अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन – मनीषा कदम यांची कामगिरी

_ManishaKadam_4_0.jpg

मनीषा कदम या औरंगाबाद येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत. त्यांनी भातवाटप केंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांना डिजिटल अंगणवाडीचा जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे! मनीषा कदम यांनी भारतात पहिल्यांदाच दौलताबादमधील अब्दीमंडी या गावातील तीन अंगणवाड्यांना 2 ऑक्टोबर 2011 रोजी ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त करून दिले. मनीषा कदम या अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळवून देणाऱ्या देशातील पहिल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका ठरल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात दोन हजार अंगणवाड्या ‘आयएसओ’ मानांकन झाल्या आहेत. त्यांपैकी त्यांनी चाळीस अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त करून दिले आहे. राज्यामध्ये अंगणवाड्यांसाठी ‘आयएसओ’ची संकल्पना राबवली जात आहे. त्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात शंभर कोटीं रुपयांची तरतूददेखील केली आहे. त्यामागे मनीषा कदम यांच्या कामाचा वाटा आहे. प्रमाणित व नामांकन या दोन्ही गोष्टी एकच आहेत. मनीषा यांचा ध्यास राज्यातील अंगणवाड्या स्वच्छ व सुंदर व्हाव्यात हा आहे. त्यांना मानांकन हे त्याकडे लक्ष वेधण्यास केवळ निमित्त याची जाणीव आहे.

मनीषा कदम या मुरूड, जिल्हा लातूरच्या. त्यांनी मुरूडला बारावीपर्यंत आर्ट्स शाखेतून शिक्षण घेतले. त्यांना समाजसेवेची आवड मुळातच होती. त्यामुळे त्यांनी लातूरच्या ‘बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठा’तून ‘एमएसडब्ल्यू’ पदवी 1994 साली मिळवली. मनीषा यांची अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून निवड महाराष्ट्राच्या निवड मंडळाकडून,  औरंगाबादमधील दौलताबाद विभागात 23 डिसेंबर 1996 रोजी झाली. त्या वडगाव कोल्हाटी गावात कामावर रुजू झाल्या. तेथे कोल्हाटी समाज बहुसंख्येने आहे. त्या तेथील अंगणवाडीतील उदासीन वातावरण, अस्वच्छता, शिक्षणाबद्दलची अनासक्ती पाहून अस्वस्थ झाल्या. खरे तर अंगणवाडी म्हणजे पोषक आहार देणारे, कुपोषण थांबवणारे, मातांचे सक्षमीकरण करून- त्यांना मार्गदर्शन करणारे, मुलांना चांगल्या सवयी लावणारे संस्कारक्षम केंद्र असायला हवे, पण त्या गावात अंगणवाडीची ओळख भातवाटप केंद्र अशी होती. त्याचा अर्थ मुलांना खाण्यपिण्यास मिळण्याची जागा. पण मनीषा यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच त्या परिस्थितीचा कायापालट करण्याची ‘मनीषा’ बाळगली आणि त्या हिरिरीने कामाला लागल्या.

_ManishaKadam_1_0.jpgकेंद्र सरकारच्या ‘एकात्मिक बालविकास योजने’अंतर्गत शून्य ते तीन वयोवर्षे गटांतील मुलांसाठी लसीकरण, तीन ते सहा वर्षें वयाच्या मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण, किशोरवयीन मुला-मुलींसाठी आरोग्यविषयक-आहारविषयक मार्गदर्शन व विविध प्रशिक्षण शिबिरे, गरोदर-स्तनदा मातांसाठी मार्गदर्शन असे विधायक कार्य अंगणवाड्यांमधून केले जाते. पण त्या अंगणवाड्या पडिक जागांत, स्मशानाजवळ किंवा मंदिरांत भरवल्या जात. मग अशा उदासीन वातावरणात मुलांचा भावनिक व मानसिक विकास कसा होणार हा विचार मनीषा यांना स्वस्थ बसू देईना! तेथूनच त्यांची शाळा डिजिटल करण्याकडे वाटचाल सुरू झाली.

