अँग्री यंग मॅन – सूर्यकांत

0
141

केरवाडी-परभणीचा सूर्यकांत कुळकर्णी हा सतत अस्वस्थ व म्हणून संतप्त असतो. त्याची अस्वस्थता, त्याचा संताप सात्त्विक असतो. कारण ती चीड सामाजिक गैरव्यवहारामधून आलेली असते. त्याचे कार्यक्षेत्र शिक्षण (मुख्यत: प्राथमिक) आणि बालमजुरी. त्या दोन्ही क्षेत्रांत त्याने गेल्या पन्नास वर्षांत अनेकविध कामे केली आहेत – तो राज्य व राष्ट्रीय विषय समित्यांवर वेळोवेळी ‘मेंबर’ राहिला आहे. त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणचा अन्याय, अत्याचार, अनाचार त्याला सदोदित दिसत असतो. मग सूर्यकांत सतत नवनवीन प्रकरणे सरकारी अधिकाऱ्यांसमोर मांडत असतो. ती यंत्रणा इतकी मुर्दाड, की तेथील अधिकारी सूर्यकांतचा संताप समजावून घेतात आणि निर्ढावल्यासारखी उत्तरे देतात.

पण एकदा परभणीच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूर्यकांतची छान जिरवली. त्यावर सूर्यकांतला आत्मटीकेखेरीज व म्हणूनच हताशतेखेरीज दुसरा पर्यायच राहिला नाही. घडले असे, की परभणीच्या वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर सनसनाटी हेडलाइन होती, मराठवाड्यातील  शाळांतून ऐंशी टक्के मुलांनासुद्धा कोणत्याही प्रकारचे शिक्षण मिळत नाही आणि ती कोरीच्या कोरी राहतात.

सूर्यकांत अस्वस्थ झाला. त्याच्या केरवाडीवरून तो तासभर प्रवास करून परभणीला सी.इ.ओ यांचे कडे  गेला. त्याने ती बातमी त्कयांना  दाखवली. सी.इ.ओ साहेबांनी सहानुभूती प्रदर्शित केली, सूर्यकांतचा राग शांत होईतो ऐकून घेतले व मग त्यांनी सूर्यकांतला उलटा प्रश्न केला, की या हेडलाइनवर लोकांमध्ये किती खळबळ असण्यास हवी होती ! पालक शिकण्यासाठी म्हणून विश्वासाने मुलांना शाळांत पाठवतात, पण शाळांत शिक्षणच मिळत नाही. पालकांचा/जनतेचा केवढा विश्वासघात आहे हा ! परंतु शैक्षणिक अनास्थेची ती बातमी किंवा तशा शेकडो बातम्या आल्या तरी जनता ढिम्म हलत नाही. त्यांना मुलांना शाळांत पाठवले की त्यांचे काम झाले असे वाटते. पालक व एकूण जनता इतपतच सजग आहे, मग आम्ही नोकरदार किती तत्पर असणार? पालकच मुलांच्या शिक्षणाबद्दल असे बेफिकीर असतील तर…

सूर्यकांत  सी.इ.ओ.साहेबांच्या त्या निवेदनावर काय बोलणार? त्याचे परभणीच्या पालम तालुक्यातील शिक्षण व अन्य सेवा सुधाराव्या यासाठी प्रयत्न चालू असतात व दुसऱ्या बाजूस एकूण सामाजिक निष्काळजीपणाबद्दल तो हतबलता व्यक्त करत राहतो – मात्र तेवढ्यापुरता. तो या सत्तराव्या वर्षीदेखील ‘अँग्री यंग मॅन’ असतो.

– प्रतिनिधी

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here