नवरात्रातील वडजाई

1
63

नवरात्राला गणेशोत्सवासारखे स्वरूप येत चालले आहे, पण आमच्या लहानपणी तसा प्रकार नव्हता; तरीही आम्ही नवरात्राची वाट कितीतरी आतुरतेने बघत असू! घटस्थापनेला घरोघरी घट बसवले जात. पहिली माळ, दुसरी माळ असे करता करता दहाव्या माळेला दसर्‍याचा, आनंदाला तोटा नसणारा सण दारात हजर होई.

ताई स्वयंपाकघरात जेथे दिवा विझणार नाही अशा कोनाड्यात घट बसवत असे. घराच्या भोवतीने काळ्या मातीत गहू पेरले जात. देवही त्या नऊ दिवसांत घटी बसत अन् ताईचे नवरात्राचे नऊ दिवसांचे उपवास सुरू होत. आम्हाला ओढ असे ती मात्र वडजाईच्या दर्शनाची.

वडजाई देवीचे मंदिर वडांगळी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. गंगावाटेला तामसवाडीकडे जाताना जुन्या पांढरीवर एका शेतातील चबुतर्‍यावर घरवजा धाब्याचे छत असलेले ते मंदिर! दहा बाय दहापेक्षाही छोटे. कळसाचा तोरा नसलेले..! (तोरा मिरवत नसलेले मंदिर) शेतात वस्ती करून राहणार्‍या एखाद्या शेतकर्‍याच्या घरासारखे. देवीच्या साधेपणाबद्दल कल्पना (मंदिर साधे) त्यावरून यावी. त्याच ठिकाणी जुने गाव वसलेले होते असे म्हणतात. त्यामुळे त्या ठिकाणाला पांढरी असे नाव पडले आहे. रस्त्याच्या पलीकडे जुन्या पांढरीवरील मारुतीचे छोटेसे मंदिर लक्ष्मण मास्तरांनी साकारलेले.

वडजाईची आठवण गावाला होते, ती नवरात्रात. एरवी, ती गावापासून दुर्लक्षित असते. देवीची छोटीशी दगडी मूर्ती, मंदिरासमोर चबुतर्‍यावर दगडी पादुका, देवीसमोर अखंड नऊ दिवस तेवणारा दगडी दिवा. घट मांडलेले. घटाभोवती हिरवे धने अन् आजुबाजूचा हिरवा शिवार. मुख्य रस्त्यापासून शे-दोनशे फूटांवर असलेल्या मंदिरात पीकांमधून वाट हुडकत जावे लागते.

एकदा घट बसले, की कधी एकदा शाळा सुटते अन् आम्ही चाकार्‍या (लहानपणीचा सायकलचा खेळ) घेऊन वडजाईच्या रस्त्याला लागतो असे होऊन जाई. नवनाथ, पांडू, सुहास, सुभाष अशी मित्रमंडळी सोबत असायची. प्रत्येकाच्या हातात चाकारी. चाकार्‍याही निरनिराळ्या प्रकारच्या- कोणाची सायकलच्या जुन्या फाटलेल्या टायरची, कोणाची सायकलच्या रिंगची तर कोणी मुले लहान लहान रिंगांना लांबलचक तारेने, तारेला रिंगच्या आकाराचे वळण देऊन मस्त रस्त्याने फिरवत चालत. चाकार्‍यांचा वेग वाढे तसा आमचाही वेग वाढत जाई. कोणाची चाकारी रस्त्यात अजिबात पडू न देता वडजाईपर्यंत जाते याची शर्यत लागायची.

आमच्याकडे स्वत:ची सायकल नव्हती. त्यामुळे माझ्याकडे रिंगची तर सोडा पण फाटक्या टायरचीही चाकारी नसायची. नवनाथ नावाचा मित्र मला ती एखाद्या सायकल दुकानदाराकडून अथवा कोणा मित्राकडून हिकमतीने मिळवून द्यायचा. आमच्यातील हिरो असलेला नवनाथ आणखीच सुपरहिरो नवरात्रांच्या दिवसांत बनून जायचा. त्याच्याशी मैत्री असणे याचासुद्धा आम्हाला कोण अभिमान वाटायचा! शाळा सुटण्याची घंटा झाली, की कधी एकदा दप्तर घरात भिरकावतो अन् चाकारी घेऊन बाहेर पडतो असे होई. सायंकाळी काय धमाल करायची ते दिवसभर वर्गात ठरलेले असे.

