम करताना अडचणी आल्या, तर त्यांना मार्गदर्शन कसे करावे, संकटकाळी त्यांच्याबरोबर दंड थोपटून उभे कसे राहवे हे सगळे बघता बघता त्यांच्या अंगात रुजत गेले.

कालांतराने, अच्युत गोडबोले आयबीएम या प्रचंड अशा कंपनीत मुंबईत काम करू लागले. त्या कंपनीचा अनेक देशांत कारभार चालत असे. जगभर लाखो लोक त्या कंपनीत काम करत होते. अजगरासारख्या अजस्त्र अशा त्या कंपनीचा कारभारही तितकाच अफाट होता. एवढा मोठा पसारा आणि त्यातील कामे बिनबोभाट कशी होत असतील याचे आश्चर्य अच्युत गोडबोले यांना वाटे. मात्र त्याच कंपनीने त्यांना एवढा मोठा कारभार करताना त्यात सुसूत्रता कशी आणावी, जागतिक पातळीवर काम कसे करावे, माणसांमधील कौशल्य कसे ओळखावे आणि त्यांच्यावर ती ती जबाबदारी कशी सोपवावी, व्यक्तीचा आदर कसा करावा अशा अनेक गोष्टी शिकवल्या. त्यांनी आयबीएमनंतर हिंदुस्थान लिव्हर, सिस्टाईम या कंपन्यांतही महत्त्वाच्या पदांवर काम केले.

अच्युत गोडबोले त्यांच्या हातून झालेल्या चुका प्रांजळपणे सांगतात. त्यांना सगळी कामे त्यांनीच केली पाहिजेत असे सुरुवातीला वाटे. त्यात आपल्यालाच सगळे कळते अशी वृत्ती होतीच आणि बरोबरीने ‘पर्फेक्शनिस्ट’ दृष्टिकोनही होता. योग्य माणसाची निवड करताना किंवा कोणा माणसाला दिलेली माहिती त्यांना समजली आहे की नाही हे तपासून बघतानाही चूक होत असे. हाताखालील लोकांनी चूक केल्यास तेच जबाबदार आहेत असेही वाटायचे. एखादे काम दुसऱ्यावर सोपवले की ते पूर्ण होईपर्यंत त्यात त्यांच्याकडून अनेक वेळा हस्तक्षेप होत असे. मात्र त्यानंतर अच्युत यांच्या अंगात काम करता करता योग्य माणसांची निवड, माहिती नीटपणे पोचवणे, काही चूक झाल्यास त्या दोषांची जबाबदारी स्वतःवर घेणे, कामासाठी योग्य प्रशिक्षण देणे या गोष्टी बाणू लागल्या आणि त्यांना त्याचा योग्य तो परिणाम कामाच्या बाबतीत दिसू लागला. काम करताना इतरांना त्या कामातील स्वातंत्र्य देणे, काही ठरावीक काळानंतर काम कुठपर्यंत आले आहे याचा पाठपुरावा करणे आणि त्यातूनच काम देताना त्या त्या व्यक्तीची क्षमता ओळखून असलेल्या क्षमतेपेक्षा थोडे जास्त क्षमतेचे काम त्याच्याकडून करून घेणे या गोष्टी त्यांच्या ध्यानी आल्या. त्यामुळे कामाचा दर्जा वाढतो, कर्मचाऱ्यांमधील कौशल्य वाढते आणि कंपनीची प्रगती होते असेही त्यांना दिसून आले.

पीटर ड्रकर हा मॅनेजमेंटमधील गुरू भारतात आला त्या वेळी अच्युत गोडबोले यांना त्यांचे भाषण ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. अच्युत गोडबोले यांनी ड्रकर यांनी लिहिलेली मॅनेजमेंटवरील पुस्तकेही वाचून काढली. त्यातूनच ते ‘मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह (एमबीओ)’ हे तत्त्व शिकले. ‘दि मिथिकल मॅनमंथ’ या पुस्तकातूनही त्यांना प्रॉजेक्ट मॅनेजमेंटविषयी खूप काही शिकण्यास मिळाले. कंपनीची प्रगती असो वा एखादी संस्था-संघटना चालवणे असो किंवा अगदी स्वयंपाकघरातील व्यवस्थापन असो, ते कसे करायला पाहिजे यातील बारकावे अच्युत गोडबोले यांना समजत गेले.

