अक्षय वाचनाचा वसा

0
203

वाचन मंदावत आहे. सार्वजनिक वाचनालयांना ओहटी लागली आहे. त्यांना नवीन सभासद मिळत नाहीत असे सगळे वातावरण असताना डोंबिवलीमध्ये काही खाजगी वाचनालये गेली अनेक वर्षे वाचनाचा वसा जपून आहेत. त्यांच्या सभासदसंख्येमध्ये वाढ होत आहे. त्यांचे कारण नवनवीन उपक्रम. अशाच दोन वाचनालयांचा हा परिचय.. प्रभाकर भिडे यांनी करून दिलेला

मराठी भाषेविषयी कळवळ्याने बोलणारे अनेक आहेत. वृत्तपत्रांत त्यावर जोरदार चर्चा होते. पण कुणाजवळ मराठी भाषा सुद्दढ, संपन्न करण्यासाठीचा खात्रीलायक उपाय नाही. पण डोंबिवली या सारस्वतांच्या नगरीत अनेक वाचनालये आपापल्या परीने मराठी लोकांपर्यंत पुस्तके पोचवण्याचे काम करत असतात.


ज्ञानविकास वाचनालय


गेली चाळीस वर्षे डोंबिवलीतील मानपाडा रोडवर (स्टेशनजवळ) दिसणारे ज्ञानविकास वाचनालय! त्या वाचनालयाभोवती सर्व दुकाने सोन्याचांदीची, रेडिमेड कपड्यांची. यात उठून दिसणारे, यशस्वी रीत्या चालवले जाणारे परांजपे यांचे ज्ञानविकास वाचनालय. परांजपे काहीसे अबोल पण आपले काम चोख करणारे, सभासदांना तशी सेवा देणारे.

त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी (1970) छोट्या जागेत वाचनालय सुरू केले. त्या सुमारास मुंबईहून व इतर ठिकाणांहून बरेचसे सुशिक्षित नोकरदार लोक डोंबिवलीत राहण्यास येत होते. परांजपे सुरूवातीस एक-दोन वर्ष एमएसइबीमध्ये नोकरीला होते, पण त्यांना व्यवसाय करण्याची आवड. त्यांनी नोकरी सोडून वाचनालय सुरू केले. स्टेशनजवळ वाचनालय असले तर चांगले चालेल हा त्यांचा होरा खरा ठरला.

त्यांच्या वाचनालयाचे एक हजारपर्यंत सभासद आहेत. ते मासिक वर्गणी 90 रुपये + डिपॉझिट 150 रूपये घेतात. सभासद 100/200 रुपये वर्गणी सहजपणे देतात असा त्यांचा अनुभव आहे. त्यांचे वाचनालय गेली तेहतीस वर्षे तेथे आहे. जागा फारशी मोठी नसली (20X12) तरी त्यांचे भाडे 12000 रूपये आहे. (ते 15000 रुपये होणार आहे) त्यांच्याकडे दोन-तीन नोकर (पगारी) असूनसुद्धा वाचनालय हा व्यवसाय म्हणून एक कुटुंब चालू शकते असा त्यांचा अनुभव आहे.

लोकांची वाचनाची आवड दिवसेदिवस बदलत चालली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक आपापली चरित्रे/आत्मचरित्रे लिहित असतात. त्यांचे अनुभव वाचायला लोकांना आवडते. त्यांच्या वाचनालयांतील पुस्तकांपैकी चाळीस टक्के पुस्तके चरित्रे/आत्मचरित्रे आहेत. तसेच, आरोग्यविषयीची पुस्तके लोक उत्सकतेने वाचतात. यामध्ये दातांची/डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, हृदयविकार/कर्करोग कसे टाळावे,सर्व अवयव व सर्व रोगा यांवर हल्ली छान छान पुस्तके प्रकाशित होत असतात. सुशिक्षितांचे प्रमाण वाढल्यामुळे, शरीराविषयी जागरुकता आल्यामुळे लोक अशी पुस्तके जास्त प्रमाणात वाचतात, ते म्हणतात, की हल्ली पुस्तकांना विषय कोणताच वर्ज्य नाही. पाणी शुद्ध कसे कराल? मायक्रोओव्हनची काळजी कशी घ्यावी? येथपासून ते गर्भसंस्कार, विवाह समुपदेशपर्यंतची चांगली व माहितीपूर्ण पुस्तके लोकांना हवी आहेत. त्याशिवाय अँग्रीमेंट/टॅक्सेशन/फायनान्स, गुंतवणूक यांवरील पुस्तके व मासिके सभासद आवर्जून नेतात. फुंगसुई/वास्तुविशारद/इटिरियरची पुस्तके वाचनालयात ठेवणे गरजेचे आहे. भोजन व विविध रेसिपी यांबाबतच्या नवीन येणा-या पुस्तकांना महिलावर्ग चांगला वाचक आहे. प्रवासवर्णने हाही एक आवश्यक भाग झाला आहे. पूर्वीच्या कथा/कादबं-या/नाटके यांची मागणी कमी आहे.कदाचित पूर्वीसारखे ताकदीचे व सातत्याने लिहिणारे लेखक कमी झाले आहेत. जीवनोपयोगी पुस्तकांचा खप व वाचन जास्त प्रमाणात आढळते.