सरकारकडून अंगणवाडीसाठी सेविका व मदतनीस अशा दोन पगारदार व्यक्ती नियुक्त केल्या जातात. त्यांना वेतन तुटपुंजे मिळते (सेविकेला सहा हजार रुपये, तर मदतनिसास तीन हजार रुपये). तसेच, सरकारकडून केवळ इमारत बांधकामासाठी पैसे मिळतात; पण अंगणवाड्यांच्या सोईसुविधांसाठी आर्थिक मदत मिळत नाही. मनीषा कदम यांनी सुनंदा जाधव, निर्मला काळे वगैरे अंगणवाडी सेविकांना बरोबर घेऊन पाच-सात जणींचा ग्रूप तयार केला. त्या सर्वांनी मिळून अंगणवाडीची रंगरंगोटी करण्यासाठी म्हणून दवाखाना, पोलिस स्टेशनपासून सर्व स्तरांतून निधी जमा केला. लोकसहभागातून बावीस-तेवीस हजार रुपये जमा झाले. वडगाव कोल्हाटी गावच्या सरपंच तेजस्विनी पंडित यांनी साधनसामग्री पुरवली, तर जमा झालेल्या निधीतून राष्ट्रसंतांचे व महापुरुषांचे फोटो, अंगणवाडीची उद्दिष्टे, प्राणी-फुले-फळांच्या चित्रांनी भिंती सजवण्यात आल्या. कार्पेट, मुलांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या वस्तू (जसे – रुमाल, नेलकटर, खेळणी, बैठक व्यवस्था, पाण्याच्या बाटल्या, युनिफॉर्म…) रंगसंगती साधून आणल्या गेल्या. बुटांचे कपाट, पंखे, स्वयंपाकघरात भांड्यांचे स्टँड, बरण्या, ग्लास असे बरेच साहित्य खरेदी करण्यात आले. स्वच्छ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली.

त्यांना काम करताना अडचणींचा सामना करावा लागला. काही वेळा, माणसेच काम करण्यास मिळत नव्हती. त्या वेळी त्या स्वत: सर्व कामे करत. त्यांनी कमी पैशांत चांगल्या दर्ज्याच्या वस्तू कशा मिळवता येतील? त्यासाठी शहराच्या ठिकाणी जाऊन अनेक दुकाने पालथी घातली. अंगणवाडीत शिक्षणासाठी दृकश्राव्य साहित्याचा वापर सुरू केला. ते साहित्य गावातील उद्योजक साहेबराव हंगरगेकर यांनी पुरवले. अशा प्रकारे, डिजिटल अंगणवाडी तयार झाली आणि मुलांना दर्जेदार शिक्षणाची वाट मोकळी झाली. अंगणवाडीचे बदललेले रूपडे पाहून, सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. त्यामुळे मुलांची वारंवार होणारी गळती थांबून उपस्थिती वाढली.

_ManishaKadam_3_0.jpgमनीषा यांनी अंगणवाडी केवळ लहान मुलांसाठी नव्हती, तर गरोदर, स्तनदा मातांसाठीचे ते समुपदेशन केंद्रही होते. ग्रामीण भागातील निरक्षर, अर्धशिक्षित व अंधश्रद्धाळू लोकांना त्यांच्या कलाने समजावणे गरजेचे होते. अनेकदा गर्भवती महिला त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांना प्रतिसाद देत नाहीत. मनीषा यांनी त्यांना त्यांचे जन्माला येणारे बाळ सुदृढ असणे किती गरजेचे आहे हे सुसंवादातून, प्रबोधनातून पटवून दिले. हळुहळू महिला स्वत:च्या बाळासाठी म्हणून मार्गदर्शनाकरता अंगणवाडीकडे वळू लागल्या. मनीषा यांनी गर्भवती महिला, स्तनदा माता यांच्या सक्षमीकरणासाठी अंगणवाडीत महिला डॉक्टरांची व्याख्याने आयोजित केली. परिणामी, कुपोषणाचे प्रमाण कमी होऊन, सुदृढ बाळे जन्माला येऊ लागली. त्यांच्या त्या कामाची दखल घेऊन, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी त्या अंगणवाडीला भेट दिली.