अच्युत गोडबोले यांना पटणी, सिंटेल, लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) अपार आणि दिशा या कंपन्यांमध्ये सीईओसारख्या सर्वोच्च पदावर काम करण्यास मिळाले. त्यांच्या कारकिर्दीत त्या कंपन्यांची अनेक पटींनी वाढ झाली. त्यांपैकी बहुतांश जागतिक कंपन्यांमध्ये शेकडा ते काही हजार असे सॉफ्टवेअर इंजिनीयर्स काम करत होते. पंधराशे लोक मुंबईला, आठशे पुण्याला, सहाशे चेन्नईला, चारशे बंगळुरूला, दोनशे इंग्लंडमध्ये, पाचशे अमेरिकेत आणि इतर शेकडो लोक जगभर विखुरलेले असत. त्या काळात ते आकडे खूप मोठे होते. जगभरच्या ऑफिसेस आणि डेव्हलपमेंट सेंटर्सवर देखरेख करणे हे काम सोपे नव्हते. कुठल्या विभागात जास्त विक्री होते-कुठे कमी होते, कामाचा मोबदला कुठे जास्त मिळतो-कुठे कमी होतो, कुठल्या सेंटरमध्ये कुठले काम चालते-ते केव्हा संपणार-ते संपल्यावर त्या इंजिनीयर्संना कोणते काम द्यायचे, लोक कुठल्या सेंटर्समध्ये नोकऱ्या सोडताहेत, कस्टमर्सच्या तक्रारी कुठल्या सेंटर्समध्ये जास्त येताहेत, मॅनेजर्सची गरज कुठे जास्त आहे या साऱ्यांकडे खूप बारकाईने लक्ष द्यावे लागत असे असे अच्युत गोडबोले सांगतात. ती कामे करताना, मार्गदर्शन करताना जगभर प्रवास करावा लागे. त्या वेळी सहकाऱ्यांकडूनही खूप काही शिकण्यास मिळत असे असेही ते म्हणतात. चांगले सहकारी लाभले म्हणून ते शक्य झाले असे सांगून त्यांच्या यशाचे श्रेय ते त्यांच्या सहकाऱ्यांना देतात.

अच्युत गोडबोले सॉफ्टवेअरच्या उद्योगात असताना ‘नेव्हर गिव्ह अप’ किंवा ‘नेव्हर से डाय’ हे शिकले. कित्येक वेळा अपयश येते आहे असे जाणवायचे. त्या वेळी सहकाऱ्यांना कळू न देता, प्रसन्नपणे काम करावे लागत असे. कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य, नाउमेद वाढू नये याची काळजी घ्यावी लागत असे. प्रतिकूल परिस्थितीत हसतमुख आणि आशावादी कसे राहवे हेही त्यांना शिकण्यास मिळाले. मीटिंगमध्ये सहकाऱ्यांसोबत आपली काही चूक झाल्यास मोकळेपणाने मान्य करायची. तसे झाल्यास इतरांवरील दडपण जाऊन दडपणविरहित आणि पारदर्शक असे, विश्वासाचे वातावरण कामाच्या ठिकाणी अनुभवण्यास मिळते असेही अच्युत गोडबोले आवर्जून सांगतात. तसेच, कोणी चांगले काम केल्यास सर्वांसमोर जाहीर शाबासकी देणे, त्या व्यक्तीचे कौतुक करणे, त्या कामाचं श्रेय त्याला देणे, पिपल मॅनेजमेंट कशी करतात, मॅनेजमेंट बाय वॉक अराउंड या गोष्टींचे महत्त्व त्यांना उमगले. हाताखालील लोकांना निर्णयप्रक्रियेत सामील करून घेणे आणि त्या कामाचे श्रेय त्यांना देणे हेही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कसोशीने केले.