त्यांना नवीन प्रकाशित झालेली पुस्तके त्या किंवा दुस-या दिवशी पुण्याचे ललित प्रकाशन (लिमये) लगेच उपलब्ध करून देते. त्यांच्या अनुभवाप्रमाणे कोणतेही पुस्तक लायब्ररीत दोन ते तीन वर्ष चालते. इतर व्यवसायांप्रमाणे, वाचनालयात पहिल्या दोन वर्षांत फायदा होत नाही. पण पुस्तके व मासिके घ्यावीच लागतात. तिथपर्यंत तोटा सहन करावा लागतो. यामध्ये पुस्तके टिकतात पण मासिकांची रद्दी होते. हल्ली व्यापारीकरणामुळे फायद्याचा भाग वाढीव भाड्यामध्ये बराच जातो. या व्यवसायासाठी दोन-तीन सहका-यांची आवश्यकता असते ते जर घरचे असतील तर चांगले.

वाचनालयात सहा भाषांतील- तामिळ, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराथी, हिंदी, इंग्रजी, मासिके – प्रत्येकी पाच ते दहा प्रती ठेवाव्या लागतात. वाचनालयात सर्वभाषिक सभासद असणे गरजेचे आहे. इतर भाषांमध्ये, विशेषत: कानडी, तेलगू मासिके बरीच स्वस्त असतात, कारण त्यांचा खप पाच-सात लाखापर्यंत आहे. फक्त मल्याऴम या केरळी भाषेतील मासिके वाचनालयांतून कोणी नेत नाही. कारण मुंबईतील बरेच केरळी लोक स्वत: मासिके विकत घेऊन वाचतात. त्यांच्या मासिकाचा खप बारा-चौदा लाखांपर्यंत आहे. त्यापुढे मराठी मासिकांचा खप तीस-चाळीस हजारापर्यंत म्हणजे फारच कमी आहे.

तुमची आवड व व्यवसाय, दोन्ही एकत्र आल्यास वाचनालय हा आवडीचा व्यवसाय होऊ शकतो. त्यातून आपला प्रपंच व्यवस्थित चालू शकतो, पण अपेक्षा मात्र मर्यादित हव्यात असे त्यांनी सांगितले.

 

फ्रेंड्स लायब्ररी

पुंडलिक पै यांची ‘फ्रेंड्स लायब्ररी’. पुंडलिक पै हे एक पुस्तकवेडे, जास्त न बोलता आपले काम चोख करणारे तरुण आहेत. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवलीलाच झाले. त्यांचे मराठीवर प्रेम असून त्याला पुणेरी टच आहे. त्यांना लहानपणापासून वाचनाचे वेड आहे. या सवयीला त्यांच्या आईने प्रोत्साहन दिले. त्यांनी नोकरी करायची नाही असे लहानपणी ठरवले; स्वत:चे खूप मोठे ग्रंथालय असावे असे स्वप्न बघितले. वाचनालयाचा विचार हा त्यांचा ध्यास आहे.

त्यांनी एक हजार पुस्तके विकत घेऊन फ्रेंड्स लायब्ररी टिळकनगरात 1986 साली सुरू केली. नंतर इतर ठिकाणांहून पुस्तके गोळा केली. नुकतीच त्यांनी विकास वाचनालयाची सर्व पुस्तके, श्रीकांत टोळ यांच्या निधनानंतर विकत घेतली. आज, त्यांच्या लायब्ररीमध्ये पासष्ट हजार एवढी इंग्रजी व मराठी पुस्तके आहेत. त्यामध्ये कथासग्रंह, कादंब-या, प्रवासवर्णने, आत्मचरित्रे, धर्मग्रंथ, कवितासंग्रह अशी सर्व पुस्तके आहेत. ते मराठी, इंग्रजी, कानडी, मल्याऴम, गुजराथी अशी सर्व मासिके दर महिन्याला घेतात. त्यांच्याकडे रोज नवीन (प्रकाशित होणारी) पुस्तके येतच असतात. त्याकरता, त्यांनी वेगवेगळ्या पुस्तक विक्रेत्यांबरोबर व्यवस्था केली आहे.