मी ‘ताईऽऽऽ! वडजाईला चाललो गं!’ असे म्हणत घराबाहेर पडून चाकारी पिटाळता पिटाळता, परवानगीची वाट न पाहता एका दमात शाळेजवळ येऊन पोचायचो. नवनाथसह इतर मित्रही तोपर्यंत तेथे येऊन आमची वाट पाहत असायचे. वडजाईच्या रस्त्यावर, मराठी शाळेच्या मागे – गावातील बहुतेक शेतकर्‍यांचे ‘खळे’ असायचे. त्या खळ्यांमध्ये एखादा झाप, जनावरांची दावण, झापात जनावरांचे भूस, चारा-वैरण, हंगाम असेल तर धान्याची रास, वाळवण असे बरेच काही असे. साधारण बाभळीच्या काट्यांचे काटेरी कुंपण, चार-दोन फळकुटे, लाकडे यांचा दोन बाजूंना मेढी ठोकून बनवलेला दरवाजा असे स्वरूप असे. संध्याकाळी खळ्यांमध्ये गायगुरांना चारा-वैरण करण्यासाठी, दूध काढण्यासाठी माणसांची वर्दळ असे.

सवसांजेची (संध्याकाळची) वेळ असल्याने रानातून दिवसभर काम करून परतणारे शेतकरी, बायामाणसे राखुळीच्या शेळ्या, गावगुरे यांचीही गर्दी असायची. त्या सगळ्या गर्दीतून वाट काढत आमच्या चाकार्‍या धावू लागत. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांना हुलकावणी देत, आरडाओरडा करत आम्ही चाकार्‍या पळवत असू. खळ्यांची हद्द संपली की खळगा सुरू होई. खळग्यात मोठ लवण (चढ-उताराचा रस्ता) आहे. वडजाई आणि गाव यांच्या मध्यावर खळग्यातच तवंग (छोट्या रस्त्यावर नाला असतो त्याखाली पाईप असतो तेथे दोन्ही बाजूला बांधलेला कट्टा) लागतो. त्या तवंगावर आम्ही विसावा घेत असू. तवंगाच्या आजुबाजूला रस्त्याच्या कडेला तरवडाची (दुष्काळी भागातील छोटे, पिवळ्या फुलांचे झाड) झुडपे होती, तरवड पिवळ्याधम्मक फुलांनी बहरलेले असत. त्याच्या फांद्या तोडून, फोक काढून चाकारीसाठी काठ्या बनवल्या जात. फोक कधी कधी तलवारीचे रूपही धारण करत अन् त्या विस्तीर्ण खळग्यात आमच्यातील मावळे जागे होत. खळग्यातील छोट्या-छोट्या टेकड्यांच्या आडून गनिमी काव्याचे युद्ध म्हणजे तलवारबाजी सुरू होई. त्या सार्‍या युद्धात नवनाथ सेनापती असायचा. मी त्याचा खास मित्र असल्याने कच्चे लिंबू असूनही माझ्या वाट्याला युद्धातील पराजय मात्र यायचा नाही. मित्रांनी आयुष्यभर सदैवच अशी पाठराखण केली. त्या मैत्रीचे मोल शब्दांनाही न तोलणारे!

आमचा हिरो, नवनाथला मात्र असल्या खेळांमध्ये फारसा रस नसायचा. त्याचा स्वभाव मुळात अडबंग! (दबंग, उनाड, खोडकर) शाळेत हुशार, चपळ व प्रत्येक गोष्टीत तरबेज असला, तरी त्याच्यातील अडबंगपणा काही वेळा उफाळून वर येई. नवरात्रात तर खासच! मग़ तो आम्हाला इंगळ्या पकडण्यास घेऊन जाई. तोपर्यंत आम्ही अनेक मित्रांनी इंगळी पाहिलेली नव्हती.

नवनाथच्या सवंगड्यांत, खरे तर, आम्ही अडाण्याच्या आळीतील मुलेच अधिक! गावात बहुसंख्य शेतकरी असताना सोनार, शिंपी, वाणी, ब्राह्मण, नोकरदार अशी, शेतीशी दुरून संबंध असणारी कुटुंबे आमच्या गल्लीत एकवटल्याने आमची गल्ली अडाण्याची ठरली होती. अशी अडाण्याची साळसूद पोरे तावडीत सापडल्यावर नवनाथच्या मर्दुमकीला जोर चढायचा.

