अक्षय तृतीया – साडेतीन मुहूर्तातील पूर्ण मुहूर्त

_AkshayTrutiya_ArthatYugabdi_1.jpg

वैशाख शुध्द तृतीया ही तिथी अक्षय तृतीया या नावाने ओळखली व साजरी केली जाते. तो हिंदू धर्माच्या धारणेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ क्षय न पावणारे, म्हणजे नाश न होणारे असा आहे. पुराणानुसार त्रेतायुगाचा प्रारंभ अक्षय तृतीयेपासून झाला. तो दिवस कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन मानला जातो. म्हणून त्याला ‘युगाब्दी’ असे नाव आहे.

अक्षय तृतीयेला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे, म्हणून तो दिवस त्यांचा जन्मोत्सव या स्वरूपातदेखील साजरा करतात. त्या दिवशी नरनारायणासाठी भाजलेले जव किंवा गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. लोक त्या दिवशी उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करतात. अक्षय तृतीया या दिवसाला दानमहात्म्य लाभले अाहे. त्या दिवशी विविश तऱ्हेच्या वस्तू दान करण्याची परंपरा अाहे. त्यामध्ये उन्हाळ्याच्या दाहापासून संरक्षण करणार्‍या वस्तू, जवस, गहू, हरबरे, सातू, दहीभात, उसाचा रस, दुग्धजन्य पदार्थ (खवा, मिठाई आदी) जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस अशा वस्तू दान केल्या जातात. भारतात त्या दिवसाबाबत प्रांतानुसार वेगवेगळ्या चालीरिती आढळून येतात. त्या दिवशी काही ठिकाणी पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घातले जाते.

त्या तिथीला अक्षय तृतीया हे नाव पडण्यामागे अाणखी एक कारण सांगितले जाते. त्या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून केलेल कर्म, अशा साऱ्या गोष्टी अक्षय म्हणजेच अविनाशी आहेत, असे श्रीकृष्णांनी सांगितले असल्याचा उल्लेख ‘मदनरत्‍न’ या ग्रंथात आढळतो.

शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शेतीच्या कामांना प्रारंभ करतात. या सणाला ‘आखेती’ असेही म्हणतात.

माणूस त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माद्वारे स्वत:च्या संचितात भर घालतो. चांगले कर्म केल्याने पुण्य मिळते आणि त्याद्वारे माणूस अधिक चांगल्या रितीने जीवन जगू शकतो, अशी भारतीयांची श्रध्दा अाहे. त्या धारणेनुसार अक्षय तृतीयेला दान करून पुण्यसंचय करण्याची प्रथा रूढ झाली असावी. या दिवशी केलेल्या पुण्यकर्माचा क्षय होत नाही, असे मानले जाते.

अक्षय तृतीयेची कथा अशी – एक व्यापारी होता. तो नित्य दानधर्म करे व संत महात्म्यांच्या कथा आवडीने ऐके. त्याला कालांतराने दारिद्र्य आले. एकदा त्याने असे ऐकले, की बुधवारी रोहिणीयुक्त तृतीया आल्यास त्या दिवशी केलेले दान-पुण्य अक्षय ठरते. त्याने तसा दिवस येताच ते सारे सोपस्कार केले अाणि तो पुढील जन्मी कुशावती नगरीचा राजा झाला. त्याने मोठमोठे यज्ञ केले व अनेक प्रकारचे वैभव उपभोगले. तरीही त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही. अक्षय तृतीया हा दिवस स्त्रियांना अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यांनी चैत्रात बसवलेल्या गौरीचे विसर्जन त्या दिवशी करायचे असते. या गौरी पूजनाच्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.

त्या दिवशी गृहिणी मातीचे माठ किंवा रांजण, छत्रीजोड अशा वस्तू दान करत असत. भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला विशेष महत्त्व आहे. ज्याच्याजवळ आहे त्यांनी ज्याच्याजवळ नाही त्याला देऊन मदत करणे हा दान देण्यामागचा हेतू आहे. ‘दान’ म्हणजे डोनेशन नव्हे! डोनेशन देताना देणाऱ्याचे नाव, काय डोनेट केले आहे ते जाहीर केले जाते. एव्हढेच नव्हे तर तसा फलकही लावला जातो. परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले या दोन्ही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू नये, असे म्हटले जाते. भारतीय सण, व्रते, उत्सव निसर्गाशी निगडीत आहेत. तो दिवस साजरा करण्यामागचा उद्देश माणसाने निसर्गाशी संवाद साधावा आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी हा असल्याचे सांगितले जाते. बदलत्या काळानुसार त्याकडे बघण्याचा आणि असे सण, उत्सव साजरे करण्याचा दृष्टीकोनही बदलता येऊ शकेल. आज समाजासमोर ढासळते पर्यावरण, प्रदूषण, पाणी समस्या, जागतिक पातळीवर वाढलेले उष्णतामान, बेभरवशाचे पर्जन्यमान असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी अशा शुभदिनी चांगले उपक्रम हाती घ्यावेत, वृक्षारोपण व संवर्धन करून पर्यावरणाला हातभार लावावा, वाहनांचा कमीत कमी वापर करून प्रदूषण टाळावे, पाण्याचा अनाठायी वापर नाकारता पाणी जपून वापरावे, निरक्षरांना साक्षर करावे अशा अनेक चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. ती सर्व कामे पुण्यकर्मे आहेत. त्यांच्या आचरणामुळे जगण्याचे सार्थक होईलच, सोबत स्वत:च्या जीवनाला शाश्वत, अक्षय आनंदाचा अर्थही प्राप्त होईल.

– प्रज्ञा कुलकर्णी

About Post Author