काम करताना अच्युत गोडबोले त्यांच्या कामाचे वर्गीकरण तीन टप्प्यांत करतात. ते म्हणतात, मॅनेजमेंटचे तीन भाग प्रामुख्याने असतात. एक म्हणजे पर्सनल मॅनेजमेंट किंवा सेल्फ इम्प्रुव्हमेंट (यात मॅनेजरने कसे वागावे, कसे बोलावे, टाईम मॅनेजमेंट कसे करावे, नेतृत्व कसे करावे, टीमवर्क कसे घडवून आणावे इत्यादी बाबी येतात.) दुसरा भाग म्हणजे ऑपरेशनल मॅनेजमेंट. यात व्यक्ती जे काम करते त्याची सखोल तांत्रिक माहिती तिला असायला हवी. त्यातील प्रक्रियांचे ज्ञान जर तिला नसेल तर ऑपरेशनल मॅनेजमेंट तिला जमणार नाही. त्यात प्रॉजेक्ट मॅनेजमेंट प्रामुख्याने येते. मॅनेजमेंटचा तिसरा भाग म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. त्यात एकूण जागतिक स्तरावर, त्या उद्योगाची माहिती, त्याविषयी विचार करण्याची क्षमता व्यक्तीच्या अंगी असावी लागते; नाहीतर तिची ‘थांबला तो संपला’ अशी अवस्था होऊ शकते. उदाहरणार्थ, कंपनीने मोटारगाड्यांचे उत्पादन करावे की पंख्यांचे? ते भारतात करावे की बाहेर? भारतात असेल तर कुठे? याचे निर्णय घेणे. वितरण कसे करावे यांसारख्या अनेक गोष्टी  मोडतात. त्यासाठी स्पर्धक, सरकार आणि देशातील नियम, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अर्थव्यवस्था या सगळ्यांचे भान असावे लागते. भारतात उद्योजकता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे त्यांना वाटते. पालक मुलांना सुरक्षित आयुष्य जगायला शिकवतो, पण त्याचबरोबर त्यांना जोखीम घ्यायलाही शिकवले गेले पाहिजे असे ते म्हणतात.

अच्युत गोडबोले हा उत्साही आणि प्रचंड आशावाद असलेला मनुष्य आहे. त्याच्या अंगी आयआयटीच्या दिवसांपासून कुतूहल आणि माणुसकी बाणली गेली. त्यामुळे त्यांना विश्वाच्या आणि माणसांच्या संदर्भातील विज्ञान, तंत्रज्ञान, संगीत, साहित्य, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित आणि मानसशास्त्र अशा अनेक विषयांत रस निर्माण झाला आणि त्यातून सखोल ज्ञान मिळवणे ही परीक्षेत मार्क्स मिळवण्यापुरती किंवा एक छंद एवढ्यापुरती गोष्ट राहिली नाही तर ती त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आणि त्यांच्या आयुष्याच्या शोधयात्रेमध्ये  महत्त्वाचा भाग ठरली. त्यातूनच त्यांच्याकडे जगभरातील चार हजार पुस्तकांचा संग्रह तयार झाला. त्यांनी गर्तेत असताना स्वतःला अनेक संकटांतून बाहेर काढून अनेक कंपन्यांचे सीईओ होईपर्यंत मजल गाठली आणि त्यांच्या मुलाच्या ऑटिझमसारख्या असाध्य अशा मनोविकाराला तोंड देण्याकरता हवे असणारे पैसे जमा झाल्यावर, हा मनुष्य चक्क वर्षाला दोन -तीन कोटी रुपयांच्या ऑफर्स आणि पंचतारांकित आयुष्य नाकारून, झपाटल्यासारखा पूर्णवेळ लिखाणाकडे वळाला.