मनीषा यांना त्यांच्या कामात यश मिळाले तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या गावांतील चाळीस अंगणवाडी सेविकांना एकत्र बोलावले. त्यांचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’ असे ग्रूप बनवले आणि अंगणवाड्या डिजिटल करण्याचे सत्र आरंभले. त्या कार्यात त्या-त्या गावातील ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांनी मदत केली. मनीषा यांनी ज्या गावामध्ये जसा निधी जमा होईल, तशी अंगणवाडी सजवून आदर्श अंगणवाड्यांचे रोल मॉडेल उभे केले. मनीषा यांना त्या कार्यात ‘युनिसेफ’चे मार्गदर्शनही लाभले. मनीषा यांनी सरकारचा एक पैसा न घेता एकेक रुपया जमवून या अंगणवाड्या सजवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात रास्त अभिमान असतो.

मनीषा सांगतात, “आयएसओ’च्या मानांकनामुळे अंगणवाड्यांना जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. ‘आयएसओ’ मानांकनामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारला, अत्याधुनिक सोईसुविधा मुलांना मिळू लागल्या, सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षणाची कवाडे उघडी झाली. त्यामुळे मुलांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. शिवाय, अंगणवाडीत किशोरवयीन मुले-मुली, गरोदर व स्तनदा माता, कुपोषित मुलांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन व आरोग्य तपासणी करण्यासाठी महिन्याचे चारही शनिवार नियोजित करण्यात आले आहेत.” डिजिटल अंगणवाड्यांना साडेसहा हजार लोकांनी भेटी दिल्या आहेत. त्यात अधिकारीवर्गाची उपस्थिती लक्षणीय आहे. तसेच, अनेक राज्यांतील राजकीय पुढाऱ्यांनी, ‘बिल गेट्स फाउंडेशन’ने, संसदेच्या बावीस खासदारांच्या टीमने भेटी दिल्याचे मनीषा सांगतात.

मनीषा यांनी विविध कार्यक्रम व शिबिरे यांच्या माध्यमातून जालना, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांतून अंगणवाड्यांच्या ‘डिजिटलायझेशन’ व ‘आयएसओ’ मानांकन यांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यांना आदिवासी मातांसाठी काम करायचे आहे. त्या मातांना त्यांच्या बाळांच्या काळजीची जाणीव करून देऊन सक्षम बनवायचे आहे. त्यांचे ध्येय मुलांपर्यंत पोचून कुपोषण कमी करणे हे आहे.

मनीषा कदम यांची आई व दोन बहिणी शिक्षक आहेत, तर वडील राजकारणात होते.

_ManishaKadam_2_0.jpgमनीषा कदम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध संस्थांकडून त्यांना पुरस्कार लाभले –

•    जिल्हा परिषदे (औरंगाबाद)चा ‘आदर्श पर्यवेक्षिका’ पुरस्कार (8 मार्च 2011)
•    पुणे बालेवाडीचा ‘यशस्वी महिला अधिकारी’ पुरस्कार (8 मार्च 2012)
•    राज्य शासनाच्या यशवंत पंचायतराज ग्राम अभियानातर्फे ‘गुणवंत कर्मचारी’ पुरस्कार (12 मार्च 2012)
•    पारिजातक कन्सल्टन्सी यांच्यातर्फे ‘हिरकणी’ पुरस्कार (2014)
•    ‘लोकमत सखी सन्मान’ 2015-16
•    जायंट ग्रूप ऑफ औरंगाबाद, सहेली (महाराष्ट्र) यांच्यातर्फे ‘गुणवंत अधिकारी’ पुरस्कार (2015-16)
•    बळीराम गायकवाड आदर्श शिक्षक पुरस्कार (1 एप्रिल 2018)
•    रमाई फाउंडेशन तर्फे ‘रमाई’ पुरस्कार (2018)

मनीषा कदम – बनसोडे – 9595302050

– वृंदा राकेश परब

vrunda.rane@gmail.com

About Post Author