नवनाथ खळग्यातील इंगळ्यांची बिळे शोधून आम्हाला थोडे दूर उभे करायचा. आम्ही चाकार्‍या एका हातात, जीव मुठीत धरून, आमच्या आमच्या चड्ड्या सावरून धरत एका बाजूला उभे राहत असू. नवनाथ हातात तरवडाची फोक घेऊन, इंगळी काढण्याचा मंत्र म्हणत बिळाच्या तोंडाशी सावध पवित्रा घेऊन फोक फिरवत घासत राहायचा.

‘इंगळी का पिंगळी सलाम करतीऽ
सलाम करतीऽऽऽ
आणाजी पाटलाला बोलवतीऽ
बोलवतीऽऽऽ
सुया मारुनी मंत्र फुकीतीऽ
मंत्र फुकीतीऽऽऽ

असा मंत्र सुरू व्हायचा. तरवडाच्या काडीने बिळाभोवती घासायला लागल्याने बिळात माती पडू लागे. माती आत गेल्यामुळे आतील इंगळी चवताळून बाहेर येई व तरवडाच्या फोकेवरच नांगीचे प्रहार करू लागे. इंगळी बाहेर आली रे आली, की आम्ही कितीतरी लांब पळून जात असू. मग हळू हळू, दबक्या पावलांनी पुढे सरकत इंगळीपासून काही अंतरावर जाऊन थांबत असू.

नवनाथ ‘येऽऽऽ! करगुटा तोडऽ करगुटा! असे कर, एक पदर दे तोडून!’  असे आदेश द्यायचा. कोणाचीच त्याचे आदेश डावलण्याची शामत नसायची. आम्ही प्रत्येकजण भीतभीत चड्डी आवळण्यासाठी चड्डीवर घट्ट बांधलेल्या करगुट्याचा एकेक पदर तोडून लांबूनच नवनाथकडे भिरकावत असू. मग तो करगुट्याची मधोमध सैल गाठ करून मोठ्या शिताफीने इंगळीची नांगी आवळायचा. इंगळी विंचवाच्या मानाने दुप्पट-तिप्पट आकाराची असते. तिचे ते अक्राळविक्राळ रूप, भलीमोठी टचटचीत नांगी पाहून आमची शिट्टी पिट्टी गुल होत असे. सहजच, तोंडातून ‘ये बाबोऽऽऽ!’ असे उद्गार बाहेर पडत.

तो एका इंगळीला दोरा बांधून मग ती दुसर्‍या बिळात सोडी. बांधलेली इंगळी बिळातील इंगळीला बरोबर खेचून काढत असे. पुन्हा बाहेर आलेल्या इंगळीची नांगी बांधण्याचा कार्यक्रम होई. मग त्यांची झुंज लावण्यात येई. दोघी एकमेकींना नांग्या मारून बेजार होऊन जात. इंगळ्यांचा हा खरा तर जीवघेणा खेळ! बालवयात थोडी चूक झाली असती तरी जिवावर बेतण्याचे काम. मात्र ती जिवाची बाजी स्वत: लावून आम्हाला वेगळे काही तरी करून दाखवणारा नवनाथ मात्र वेगळाच! त्याचे हे वेड एकदा इतके चेकाळले, की महाशय एका वारुळालाच ‘इंगळी का पिंगळी’चा मंत्र म्हणण्यास गेले, अन् तेथून सापच फुत्कारत बाहेर आला. आमची सर्वांची पळता भुई थोडी!

असे अनेक प्रसंग नवरात्रात घडलेले. दसर्‍याच्या दिवशी त्या सगळ्या खेळांना पूर्णविराम मिळे. आम्ही संध्याकाळी नीटनेटके कपडे घालून, डोक्यात टोप्या घालून, टोपीत घटाभोवतीच्या धनाचे तुरे खोवून शिलंगणाला निघत असू. वडजाईला धने, आपट्याचे सोने वाहून गावातील एकही उंबरा न सोडता घरोघर शिलंगणाचे सोने वाटत फिरत असू. प्रत्येक वडीलधार्‍यांच्या पावलावर डोके टेकण्यातील आनंद नवरात्रातील त्या खेळांपेक्षा कितीतरी पटींनी आता अधिक जाणवतो!

– किरण भावसार, kiran@advancedenzymes.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.