कुठलेही काम करताना आपल्याला हवी असलेली माणसे त्या कामासाठी योग्य आहेत की नाहीत हे बघणे हे सगळ्यात महत्त्वाचे आणि अच्युत गोडबोले ते नेमके अचूक रीत्या हेरतात. त्यांना समोरच्या व्यक्तीमधील क्षमता लक्षात येतात. त्या क्षमता काही वेळेस समोरच्या व्यक्तीलाही पुरेशा माहीत नसतात. लिखाणाच्या संदर्भात सांगायचे झाले, तर त्यांची सहकारी या नात्याने मला जाणवलेल्या बाबी म्हणजे, त्यांच्या मनात अनेक विषय घोळत असतात. त्या वेळी ते एक विषय समोर घेऊन त्याचा पूर्ण आराखडा कागदावर उतरवतात. त्या विषयरूपी इमारतीचा कच्चा सांगाडाच तयार होतो! त्यात काय काय असायला हवे, ते लोकांनी का वाचायला हवे, त्या विषयाची आवड तर निर्माण झालीच पाहिजे पण त्याच बरोबर त्या विषयाचा बोजडपणा गेला पाहिजे-वाचक त्यात गुंतला गेला पाहिजे या सगळयांची ते पुन्हा पुन्हा दखल घेतात. त्यानुसार त्या विषयांवर काम केले जाते. विषयाबरोबरच त्या विषयात काय काय असायला हवे, ते ते भाग किती पानांचे असावेत, ते कंटाळवाणेही झाले न पाहिजेत, त्याचा फॉण्ट कसा हवा इथपासून ते किती दिवसांत पूर्ण झाले पाहिजे इथपर्यंत सगळे नियोजन होते. विषय जसजसा पुढे जाऊ लागतो, म्हणजे आधी त्या विषयाशी संबंधित कितीतरी पुस्तके (प्रत्येक विषयाची ऐंशी ते शंभर) समोर दिसतील अशी त्यांची त्यांची जागा घेतात. त्या आधारे कच्च्या नोट्स काढल्या जातात, मग सिक्वेन्स तयार होतो, प्रत्येक लेख कितीही मोठा झाला तरी चालेल पण लिहिताना कोणताही दबाव घेऊन तो लिहिला जात नाही. त्यानंतर त्या त्या लेखांचे संक्षिप्तीकरण होते, लेखात अनेक ‘अॅडिशन्स’ही होतात, लेख व्याकरणाच्या दृष्टीने निर्दोष असायला हवा याची दक्षता घेतली जाते. जेव्हा विषय पूर्णत्वाकडे जाऊ लागतो, तेव्हा जवळच्या मित्रमंडळींना त्यात सामील करून घेतले जाते. त्यांना ते लेखन वाचण्यासाठी पाठवले जाते. त्यांच्या सूचना अच्युत गोडबोले खूप महत्त्वाच्या मानतात. लेखन चांगले वाटो वा वाईट, त्याविषयीचे विश्लेषण त्यांना हवे असते. अनेकदा, ते समोरच्याच्या उपयुक्त सूचनांचा गांभीर्याने विचार करतात आणि ते ते बदल लेखात केले जातात. इतकेच नाही, तर त्या त्या विषयातील तज्ज्ञ – त्यांच्याशी संपर्क करून त्यांना ते बाड वाचण्यास दिले जाते. त्यांच्या सूचनांचीही विशेष दखल घेतली जाते आणि लेखनात पुन्हा आवश्यक ते बदल केले जातात. त्यानंतर  तयार झालेल्या पुस्तकाचे पूर्ण वाचन होते. त्यात अगदी वाक्यरचनेपासून ते आशयापर्यंत काही अपुरे वाटत असेल, आकलनाच्या दृष्टीने कठीण वाटत असेल, तर त्या शेवटच्या टप्प्यावरही, न कंटाळता त्यावर काम केले जाते. ‘मी मोठा-मलाच फार कळतं’ असा भाव त्या प्रक्रियेत गोडबोले यांच्या गावी कधीही नसतो हे विशेष. पुस्तक पूर्णत्वाला येत असताना त्या विषयाच्या मुखपृष्ठावर चर्चा सुरू होते. मी त्यांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे तयार केलेली असल्यामुळे त्या त्या विषयाला अनुसरून मुखपृष्ठ तयार करताना ते पूर्ण स्वातंत्र्य देतात आणि तयार झालेल्या मुखपृष्ठात काही बदल हवे असल्यास ते बदल ते सुचवत राहतात. अशा रीतीने, लेखक आणि चित्रकर्ता यांच्या समन्वयातून मुखपृष्ठ जन्माला येते.

एकूणच, त्या माणसाचा संयम लेखन प्रक्रियेत कधीही जात नाही. त्या माणसात अतिशय हळुवारपणे समोरच्याकडून काम करवून घेण्याची हातोटी आहे. समोरच्याला सतत प्रोत्साहित केले जाते. त्या त्या माणसाच्या कामाचे श्रेय त्याला पूर्णपणे दिले जाते आणि पुरेसा वेळ व स्वातंत्र्यही. त्यामुळे काम करणाऱ्याला त्या कामाचा एक प्रकारचा मालकीहक्क मिळतो आणि काम करणारा ते काम त्याचे आहे असे समजून ते काम चांगले, परिपूर्ण व उत्कृष्ट कसे होईल यावर कटाक्षाने लक्ष देतो. पुस्तक लिखाणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक निर्मिती प्रक्रियेतही ते त्यांच्या सूचना देतात. ते पुस्तक तयार होण्याच्या प्रत्येक क्षणाला उत्साही असतात.