‘फ्रेंड्स लायब्ररी’ हे ठाणे जिल्ह्यांतील पहिले पूर्णपणे संगणकीय ग्रंथालय आहे असा त्यांचा दावा आहे. त्यांनी वाचनालयासाठी अद्यावत ‘सॉफ्टवेअर’ बनवून घेतले. त्यामध्ये जेवढी पुस्तके आहेत त्यांना क्रमांक दिले आहेत. पुस्तकांचे नाव, लेखकांचे नाव, सभासदाचे नाव, पत्ता, वय, शिक्षण, जन्मतारीख, व्यवसाय, रक्तगट अशा माहितीसह नोंदले आहे. सभासदाने पुस्तक घेतले की पुस्तकावरचा नंबर संगणकावर प्रिट करायचा. सभासदाने आपला नंबर लक्षात नाही ठेवला तरी चालते. संगणकावर वर्गणी किती बाकी आहे वगैरे तपशीलही कळतो. ते प्रत्येक सभासदाकडून दोनशे रुपये डिपॉझीट व पन्नास रू. प्रवेश फी + 80 रू. मासिक वर्गणी घेतात. प्रत्येक पुस्तकाला आकाशी रंगाचे कव्हर असते. कपाटे पुस्तकांनी भरलेली आहेत. वाचकाने तेथे येऊन पुस्तक निवडायचे.

पुडंलिक पै यशस्वी व्यवसायाची तीन प्रमुख पथ्ये पाळतात; 1. सभासद त्याला हवे असलेले पुस्तक घेऊन समाधानाने गेला पाहिजे, 2. पुस्तक उपलब्ध नसल्यास ते त्वरित आणून दिले पाहिजे, 3. वाचनालय दिवसभर उघडे पाहिजे.

शांत, मनमिळाऊ स्वभाव; ते कापड दुकानदाराप्रमाणे गोडवा ठॆवून पुस्तकांसबंधीची माहिती न कंटाळता देतात. वाचण्यासाठी पुस्तके सुचवली जातात. व्यवसायांतील अशा गुणामुळे त्यांच्याकडे सभासद भरपूर आहेत. त्यांनी वाचनालयाच्या चार शाखा विविध भागांत सुरू केल्या आहेत. पाचवीचे उद्घाटन अलिकडेच झाले. विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक लायब्ररी वेगळी आहे. त्यामध्ये इंजिनीयरिंग, संगणक, मेडिकल, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची भरपूर पुस्तके आहेत. मेडिकलच्या काही पुस्तकांच्या किमती पाच ते आठ हजार रुपयांपर्यंत आहेत. सर्व शाखांची मिळून तीन हजारापर्यंत सभासद संख्या आहे. ते म्हणतात, वाचनालय हा व्यवसाय छोट्या प्रमाणात केल्यास यशस्वी ठरू शकत नाही.

त्यांनी ‘Online Book’ ही नवीन संकल्पना राबवली आहे. कल्याण ते घाटकोपर या दरम्यान ती सुरू आहे. त्यांनी आपल्याकडील पुस्तकांपैकी पंचावन्न हजार पुस्तकें संगणकावर  online टाकली आहेत. त्यामध्ये पुस्तकांचे नाव, प्रकाशकाचे नाव, लेखक व मागील पानावरील पुस्तकासंबधीचे निवेदन दिले आहे. दीडशे रुपये भरून सभासद झाले की टेलिफोनने पुस्तक बुक करायचे. दुस-या दिवशी कुरियरद्वारा सभासदास पुस्तक मिळते. या योजनेचे साडेतीनशे सभासद झाले आहेत.

इंग्रजीची नवीन व लोकांना हवी असलेली पुस्तके ते भरपूर प्रती घेतात. त्यांनी चेतन भगतच्या कादंबरीच्या दोनशे प्रती घेतल्या आहेत. कारण ते पुस्तक एकाच वेळी शंभर सभासदांना हवे असते. ते लोकप्रिय मराठी पुस्तकांच्या दहा-पंधरा प्रती घेतात, सभासदांना हवे असलेले पुस्तक वेळी दिले तर त्यांचे समाधान होते हा त्या पाठीमागचा विचार.

आता त्यांचे स्वप्न आहे, वाचनकक्ष सुरू करण्याचे. त्याकरता ते पाच हजार चौरस फूट जागेच्या शोधात आहेत. तेथे येऊन वाचकांनी निवांत बसून पुस्तके वाचावी. ब्रिटिश कौन्सीलच्या संदर्भ लायब्ररीसारखी ही कल्पना आहे. त्यामध्ये स्वतंत्र बाल-वाचनालय असणार आहे.

पुंडलिक पै म्हणतात, फायद्याचा फार विचार न करता सतत मेहनत व कार्यावरील निष्ठा असली की यश आपोआप चालत येते. अर्थात नवीन जमान्याप्रमाणे राहणे गरजेचे आहे.

 
– प्रभाकर भिडे

 

About Post Author

Previous articleनिगर्वी आणि निश्चयी! – दांडेकर
Next articleजेजुरी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.