लिखाणाच्या प्रक्रियेत अच्युत गोडबोले यांच्या अंगात मुरलेला, रुजलेला, हाडाचा निष्णात व्यवस्थापक, विद्यार्थी आणि शिक्षक पावलोपावली भेटतो. त्यांच्या लिखाणाचे मुख्य उद्दिष्ट हेच मुळी इंग्रजीमध्ये किंवा जगामधील विविध गोष्टीतील ज्ञान हे सोप्या रंजक भाषेत मराठीत आणणे आणि वाचकाला सांगणे असते, की ‘हे किती सोपं आणि सुंदर आहे बघ! मी तुला याची तोंडओळख तर करून दिली आहे. पण हे काही अंतिम ज्ञान नाही. त्या प्रवासाकडे आता तुला जायचंय आणि त्यावर तुला  भरपूर वाचन, चिंतन आणि मनन केलं पाहिजे. यात फक्त कुठूनतरी माहिती मिळवून, ती कशीतरी कोंबलेली नसून तिची सुसूत्रपणे, रंजक पध्दतीनं मांडणी केल्यामुळे ती ज्ञानाचं रूप धारण करते. मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे असं सगळेच म्हणतात. पण आपण त्यात उतरून जरी अर्धा ते एक टक्का भर घालू शकलो, तरी त्यात मला आनंद होईल’ त्यांच्या या वृत्तीमुळे आणि लेखनशैलीमुळे आणि त्यातील ज्ञानामुळे त्यांची पुस्तके महाराष्ट्रात घरोघरी जाऊन पोचली आहेत.

संगीतातही ते कानसेन आणि काही प्रमाणात तानसेन आहेत. (त्यांच्या रंजिशी सही, क्युं मुझे मौत के पैगाम दिए जाते है, आज जाने की जिद ना करो या गझल्स असोत वा एखादा राग शिटीवर उभा करणे असो ती त्यांची खास खासियत.) संगीतावरील त्यांचा त्यांच्या बहिणीसोबतचा ‘नादवेध’ हा कार्यक्रम महाराष्ट्रभर रसिकांची दाद मिळवून आहे. त्यांनी लहानपणापासून अनेक बुजूर्गांची अनेक वर्षें गाणी ऐकली आहेत आणि त्यांच्याकडे संगीताचा अतोनात खजिनाच आहे. पाश्चिमात्य संगीत असो, सिनेसंगीत असो वा शास्त्रीय संगीत असो. ते सदोदित त्यांच्या भोवती आणि मनात अविरतपणे चालू असते. संगीत, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य या साऱ्या क्षेत्रात लीलया संचार करणारी अच्युत गोडबोले ही व्यक्ती लौकिक दृष्टया यशस्वी तर आहेच, पण सामाजिक भान राखणारी आणि मानवतावादी आहे!

– दीपा देशमुख

About Post Author

Previous articleनंदीबैल – दान देवाच्या नावानं
Next articleमुणगे गावचा आध्यात्मिक वारसा!
दीपा देशमुख या वाणिज्‍य शाखेतल्‍या पदवीधर. त्‍या प्रसिद्ध लेखक अच्‍युत गोडबोले यांच्‍या लेखनप्रक्रियेत सहाय्यक म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी बालवाचकांसाठी प्रसिद्ध होणा-या 'चांदोबा' या मासिकाचा चार वर्षे मराठीतून अनुवाद केला. त्‍यांनी विविध वर्तमानपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांमधून सातत्‍याने लेखन केले आहे. त्‍यांनी शिक्षण, पर्यावरण, अपंगत्‍व, महिला स्‍वयंसहायता गट अशा विविध विषयांवरील विशेषांकांचे संपादनही केले आहे. त्‍या मुलाखती घेणे, पुस्‍तक परिक्षण लिहीणे आण्‍ाि मुखपृष्‍ठ तयार करणे यांसारख्‍या विविध कामांत त्‍या गुंतलेल्‍या असतात. लेखकाचा दूरध्वनी - 9545555540

3 COMMENTS

  1. त्यांची ” संगणकयुग ” ‘
    त्यांची ”संगणकयुग”, ”अर्थात” व ”गणिती” ही पुस्तक मला इतकी आवडली की, ती माझ्या संग्रही असावी अशी तीव्र इच्छा झाली. म्हणून लगेच विकतसुद्धा घेतली. असो.

  2. Aabhari. Ajun ek vinanti.
    Aabhari. Ajun ek vinanti. Godbole ani jabbar patel solapurche, ek vachnat aalele ki doghanvarhi shaley jeevnat Pujari sirancha prabhav padla. Jeevnala vegle valan milale. Tya pujari siran baddal lekh lihava.

Comments are closed.